घरसंपादकीयअग्रलेखवर्षातील दुसरी दिवाळी!

वर्षातील दुसरी दिवाळी!

Subscribe

तीन महिन्यांपूर्वी पारंपरिक दिवाळी साजरी झाल्यानंतर देशाने पुन्हा एक ‘दिवाळी’ सोमवारी साजरी केली. निमित्त होते अयोध्येतील बालरूपातील रामलल्लांच्या प्रतिष्ठापनेचे! असा सोहळा कधीतरीच होतो. तो एक इव्हेंट म्हणून साजरा केला गेला आणि अपेक्षेप्रमाणे श्रीरामावर निःस्सीम प्रेम करणार्‍या देश-विदेशातील भक्तांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे एक भव्य, नेत्रदीपक असा सोहळा सर्वांना अनुभवता आला. रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेवरून दोन भिन्न मते समोर आली, मात्र ठरल्याप्रमाणे सर्व काही पार पडले.

अयोध्येतील कार्यक्रमानिमित्ताने नीटनेटके नियोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यासाठी हजेरी लावली. अर्थात या शाही सोहळ्याचा केंद्रबिंदू होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी! स्वाभाविकच ते काय बोलणार, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते, पण त्यांनी अतिशय संयमित भाषण करताना ना विरोधकांना राजकीय कोपरखळ्या लगावल्या, ना अन्य राजकीय भाष्य केले. २२ जानेवारीचा हा केवळ सोहळा नसून नव्या कालचक्राची सुरुवात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. बांधण्यात आलेले राम मंदिर देशाच्या उत्कर्षाचे साक्षीदार ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काहीतरी नवीन संदेश द्यायचा ही मोदी यांच्या अनेक भाषणांची खासियत ठरली आहे. यावेळी देवापासून देशाकडे आणि रामापासून राष्ट्राकडे असा नवा मंत्र त्यांनी दिला.

- Advertisement -

राम ही ऊर्जा असून शांततेचे प्रतीक असल्याचेही मोदी म्हणाले. सरसंघचालक मोहन भागवत यांचेही भाषण झाले. अपेक्षेप्रमाणे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करतानाच रामराज्य येत असल्याने देशातील सर्वांनी एकजूट राखण्याचे आवाहन केले. शिस्तबद्ध जगण्याची सूचना करताना भागवत यांनी जास्त हाव न ठेवण्याचाही सल्ला दिला. जगाच्या मदतीसाठी आपण पुढे येऊ, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या ही जगाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाईल, असा विश्वास व्यक्त केला. प्रतिष्ठापनेचा सोहळा ऐतिहासिक घटना असल्याचे ते म्हणाले. या नेत्यांच्या भाषणातून राष्ट्रीय अस्मितेची भावना एकाच वेळी अधोरेखीत झाली.

गेल्या अनेक महिन्यांपासून अयोध्येतील मंदिर आणि इतर कामांची तयारी सुरू होती. इतका मोठा सोहळा ठरलेल्या वेळेत पार पडण्यासाठी कारागीर, तंत्रज्ञांनी केलेली मेहनत नजरेआड करून चालणार नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी या सर्वांवर पुष्पवृष्टी करीत त्यांचा सन्मान केला हे योग्यच झाले. एका भव्यदिव्य मंदिरामुळे गेल्या काळातील कटू आठवणींना पूर्णविराम मिळाला आहे. रामजन्मभूमी आंदोलनात अनेक निरपराध कारसेवकांचे बळी गेले. यावरून बरेच राजकारणही झाले. हिंसक दंगलीही झाल्या, मात्र सरतेशेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंदिर-मशीद हा वाद सामोपचाराने मिटविण्यात आला.

- Advertisement -

याबद्दल मुस्लीम समाजाच्या नेत्यांनाही धन्यवाद द्यावे लागतील. दोन्ही बाजू तुटेपर्यंत ताणल्या गेल्या असत्या तर श्रीरामाचे मंदिर होणे ही स्वप्नवत ठरणारी बाब होती. एका धगधगत्या विषयाचा शेवट गोड झाला यातील मर्म लक्षात घेऊन अधूनमधून भडकणारा जातीय विद्वेशही समाप्त व्हावा, अशी सर्वसामान्यांची भावना आहे. अयोध्येत रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी वादाची ठिणगी पडावी हे चांगले लक्षण मानता येणार नाही. अनेक ठिकाणी हिंदूंच्या आनंदात मुस्लीम बांधव सहभागी झालेले असताना माथेफिरूंकडून होणारी आगळीक मन विषण्ण करून टाकणारी आहे.

अयोध्येत भव्य गर्भगृहात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर रामराज्याची चर्चा सुरू झाली आहे. रामराज्य ही संकल्पना केव्हाही चांगलीच, पण त्यासाठी आपले आचार-विचार चांगले असावेत, तशी मानसिकता तयार व्हायला हवी. न्याय देताना ‘तुझा-माझा’ करून चालणार नाही. आज भाजपचे लोक रामराज्याची भाषा करीत असतील तर त्याची सुरुवात स्वतःपासून करावी लागेल. गेल्या काही दिवसांपासून राजकारणाने गलिच्छ पातळी गाठली आहे. विरोधकांना लक्ष्य करून त्यांच्यामागे चौकशांचा ससेमिरा लावला जात आहेत. कारवाईच्या भीतीने आपल्या पक्षात आलेले साव आणि विरोधी पक्षातील चोर, ही मानसिकता रामराज्याच्या व्याख्येत कधीच बसू शकणार नाही. श्रीराम हे न्यायप्रिय होते. त्यामुळे रामराज्याच्या गोष्टी करणार्‍यांनी समान न्यायाचे तत्त्व आचरणात आणले पाहिजे.

कधीकाळी भारतभूमीवर रामराज्य अस्तित्वात होते. तसे रामराज्य येणे शक्य नसले तरी किमान साधनशुचिता पाळणे अपेक्षित आहे. किंबहुना विस्कटलेल्या समाज व्यवस्थेसाठी ती काळाची गरज ठरली आहे. सध्याचे युग विज्ञानाचा आधार घेऊन चालते. रामराज्याशी याची चपखल सांगड घालावी लागेल. आचार-विचार चांगले असतील तर भारत विश्वगुरू होण्याचा दिवस दूर नसेल. सामान्यांना घाणेरड्या राजकारणाबद्दल, नेत्यांच्या चापलुशीवर तीव्र संताप आहे. त्यामुळे रामराज्य खरोखरंच यावे अशी राजकीय नेत्यांची इच्छा असेल, तर त्याची सुरुवात आपल्याकडून करावी लागेल.

श्रीरामांच्या मंदिरामुळे भविष्यात अयोध्या भूमीला अनन्यसाधारण महत्त्व येणार आहे. आध्यात्मिक पर्यटनाचे ते जागतिक केंद्र होणार आहे. सोमवारच्या सोहळ्याने या स्थानाबद्दलची उत्सुकता ताणली गेली आहे. त्यामुळे अयोध्या नगरीला प्रत्येक दिवस हा जणू जत्रेसारखा असणार आहे. यातून मोठी आर्थिक उलाढाल होणार असल्याने उत्तर प्रदेश राज्यासाठी ती अभिमानाची बाब ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना नवनिर्माणाचे स्वप्न दाखविले आहे. त्यासाठी प्रामाणिकपणे योगदान देणे हाही एक रामराज्य संकल्पनेचाच भाग ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -