घरमुंबईमुंबईत पावसामुळे तिघांचा मृत्यू

मुंबईत पावसामुळे तिघांचा मृत्यू

Subscribe

पावसाने पुन्हा एकदा मुंबईकरांना खिंडीत गाठून रविवारीही घरी बसवले. शनिवारी दुपारपासून मुसळधार पडलेल्या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा खोळंबली होती. रेल्वेगाड्या उशीराने धावत होत्या. परंतु रविवारीही पावसाचा जोर कायमच राहिला आणि पुन्हा एकदा रेल्वेसह रस्ते वाहतूक विस्कळीत होऊन गेली. रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यामुळे याचा फटका मुंबईकरांना बसला नसला तरी अनेक भागांमध्ये घराघरांमध्ये तुंबलेल्या पाण्यामुळे लोकांची जीवाच्या आकांताने एकच पळापळ सुरु होती. दरम्यान, सांताक्रुझ येथे पावसामुळे शॉक लागल्याने आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. तर धारावीत खाडीत पडून एक तरुणाचा मृत्यू झाल्याचे कळते.

शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहर व दोन्ही उपनगरांमध्ये दीडशे ते दोनशे मिमी एवढा पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला होता. संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत शहरात ६ मिमी आणि उपनगरात १२ मिमी एवढा पाऊस पडला. त्यामुळे दिवसभरात मुंबईत पाऊस नसला तरी विरार, नालासोपारा, कल्याण, कर्जत आदी भागांमधील मुसळधार पावसामुळे तसेच तुंबलेल्या पाण्यामुळे लोकल सेवा ठप्प झाली होती. पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरु असली नायगाव-वसईमध्ये रेल्वे रुळांवर साचलेल्या पाण्यामुळे सकाळी वाहतूक ठप्प झाली होती. तर मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेची वाहतूक सकाळपासूनच बंद होती.

- Advertisement -

४०० कुटुंबांचे स्थलांतर
रविवारी भल्या पहाटे पावसाने जोर धरला होता. शहरातील शीव, तर पश्चिम उपनगरातील कांदिवली, जोगेश्वरी, अंधेरी, मालाड,सांताक्रुझ, गोरेगाव तसेच पूर्व उपनगरातील कुर्ला, घाटकोपर, चेंबुर, मुलुंड आदी भागांमधून पाणी साचले होते होते. वांद्रे खेरवाडी आणि पूर्व उपनगरांतील एल. बी. एस रोडवर पाणी तुंबले होते. मिठी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने येथील सुमारे ४०० कुटुबांचे स्थलांतर बैलबाजार येथील महापालिका शाळेमध्ये करण्यात आले. त्यासर्वांना महापालिकेच्यावतीने चहापाणी नाश्तासह जेवणाची व्यवस्था करण्यात आली होत. दरम्यान महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनीमिठी नदीची पाहणी करून नदीच्या पात्रातील पाण्याच्या पातळीचा आढावा घेतला.

तरुण खाडीत पडला
सकाळी पावणे आठच्या सुमारास गोरेगाव पूर्व येथील नुरानी मस्जिदजवळ दिडोशी येथे दरडीचा भाग काही रिकाम्या घरांवर कोसळला. येथील काही घरे आधीच रिकामी करण्यात आली होती. परंतु याठिकाणी असलेले चार लोकांना किरकोळ मार लागला. यापूर्वी ५० लोकांना स्थलांतरीत करण्यात आले होते. रविवारी पुन्हा आणखी ५० लोकांचे स्थलांतर करण्यात आले. धारावी येथे दुपारी साडेअकराच्या सुमारास धारावी बस डेपोच्यासमोरील राजीव गांधी नगर येथे राजा मोहम्मद मजार शेख (२०) हा तरुण खाडी परिसरात प्रात:विधीसाठी गेला होता. परंतु तो परत न आल्याने नागरिकांनी तो तरुण खाडीत पडल्याची तक्रार पोलिस ठाण्यात केली. त्यानुसार या तरुणाचा शोध संध्याकाळपर्यंत सुरु होता.

- Advertisement -

विजेच्या शॉकने आई-मुलाचा मृत्यू
सांताक्रुझ पूर्व येथील गोळीबार नगर येथील राजे संभाजी विद्यालयाजवळील सहयोग सहजीवन प्रगती मंडळाच्या भागात घरात पाण्यामुळे विजेचा शॉक लागल्याने ५२ वर्षीय माला भुमन्ना नागम आणि २६ वर्षीय संकेत भुमन्ना नागम हे जबर जखमी झाले हेाते.त्यांना जवळील व्ही.एन.देसाई रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांना त्यांना मृत घोषित केले.

चौपाट्यांवर कचरा
सकाळी समुद्राला मोठी भरती असल्याने या उधाणाच्या भरतीमुळे समुद्र लाटांबरोबरच आतील कचरा बाहेर फेकला जात होता. त्यामुळे दुपारी महापालिकेने विशेष कामगारांच्या मदतीने ही सफाई केली. जुहू चौपाटीवरुन ११५ मेट्रीक टन , तर वर्सोवा चौपाटीवरून ९७ मेट्रीक टन आणि दादर-माहिम चौपाटीवरून ३० मेट्रीक टन कचरा साफ करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -