घरसंपादकीयअग्रलेखतुम्ही लढा आणि पडा...

तुम्ही लढा आणि पडा…

Subscribe

शिवसेना शिंदे गटावर देवेंद्र फडणवीस यांचाच वचक असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे यांच्या पक्षप्रवेशावरून दिसून आले आहे. विरोधी पक्षातील एखाद्या नेत्याच्या प्रवेशावेळी संबंधित पक्षाचेच पदाधिकारी-नेते यांची उपस्थिती अपेक्षित असते, पण निलम गोर्‍हे यांच्या पक्षप्रवेशाक्षणी शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. यावेळी शिंदे गटापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना विशेष महत्व दिले गेल्याने शिंदे गट देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या हातातच असल्याचेही यावरून दिसून आले आहे. राज्यात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला हाताशी धरून भाजपने महाविकास आघाडी सरकार खालसा करत सत्ता काबीज केली.

बंडखोरी कशा पद्धतीने झाली याचा इतिहास तमाम महाराष्ट्राला आता तोंडपाठ झाला आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावर बसवून भाजपने शिवसेना आणि ठाकरे परिवाराचे राजकीय अस्तित्वच संपुष्टात आणण्याचा जणू विडाच उचलला आहे. बंडखोरीनंतर अनेक राजकीय डावपेच, राजकीय लढाया, न्यायालयीन लढायांमध्ये सध्या उद्धव ठाकरे गटाला गुंतवून ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाचे आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी यांना शिंदे गटात खेचून आणण्याचे काम अद्यापही सुरूच आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटातील आमदार, खासदार अथवा पदाधिकारी स्वत:च्या पक्षात न घेण्याची खबरदारी भाजपकडून घेतली जात असल्याचे दिसून आले आहे. शिंदे गट मजबूत करण्याच्या नावाखाली ठाकरे गट कमकुमत करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर बंडखोरांना स्वतःच्या पक्षात घेऊन स्वपक्षीयांची राजकीय कोंडी, हानी होऊ नये याची खबरदारीही भाजपकडून घेतली जात आहे.

- Advertisement -

विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे यांचा शिंदे गटात झालेला प्रवेश तसा अपेक्षितच होता. गेल्या काही महिन्यांपासून गोर्‍हे ठाकरे गटापासून तशा तटस्थच होत्या. आपली राजकीय सोय लावण्यासाठीच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला, यात शंकाच नाही. अर्थात पक्ष सोडताना प्रत्येक नेता कोणता तरी आरोप करूनच पक्ष सोडत असतो. गोर्‍हे यांनीही तसे आरोप करत ठाकरे गट सोडण्यामागची कारणे सांगितली आहेत, मात्र गोर्‍हे यांचा पक्षप्रवेश चर्चेत आला तो भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पक्षप्रवेशावेळी असलेल्या उपस्थितीने. अर्थात मित्रपक्ष असल्यानेच आपण उपस्थित होतो, यासह विविध खुलासे फडणवीस यांनी त्यावेळी केले. शिंदे गट सत्तेत मित्रपक्ष असला तरी पक्ष म्हणून त्यांचे वेगळे अस्तित्व आहे. त्यात दुसर्‍या पक्षातील नेत्याने ढवळाढवळ करू नये, असे अपेक्षित आहे.

या मर्यादा ओलांडून फडणवीस यांनी गोर्‍हे यांच्या प्रवेशावेळी लावलेली हजेरी अनेकांना खटकली होती. विशेष म्हणजे पक्षप्रवेश झाल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निलम गोर्‍हे यांच्यासोबत स्वतः देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. खरे पाहता शिंदे गटाला शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्हदेखील मिळालेले आहे. शिवसेना पक्ष म्हणून अनेक पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पत्रकार परिषदेत शिंदे गटाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना दुय्यम स्थान देताना देवेंद्र फडणवीस यांना महत्वाचे स्थान देण्यात आले होते. ते स्थान देण्यात आले होते की फडणवीस यांना ते स्थान देण्याशिवाय शिंदे गटाकडे पर्याय नव्हता, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यातून शिंदे गटाची हतबलताही लपून राहिलेली नाही.

- Advertisement -

राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांभोवती केंद्रीय तपास यंत्रणांचा फास आवळला जात आहे. शिंदे गटातील अनेक आमदार, खासदार, नगरसेवक यांच्यासह नेतेही त्यातून सुटलेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमागेही केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा होता. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राष्ट्रवादीतील फुटीच्या आधी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा बोलून दाखवला होता. अर्थात काही दिवसातच आरोप असलेले नेते मंत्री झाल्याचे पहावयास मिळाले. त्याआधी शिंदे गटात गेलेल्यांनाही केंद्रीय तपास यंत्रणांच्या जाचातून मुक्तता मिळाली आहे. असे असले तरी शिंदे गटाचे स्वतंत्र अस्तित्वच आता धोक्यात येऊ लागले आहे. शिंदे गटात आलेले आमदार गेले वर्षभर मंत्रीपदाची आस लावून उभे आहेत, पण भाजपकडून त्यांना आश्वासनापलीकडे काहीच मिळेनासे झाले आहे. उलट राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजपने त्यांना बडी खाती देऊन शिंदे गटाला कमी लेखण्याचे काम केले आहे.

शिंदे गटातील नेत्यांपेक्षा राष्ट्रवादीमधील ताकदवान नेते मंत्रिमंडळात जास्त आल्याने शिंदे गटात अस्वस्थता वाढली आहे. उद्धव ठाकरे गटातून इनकमिंग सुरू असली तरी पक्ष वाढीकडे शिंदे गटाचे दुर्लक्ष होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: राज्यात ठिकठिकाणी फिरून मेळावे घेत आपल्यासोबत आलेल्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसा प्रयत्न त्यांच्यासोबत असलेले आमदार, खासदार, नेते करताना दिसत नाहीत. शिवसेनेत असतानाचा उत्साह त्यांच्यात दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. भाजपचे केंद्रीय आणि राज्यातील नेते, मंत्र्यांनी राज्यात पक्ष वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. शिंदे गटाला ठाकरे गटाशी संघर्ष करण्यात गुंतवून भाजप आपली ताकद वाढवत आहे. त्याचबरोबर शिंदे गटाची राजकीय ताकद वाढू नये याचीही खबरदारी भाजपकडून घेतली जात आहे. ठाकरे गटाशी संघर्ष करण्यातच गुंतलेल्या शिंदे गटातील नेत्यांना याची अद्याप जाणीव झालेली दिसत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -