घरसंपादकीयअग्रलेखवणवे...राजकीय आणि जंगलातील!

वणवे…राजकीय आणि जंगलातील!

Subscribe

सध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या राजकारणाचा दर्जा इतका खालावलाय की असे यापूर्वी कधीतरीच अभावाने दिसत होते. औकात नसलेले राजकारणात हिरीरीने पुढे येताना दिसताहेत. काल गल्लीत फिरणारा आणि टिंगलटवाळीचा विषय असणार्‍या ‘बाब्या’ला एका रात्रीत ‘बाबूराव’ किंवा ‘बाबूशेठ’ करण्याची किमया फक्त राजकारणातच आहे. यातील मतितार्थ लक्षात घेतला तर असे लक्षात येईल की राजकारणात उगवलेले हे ‘राव’, ‘शेठ’चे पीक सर्वसामान्याला अचंबित करणारे आहे.

त्यातच राजकारण आणि नीतीमूल्ये याचा आता दुरान्वयानेही संबंध राहिला नसल्याने सर्वसामान्य माणसाला उबग आला आहे. आपली पोळी भाजून किंवा शेकून घेण्यासाठी राजकीय वणवे जागोजागी पेटू लागले आहेत. याच्या झळा आता थेट सर्वसामान्यांना लागत आहेत. तीन दिवसांपूर्वी कल्याण पूर्वच्या आमदाराने भर पोलीस चौकीत गोळीबार करून एकच गोंधळ उडवून दिला. एक जबाबदार लोकप्रतिनिधीच असे कृत्य करणार असेल तर विश्वास ठेवायचा कुणावर, असा स्वाभाविक सवाल उपस्थित होतो. या गोळीबारावरून आता महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे.

- Advertisement -

सध्या उद्धव ठाकरे कोकण दौर्‍यावर असून ते सत्ताधार्‍यांची प्रत्येक भाषणात पोलखोल करीत असल्याने सत्ताधारीही त्यांच्यावर तुटून पडत आहेत. प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलून पेटलेल्या राजकीय वणव्यात तेल ओतत आहे. त्यातच सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणात ४०० पारचा नारा दिला आहे. त्यावरून रणकंदन सुरू झाले आहे. अशा प्रकारे राजकीय वणवे पेटत असताना त्यात दररोज विद्वेषाचे इंधन टाकून आग भडकवत ठेवली जात आहे. राजकारणात येऊ पाहणार्‍या तरुणाईने यातून नेमका कोणता बोध घ्यायचा हेच कळेनासे झाले आहे. त्यातच विरोधकांमागे चौकशी यंत्रणांचा लागलेला ससेमिरा राजकीय वणवा भडकवण्यात हातभार लावत आहे.

असे राजकीय वणवे पेटलेले असताना जंगलात लागणार्‍या वणव्यांकडे सत्ताधार्‍यांप्रमाणे विरोधकांनाही लक्ष देण्यास वेळ नाही. दरवर्षी महाराष्ट्रातील जंगल भागात ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून वणवे लागण्याचे प्रकार चालू होतात. यात वृक्षराजींची मोठ्या प्रमाणात हानी होते. महाराष्ट्रात जवळपास साडेएकसष्ट हजार चौरस किलोमीटर इतके प्रचंड जंगल आहे. त्यातील काही भाग राखीव असून साडेसहा हजारांहून अधिक चौरस किलोमीटर जंगल संरक्षित आहे. महाराष्ट्राची जंगल श्रीमंती माफियांच्या डोळ्यांत सतत येत असते. हे माफिया कोण तर थेट राजकारणाशी संबंधित असणारे किंवा ज्यांना राजकारण्यांचा उघड किंवा छुपा वरदहस्त असणारे असे! यांच्याकडून जंगल भाग पेटवून ओसाड केला जातो.

- Advertisement -

नैसर्गिक कारणामुळे वणवा लागणे जवळ जवळ बंदच झाले आहे. आता जंगल सर्रासपणे पेटवले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकण पट्ट्यात जंगलांतून वणवे लागण्याच्या घटनांत वाढ होऊ लागली आहे. सह्याद्रीच्या कुशीत असणारी जंगले जळताना पाहून अनेकांचा जीव व्याकूळ होत असतो, पण राजकीय वणवे पेटवण्यात मश्गूल असणार्‍यांना या जंगलांतील वणव्यांशी काहीएक देणे-घेणे उरलेले नाही. जंगलात लागणार्‍या वणव्यांचे प्रमाण रोखण्याची मागणी पर्यावरणप्रेमी आणि वनप्रेमी गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. वणवे रोखण्यासाठी वन विभागाकडून अनेक ठिकाणी जाळरेषा काढण्यात येतात, परंतु हे प्रमाण पुरेसे नसल्याने जंगले आगीच्या कचाट्यात अलगदपणे सापडत आहेत.

महाराष्ट्राच्या वन विभागाकडे वणवा विझवण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही. प्रगत राष्ट्रांतून वणवे विझवण्यासाठी खास प्रकारची विमाने किंवा हेलिकॉप्टर तैनात असतात. आमच्याकडे वन विभागाचे कर्मचारी स्थानिक ग्रामस्थांना मदतीला घेऊन झाडांच्या फांद्यांनी झपाट्याने पसरत जाणारी आग विझवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात. अलीकडच्या काही वर्षांत वणव्यांबाबत जनजागृती केली जात आहे, परंतु समाजातील विघातक प्रवृत्तींचे यामुळे मतपरिवर्तन होईल असे अजिबात नाही. जंगल पेटवून लाकडांची चोरटी वाहतूक केली जाते. वणव्याचा खरा फटका बसतो तो जंगली श्वापदे, सरपटणारे प्राणी आणि पक्ष्यांना! पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी पशू-पक्षी जंगलात असणे महत्त्वाचे असले तरी वणवे पेटवल्यामुळे ते सैरभैर होतात.

त्यात त्यांचा जीव जातो. आग लागल्यामुळे शिकार्‍यांचेही फावत असते. वणवा लागल्यानंतर जंगली श्वापदे नागरी वस्तीत घुसतात. मग एकतर त्यांची हत्या केली जाते किंवा तेथील रहिवाशांना या श्वापदांपासून बचावासाठी तारेवरची कसरत करावी लागते. गेल्या काही वर्षांत या घटना वारंवार घडत आहेत. वणव्यांमुळे जंगलांची दरवर्षी प्रचंड हानी होत असल्याचे सांगितले जाते. वणव्याचा विषय विधिमंडळातही अनेकदा उपस्थित झाला आहे, मात्र राजकीय वणव्यात समिधा टाकण्यासाठी आतूर असलेले राजकारणी जंगलांतून लागणार्‍या वणव्याला कधी गांभीर्याने घेत नाहीत.

त्यामुळे केवळ थातूरमातूर योजना राबवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. परदेशात जंगल संपत्ती वाचवण्यासाठी जेवढी सजगता दाखवली जाते तितकी आपल्याकडे नाही. जंगले ओरबाडून मालामाल कसे बनता येईल याकडे अनेकांचा कल आहे आणि यात राजकारणी हस्ते, परहस्ते मदत करत आहेत ही बाब सर्वात गंभीर वाटते. महाराष्ट्राच्या विविध भागात लागणारे वणवे रोखण्यासाठी राज्य शासनाने आता अलर्ट मोडवर आलेच पाहिजे. पर्यावरणाचा र्‍हास झाल्याने त्याची ‘फळे’ आपल्याला भोगावी लागत आहेत. आता उरलेसुरले जंगल पेटवण्याऐवजी ते शाबूत राहून अधिक भरगच्च कसे राहील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -