घरसंपादकीयओपेडमनावर दगड किती दिवस ठेवणार?

मनावर दगड किती दिवस ठेवणार?

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व जर संपुष्टात आणायचे असेल तर त्याकरता शिवसेनेतील बंडखोरालाच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसवून त्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचे अधिकाधिक खच्चीकरण करणे, त्यांची ताकद क्षीण करणे अशी रणनीती एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यामागे आहे. त्यामुळे शिंदे हे जोपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या भात्यातील बाण स्वतःकडे आकर्षित करत राहतील आणि त्यांचे अधिकाधिक नुकसान करतील तोपर्यंत महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना आणि विशेषत: मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्यांना मनावर आणि त्याचप्रमाणे डोक्यावर दगड ठेवण्याखेरीज अन्य कोणताही पर्याय भाजप पक्षश्रेष्ठींनी शिल्लकच ठेवलेला नाही.

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता शिबीर नुकतेच पनवेल येथे संपन्न झाले आणि यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाषणाच्या ओघात बोलून गेले की, एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्री करताना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केले. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी सर्व करून वेळ मारून देण्याचा प्रयत्न नक्कीच केला. मात्र त्यानंतरदेखील महाराष्ट्र भाजपच्या मनातील अंतर्गत भावना म्हणा अथवा खदखद म्हणा ही उत्स्फूर्तपणे आणि नैसर्गिकरित्या सार्वजनिक व्यासपीठावर व्यक्त झाली याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाणात जोपर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडील बाण आहेत तोपर्यंत तरी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना स्वीकारण्याखेरीज भाजपकडे अन्य दुसरा कोणताही पर्याय सद्यस्थितीत नाही आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडील हे बाण जेव्हा संपतील तेव्हा आपसूकच भाजप त्यांच्या मनावरील दगडाचा भार खाली ठेवून हलका केल्याशिवाय राहणार नाही. हाच अत्यंत महत्त्वाचा संदेश भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला अप्रत्यक्षपणे दिला आहे.

भाजप हा भारतीय राजकारणात सुरुवातीपासूनच म्हणजे अगदी अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळापासूनच कॅल्क्युलेटीव्ह रिस्क घेऊन वाटचाल करणारा पक्ष आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात नरेंद्र मोदी या नावाची तुफान लाट आली आणि या लाटेने मोठमोठ्या भाजप विरोधकांना गेल्या आठ वर्षांच्या काळात अक्षरशः गाडून टाकले. मोदी लाटेचा हा धोका शिवसेनेने २०१४ मध्येच ओळखला होता. त्यामुळेच २०१४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप विरोधात जोरदार आघाडी उघडत शिवसेनेचे तब्बल ६३ आमदार देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची प्रचंड मोठी लाट असताना देखील त्यांनी निवडून आणले होते.

- Advertisement -

त्यावेळी शिवसेनेला ज्याप्रमाणे भाजपच्या विरोधी पक्षाची स्पेस काबीज करता आली त्यामागे काँग्रेस राष्ट्रवादीचे सुरू झालेले देशातील अध:पतन हे प्रमुख कारणीभूत होते. वास्तविक महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेला त्यावेळी भाजप विरोधात कौल दिलेला होता मात्र त्यानंतर देखील केवळ सत्तेत वाटा मिळावा यासाठी शिवसेना ही विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही दिवसातच भाजपच्या राज्यातील सत्तेत सहभागी झाली. हा शिवसेनेचा पहिला चुकलेला मोठा निर्णय होय. महाराष्ट्रातील एका मोठ्या वर्गाची अगदी बहुजन समाजाची मोठी ताकद भाजपच्या विरोधात शिवसेनेला त्यावेळी मिळाली होती. अशावेळी शिवसेनेने केवळ सत्तेसाठी निवडून आल्यानंतर पुन्हा भाजपशी युती करणे हे खर्‍या अर्थाने राजकीय नीतिमत्तेला धरून नव्हते. मात्र सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे म्हणतात ते खरेच मानावे लागेल. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या भाजपबरोबरच्या सत्तेतील सहभागामध्ये शिवसेनेचा मोठ्या प्रमाणावर अपेक्षाभंग आणि सातत्याने उपमर्द व अवहेलना करण्यात आली.

मात्र तरी देखील सत्तेला लाथ मारण्याची हिंमत अथवा धाडस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या पाच वर्षांच्या काळात दाखवू शकले नाही ही देखील एक वस्तुस्थिती आहे. यानंतर २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेने पुन्हा एकदा निवडणूकपूर्व युती केली या दोन्ही पक्षांना युती असण्याचे जसे फायदे झाले तसेच त्यांचे त्या प्रमाणात तोटेदेखील झाले. शिवसेनेची आमदारांची संख्या ६३ वरून ५६ वर आली तर भाजपची आमदारांची संख्या शिवसेनेची युती केल्यानंतरही १२२ वरून घसरून १०५ वर आली. मात्र तरीदेखील भाजप नेते म्हणतात त्याप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला सत्ता दिली होती हे सत्य नाकारून चालणार नाही. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा युतीमध्ये केवळ ५६ आमदार निवडून आल्यानंतर भाजपकडे मुख्यमंत्री पदासाठी केलेला हट्ट ही त्यांची दुसरी चूक होती. आणि यानंतर सर्वात मोठी घोडचूक म्हणजे भाजप नेतृत्व शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार न झाल्याने शिवसेनेने त्यांचे पारंपरिक राजकीय वैरी असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर केलेला घरोबा ही उद्धव ठाकरे यांची आजवरच्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठी घोडचूक होती.

- Advertisement -

वास्तविक बोलायचे झाल्यास एकनाथ शिंदे यांनी बंड केले तर त्यात त्यांचे काय चुकले असा प्रश्न जो एकनाथ शिंदे वारंवार उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित करत आहेत, त्याला उत्तर देण्याची जबाबदारीदेखील पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचीच आहे. खरं बघायचं झाल्यास एकनाथ शिंदे यांचे काय चुकले? राज्यात शिवसेनेचा पक्षप्रमुख मुख्यमंत्री पदासारख्या सर्वोच्च सत्ता पदावर बसलेला असूनदेखील जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्र्यांचा पक्ष अर्थात शिवसेना जर चौथ्या क्रमांकावर फेकली जात असेल तर त्याची जबाबदारी कुणाची याचा विचार नको का व्हायला? उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचीच जनहिताची कामे होत नसतील तर या आमदाराने मंत्र्यांनी कोणाकडे जायचे याचा विचार पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी करणे गरजेचे नव्हते का? ठाण्याच्या साध्या शहराच्या राजकारणात ज्या एकनाथ शिंदे यांचे बाजूच्या मतदारसंघातील शिवसेनेचेच आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी फारसे सख्या नव्हते.

अशा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे तर तब्बल ४० आमदार बंड करून उठतात यामध्ये पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचे काहीच चुकले नाही का? त्यानंतर देखील शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी दहा ते बारा खासदार तसेच ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे बहुसंख्य नगरसेवक पदाधिकारी हे जर एकनाथ शिंदे यांच्याकडे आकर्षित झाले तर एकनाथ शिंदे यांच्याकडे असे कोणते चुंबक आहे की ज्याच्यामुळे वर्षानुवर्ष केवळ शिवसेनेमुळे निवडून येणारे आमदार खासदार नगरसेवक जिल्हाप्रमुख हे एकनाथ शिंदे यांच्याकडे जावेत? पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचे असे काय चुकत आहे किंवा काय चुकले आहे याचा खर्‍या अर्थाने विचार करण्याचीदेखील गरज आहे हे या निमित्याने उद्धव ठाकरे यांनी लक्षात घेतले पाहिजे.

आज केवळ मुंबई महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील आणि परदेशातील शिवसेना प्रेमी मराठी माणूस हळहळत आहे. हळहळन्याला जसे बंडखोर म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कारणीभूत आहेत. त्याच बरोबरीने किंबहुना त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे कारणीभूत आहेत. ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी रात्रीचा दिवस करून आणि रक्ताचे पाणी करून महाराष्ट्रभर शिवसेना वाढवली त्या शिवसेनेची आज महाराष्ट्रात काय स्थिती झाली आहे आणि ती कोणामुळे आहे याचा विचार कोणी करणार आहे की नाही? मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्यापूर्वी जनतेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी असे म्हटले होते की, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या चिरंजीवांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार केले. पण मग मी आदित्यला पर्यटन मंत्री केले तर मात्र ती लुडबूड ठरते. म्हणजे केवळ यांच्या मुलानेच राजकारण करावे का मग आदित्यने माझ्या मुलाने काय करायचं? असा प्रश्न त्यावेळी त्यांनी शिवसैनिकांना आणि जनतेला संबोधित करताना विचारला होता.

मुळात प्रश्न असा आहे की शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्यासाठी, त्यांच्या चिरंजीवांना खासदारकी मिळण्यासाठी अथवा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यासाठी किंवा उद्धव ठाकरे यांच्या चिरंजीवांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्यासाठी शिवसेना स्थापन केलेली नाही. मराठी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी स्थापन केलेली ही शिवसेना आहे हे मूळ तत्त्वच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघेही विसरून गेले आहेत. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची प्रमुख विचारधारा होती. आज दुर्दैवाने ही विचारधाराच कुठे अस्तित्वात असल्याचे दिसत नाही. याला जबाबदार कोण आहे याचा साधा शोध घ्यावा असे देखील पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना वाटत नाही का? मुळात शिवसेनेचा जन्मच हा अखंड अविरत संघर्ष करण्यासाठी झाला आहे आणि हा संघर्ष येथील मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी आहे. असे असताना शिवसेनेला सत्तेची, सत्ता पदांची चटक लावण्याची गरजच काय होती असेही कधी शिवसेनेच्या नेत्यांना का वाटले नाही? याच सत्तालोलुप प्रवृत्तीने शिवसेनेचा आत्मघात केला आहे.

हे एवढे सर्व सविस्तर सांगण्याचे प्रयोजन म्हणजे दोन दिवसांपूर्वींचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे पनवेल येथे भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत झालेले मुक्तचिंतन हे होय. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. २०१४ च्या मोदी युगाच्या प्रारंभानंतर भाजपच्या राजकीय महत्त्वाकांक्षा या निश्चितच प्रचंड प्रमाणावर वाढलेल्या आहेत. भाजपला देशात आणि महाराष्ट्रात जर स्वबळावर संपूर्णपणे सक्षम आणि बळकट बनवायचे असेल तर त्यासाठी सध्याचा काळ हाच भाजपसाठी सुवर्णकाळ आहे. मात्र देशात भाजपसाठी एवढे अनुकूल वातावरण असताना देखील महाराष्ट्रात शिवसेनेने शरद पवार यांच्या माध्यमातून जो महाराष्ट्र विकास आघाडीचा प्रयोग केला यामुळे राज्यातीलच नव्हे तर केंद्रातील भाजप नेतृत्वदेखील अस्वस्थ झालेले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपचे स्वबळाचे सरकार स्थापन होणे शक्य नाही असे जेव्हा केंद्रीय भाजप नेत्यांच्या लक्षात आले त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी शीतयुद्ध सुरू असलेल्या तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठबळ देण्याचे पद्धतशीर नियोजन हे केंद्रीय भाजप नेतृत्वाकडून सुरू झाले होते.

त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांना थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा धक्कादायक निर्णय जो भाजप केंद्रीय नेतृत्वाला घ्यावा लागला त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची स्वतःची अशी स्वतंत्र नीती आहे हे लक्षात घेतले पाहिजे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व संपुष्टात आणायचे आहे. आणि हे उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व जर संपुष्टात आणायचे असेल तर त्याकरता शिवसेनेतील बंडखोरालाच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसवून त्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचे अधिकाधिक खच्चीकरण करणे, त्यांची ताकद क्षीण करणे अशी रणनीती एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यामागे आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे जोपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या भात्यातील बाण स्वतःकडे आकर्षित करत राहतील आणि उद्धव ठाकरे यांचे अधिकाधिक राजकीय नुकसान करतील तोपर्यंत तरी महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना आणि विशेषत: मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या भाजप नेत्यांना मनावर आणि त्याच प्रमाणेडोक्यावर दगड ठेवण्याखेरीज अन्य कोणताही पर्याय भाजप पक्षश्रेष्ठींनी शिल्लकच ठेवलेला नाही हे एवढे जरी लक्षात घेतले तरी खूप झाले असेच म्हणावे लागेल.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -