घरमुंबईसुशिक्षित-सुसंस्कृत डोंबिवली बनतेय क्राईम सिटी

सुशिक्षित-सुसंस्कृत डोंबिवली बनतेय क्राईम सिटी

Subscribe

कधी नक्षलवादी तर कधी शस्त्रांचा साठा

डोंबिवली शहरात चोरी, घरफोडी आणि गोळीबाराच्या घटना नित्याच्याच घडत असतानाच आता भाजपचे शहर उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानात प्राणघातक शस्त्रांचा साठा आढळून आल्याने सुशिक्षित, सुसंस्कृत समजली जाणारी डोंबिवलीनगरी हादरून गेली आहे. काही महिन्यांपूर्वीच भाजप पुरस्कृत नगरसेवकाच्या हत्येसाठी एक कोटीची खंडणी दिल्याप्रकरणी भाजपचा नगरसेवक तुरुंगात आहे. पुन्हा भाजपचा पदाधिकारी अडकल्याने डेांबिवलीत भाजपची प्रतिमा मलीन होत आहे. यापूर्वी डोंबिवलीत चार नक्षलवाद्यांना एटीएसच्या पथकाने अटक केली आहे. गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत असल्याने सांस्कृतिक आणि साहित्य नगरीवर गुन्हेगारीची काळी छाया पसरली आहे. त्यामुळे सुशिक्षित डोंबिवलीची क्राईम सिटी बनत चालल्याचे दिसून येत आहे.

सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली शहरात गेल्या वर्षभरात गंभीर स्वरूपाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २०१८ मध्ये तीन, तर २०१७ मध्ये सहा जणांच्या हत्या झाल्या होत्या. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरताना दिसत आहेत. डोंबिवली पश्चिमेतील सखारामनगर परिसरात कुंदन जोशी (३२) या तरुणाची हत्या करण्यात आली होती. प्ले-बॉयच्या जॉबची ऑफर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवल्याच्या रागातून हा प्रकार घडला होता, तसेच पूर्वेतील देसलेपाडा येथे राहणारा अथर्व वारंग या सात वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या केली. तब्बल दोन महिन्यानंतर पोलिसांनी एहसान साबीर आलम आणि नदीम जाकीर आलम या दोघांना अटक केली होती. सोनारपाडा परिसरातील भंगार व्यावसायिक दीपक चौहान याचीही हत्या करण्यात आली होती. मद्यविक्री करणार्‍या कर्मचार्‍याला चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील साडेतीन लाखांची रोकड लुटून नेण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी शैलेश रॉय, अनंत पवार या दरोडेखोरांना अटक केली, तसेच पूर्वेतील मानपाडा रोडवरील रमेश गोल्ड नावाचे ज्वेलर्स दुकानाचे मालक रमेश नहार आणि कर्मचारी प्रदीप जैन हे दुकान बंद करून जात असतानाच दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी जैन यांच्या हातातील दागिन्यांची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न करत गोळीबार केला हेाता. मात्र, सुदैवाने गोळी कोणालाही लागली नाही.

- Advertisement -

केडीएमसीतील भाजप पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांना ठार मारण्यासाठी एक कोटीची सुपारी दिल्याप्रकरणी भाजप नगरसेवक महेश पाटील यांच्यासह दोन जण अटकेत आहेत. यापूर्वीही शहरात खंडणीसाठी व्यापारी, उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिकांना धमकावण्याचे तसेच पैसे न मिळाल्यास हत्या करण्याचे प्रकार घडले होते. त्यानंतर पेट्रोल पंप लुटणार्‍या, बँकांवर दरोडे टाकणार्‍या टोळ्यांनी उच्छाद मांडला होता. काही वर्षांपूर्वी शाळकरी विद्यार्थ्यांचे खंडणीसाठी अपहरण आणि हत्येच्या घटना घडल्या होत्या. डोंबिवली पूर्वेतील गांधीनगर परिसरातील एका सोसायटीत एटीएसच्या पथकाने चार नक्षलवाद्यांना अटक केल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील ९० च्या दशकात गाजलेल्या केएमसी टोळी आणि नवनाथ टोळीचे आपापसातील युध्दाच्या आठवणी यानिमित्ताने ताज्या झाल्या आहेत. कल्याण-डोंबिवलीतील बहुतांश गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नगरसेवक आहेत. कमरेला पिस्तूल लावून बॉडीगार्डच्या गराड्यात वावरणार्‍या दादा भाई नगरसेवकांची संख्या कमी नाही. त्यामुळे राजकारणातील गुन्हेगारीकरण हे येथे पहावयास मिळते.

ठाण्यातील गुह्यांमध्ये वाढ
ठाण्यातील गुन्ह्यांमध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वार्षिक गुन्हे अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. २०१७मध्ये गुन्हे उघडकीला येण्याचं प्रमाण ५८ टक्के होते. तर, २०१८मध्ये तेच प्रमाण ६३ टक्क्यांवर वर गेलं आहे. विनयभंग, दरोडा, चोरी, अपहरण, सरकारी कर्मचा-यांना मारहाण, आत्महत्येचा प्रयत्न, निष्काळजीपणे मृत्यूला कारणीभूत ठरणे असे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलं. तर, बलात्काराच्या ३०७ गुन्ह्यांपैकी२८८ गुन्हे पोलीसांना उघडकीस आणता आले. चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मात्र हे प्रमाण तुलनेत कमी आहे.

- Advertisement -

२०१७ मधील गंभीर घटना
सुरेश मंचेकर टोळीचा गुंड विठ्ठल नवघरे याची चाकूने भोसकून हत्या
ठाकुर्लीत घराच्या दुरुस्तीचं काम घेण्याच्या वादातून किशोर चौधरी आणि महिमादास विल्सन यांची हत्या
मानपाड्यात कैर्‍या तोडण्याच्या वादातून जयेश म्हात्रे याच्यावर गोळीबार
आयरे गावात जागेच्या वादातून विक्रांत उर्फ बाळू केणे या तरुणाची गोळ्या झाडून हत्या

२०१८ मधील घटना
डोंबिवली सखारामनगर परिसरात कुंदन जोशी या ३२ वर्षीय तरुणाची हत्या.
देसलेपाडा येथे राहणारा अथर्व वारंग या सात वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या केली होती.
सोनारपाडा परिसरातील भंगार व्यावसायिक दीपक चौहान याचीही हत्या.
रमेश गोल्ड ज्वेलर्सचे मालक रमेश नहार यांच्यावर गोळीबार.
भाजप पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी भाजप नगरसेवक महेश पाटील अटकेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -