महानगरी मुंबई तसेच देशाची राजधानी असलेले दिल्ली शहर प्रदूषणाच्या विळख्यात इतके घट्ट अडकलेय की त्यातून या दोन महानगरांची लवकर सुटका होईल असे कोणतेही चिन्ह दिसत नाही. दिवसागणिक वाहनांची वाढणारी प्रचंड संख्या, मेट्रोची कामे, विविध ठिकाणी सुरू असलेली बांधकामे पर्यावरणाची हानी करीत असल्याचे स्पष्ट झाले असून प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाय योजले जात असले तरी तो प्रकार वरातीमागून धावणार्या घोड्यांसारखा आहे. मुंबई, दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाचा धसका आता लोक घेऊ लागले आहेत. इतकेच नाही तर धास्तीने काही जण थेट मुंबई, दिल्लीलाच बाय-बाय करण्याच्या निर्णयाप्रत आले आहेत.
एका संस्थेने या दोन शहरांसह इतर काही ठिकाणी काहींशी प्रातिनिधिक चर्चा केल्यानंतर हे वास्तव समोर आले आहे. किंबहुना ते धक्कादायक आहे. आपल्याकडे कोणतेही शहर वाढत असताना नियोजन नसते. झोपडपट्ट्या वसवून मतांची बेगमी करून ठेवण्यात आली आहे. जवळपास प्रत्येक राजकीय पक्षाने हे बेजबाबदार उद्योग केले आहेत. ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी मुंबई, दिल्ली या शहरांची अवस्था असल्याने ही शहरेे गर्दीने अक्षरशः फुगली आहेत. येणार्यांसाठी मग विविध सुविधा दिल्या गेल्या. त्यातूनच बांधकामे, मेट्रो अशी कामे वेगाने होऊ लागली. आज अस्ताव्यस्त कामे सुरू असताना कोठेही शिस्तीचा मागमूस नाही. त्यातून प्रदूषणाचा राक्षस माजतोय याकडे कुणालाही लक्ष द्यावेसे वाटले नाही. आता या प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात येऊ लागले आहे.
‘प्रिस्टिन केअर’ने केलेल्या सर्वेक्षणात मुंबई, दिल्लीतील १० पैकी ६ माणसे शहर सोडण्याच्या मनःस्थितीत असल्याचे समोर आले आहे. मूळ शहरवासी वाढत्या गर्दीमुळे यापूर्वीच बाहेर गेल्यानंतर आता बाहेरून आलेलेही प्रदूषणामुळे हे शहर नको म्हणण्याच्या मानसिकतेपर्यंत पोहचले आहेत. प्रदूषण आताच रोखा म्हणून पर्यावरणतज्ज्ञ गेल्या अनेेक वर्षांपासून बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत आहेत, परंतु त्यांनाच मूर्ख ठरविण्यात आले. आता उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर शासन, महानगरपालिका यंत्रणा प्रदूषण रोखण्यासाठी बाहेर पडल्या आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी जनतेला विश्वासात घ्यायला पाहिजे, ते अद्याप होत नाही. रोज रस्त्यावर पाण्याचे फवारे मारून प्रदूषण कमी होणार नाही.
दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस पडल्यानंतर सर्वांना कोण आनंद झाला! का म्हणे तर प्रदूषण रोखण्यास मदत झाली. या गोष्टीला हसावे की रडावे तेच समजत नाही. प्रदूषण नेमके कशामुळे होतेय याकडे लक्ष द्यायचे नाही आणि नंतर त्याच्या नावाने गळा काढून उपाययोजना करीत राहायचे. अनेकदा मूळ दुखर्या नसेवर ‘औषधोपचार’ करण्याऐवजी भलतेच प्रयोग करीत बसायचे म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा प्रकार आहे. प्रदूषणामुळे आमचा श्वास गुदमरायला लागलाय असे जनतेला वाटू लागल्याने तुमचे शहर तुम्हाला लखलाभ होवो म्हणत ते बाय-बाय करण्याच्या विचारापर्यंत पोहचले ही बाब शासनाला, लोकप्रतिनिधींना भूषणावह नाही. प्रदूषणामुळे अनेक व्याधी निर्माण होतात. मिळणारा पैसा औषधोपचारातच जाणार असेल तर शहरात राहणेच नको, असे १० पैकी ६ जणांना वाटू लागले आहे.
विविध कारणांमुळे प्रदूषणाचा विळखा घट्ट होत असताना आजारांचे प्रमाणही वाढले आहे. सर्वात अधिक श्वसन विकार जडलेल्यांचे प्रमाण आहे. डॉक्टरांचे उंबरठे झिजवून अनेक जण कंटाळले आहेत. खोकला, अस्थमा याचेही रुग्ण वाढले आहेत. काम, नोकरी नाही म्हणून मोकळ्या हवेत गावी राहणारी माणसे शहरातील घुसमटलेल्या वातावरणात आली आणि इथेच रमून गेली, पण आता त्यापैकी अनेकांना शहरात आल्याचा पश्चाताप होत आहे. मग ती मुंबईतील माणसे असोच नाहीतर दिल्लीतील! आज हीच माणसे बहुसंख्येने शहर सोडण्याच्या तयारीत आहेत. पर्यावरणाचा पोत बिघडल्याने पहाटे मोकळ्या हवेत फिरण्याचीही सोय उरलेली नाही.
मुंबई, दिल्ली महानगरांप्रमाणेच छोट्या शहरांतूनही वाढणार्या प्रदूषणामुळे पहाटेचा मोकळा श्वास घेता येत नाही. ज्या परिसरात कारखानदारी वाढली तेथे हवा, पाणी याचे प्रदूषण वाढले. यावर अनेक आंदोलने झाली, पण त्यातून फार काही निष्पन्न झालेले नाही. केवळ प्रदूषणामुळे आमचे आरोग्य बिघडलेय असे सांगणारे जागोजागी भेटतील. वायू गुणवत्ता निर्देशांक आज घसरला आहे. याबाबत ‘गंभीर’ चर्चा होतात, मात्र गांभीर्याने काहीच घेतले जात नाही. शहरातील वाढती बांधकामे प्रदूषणाला हातभार लावत असताना ती रोखण्यासाठी कोणतीच कार्यवाही होणार नाही. तथाकथित विकासाच्या नावाखाली शहरांच्या नरड्यालाच नख लावण्यात आले आहे.
त्यात जनतेची घुसमट होत असताना त्यांना दिलासा देणारी कोणतीही बाब समोर येत नाही. एक काळ असा होता की ग्रामीण भागातील जनता हाताला काम नाही म्हणून मुंबईकडे धावत होती. आता मुंबईत येण्यापूर्वी दहादा विचार करावा लागत आहे. मुंबईत राहणे परवडत नसतानाही कशीतरी दाटीवाटीने राहणारी माणसे प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या आजाराने जर्जर झाली आहेत. रस्त्यावर पाण्याचे फवारे मारणार्यांनी जनतेलाही प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या रोगांवर मोफत औषधोपचार करण्यासाठी मदत करावी. ज्यांचा दोष नाही ते प्रदूषणात भरडले जात आहेत. विविध व्याधींचा सामना करत आहेत. प्रदूषणामुळे शहर सोडावे लागण्याची वेळ येण्याचा प्रसंग कदाचित भारतातच घडत असावा.