Maharashtra Assembly Election 2024
घरसंपादकीयदिन विशेषनिबंधकार, कोशकार वासुदेव गोविंद आपटे

निबंधकार, कोशकार वासुदेव गोविंद आपटे

Subscribe

वासुदेव गोविंद आपटे यांचा आज स्मृतिदिन. वासुदेव आपटे हे मराठी लेखक, भाषांतरकार, पत्रकार, आनंद मासिकाचे संस्थापक व संपादक, बंगाली कथा-कादंबर्‍यांचे अनुवादक, निबंधकार व कोशकार होते. त्यांचा जन्म १२ एप्रिल १८७१ रोजी खान्देशातील धरणगाव याठिकाणी झाला. कोलकाता विद्यापीठाची बी. ए. परीक्षा १८९६ मध्ये उत्तीर्ण झाल्यावर ते नागपूरच्या ‘हिस्लॉप’ कॉलेजात एक वर्ष फेलो होते. त्यानंतर ते पुण्यातही काही काळ शिक्षक होते. पुण्यात त्यांना हरि नारायण आपटे यांच्या सहवासात मराठी भाषा व साहित्याची विशेष गोडी निर्माण झाली.

‘अशोक अथवा आर्यावर्तातला पहिला चक्रवर्ती राजा याचे चरित्र’ (१८९९) हे त्यांचे पहिले प्रकाशित पुस्तक. ते कोल्हापूरचे प्रोफेसर विजापूरकर यांच्या ग्रंथ मालिकेतून प्रसिद्ध झाले. त्यानंतर भगवान बुद्ध आणि त्याचा धर्म या विषयावरील ‘बौद्धपर्व अथवा बौद्ध धर्माचा साद्यंत इतिहास’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ त्यांनी १९०५ मध्ये लिहिला. काही काळ त्यांनी अलाहाबाद येथील ‘मॉडर्न रिव्ह्यू’त मराठी पुस्तकांच्या परीक्षणाचे व नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या ‘ज्ञानप्रकाशा’च्या संपादनाचे काम केले. १९०६ रोजी त्यांनी ‘आनंद’ हे मुलांचे मासिक सुरू केले. त्यांच्या एकूण लेखनापैकी सुमारे ७५ टक्के लिखाण भाषांतरित, रूपांतरित व आधारित अशा स्वरूपाचे आहे.

- Advertisement -

लेखन हा व्यवसाय त्यांनी आर्थिकदृष्ठ्या यशस्वी करून दाखविला. ‘मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी’ (१९१०),‘लेखनकला आणि लेखनव्यवसाय’ (१९२५), ‘मराठी शब्दरत्नाकर’ (१९२२), ‘मराठी शब्दार्थ चंद्रिका’ (१९२२), आणि ‘मराठी-बंगाली शिक्षक’ (१९२५) ही भाषाभ्यास विषयक; ‘जैनधर्म’ (१९०४), ‘टापटीपचा संसार’ (१९१४), ‘बालोद्यान पद्धतीचे गृहशिक्षण’ (१९१८), ‘सौंदर्य आणि ललितकला’ (१९१९) इत्यादी विविध विषयांवरील २४-२५ पुस्तके व बाल वाङ्मय विभागात छोटीछोटी ३०-३२ पुस्तके त्यांनी लिहिली. अशा या महान कोशकाराचे २ फेब्रुवारी १९३० रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -