घरसंपादकीयअग्रलेखडेडलाईन मरो आणि काम पूर्ण व्होवो

डेडलाईन मरो आणि काम पूर्ण व्होवो

Subscribe

मुंबई-गोवा महामार्गाचे कार्म पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच नवी डेडलाईन दिली आहे. गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गाची एक लेन सुरू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशील आहे. गणपतीच्या आधी या महामार्गावरील एका लेनचे काम पूर्ण करण्याचा विचार आहे. मुंबई-सिंधुदुर्ग मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून देण्यात आली.

मुख्यमंत्री डेडलाईन देत असतानाच रायगड जिल्ह्यातील मराठी पत्रकारांकडून महामार्गाच्या दुर्दशेविरोधात जोरदार आंदोलन सुरू होते. रखडलेल्या महामार्गासाठी भजनातून गार्‍हाणे घातले जात होते. सोबतच महामार्ग पूर्ण नाही, तर एकाही लोकप्रतिनिधीला मत नाही, अशी भूमिका घेतली जात होती. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण १२ रेल्वे स्थानकांचे रस्ते काँक्रिटीकरण व सुशोभीकरण या कामांचे दूरदृष्यप्रणालीद्वारे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. यावेळी कोकणाच्या गतिमान विकासासाठी येथील दळणवळण सुविधांमध्ये वाढ करण्यास आणि पायाभूत सुविधा उभारण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचा मनोदय राज्य सरकारने व्यक्त केला.

- Advertisement -

खरे तर मागील १७ पेक्षा जास्त वर्षांमध्ये राज्यात आणि केंद्रातही अनेक सरकारे आली नी गेली. हा महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय महामार्ग जात असलेल्या मुंबई-रायगड-कोकण-गोवा दरम्यानच्या पट्ट्यात अनेक आमदार-खासदार निवडून आले, पराभूत झाले. प्रत्येकाने आपल्या कार्यकाळात चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास नेण्याची आश्वासने दिली. काहींनी तर कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचे आश्वासनही दिले, पण कुठल्याही सरकारला वा लोकप्रतिनिधीला मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आजतागायत पूर्ण करता आलेले नाही, ही अतिशय लाजीरवाणी बाब म्हणावी लागेल. हे अपयश जितके या लोकप्रतिनिधी वा सरकारी यंत्रणांचे आहे, त्यापेक्षाही अधिक अपयश सरकारी यंत्रणांवर दबाव ठेवण्यात आणि अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधींना वारंवार निवडून देणार्‍या सर्वसामान्य जनतेचेही आहे.

पावसाळ्यापूर्वीच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी केली होती. पावसाळ्यात वाहनचालकांना त्रास होऊ नये म्हणून रस्त्यावरील खड्डे युद्धपातळीवर बुजवण्याचे आदेश त्यांनी दिले होते. याचवेळी गणपतीआधी महामार्गाची एक लेन पूर्ण करण्याचे आणि डिसेंबर अखेरपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन रवींद्र चव्हाण यांनी दिले होते. प्रत्यक्षात मात्र गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. डांबर, खडी टाकून बुजवण्यात आलेल्या रस्त्यावर जागोजागी भलेमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे कोकणात जाता-येताना प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात जातात.

- Advertisement -

मुंबईहून कोकणात जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग महत्त्वाचा मार्ग असल्याने बहुतांश चाकरमानी हाच मार्ग निवडतात, परंतु चौपदरीकरणाची रखडलेली कामे, खड्डे यामुळे या मार्गावरून वाहन चालवणे जीवघेणे ठरत आहे. या महामार्गावरून किमान ६० ते ८० किमी प्रति तास वेगाने वाहने धावत असतात. अशातच दीड-दोन फूट खोल आणि तीन ते चार फूट रुंद खड्डा मध्येच येतो आणि वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होतो. मागील काही दिवसांपासून एका तरुणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, डोळ्यात अंजन घालणारा आहे. या महामार्गावर अपघातात १ हजार ५१२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेचा मुद्दा नुकत्याच संपलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही विरोधकांकडून उचलून धरण्यात आला होता, पण त्यावर ठोस उत्तर राज्य सरकारला देता आलेले नाही.

दुसरीकडे देशातील रस्त्यांच्या रखडणार्‍या कामावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत खंत व्यक्त केली. यावेळी त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर पुस्तक लिहिता येईल, असे म्हणत हतबलता व्यक्त केली. गडकरी कुठल्याही कार्यक्रमात गेले की, आमच्या विभागाकडे पैशांची कमतरता नाही, लागेल तेवढा पैसा आम्ही खर्च करू शकतो, फक्त आम्हाला प्रस्ताव द्या की तुम्हाला कुठे आणि कसे रस्ते, उड्डाणपूल हवे आहेत, ते आम्ही बांधून देतो. आमच्या विभागाने ५०० दिवसांत ५०० किमी महामार्ग बांधून पूर्ण केला. दर्जाशी आम्ही तडजोड करत नाही, अन्यथा कंत्राटदाराला घरचा रस्ता दाखवतो, असा टेंभा नितीन गडकरी जिथे तिथे मिरवत असतात.

कधी उडती बस तर कधी ई हायवेच्या बाता मारत असतात, पण महाराष्ट्राचे सुपूत्र असलेल्या गडकरींना मागच्या ९ वर्षांमध्ये मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करून दाखवता आले नाही, यापेक्षा दुर्दैवी बाब काय असू शकते. वर्षाला १०० किमी याप्रमाणे एक लेन बनवली असती तरी आतापर्यंत दोन लेनचे काम पूर्ण झाले असते. सध्या राज्याचा सुकाणू गतिमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती आहे. मग या महामार्गाच्या कामाला गती का येत नाही? जनतेला सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम आहे. त्यात रस्त्यांची जोडणी ही महत्वपूर्ण बाब आहे. केवळ डेडलाईन देण्यापेक्षा लवकरात लवकर हा प्रकल्प मार्गी लागावा, अशी जनसामान्यांची इच्छा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -