घरसंपादकीयअग्रलेखतांबेंचे पितळ उघडे

तांबेंचे पितळ उघडे

Subscribe

विधान परिषद निवडणुकीच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या ५ जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. या ड्राम्यात अवघ्या दोनच दिवसांपूर्वी भाजपविरोधात एकजुटीने लढण्याचा निर्धार करणारी महाविकास आघाडी खासकरून काँग्रेस पक्ष तोंडघशी पडल्याचे दिसले. काँग्रेसने नाशिक शिक्षक मतदारसंघातून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. सुधीर तांबे याआधी तीनवेळा याच मतदारसंघातून निवडून आले असल्याने त्यांची जागा भरवशाची मानली जात होती, परंतु भरवशाच्या म्हशीला टोणगा या म्हणीप्रमाणे तांबे यांनी कृती केल्याने काँग्रेसला मोठाच धक्का बसला आहे. अखेरच्या क्षणी पुत्रप्रेम उफाळून आल्याने डॉ. सुधीर तांबे यांनी पक्षाने दिलेला एबी फॉर्म अर्थात उमेदवारी अर्ज भरलाच नाही, त्यांच्या जागी त्यांचे पुत्र आणि युवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला.

सत्यजित तांबेंनी एक अपक्ष आणि एक राष्ट्रीय काँँग्रेसच्या नावाने असे २ अर्ज भरले. मी अजूनही काँग्रेसचाच उमेदवार आहे, शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म मिळू न शकल्याने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्याचे तर्कहिन स्पष्टीकरण सत्यजित तांबे सध्या देत आहेत, मात्र त्यांच्याकडे पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म नसल्याने शेवटी ते अपक्ष उमेदवार ठरले आहेत. तरुण पिढीला संधी मिळावी म्हणूनच माघार घेतल्याचे म्हणणे त्यांचे वडील डॉ. सुधीर तांबे मांडत आहेत. सुधीर तांबे यांना अशा वेळी पक्षातील इतर कुणी सक्षम दिसले नाही का? युवक काँग्रेसमध्ये अनेक वर्षे काम करूनही पक्षीय पातळीवर पदोन्नती होत नसल्याने सत्यजित तांबे अस्वस्थ असावेत. मविआच्या सत्ताकाळातही विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागू शकली नाही.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हीच अस्वस्थता हेरून डाव साधल्याचे म्हटले जात आहे. आजही सत्यजित तांबे यांच्या कामाचे कौतुक करताना अखेरच्या क्षणी नाशिकमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस सांगत आहेत. यामागील भाजपचे कारस्थान पुढील काही दिवसांनंतर उघड होवो अथवा न होवो काँग्रेसला त्यांचा गाफीलपणा नडल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. कधीकाळी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका या पक्षीय संघटना पातळीवर लढवल्या जायच्या. उमेदवारही संघटनेतूनच निवडले जायचे, परंतु विधान परिषदेत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर पक्षाने व्हिप काढल्यावर पक्षीय संघटनेतून निवडून आलेल्या सदस्यांना हा व्हिप लागू होत नव्हता. उगीच अडचण वाढू नये म्हणून संघटनांना दडपण्यासाठी हळुहळू सर्वच राजकीय पक्षांनी संघटनेऐवजी थेट पक्षातूनच उमेदवार देण्याचा कल वाढू लागला. त्यामुळे पक्षातील नेत्यांच्या अपेक्षाही वाढल्या. तांबे हे त्याचेच उदाहरण आहे.

संघटना पातळीवर लढवण्यात येणार्‍या या निवडणुकांसाठी उमेदवारांची घोषणा आधीच होणे अपेक्षित असते. जेणेकरून उमेदवाराला आपल्या ध्येय धोरणांच्या प्रचारासाठी, कार्यकर्त्यांपर्यंत जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, परंतु नेत्याच्या महत्त्वाकांक्षेला आवर घालण्यासाठी सर्वच पक्षांकडून आता निवडणुकीच्या काही दिवस आधी किंवा ऐनवेळी उमेदवारांच्या नावांची घोषणा होऊ लागली आहे. त्याचप्रमाणे डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीची घोषणा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्लीतून केली. एकाबाजूला काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात आलेली असताना तांबे यांनी खेळलेला सोयीचा डाव धक्कादायक आहे. सत्यजित तांबे उद्याच्या निवडणुकीत कदाचित निवडणून आले, तरीही ते अपक्ष उमेदवारच असल्याने भाजपने त्यांच्यावर भगवा रुमाल टाकल्यास कुणालाही आक्षेप घेता येणार नाही. हा सगळा सावळा गोंधळ सुरू असताना सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात हे मुंबईत होते.

- Advertisement -

नागपूरमध्ये असलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तांबेंनी अपक्ष उमेदवारी भरल्याने त्यांच्याशी आमचे काही देणे घेणे नाही, असे म्हणत आहेत, परंतु भाजपने खेळलेली ही खेळी म्हणजे मनात येईल तेव्हा स्वबळावर निवडणूक लढण्याच्या बाता मारणारे नाना पटोले यांना दाखवलेला आरसा आहे. एबी फॉर्म देऊनही उमेदवार अर्ज भरत नाही. अधिकृत उमेदवाराऐवजी पक्षातीलच दुसरा नेता अर्ज भरतो आणि प्रदेशाध्यक्षाला याचा थांगपत्ताही लागत नाही, ही घटना पटोलेंची पक्षावर किती पकड आहे, हे सिद्ध करण्यास पुरेशी ठरते. अमरावतीत काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. रणजीत पाटील यांनाच उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्या उमेदवारीवर पक्षातून अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, तर नागपूरची जागा ठाकरे गट प्रणित शिक्षक सेनेचे गंगाधर नाकोडे यांना सोडल्याने नागपूर काँग्रेसमध्ये असंतोष वाढला आहे.

इथेच राष्ट्रवादीच्या उमेदवारानेही आपला अर्ज भरला आहे. त्यामुळे या निवडणुकीतही आघाडीत बिघाडी असल्याचेच उघड झाले आहे. आजघडीला ७८ सदस्य संख्या असलेल्या राज्य विधान परिषदेत भाजपचे सर्वाधिक २२ सदस्य असूनही पक्षाचा सभापती नाही. विधान परिषदेत विरोधकांचे (३३) संख्याबळ अद्यापही अधिक असल्याने भाजपला काहीही करून संख्याबळ वाढवून विधान परिषदही आपल्या ताब्यात घ्यायची आहे. त्यासाठी भाजप साम, दाम, दंड, भेद याचा अवलंब करताना दिसत आहे, तर दुसरीकडे विधानसभा हातची जाऊनही मविआ झालेल्या चुकांमधून धडा घेण्यास तयार नाही. हेच यातून स्पष्ट होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -