घरसंपादकीयअग्रलेखया प्रेमाचे रहस्य काय !

या प्रेमाचे रहस्य काय !

Subscribe

सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची आग ओकत असताना अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी जो प्रेमाचा राग आळवला आहे, त्यामुळे सगळेच बुचकळ्यात पडले आहेत. इतकेच काय तर हा नक्की डाव काय आहे, हे भाजपच्या कार्यकर्त्यांनाही कळेनासे झाले आहे. कारण सोशल मीडियावर मोदींचे समर्थक आणि भाजपचा आयटी सेल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना अक्षरश: धुवून काढत असताना अचानक मोदींनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी आपुलकी व्यक्त केली. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र आहेत आणि माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. ते आजारी होते तेव्हा मी लगेच त्यांना फोन केला. मी वहिनींना फोन करून उद्धव ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करायचो. आधी उपचार करून घ्या, बाकीच्या चिंता सोडा. आधी शरीर जपा. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा सन्मानच करणार आहे. ते काही माझे शत्रू नाहीत. उद्या त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना सर्वात आधी मदत करणारा मीच असेन. आमच्या राजकीय वाटा वेगळ्या असल्या तरी कुटुंब म्हणून मी त्यांच्याबरोबर असेन. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही आणि शिवसेना वेगवेगळे लढलो होतो. त्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात एकही शब्द बोललो नाही. उद्धव ठाकरे यांनी मला कितीही शिव्या दिल्या तरी मी त्यांच्या विरोधात काहीच बोलणार नाही. कारण माझी बाळासाहेबांप्रती श्रद्धा आहे. मी बाळासाहेबांचा आदर करतो आणि आयुष्यभर करत राहीन, असे मोदी म्हणाले. महाराष्ट्रात लोकसभेच्या दोन टप्प्याचे मतदान झाल्यानंतर मोदींना ठाकरे यांच्याविषयी इतके प्रेम का दाटून आले, हाही संशोधनांचा विषय आहे.

आपल्या संकट काळात मदतीसाठी धावून येईन असे तुम्ही म्हणता, पण मी आजारी असताना तुम्ही माझे सरकार पाडलेत, असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या प्रेमभावनेला दिले आहे. इतकेच नव्हे तर भाजपने आमचा पक्ष फोडला, असा आरोप केला. काही दिवसांपूर्वी मोदी आणि शहा आपल्या भाषणांमधून आम्ही शिवसेना फोडली नाही, असे सांगत होते. महाराष्ट्रात भाजपच्या विस्तारात ठाकरे आणि पवार हे आडवे येत आहेत, हे लक्षात घेऊन भाजपने या दोन पक्षांमधून असंतुष्टांना खतपाणी दिले, त्यांना आपल्यासोबत घेऊन राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले. भाजपने आपले सरकार महाराष्ट्रात आणले, पण ते ज्या पद्धतीने आणले, ते लोकांच्या मनाला पटणारे नव्हते, पण तरीही महाराष्ट्रात मोठमोठ्या प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन आणि लोकार्पण करून महाराष्ट्रातील जनमत जिंकता येईल, असे वाटत होेते, पण तसे होताना दिसत नसावे. अजून महाराष्ट्रातील तीन टप्प्यांतील मतदान बाकी आहे. मोदी-शहा लोकसभेत चारसो पारचे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्रात प्रचारसभांचा धडाका लावत आहेत, पण इतके करूनसुद्धा फारसा फरक पडताना दिसत नाही, असे वाटू लागल्यामुळेच आता काही वेगळ्या रणनीतीचा विचार सुरू आहे की काय, असे मोदींच्या ठाकरे प्रेमावरून दिसून येत आहे. एका बाजूला मोदी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी अतीव आदर व्यक्त करत आहेत, पण त्याच वेळी त्यांनी स्थापन केलेली शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हातून काढून घेऊन नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या हाती दिले आहे. त्याचसोबत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या हाती दिली आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री बनण्याच्या आशेने भाजपसोबत आले होेते, पण भाजपकडून त्यांची आशा पूर्ण केली जाईल, असे दिसत नाही. कारण त्यांना आम्ही तसा शब्द दिलेला नाही, जो दिला तो पाळला आहे, असे स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात ज्या ठाकरेंचे सरकार भाजपने केंद्रीय सत्तेचा अडीच वर्षे सातत्याने वापर करून पाडले, त्याच उद्धव ठाकरे यांच्याविषयी मोदींना इतके प्रेम आणि ममत्व वाटण्यामागे काही तरी नक्कीच कारण असेल. कारण ठाकरे यांच्याविषयी जर मोदींना खरोखरच इतके प्रेम असते, तर शिवसेना नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावून त्यांनी शिवसेना आपल्या ताब्यात घेतली नसती, इतके करूनही ठाकरे आणि शिवसेना यांना आपण विलग करू शकत नाही, असेच मोदींना दिसू लागले असावे. कारण तसे सगळ्याच राजकीय नेत्यांचे एकमेकांशी कौटुंबिक संबंध असतात, ते एकमेकांना खासगीत मदत करतात, पण राजकीय गणिते वेगळी असतात. त्यामुळे महाराष्ट्रातील ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात मोदींनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी जो प्रेम राग आळवला आहे, त्यामागे त्यांचे काही नक्कीच गणित असेल, पण त्यामुळे भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांवर नक्कीच नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कारण ते उद्धव ठाकरेंच्या विरोधात सगळी शक्ती एकवटत आहेत, तर मोदी उद्धव ठाकरे यांच्या संकट काळात धावून जाण्याची भाषा करत आहेत. या वक्तव्यातून मोदींना भाजपच्या संकट काळाचे संकेत तर मिळत नाहीत ना, असे ध्वनित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -