घर संपादकीय अग्रलेख प्रवाशांची लूट कोण थांबवणार!

प्रवाशांची लूट कोण थांबवणार!

Subscribe

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर बेछुट लाठीहल्ला झाल्यानंतर संतापलेल्या या समाजाने मराठवाड्यासह राज्यात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा सर्वात मोठा फटका एसटीला बसला आहे. जवळपास साडेसहा हजार फेर्‍या रद्द कराव्या लागल्याने एसटीचे साडेसहा कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. अगोदरच गटांगळ्या खात असलेल्या एसटीला हा तोटा परवडण्यासारखा नाही. सरकारी मालमत्ता म्हणून कोणत्याही आंदोलनात एसटीच्या गाड्यांना लक्ष्य केले जाते. खरं तर हा प्रकार क्लेषदायक आहे, कारण एसटीतून सर्वसामान्य प्रवासी प्रवास करीत असतो. एसटी कोलमडली की त्याचा प्रवासही कोलमडतो. एसटीचे नुकसान होणार नाही याची आंदोलनाच्या नेत्यांकडून काळजी घेण्याची गरज आहे. हा एक भाग झाला.

तर दुसरीकडे एसटी कशी रखडते या संधीची वाट पाहणारे खासगी ट्रॅव्हल्सवाले सर्वसामान्यांची लूट करीत असतात. मराठवाड्यात एसटी थांबल्याने या ट्रॅव्हल्सवाल्यांसाठी मराठा आंदोलन इष्टापत्ती ठरत असल्याचे समोर येत आहे. महत्वाच्या कामासाठी बाहेर पडणार्‍या प्रवाशांना वेठीला धरून त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळले जात आहे. हा प्रकार तेथील आरटीओ किंवा पोलिसांना अवगत नसेल अशातील भाग नाही, पण सर्वचजण हाताची घडी तोंडावर बोट या अवस्थेत असावेत. आंदोलकांची समजूत घालून निदान एसटीचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. अर्थात संतप्त आंदोलकांना समजावणे कठीण असते. तरीही एसटीला लक्ष्य करून सर्वसामान्यांचे हाल होऊ देऊ नका हे कुणी तरी कळकळीने सांगितले पाहिजे.

- Advertisement -

प्रवाशांना लुटण्याचा गोरख धंदा आता कोकणातही सुरू होईल. गणेशोत्सव तोंडावर असल्याने मुंबईसह शेजारी आणि इतर शहरातील चाकरमानी तळकोकणाकडे निघतील. ही संख्या काही लाख असते. रेल्वे, एसटी प्रवासाची सुविधा पुरवत असली तरी ती बर्‍याचदा अपुरी ठरते. रेल्वेचे आरक्षण गाजावाजा करीत सुरू होते खरे पण काही मिनिटांत आरक्षण खिडकी बंद होते. हजारो प्रवासी काही मिनिटांत कसे तिकीट आरक्षण करू शकतात हा संशोधनाचा विषय आहे. यावर टीकाही होते, पण त्याने रेल्वेला काही फरक पडत नाही. एसटी गणपतीचा मुहूर्त साधून नव्या बसेस सेवेत आणते.

तरीही यंदा प्रवाशांसाठी एसटीच्या बसेस अपुर्‍या पडण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. आता याच संधीचा अचूक लाभ उठवत खासगी ट्रॅव्हल्सवाले आपली तुंबडी भरण्यास सुरुवात करतील. अर्थात हा दरवर्षीचा अनुभव आहे. आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे आरटीओकडून सांगितले जाते. वास्तविक त्यात काही तथ्य नसते. खासगी ट्रॅव्हल्सवाले स्कूल बसही प्रवासासाठी कोकणात दामटवतात. यासाठी एसटीच्या दुप्पट, तिप्पट भाडे घेतले जाते. या खासगी ट्रॅव्हल्सची मालकी मोठ्या प्रमाणात बड्या धेंडांकडे आहे. स्वाभाविक पोलीस आणि आरटीओ खासगी ट्रॅव्हल्स मालकांकडे दुर्लक्ष करतात, मात्र यात सर्वसामान्यांना नाहक आर्थिक भुर्दंड बसतो.

- Advertisement -

गणेशोत्सवाप्रमाणे दिवाळी, नाताळ, होळीमध्ये ‘हात’ मारण्याचा धंदा सुरू असतो. आरटीओकडे तक्रारी झाल्या तरी त्याची दखल घेतली जात नसल्याने सामान्य प्रवाशांना खर्चाचा ताळमेळ बसविणे शक्य होत नाही. खासगी बसमधून तर प्रवाशांना सणासुदीच्या काळात उभ्याने प्रवास करणे भाग पडते. काही ट्रॅव्हल्सवाले तर बसेसमधून बसण्यासाठी चक्क लाकडी किंवा प्लास्टिक स्टूल ठेवतात. रेल्वे आणि एसटीची सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांना शेवटी महागडा प्रवास करणे भाग पडते. दरवर्षीचे हे झाले आहे. शासनाने बड्या धेंडांबद्दल वाटणारे प्रेम बाजूला ठेवून सर्वसामान्य प्रवाशांची पाठराखण केली पाहिजे. चारशे रुपयांत होणार्‍या प्रवासासाठी चौदाशे रुपये मोजावे लागत असतील, तर ट्रॅव्हल्सवाल्यांची ही सभ्य दरोडेखोरी समजली पाहिजे. इतके पैसे मोजून कोकणात कुटुंबासह जाणार्‍या प्रवाशांच्या तोंडाला या लुटीने फेस आल्यास नवल नाही.

अशा या ‘लूटमारी’च्या घटना वरवर साध्या वाटत असल्या तरी सर्वसामान्यांची जमाखर्चाची तोंडमिळवणी करताना किती दमछाक होत असेल याची दखल शासनाने घेतली पाहिजे. सणासाठी पै पै जमा करून गावी जाणारेही आहेत. त्यांची काळजी घेतली गेली पाहिजे. एसटीने प्रवास करणार्‍यांना खासगी हॉटेलमध्येही नाहक मोठी पदरमोड करावी लागते. भरमसाठ भाडे आकारणी केली जात असल्याने एसटीची कॅन्टीन कुणी चालवायला घेत नाहीत. त्याचा परिणाम बहुतांश कॅन्टीनना टाळे लागण्यात झाला आहे. यामुळे एसटीच्या बसेस खासगी हॉटेलांतून थांबविण्यात येतात. एसटी कॅन्टीनच्या तुलनेत या हॉटेलांतील खाद्यपदार्थांचे दर खिशाला परवडणारे नसतात. तरीही ते पदार्थ घ्यावे लागतात.

प्रवाशांची याबाबत वारंवारची तक्रार आहे, पण कुणाच्या तरी भल्यासाठी एसटी कॅन्टीनना लागलेले टाळे खोलण्यास वरिष्ठ अधिकारी स्वारस्य दाखवत नाहीत. लोकप्रतिनिधींना एसटीचे वावडे असल्याने त्यांना प्रवाशांना होणार्‍या त्रासाशी काही देणेघेणे नसते. गणेशोत्सव किंवा अन्य सणांत प्रवाशांची गर्दी वाढली की खाद्यपदार्थांचे भावही भरमसाठ वाढवले जातात. या मनमानीवर कुणाचेही नियंत्रण नाही. हॉटेल चालकांकडून होणारी ही लूटमारही लोकांना असह्य होत आहे. महागाईचे चटके सहन करताना सर्वसामान्य, मध्यमवर्गीय आधीच मेटाकुटीला आला आहे. त्यामध्ये आता उजळ माथ्याने आणि कुणाच्या तरी आशीर्वादाने सुरू असलेली लूटमार त्याला असह्य करीत आहे. शासनाने सर्वसामान्यांचा अंत पाहणे थांबवावे.

- Advertisment -