घरसंपादकीयअग्रलेखब्रिटनचा भारतीय कप्तान!

ब्रिटनचा भारतीय कप्तान!

Subscribe

त्यांच्यामागे समर्थक सदस्यांचे भक्कम पाठबळ असल्याने कदाचित या कसोटीत ते उत्तीर्ण होतील आणि तो त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरेल.

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारतात दिवाळीचा डबल धमाका सुरू असताना अवघ्या चार दिवसांना तमाम भारतीयांचा उर आनंदाने आणि अभिमानाने भरून येईल अशी घटना घडली. अवघा देश लक्ष्मीपूजनच्या तयारीत असताना ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ॠषी सुनक यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्याचे वृत्त आले. ज्या ब्रिटनच्या साम्राज्यावरील सूर्य कधी मावळत नसे, ज्यांनी भारतासह जगातील अनेक छोट्या-मोठ्या देशांवर हुकमत गाजवत त्यांना पारतंत्र्यात ठेवले त्या ब्रिटनला भारतीय वंशाचा पंतप्रधान स्वीकारावा लागलाय हा काळाने उगवलेला सूड म्हणायला हरकत नाही.

अर्थात ब्रिटनमधील लोकशाही प्रगल्भ असल्याने सुनक यांच्यासाठी पंतप्रधानाच्या खुर्चीपर्यंतचा मार्ग सोनेरी झाला हेही नाकारता येणार नाही. आपल्याकडे अशी पद्धती असती तर घोडेबाजार, केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक असे बरेच काही झाले असते. सुनक म्हणतात, ब्रिटनला भारताकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे, तसे भारतीय राज्यव्यवस्थेने ब्रिटनची राज्यव्यवस्थाही समजून, शिकूून घेण्यास हरकत नाही. अवघे ४२ वर्षीय सुनक ब्रिटनच्या सर्वोच्च पदावर याच आठवड्यात विराजमान झाल्यानंतर त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. जगातील महत्त्वाच्या विविध क्षेत्रात भारतीय तरुण देदीप्यमान कामगिरी बजावत असताना सुनक नामक तरुण विस्कटलेल्या अर्थव्यवस्थेसह अनेक आव्हानांवर मात करेल, अशी अपेक्षा आपण करूया!

- Advertisement -

बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रीपद भूषविण्याचा अनुभव सुनक यांना आहे. कोविड काळात त्यांनी बजावलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. विविध उपाययोजना राबवून अर्थव्यवस्था ‘चालती-बोलती’ ठेवण्यात त्यांना यश आले. कोविडचा जोर ओसरताच दिलेल्या सवलती थांबविण्याचे धाडस दाखविल्याने सुनक टीकेचे धनी ठरले. याचा फटका त्यांना पुढील निवडणुकीत बसला. तरीही तरुण असल्याने राजकीय ईर्षा असणार हे ओघाने येते. ब्रिटनमधील शक्तीमान समजल्या जाणार्‍या हुजूर पक्षाचे ते सप्टेंबरमध्ये झालेल्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीतील उमेदवार होते. पण त्यांच्या पक्षाने त्यांना नाकारल्याने करकपात आणि इंधन सवलतीचे गाजर दाखविणार्‍या लिझ ट्रस यांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली. अनुभव नसल्याने या बाईंचे अपेक्षित असलेले धोरण सपशेल फसले आणि अवघ्या ४४ दिवसांत त्यांच्यावर पदावरून पायउतार होण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे ॠषी सुनक यांचा बोलबाला पुन्हा सुरू होणे अपेक्षित होते.

याचवेळी माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या नावाची चर्चाही होती. परंतु त्यांनी ऐनवेळी माघार घेतली. पक्षाच्या अन्य उमेदवार पेनी मॉरडॉन्ट यांनी उमेदवारी जाहीर केली होती. परंतु तेथील नियमानुसार आवश्यक असलेले शंभर जणांचे पाठबळ त्यांना मिळवता आले नाही. याचवेळी सुनक यांनी शंभरहून अधिक जणांचा पाठिंबा असल्याचे सांगत रिंगणात उडी घेतली. प्रत्यक्षात सुनक यांना दोनशेहून अधिक जणांचा पाठिंबा मिळाला, तर दुसरीकडे मॉरडॉन्ट यांना ३० जणांचाही पाठिंबा मिळाला नाही. स्वाभाविक त्यांनी माघार घ्यावी, असे आवाहन त्यांना करण्यात आले. समोरची परिस्थिती साथ देणारी नसल्याने मॉरडॉन्ट यांनी माघार घेताच सुनक पंतप्रधान होणार हे निश्चित झाले.

- Advertisement -

ज्या देशात प्रोटेस्टंट ख्रिश्चन बहुसंख्येने आहेत त्या देशाने भारतीय वंशाचा माणूस सर्वोच्च पदावर बसविण्याचा उदारपणा दाखविला ही बाब निश्चितच कौतुकास्पद असून, भारतात एकत्र राहून निवडणुकीच्या काळात खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणार्‍यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. जात-पात, वंश, धर्म यापेक्षा कर्तृत्वाला आम्ही महत्त्व देतो हे ब्रिटनने दाखवून दिले. असेच उदाहरण अलीकडे अमेरिकेतही पाहण्यास मिळाले. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेसारख्या लोकशाहीप्रधान आणि बलाढ्य देशाच्या उपाध्यक्षा आहेत. हॅरिस, सुनक यांच्या रूपाने भारतीयांचा डंका सातासमुद्रापलीकडे वाजतोय हे ऊठसूठ गलिच्छ राजकारण करणार्‍या भारतीय नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे. उद्या कदाचित सुनक हे हिंदू आहेत, ते श्रद्धाळू आहेत, ते मंदिरात नियमितपणे जातात म्हणून त्यांच्या नावाचा वापर राजकारणात करून घेतला जाईल. इतकेच नव्हे तर गोर्‍या साहेबांना एका हिंदूने कशी सणसणीत चपराक हाणली म्हणून अकलेचे तारे तोडले जातील! मात्र असे होऊ नये यातच आपले भले असेल.

ॠषी सुनक जसे भारतीय वंशाचे आहेत तसे ते भारताचे जावईही आहेत. सुनक यांचे आई-वडिल मूळचे पंजाबचे आहेत. नंतर ते लंडनमध्ये स्थायिक झाले. ॠषी यांचा जन्म तेथील असून, ते भारतीय अब्जाधीश ‘इन्फोसिस’चे सर्वेसर्वा नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. ‘इन्फोसिस’च्या सर्वाधिक मोठ्या समभागधारकांत त्यांची गणना होते. स्वतः सुनक साडेसहा हजार कोटीहून अधिक मालमत्तेचे मालक आहेत. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा फटका इतर देशांप्रमाणे ब्रिटनलाही बसला आहे. करकपातीचे धोरण ब्रिटनसाठी कुर्‍हाडीच्या दांड्याप्रमाणे ठरले आहे. परिणामी ब्रिटनची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. अर्थमंत्री राहिलेले सुनक देशाला आर्थिक शिस्त कशी लावणार, हा औत्सुक्याचा भाग आहे. एक गडगंज व्यक्ती गरीब देशाला काय आर्थिक शिस्त लावणार, अशीही टीका त्यांच्यावर होऊ शकते. सुनक यांना अतिशय संयमाने पुढील वाटचाल करावी लागणार आहे. आर्थिक शिस्त लावताना अनेकदा कटू निर्णयही घ्यावे लागतात. त्यामुळे ब्रिटनच्या २०० वर्षांच्या इतिहासातील पहिलाच तरुण पंतप्रधान अशी बिरूदावली लागलेल्या सुनक यांची खर्‍या अर्थाने कसोटी लागणार आहे.

त्यांच्यामागे समर्थक सदस्यांचे भक्कम पाठबळ असल्याने कदाचित या कसोटीत ते उत्तीर्ण होतील आणि तो त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरेल. मागील निवडणुकीत ‘मी निवडणूक जिंकण्यासाठी कर कपात करणार नाही, तर कर कपात करण्यासाठी निवडणूक जिंकेन’ असे ठाम प्रतिपादन करणारे सुनक उच्च विद्याविभूषित आहेत. राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयात त्यांनी प्राविण्य मिळविले आहे. अत्यंत हुशार राजकारणी अशी त्यांची ओळख आहे. कधी काळी सोन्याचा धूर निघणार्‍या ब्रिटनला आर्थिक बेशिस्तीचे चटके सहन करावे लागत आहेत. यातून राजकीय अस्थिरता आली. त्यामुळे गेल्या अवघ्या ६ वर्षांत देशाला ४ पंतप्रधान निवडावे लागले. ब्रिटनची खडतर मार्गक्रमणा चालू असताना ॠषी सुनक पंतप्रधान म्हणून विराजमान होत आहेत. राजे चार्ल्स तिसरे यांची भेट घेतल्यानंतर या पदावर त्यांची अधिकृत नियुक्ती होईल. भारताने सुनक यांचे स्वागत केले आहे. ब्रिटन आणि भारताचे राजनैतिक संबंध बहुतांश सौहार्दाचे राहिले आहेत. सुनक यांच्या काळात ते अधिक दृढ होतील अशी आशा आहे. ब्रिटनच्या ‘भारतीय कप्ताना’च्या पुढील खेळीला भारतीयांच्या नक्कीच शुभेच्छा आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -