Eco friendly bappa Competition
घर संपादकीय अग्रलेख परमेश्वराला स्पर्धेत ओढू नका

परमेश्वराला स्पर्धेत ओढू नका

Subscribe

गुरुवारी रात्रीपर्यंत मुंबईतील जखमी गोविंदांची संख्या शंभरच्या पुढे होती. यापैकी ६२ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, तर ४५ जणांवर उपचार सुरू आहेत. ठाण्यात जखमी गोविंदांची संख्या शुक्रवारी दुपारपर्यंत २३वर पोहचली होती. दहीहंडीच्या थरथराटाची स्पर्धा जीवघेणी ठरत असल्याची चर्चा दरवर्षी होते. मागील वर्षीही गोविंदांचा थरावरून कोसळून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. धार्मिक सण उत्सव भारताच्या संस्कृतीचा भाग आहेत. जगात सर्वाधिक सण उत्सव भारतात साजरे केले जातात. दिवाळीत फटाक्यांच्या विषयावरून प्रदूषण आणि आग दुर्घटनांचा विषय येतोच. आता गणेशोत्सवाचे वेध लागले असताना रस्त्यावर बांधले जाणारे मंडप, त्यासाठी खोदल्या जाणार्‍या रस्त्यांबाबतही सूचना स्थानिक सरकारी यंत्रणांकडून येणार आहेतच.

यात धार्मिक विद्वेषाचा मुद्दा नाहीच. धर्म परंपरा, सण उत्सव आनंद घेऊन येणारे असतात, मित्र आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतात. सासरी गेलेल्या मुली माहेरी आईबापाच्या घरी सणानिमित्त येतात, त्यातून प्रेम जिव्हाळा वाढतोच. सणांच्या आनंदसोहळ्यात स्पर्धा नकोच. त्यामुळे त्याच्या धार्मिक आणि सामाजिक उद्दिष्टालाच आडकाठी होते. गणेशोत्सवातील उंचच उंच मूर्तींची स्पर्धा, नवसाला पावणार्‍या गणेश मंडळांतील स्पर्धा या राजकीय उद्देशाने आणि आपले शक्तिप्रदर्शन करण्यासाठीचा उद्देश यातून स्पष्ट व्हावा. गणेश ही बुद्धीची देवता मानली जात असताना बुद्धी गुंडाळून त्याची खरी आराधना, भक्ती करताच येणार नाही.

- Advertisement -

दहीहंडीमध्ये थरांच्या स्पर्धांमुळे अशी स्पर्धा अधिक धोकादायक होते. भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या लीलांचा आधार आजच्या दहीहंडीला खरंच आहे का? गोकुळात बाळगोपाळांसमवेत भगवंताने घरकुटींमध्ये मातीच्या घड्यांमध्ये हाताला पोहचण्याइतक्याच उंचावर टांगलेले लोणी चोरण्यासाठी सुदाम्याला घेऊन लावलेल्या थरांना राजकीय थरांच्या स्पर्धांचे रूप देणे खरेच गरजेचे आहे का? कुठल्याही सण उत्सवाच्या राजकीयीकरणामुळे त्यातील धार्मिक विश्वास, श्रद्धा दुय्यम ठरत नसते का? हाच प्रकार कुठल्याही सण उत्सवांच्या कर्णकर्कश्य डिजे, डोळे दिपवणार्‍या रोषणाईचाही, अगदी शिवजयंती असो किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्याचेही राजकीयीकरण, कर्णकर्कश्य स्पर्धा, शक्तिप्रदर्शनाची खरेच गरज असते का? उत्सवाचे स्वरूप धोकादायक होण्याने त्यातील सात्विकता लोप पावू लागते आणि मागे केवळ इव्हेंट उरतो.

ठाणे शहरात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत दहीकाला उत्सवात जखमी झालेल्यांची संख्या १७ होती. त्यात शुक्रवारपर्यंत भर पडून ही संख्या २३ झाली. या जखमी गोविंदांमध्ये १३, १६, १७ या गटातील मुले होती. अर्थातच ही मुले अल्पवयीन आहेत. या मुलांच्या आयुष्याची ही सुरुवात आहे. शिक्षण, छंद, खेळ जोपासण्याचे हे वय मात्र नऊ-दहा थरांची स्पर्धा लावून या मुलांना आपण धार्मिक सणांच्या नावाखाली धोक्यात टाकत आहोत का? असा प्रश्न निर्माण होतो. दुर्घटनेत जखमी झालेल्या मुलांमध्ये शारीरिक व्यंग निर्माण झाले तर त्यांचे आयुष्यभराचे नुकसान होते. थर उभारणी आणि स्पर्धांवर मर्यादा येण्याची गरज यानिमित्ताने दरवर्षी चर्चिली जाते, पण त्याचा उपयोग होत नाही. दहीहंडी उत्सव आणि प्रो-गोविंदा लीगदरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटना झाल्यास गोविंदांना सरकारकडून विमा संरक्षणाची घोषणा दरवर्षी होते.

- Advertisement -

अनेकदा पथकातील गोविंदांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास आणि असा गोविंदा त्याच्या कुटुंबाच्या पालनपोषणाचा आधार असल्यास संपूर्ण कुटुंबासमोरील भविष्याचा प्रश्न गंभीर असतो. यासाठी विमा कंपनीच्या माध्यमातून ५० हजार गोविंदांना प्रति गोविंदा ७५ रुपयांच्या हप्त्यांप्रमाणे एकूण ३७ लाख ५० हजार इतका निधी अदा करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. यात अपघाती मृत्यू संरक्षण रुपये दहा लाख, दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास विमा संरक्षण रुपये दहा लाख आहे. यातही दुखापतीच्या प्रमाणावर मिळणारी आर्थिक मदत असा निकष असतो. ही रक्कम संबंधित गोविंदांच्या कुटुंबातून हिरावलेल्या माणसामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढू शकते का? सण उत्सवामुळे आनंद वाढतो. असा आनंद मिळवण्यासाठी सणांचे निमित्त असते. सण उत्सवातून समाज एकत्र येत असतो, विचारांचे आदान प्रदान होते.

आपल्या रोजच्या धकाधकीतून थोडा वेळ धर्म आणि परमेश्वराच्या सान्निध्यात घालवून मनाला शांतता मिळण्यासाठी सण उत्सव गरजेचे असतात. त्याची अनाठायी स्पर्धा करण्याची गरज नसते. सण उत्सवातून शक्तिप्रदर्शनाची गरज राजकारण्यांना असते, धर्माची ही गरज कधीही नसते. धर्म किंवा परमेश्वर, भगवंत हा व्यक्तीच्या मनाचा विषय आहे, व्यक्ती धार्मिक असतो, समुदाय नाही. देव धर्म हा श्रद्धेचा विषय असतो आणि श्रद्धा ही वैयक्तिक असते. देव धर्म ही मानण्याची नाही तर जाणण्याची गोष्ट आहे. बाळकृष्ण म्हणजेच निखळ, निसर्ग आणि बालकाचे अस्पर्श गोंडस हास्य, ज्यात स्पर्धा नाही, एकमेकांहून पुढे जाण्याची अहमहमिका नाही. भगवंत हे विराटाचे रूप आहे. सूर्याला त्याच्या ऊर्जा प्रकाशाचा अहंकार नाही. गवताचे लहानपण त्याला खुजे करत नाही आणि वटवृक्षाला त्याचे मोठेपण नसते. कुठलाही अभिनिवेष न बाळगता नदी, पाऊस सरींचे थेंब, ओहळ, झरे अखेरीस सागरात सामावतात, त्यांची सागराशी स्पर्धा नसते. भक्तीमध्ये स्पर्धा नसावी, समर्पण असावे. तिथं कोणीही कोणाचे स्पर्धक नाही. त्यामुळे भक्तांनीही परमेश्वराला त्यांच्या राजकीय उत्सवांच्या स्पर्धेत ओढू नये.

- Advertisment -