घरसंपादकीयदिन विशेषविख्यात नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ

विख्यात नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ

Subscribe

जॉर्ज बर्नार्ड शॉ हे विख्यात ब्रिटिश नाटककार, समीक्षक, पत्रकार आणि समाजवादाचे खंदे प्रचारक होते. त्यांचा जन्म २६ जुलै १८५६ रोजी आयर्लंडमधील डब्लिनमध्ये झाला. शॉ यांचे औपचारिक शिक्षण फारच कमी झाले होते. तथापि स्वप्रयत्नाने त्यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला. घरातील संगीताच्या वातावरणाच्या प्रभावातून ते पियानो वाजवायला शिकले होते. आपल्या व्यक्तिगत जीवनाची गुणवत्ता वाढवत, लंडनच्या सामाजिक जीवनात आत्मविश्वासाने वावरण्यासाठी सतत आत्मप्रसिद्धीच्या झोतात राहू पाहणारे स्वत:चे एक धीट, बेधडक व्यक्तिमत्त्व त्यांनी घडविले. संगीतावर लेख लिहून सुरू केलेल्या पत्रकारितेबरोबर ते कांदबर्‍याही लिहीत होते आणि त्या प्रकाशकांकडून नाकारल्या जात होत्या. कमाईही फारशी नव्हती.

अशा खडतर परिस्थितीला निश्चयाने तोंड देत लंडनमधल्या बुद्धिमंतांच्या वर्तुळात ते वावरू लागले आणि तिथल्या चर्चांमध्ये भाग घेऊन आपल्या उपस्थितीची जाणीव तिथल्या मंडळींना ठसठशीतपणे करून देऊ लागले. १८८२ साली ख्यातनाम अमेरिकन अर्थतज्ञ हेन्री जॉर्ज यांच्या एका व्याख्यानाच्या प्रभावातून शॉ समाजवादाकडे वळले आणि पुढे फेबिअन सोसायटी या लंडनमधील समाजवादी संघटनेचे एक आधारस्तंभ बनले. इंग्लंडमध्ये समाजवाद आला पाहिजे, पण तो क्रांतीच्या मार्गाने नव्हे, तर योग्य त्या सामाजिक-आर्थिक सुधारणांमधून येईल, अशी फेबिअन समाजवाद्यांची धारणा होती. पोथीनिष्ठ सैद्धांतिकतेपेक्षा विवेक आणि मानवतावाद यांवर शॉ यांचा अढळ विश्वास होता आणि तो त्यांच्या लेखनातूनही अटळपणे प्रकट झालेला आहे. क्विटेसन्स ऑफ इब्सेनिझम (१८९१) हे त्यांचे इंग्रजी भाषेतले इब्सेनवरचे पहिले पुस्तक होय. त्यानंतर शॉ यांनी साठांहून अधिक नाटके लिहिली.

- Advertisement -

‘कॅशेल वायरन्स प्रोफेशन’ (१८८६), ‘अन्सोशल सोशॅलिस्ट’ (१८८७), ‘लव्ह अमंग द आर्टिस्ट्स’ (१९००), ‘द इरॅशनल नॉट’ (१९०५) आणि ‘इमॅच्युअरिटी’ (१९३०) या कादंबर्‍याही त्यांनी लिहिल्या. १९२५ मध्ये त्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. अशा या विख्यात नाटककाराचे २ नोव्हेंबर १९५० रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -