घरसंपादकीयदिन विशेषहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज

Subscribe

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी मराठवाड्यातील भोसले या वतनदार घराण्यातील शहाजीराजे आणि जिजाबाई यांच्यापोटी शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांचे बालपण शिवनेरी, माहुली व पुणे येथे गेले. शहाजीराजांनी शिवाजी महाराज आणि जिजामाता यांच्याकडे महाराष्ट्रातील जहागिरीची व्यवस्था सोपवून त्यांना पुण्याला पाठविले. जहागिरीची प्रत्यक्ष व्यवस्था पाहण्यासाठी शहाजींनी दादोजी कोंडदेव आणि आपले काही विश्वासू सरदार यांची नेमणूक केली.

जिजाबाईंचा देशाभिमान, करारीपणा आणि कठीण प्रसंगांतून निभावून जाण्यासाठी लागणारे धैर्य, या त्यांच्या गुणांच्या तालमीत शिवाजीराजे तयार झाले. त्यांच्या या शिकवणीतून शिवाजीराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. आपल्या जहागिरीच्या संरक्षणासाठी गड, किल्ले आपल्या ताब्यात असले पाहिजेत, ही जाणीव त्यांना बालवयापासून झाली. त्यातूनच भविष्यातील हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराजांनी आपल्या उपक्रमाची सुरुवात सावधपणे केली. आपल्याशी सहमत होणारे समवयस्क तरुण त्यांनी जमविले आणि देशमुख, देशपांडे, वतनदार इत्यादींशी त्यांनी निरनिराळ्या प्रकारे संबंध जोडले. महाराजांनी पुण्याच्या परिसरातील मोकळ्या टेकड्या, पडके किल्ले, दुर्गम स्थळे हळूहळू आपल्या ताब्यात आणली. राजगड आणि तोरणा किल्ला (प्रचंडगड) महाराजांनी हस्तगत केला.

- Advertisement -

राज्यविस्तार करताना महाराजांनी जहागिरीचा सगळा बंदोबस्त आपल्याकडे घेतला. पुणे, सुपे, इंदापूर, चाकण ही या जहागिरीतील प्रमुख स्थळे होती. राष्ट्राचे संरक्षण दुर्गाकडून, राज्य गेले तरी दुर्ग आपल्याकडे असल्यास राज्य परत मिळविता येते, दुर्ग नसल्यास हातचे राज्य जाते, हे महाराजांचे धोरण होते. त्यांनी अनेक किल्ले बांधले, अनेकांची डागडुजी केली. लष्करी डावपेच, सैन्याची हालचाल आणि व्यूहरचना तसेच अनुकूल रणांगणाची निवड आणि प्रसंगावधान हे शिवाजी महाराजांच्या युद्धकौशल्याचे महत्वाचे विशेष होते. महाराज केवळ शूर आणि युद्ध निपूणच नव्हते तर ते एक उत्तम प्रशासकदेखील होते. अशा या महान राजाचे 3 एप्रिल 1680 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -