घरभक्तीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

मग म्हणितलें जी स्वामी । भलेनि ममत्वें देखिलें तुम्हीं । म्हणौनि कृष्णार्जुनसंगमीं । प्रयागवटु जाहलों ॥
मग ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, ‘हे स्वामी, तुम्ही माझ्यावर ममतेने कृपादृष्टी केल्यामुळे कृष्णार्जुनसंवादरूपी संगमात मी प्रयाग येथील वटवृक्षाप्रमाणे झालो ! आपण कृपादृष्टीने काय करणार नाही!
मागां दूध दे म्हणतलियासाठीं । आघविया क्षीराब्धीची करूनि वाटी । उपमन्यूपुढें धूर्जटी। ठेविली जैसी ॥
पूर्वी, ‘मला दूध हवे’ असे उपमन्यूने म्हटल्यावरून शंकरानी ज्याप्रमाणे सर्व क्षीरसमुद्राची वाटी करून त्यापुढे ठेवली.
ना तरी वैकुंठपठिनायकें । रुसला ध्रुव कवतिकें । बुझाविला देऊनि भातुकें । ध्रुवपदाचें ॥
किंवा ध्रुव रुसला असता त्याला अढळपदाचा खाऊ देऊन श्रीविष्णूंनी त्याची समजूत केली.
तैसी जे ब्रह्मविद्यारावो । सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो । ते भगवद्गीता वोंविये गावों । ऐसें केलें ॥
त्याचप्रमाणे, ब्रह्मविद्येमध्ये श्रेष्ठ व सकलशास्त्रांचे विश्रांतिस्थान अशी जी अध्यात्मविद्यारूप भगवद्गीता ती मी ओवीरूपाने वर्णन करावी अशी मला शक्ति दिली!
जे बोलणियाचे रानीं हिंडतां । नायकिजे फळलिया अक्षराची वार्ता । परि ते वाचाचि केली कल्पलता । विवेकाची ॥
ज्या भाषणांच्या रानात हिंडत असता फलद्रूप म्हणजे फलप्राप्ति करून देणारे असे एकही अक्षर ऐकू येत नाही, अशा फलद्रूप विचारयुक्त माझ्या वाणीचा कल्पवृक्षच आपण केला.
होती देहबुद्धी एकसरी । ते आनंदभांडारा केली वोवरी । मन गीतार्थसागरीं । जळशयन जालें ॥
ज्या माझ्या बुद्धीची गती देहापलीकडे गेली नव्हती, ती बुद्धि हल्ली ब्रह्मानंदरूपी भांडाराची खोलीच बनविली आहे आणि माझ्या मनाला गीतार्थरूपी क्षीरसागरात जलमंदिर बांधून दिले आहे.
ऐसें एकेक देवांचें करणें । तें अपार बोलों केवीं मी जाणें । तर्‍ही अनुवादलों धीटपणें । तें उपसाहिजो जी ॥
याप्रमाणे श्रीगुरूची एकेक करणी अगाध असल्यामुळे, मला त्यांच्या अपार सामर्थ्याचे वर्णन कसे करिता येईल? तेव्हा महाराज, जे काही मी धिटाईने बोललो आहे, त्याची मला क्षमा असावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -