घरसंपादकीयदिन विशेषथोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले

थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले

Subscribe

महात्मा जोतिबा फुले हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, समाजसुधारक होते. अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना शिक्षण देण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी सातार्‍यातील कटगुण येथे झाला. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांचा सावित्रीबाई यांच्याशी विवाह झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षांतच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.

बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्य्र आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यानुसार त्यांनी स्त्री-शिक्षणासाठी पुढाकार घेतला. १८४८ मध्ये पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून जोतिबांनी तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. त्यानंतर १८५२ मध्ये अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत शाळा स्थापन केली. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्‍याचा आसूड’या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्य्राची वास्तवता विशद केली आहे.

- Advertisement -

मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्व कुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचे वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे जोतिबांनी आपल्या ‘सार्वजनिक सत्यधर्म’ संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडले आहे. २४ सप्टेंबर १८५३ रोजी जोतिबांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. भारतीय समाज सुधारणेत महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांमध्ये जोतिबांचे नाव अग्रणी येते. अशा या थोर समाजसेवकाचे २८ नोव्हेंबर १८९० रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -