घरसंपादकीयअग्रलेखसंस्कृत-उर्दूचा ज्ञानपीठ संगम!

संस्कृत-उर्दूचा ज्ञानपीठ संगम!

Subscribe

कवीश्रेष्ठ गुलजार आणि रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ जाहीर होणे हे संवेदना आणि अध्यात्म या संगमाचा गौरव आहे. पहाटेच्या गारव्यात गवताच्या हिरव्यागार पानावर अलवार उतरणार्‍या दवाच्या थेंबासारखे शब्द कागदावर उतरवणारे गुलजार तरल संवेदनांचे जादूगारच म्हणायला हवेत, संपूरन सिंह कालरा म्हणजेच गुलजारांच्या नावाला तरलता, पाऊस, पहाट, जाणिवा, प्रेम, संवेदना असे शब्द पर्याय ठरू शकतात. ज्ञान किंवा ज्ञानपीठ हा शब्द गुलजारांच्या लेखनाशी बदलत्या अर्थाने थोडासा विसंगत वाटावा, ज्ञान म्हणजे या अर्थाने माहितीचा संचय असा अर्थ गुलजारांशी सुसंगत नाहीच. प्रेम, तरलता, संवेदना, जाणिवा ज्ञानाशी विसंगतच असतात. ज्ञानाचा अर्थ प्रेमात शोधता येत नाही, तर प्रेमाचा अर्थ ज्ञानियाला उमजतोच असंही नाही, म्हणून प्रेम किंवा मानवी जाणिवा या ज्ञानाशी विसंगतच असाव्यात. गुलजारांचं लेखन म्हणजे नज्म, गजल टोकदार नाहीच असं नाही, मात्र त्यांच्या शब्दांना धार नाही असंही नाही, परंतु ही धार ‘खुश्बू बिखेरणार्‍या’ गुलाब-मोगरा किंवा पारिजात फुलांच्या पाकळ्यांची असावी. या धारेनं झालेल्या जख्मा सुगंधी व्हाव्यात, गुलजारांच्या लेखनात ज्ञानाचा अहंकार नाहीच नाही, ज्ञानाला संवेदना समजेलच असंही नाही. ज्ञानासोबत प्रसंगी कठोरता, निर्णयक्षमता, अधिकारवाणी असलं काहीसं येऊ शकतं. जाणिवांचा प्रांत ज्ञानाचा नसल्यानं गुलजारांसोबत ज्ञानपीठ असा शब्द थोडासा वेगळा वाटू शकतो.

ज्ञानाचा संबंध माणसाच्या नैतिक जाणिवेपेक्षा त्याच्या आत्मानुभूतीशी जोडल्यावर रवींद्रनाथ किंवा कुसूमाग्रज या नावांसोबतच ज्ञानपीठ हा शब्द साजेसा होतो. गुलजारांच्या बाबतीतही हीच आत्मानुभूती ज्ञानपीठ सोबत येते, हे या पुरस्काराचं यशच आहे. गुलजारांनी बरंच लिहिलंय, त्यांनी चित्रपटांच्या कथा, पटकथा, गाणीही लिहिलीत, दिग्दर्शनही केलंय. अगदी ऑस्करची बाहुली गुलजारांचा जय हो म्हणत त्यांच्या दिवाणखान्यात विराजमान झालीय. कवी आणि कवितेवर आधीच्या काळाचा प्रभाव असण्याला कवीचा नाईलाज असतो, मात्र गुलजारांवर काळाचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव नाही. त्यामुळेच त्यांचे शब्द टोकदार आणि हळुवारपणाच्या मध्यममार्गातून नदीसारखे वाट काढत कागदाच्या डोंगरदर्‍यातून धावत असतात. कुसूमाग्रजांचं लेखन त्यांनी हिंदी, उर्दूत आणलं, ‘मैने बस शीशि बदली है…इत्र और खुश्बू वही है’ असं ते म्हणतात. नामदेव ढसाळ गेल्यावर गुलजार लिहितात….नामदेव ढसाळ तुला नेणारं स्मशान काही जास्त दूर नव्हतं, मलाच उशीर झाला तुझ्यापर्यंत पोहचायला…ढसाळांची कविता अद्याप पुरेशी आपल्याला उमगली नाही किंवा तेवढ्या जीवनानुभवापर्यंत आपण पोहचलेलो नाहीत, याचा हा कबुलीजबाब असावा. गुलजारांच्या लेखनावर बरंच काही लिहून झालंय, लिहून येतंय. गुलजारांच्या नज्मला संगीतसाज चढवणं आरडी (पंचम) साठी नेहमीच आव्हानात्मक होतं. ‘खामोश सा अफसाना पानी पे लिखा होता…ना तुमने सुना होता, न हमने लिखा होता’ किंवा ‘हमने देखी है उन आँखोकि महकती खुशबू…हाथ से छू के इसे रिश्तो का इल्जाम न दो’ जाणिवांच्या किनार्‍यावरून काही शब्द कवितेच्या आेंजळीत सामावून घेण्याची ही धडपड संवेदनांचा समुद्र अद्याप कित्येक खोल उतरण्याचा बाकी असल्याचा पुरावा ठरावेत, जाणिवांना नात्यांची नावे देऊच नका, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. संवेदनांना पाण्याच्या प्रवाहांवर लिहता येणं शक्य नाही, ‘खामोशी’ केवळ ऐकता येऊ शकते, लिहिता वाचता येणं शक्य नसतंच, ही मर्यादा जेवढी गुलजारांना समजली तेवढी खचितच इतर कवी लेखकांना कळली असावी. म्हणूनच गुलजारांच्या लेखनातले शब्द केवळ जागा भरण्याची कामे करत नाहीत, त्यांना एक शांततेचा अर्थ असतो, ही शांतता मौन असते, जगातल्या रोजच्या ‘जगण्याच्या आवाजात’ अशी मनातली शांतता ऐकू येत नाही, मग माणसं हळूहळू बहिरी होऊ लागतात, हे बहिरेपण बधिरतेपर्यंत पोहोचण्याच्या आत त्यावर इलाज करावा लागतो, अन्यथा हे बधिरलेपण हळूहळू माणसाला कुठल्याही संवेदना नसलेल्या निपचितपणाकडे घेऊन जाते, हा माणसाचा मृत्यूच असतो. तो टाळणे फार महत्वाचे असते.

- Advertisement -

स्वत:च्या मनातली शांतता ऐकल्यावर माणसांना दुसर्‍यांच्या मनातली शांतताही ऐकू येऊ लागते, हे मौन बरंच बोलणारं असतं, संवाद साधणारं असतं, शब्दांच्या पलीकडे असलेला हा ‘अनाहत’ नाद असतो, हाच अनाहत नाद पाहण्याची गरज नसते, तो ऐकावा लागतो, हा नाद ऐकणारे ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेले रामभद्राचार्य त्यामुळेच मोलाचे ठरतात. रामभद्राचार्यांनी मानवी मनातलं ‘हे खोलवर मौन’ बाहेरच्या वरकरणी आवाजी गोंगाट पसरलेल्या जगातही लहानपणासून ऐकलं. त्यामुळेच त्यांनी २०० हून अधिक पुस्तकांच्या रूपातून या मौनाला शब्दरूप दिले. अध्यात्म आणि धर्म या दोन घटकांच्या काठावरून त्यांची ज्ञानगंगा सातत्याने प्रवाही होती. जन्म झाल्यावर दोनच महिन्यात त्यांनी आपली दृष्टी गमावली होती. दोन डोळे जरी निकामी असले तरी तिसर्‍या ज्ञानरूपी नेत्राने ते भवताल पाहत होते. डोळ्यांचे काम कानांनी केल्यामुळे ऐकणे, समजून घेण्याची प्रक्रिया इतरांच्या तुलनेत अधिक सक्षम झाली. अनेकांनी या ज्ञानगंगेत आपली ज्ञानाची तहान भागवली. चित्रकूट येथील तुलसी पीठाची स्थापना त्यांनी केली. त्यांना २२ भाषांचे ज्ञान आहे. गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना जाहीर झालेला ज्ञानपीठ पुरस्कार हा खरोखरच दोन प्रतिभावंतांच्या विलोभनीय प्रतिभेच्या संगमाचा सत्कार म्हणावा लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -