घरदेश-विदेशबीएसएफ जवान तेज बहादुरच्या मुलाची आत्महत्या

बीएसएफ जवान तेज बहादुरच्या मुलाची आत्महत्या

Subscribe

रोहीत हा तेज बहादुर आणि शर्मिला देवी यांचा एकुलता एक मुलगा होता. रोहित दिल्लीमध्ये बीएससीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता.

भारतीय लष्करात दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवणाचा व्हिडिओ फेसबुकवर टाकणाऱ्या माजी बीएसएफ जवान तेज बहादुर यादव याच्या मुलाने आत्महत्या केली आहे. गुरुवारी रात्री रोहित यादवने वडिलांच्या बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. रेवाडीतील शांती विहारमध्ये असणाऱ्या घरामध्ये रोहितने आत्महत्या केली आहे. त्यावेळी घरामध्ये कोणीच नव्हते. तेज बहादुर त्यावेळी प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात गेले होते तर त्यांची पत्नी शर्मिला देवी ही ऑफिसला गेली होती. या घटनेची माहिती मिळताच हरियाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रोहितचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. रोहितच्या मृतदेहाशेजारी पोलिसांना बंदुक सापडल्यामुळे त्याने बंदुकीने आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

- Advertisement -

घरात कोणी नसताना केले हे कृत्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहीत हा तेज बहादुर आणि शर्मिला देवी यांचा एकुलता एक मुलगा होता. रोहित दिल्लीमध्ये बीएससीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता. रोहित दोन दिवसांपूर्वीच घरी आला होता. गुरुवारी रात्री शर्मिला देवी ज्यावेळी ऑफिसवरुन घरी आल्या त्यावेळी रोहितच्या खोलीचा दरवाजा आतमधून बंद होता. त्यांनी त्याला आवाज दिला मात्र त्याने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर शर्मिला देवींनी आसपासच्या लोकांना सांगितले. त्यांनी दरवाजा तोडला तर रोहित बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.

स्टंट केल्याचा संशय

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, रोहितचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. रोहितने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळावरुन बंदुक देखील ताब्यात घेतली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बंदुकीचे लायसन्स होते की नाही याचा तपास केला जात आहे. बंदुकीमधील मॅगझिन पलंगवर पडले होते. त्यामुळे रोहित मॅगझिन काढून स्टंट करत असावा आणि ही घटना घडली असावी असा देखील संशय व्यक्त केला जात आहे. यासर्व बाजूने पोलिसांचा तपास सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -