घरसंपादकीयअग्रलेख‘बेटी बचाव’ची पुण्यातून सुरुवात

‘बेटी बचाव’ची पुण्यातून सुरुवात

Subscribe

येत्या वर्षभरात लोकसभा आणि पाठोपाठ विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक पक्षाची मोर्चेबांधणी सुरू आहे. पुढार्‍यांकडून एकमेकांचे राजकीय वस्त्रहरण सुरू आहे. तर दुसरीकडे, सर्वसामान्य विविध प्रश्नांना तोंड देत आहेत. अशातच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुण्याची तर आता गुन्हेगारीचे केंद्र अशी ओळख निर्माण झाली. कोयता गँगची दहशत तर आहेच, त्यातच येथे मुली, महिला सुरक्षित नसल्याचेही विविध दुर्घटनांद्वारे दिसत आहे. मंगळवारी एका तरुणीवर तरुणाने केलेला जीवघेणा हल्ला हे त्याचे ताजे उदाहरण आहे. एकतर्फी प्रेमातून एमपीएससीच्या विद्यार्थिनीवर एका तरुणाने जीवघेणा हल्ला केला.

सतर्क नागरिकांनी दाखवलेल्या, विशेषत: लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्या तरुणीचा जीव वाचला. या घटनेच्या साधारण १५ दिवस आधी पुण्यातच २६ वर्षीय दर्शना पवार हिची हत्या तिचाच मित्र राहुल हंडोरे याने केल्याची समोर आले होते. राजगडाच्या पायथ्याशी तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. एमपीएससी परीक्षेत दर्शना तिसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. दर्शनाशी मारेकर्‍याला लग्न करायचे होते, परंतु तिने त्याला नकार दिला. याच रागातून त्याने अमानुषपणे तिचे जीवन संपवले. पुण्यात मंगळवारी घडलेल्या घटनेतील तरुणीदेखील एमपीएससीचीच विद्यार्थिनी असून हल्लेखोरे आधी तिच्याच कॉलेजमध्ये शिकत होता. त्यानेही तिला लग्नाची मागणी घातली होती आणि त्याला तिने नकार दिला होता. म्हणूनच त्याने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत.

- Advertisement -

पुरोगामित्व, महिला स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समानता, धर्मनिरपेक्षता आणि अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या इतर अनेक चळवळींचे माहेरघर असलेल्या महाराष्ट्रात अशा घटना घडणे, हे अयोग्यच आहे. अशा घटना घडल्यानंतर सर्वाधिक बंधने येतात, ती मुली आणि महिलांवर. एकटे-दुकटे बाहेर जाण्यावर, रात्री उशिरा जास्त वेळ बाहेर राहण्यावर, कुठल्या कार्यक्रमांना जाण्याबाबत, नाट्य-चित्रपटांचे उशिराचे खेळ पाहण्यावर निर्बंध येतात. प्रत्यक्षात अशा नराधमांना वचक बसण्याची गरज आहे. मग अशा घटनांतून काही प्रश्नही निर्माण होतात. पहिला सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा की, मुले नकार पचवू शकत नाहीत का? पूर्वी यातूनच अ‍ॅसिड हल्ल्यासारख्या घटना घडल्या आहेत. वर्धा येथील हिंगणघाट जळीतकांड हे त्याचेच उदाहरण आहे.

३ फेब्रुवारी २०२० रोजी हिंगणघाट येथे आरोपी विकेश नगराळेने एकतर्फी प्रेमातून पेट्रोल टाकून प्राध्यापिका तरुणीला जिवंत पेटवले होते. यात गंभीररित्या जखमी झालेल्या पीडित प्राध्यापिका तरुणीचा उपचारादरम्यान १० फेब्रुवारी २०२० रोजी मृत्यू झाला होता. दुसरा प्रश्न म्हणजे, जेव्हा आपण करियरला प्राधान्य देत असतो, तेव्हा कुटुंबीयांव्यतिरिक्त आसपासच्या व्यक्तींना आपल्या आयुष्यात किती स्थान द्यायचे, हा निर्णय मुली करू शकत नाही का? एखादा धोका जाणवल्यावर थेट पोलिसांकडे जाण्याचा मार्ग का निवडला जात नाही? श्रद्धा वालकर आणि सरस्वती वैद्य प्रकरणांमध्ये हेच घडल्याचे पहायला मिळाले. श्रद्धाने पोलिसांकडे जाण्याचे धाडस दाखवले असले तरी, नंतर तिने अचानक परिस्थितीपुढे नमते घेतले आणि जीव गमावून बसली. असे एखादे काही भयानक कृत्य घडणार असल्याचे संकेत कुठे ना कुठे मिळत असतात. त्यासाठी सतर्क तसेच ठाम राहण्याची गरज असते.

- Advertisement -

दर्शना पवारची हत्या निर्जन स्थळी करण्यात आली, पण मंगळवारची घटना गजबजलेल्या सदाशिव पेठेत घडली. कोयता घेऊन हल्लेखोर मुलीच्या मागे धावला, पण त्या मुलीला वाचविण्यासाठी अनेक जण धावले. अशीच सतर्कता गेल्या महिन्यात दिल्लीत एका १६ वर्षीय मुलीची भर रस्त्यात हत्या करण्यात आली, तेव्हा दुर्दैवाने दाखवली गेली नाही. साक्षी नावाच्या मुलीवर तिच्या कथित प्रियकराने तब्बल ४० वार केले आणि तिला दगडाने ठेचले. रहदारीच्या रस्त्यावर हा थरार सुरू होता, आजूबाजूने लोक जात-येत होते, पण कोणीही पुढे येऊन त्याला रोखण्याचे धाडस केले नाही. काही जणांनी मिळून त्या मारेकर्‍याला रोखण्याची हिंमत दाखवली असती तर साक्षीचाही जीव वाचला असता. मारेकर्‍याच्या हाती शस्त्रे असले तर लोक घाबरतात, पण एकत्रित प्रयत्न केल्यास मारेकर्‍याला रोखता येऊ शकते.

पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख चढाच राहिला आहे, त्यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. आयटी हब असलेले पुणे गुन्हेगारीचे केंद्र बनू नये, असे अपेक्षित आहे, पण आता पुण्याच्या या घटनेवरून कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत राजकीय शरसंधान सुरू आहे, पण त्याला अर्थ नाही. प्रत्येक ठिकाणी पोलीस असलेच पाहिजे, अशी अपेक्षा करणे अवाजवी आहे. मानवतेला कलंक लावणार्‍या अशा घटना वारंवार घडू नयेत, यासाठी नागरिकांच्या सजगतेची नितांत आवश्यकता आहे. महाविद्यालयात जाणार्‍या विद्यार्थिनींना रोडरोमियो, टवाळखोरांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असते. त्यांच्या विरोधात संबंधित मुलगी किंवा मुलीचे कुटुंबीय पोलिसांकडे जायला धजावत नसतील, तर परिसरातील नागरिकांनी पुढे यायला हवे. अशा घटनांचे व्हिडीओ शूटिंग करण्याला प्राधान्य देण्याऐवजी पीडित मुलीला वाचविण्याची जबाबदारी एक भारतीय नागरिक म्हणून आपलीच आहे, ही जाणीव ठेवणे गरजेचे आहे. ‘बेटी बचाव’ला पुण्याने सुरुवात केली आहे, आता इतर राज्य, शहरांनीही अशीच सतर्कता दाखवावी, एवढीच अपेक्षा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -