घरसंपादकीयओपेडरायगड काँग्रेसचे भरकटलेले जहाज मार्गी कसे लागणार !

रायगड काँग्रेसचे भरकटलेले जहाज मार्गी कसे लागणार !

Subscribe

माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी रायगड जिल्ह्याचा विकास केला. काँग्रेस पक्षाचा विस्तार केला. अंतुले यांच्यानंतर मात्र रायगडमध्ये काँग्रेस पक्षाची बिकट अवस्था झाली. काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाचा रायगड जिल्ह्यात एकही आमदार नसणे एकप्रकारे काँग्रेसचा जनाधार कमी होत चालल्याचे द्योतक मानावे लागेल. जिल्हा पातळीवर स्वत:चे स्थान निर्माण करू शकेल असे नेतृत्व काँग्रेसला घडवता आले नाही, हे या पक्षाचे दुर्दैव आहे.

रायगड जिल्हा हा संघर्ष करणार्‍यांचा जिल्हा म्हणून सर्वपरिचित आहे. या मातीत अनेक महापुरुष, कामगार नेते, सामाजिक कार्यकर्ते, नेते जन्मले व विकास घडवून आणला. बॅ. ए. आर. अंतुले यांनी रायगड जिल्ह्याचा विकास केला. काँग्रेस पक्षाचा विस्तार केला. अंतुले यांच्यानंतर मात्र रायगडमध्ये काँग्रेस पक्षाची बिकट अवस्था झाली. त्यातच माजी आमदार माणिकराव जगताप, माजी आमदार मधुकर ठाकूर, श्याम म्हात्रे या नेत्यांच्या निधनानंतर तर काँग्रेसमध्ये एकप्रकारची पोकळी निर्माण झाली. त्यानंतर मधुकर ठाकूर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेले अनंत गोंधळी शिवसेना शिंदे गटात दाखल झाले. अलिबाग तालुक्यातील पक्षसंघटना कठीण परिस्थितीत टिकवून ठेवणारा गोंधळी यांच्यासारखा एक शिलेदार पक्षाने गमावला, तर महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. स्नेहल जगताप या काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या सुकन्या आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे हनुमंत जगताप, संदीप जाधव, राजेंद्र कोरपे, धनंजय देशमुख, श्रीधर सकपाळ या प्रमुख कार्यकर्त्यांनीही ठाकरे गटात प्रवेश केल्याने काँग्रेसला धक्का बसला. तेव्हापासून काँग्रेसची वाताहात कधी थांबणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला.
जिल्ह्यात काँग्रेसला घरघर लागल्याचे लक्षात येताच अनेक नेत्यांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली. अमित नाईक, चारूहास मगर यांनी गतवर्षी पक्षत्याग करत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. माथेरानचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काही महिन्यांपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. कर्जत तालुका अध्यक्ष शिवाजी खारीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली. संघटनात्मक पातळीवर काँग्रेसला बसलेले हे मोठे धक्के मानले जातात. रायगड जिल्ह्यात एकेकाळी शेकाप आणि काँग्रेस हे प्रमुख राजकीय पक्ष म्हणून ओळखले जात होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये याच दोन पक्षांची थेट लढत व्हायची, मात्र गेल्या काही वर्षांत दोन्ही पक्षांचा जनाधार घटल्याचे दिसून येत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत तर काँग्रेस आणि शेकापचा एकही उमेदवार जिल्ह्यातून निवडून आला नाही. शेकापच्या तुलनेत आता जिल्ह्यातील काँग्रेसची परिस्थिती मात्र खूपच बिकट झाली आहे. रायगड जिल्ह्यात पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड असे सात विधानसभा मतदारसंघ येतात. यातले तीन मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात, तर उर्वरित चार रायगड मतदारसंघात समाविष्ट होतात. सद्यस्थितीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि भाजपचे प्राबल्य या जिल्ह्यात आहे. विधानसभेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेला ३, भाजपला २, राष्ट्रवादीला १ तर अपक्ष १ निवडून आला होता. अपक्ष आमदाराने नंतर भाजपला साथ दिली. एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या काँग्रेस आणि शेकापचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
रायगडमध्ये सध्या कोणत्याच एका पक्षाचे एकहाती वर्चस्व दिसून येत नसले, तरी माजी मंत्री आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचे प्राबल्य असलेला जिल्हा अशी महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली आहे. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्यावर वरचष्मा असल्याचे आमदारांच्या संख्येवरून दिसून येत नाही. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात असलेला एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस. या पक्षाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे योगदान दिले. स्वातंत्र्यानंतर भारतीय राजकारणात काँग्रेस पक्षाने आपली छाप उमटविलेली आहे. भारताची राजसत्ता पन्नासहून अधिक वर्षे एकट्या काँग्रेसच्या हाती होती. त्यामुळेच दिल्लीपासून गल्लीपर्यंत म्हणजेच संसदेपासून ग्रामपंचायतीपर्यंत सर्वत्र काँग्रेसचीच सत्ता अनेक वर्षे राहिली. तळागाळातील लोकांपर्यंत काँग्रेस पोहोचला असून गावागावांत काँग्रेसचे कार्यकर्ते आजही आढळतात, मात्र सध्या वादळात भरकटलेल्या जहाजाप्रमाणे काँग्रेसची वाटचाल सुरू आहे. पक्षाचे जिल्ह्यातील संघटनेबाबत असलेले उदासीन धोरण याला कारणीभूत आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षाची आणखी वाताहत झाली तर नवल वाटायला नको अशी स्थिती आहे. काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाचा रायगड जिल्ह्यात एकही आमदार नसणे एकप्रकारे काँग्रेसचा जनाधार कमी होत चालल्याचे द्योतक मानावे लागेल. कारण रायगडमधील मतदार हे सर्व जाती, धर्माचे आणि सर्व स्तरातले आहेत. धर्मनिरपेक्ष राजकारण ही काँग्रेसची धारणा आहे. त्यामुळे रायगडमध्ये काँग्रेसची अशी वाताहत होत असेल, तर जनसामान्यांपासून काँग्रेसची नाळ तुटत चालली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
रायगड काँग्रेसची पीछेहाट होण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी एक म्हणजे, काँग्रेसमध्ये लोकाश्रय असलेला नेता आजघडीस दिसत नाही. पक्षांतर्गत कुरघोडी करण्यात आणि एकमेकांचे पाय ओढण्यात काँग्रेस नेत्यांनी पक्षाचे नुकसान केलेले आहे. जिल्हा काँग्रेसला हायकमांडच्या इशार्‍यानुसार निर्णय घ्यावे लागतात. त्याचप्रमाणे काँग्रेसला साथ देणारा मतदार अन्य पक्षांकडे वळताना दिसतो. काँग्रेस हा सर्वधर्मीयांना सोबत पुढे घेऊन जाणारा पक्ष मानला जातो. अल्पसंख्याक समाज हा काँग्रेसचा गाभा आहे, मात्र हा समाजही काँग्रेसपासून दुरावला आहे. रायगडच्या शहरी आणि ग्रामीण भागातील राजकारण एकजीनसी नसल्यामुळे काँग्रेसला स्थिर असा आधार निर्माण करता आला नाही. रायगडमध्ये आगरी, कुणबी समाजाचे वर्चस्व आहे. त्याचबरोबर मराठा, मुस्लीम, ब्राह्मण, गुजराती, मारवाडी, सिंधी अशा विविध जातींच्या लोकांचे वर्चस्व वाढलेले दिसून येते. अलीकडच्या काळातील शहरीकरण, औद्योगिकीकरण यामुळे अमराठी वर्गही काही ठिकाणी राजकारणात आल्याचे दिसते. रायगडचे राजकारण कायमच भूमिपुत्रांचे प्रश्न अणि मुंबईच्या प्रभावाखाली घडत गेल्याचे दिसते. रायगडमधील शिवसेना आणि भाजपचा विस्तार हा या मुंबईकेंद्रित राजकारणापासून झाला. जिल्ह्यात आगरी समाज सधन आणि संघटित आहे, त्याचा लाभ शेकाप आणि काँग्रेसला मिळत होता, मात्र मागील काही काळात या दोन्ही पक्षांची अवस्था दयनीय झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गासह जिल्ह्यांतर्गत रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य या अगदी मूलभूत समस्या आजही रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये भेडसावत आहेत. दोन-दोन टर्म प्रत्येक मतदारसंघात एकच आमदार आहे, मात्र कुणीही या समस्यांवर कायमचा उपाय शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. बेरोजगारी हा जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्न आहे. महाड, धाटाव आणि रसायनी अशा तीन एमआयडीसी जिल्ह्यात आहेत. तरीही येथील तरुण मुंबई-पुण्यासारख्या शहरांकडे वळताना दिसतो. मुंबईच्या अगदी जवळ हा जिल्हा असूनही शिक्षण आणि आरोग्यासाठी आजही जिल्ह्यातील तरुणांना कोसो दूर जावे लागते. जिल्ह्यात जी व्यवस्था आहे, ती खासगी असल्याने ती महागडी आहे. सर्वसामान्यांचे हे प्रश्न ओळखून काँगेस आपले अस्तित्व निर्माण करेल अशी आभासी प्रतिमा मेळाव्यांमधून तयार केली जाते. प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
एकीकडे काँग्रेसला लागलेली घरघर, शेकापची पिछेहाट, राष्ट्रवादीने आपला निश्चित केलेला मतदार, शिवसेनेचे वाढते प्राबल्य आणि मागील काही वर्षांत भाजपची आलेली लाट या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाची धुरा कामगार नेते महेंद्र घरत यांच्याकडे आली. ग्रामपंचायत स्तरापासून जिल्हा परिषद ते इंटकचे राष्ट्रीय सचिव तसेच आयटीएफच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर महेंद्र घरत कार्य करत आहेत. त्यांचा स्वभाव रोखठोक असल्यामुळे पक्षासाठी झटून काम करणारे कार्यकर्ते त्यांच्याकडे आकर्षित झाल्याचे दिसते, मात्र तळागाळापर्यंत पोहोचून जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांना विश्वास देणे, संघटन मजबूत करणे, जनतेमध्ये काँग्रेसबद्दल विश्वास निर्माण करणे. विविध प्रकारची आंदोलने, धरणे, मोर्चे, मेळावे आणि बैठका घेऊन काँग्रेसचा आवाज जिल्ह्यात बुलंद करण्याचे अशक्यप्राय आव्हान घरत यांच्यासमोर आहे. यात त्यांना किती यश मिळेल आणि काँग्रेसला लागलेली घरघर कशाप्रकारे रोखली जाईल हे येणार्‍या निवडणुकीतील निकालानंतरच स्पष्ट होईल.
जिल्ह्यात एकेकाळी शेकाप आणि काँग्रेस हे दोनच प्रमुख पक्ष होते. पक्षाचे तीन-तीन आमदार जिल्ह्यातून विधानसभेवर निवडून येत असत, पण बॅ. ए. आर. अंतुले यांच्या पश्चात पक्षाची वाताहत सुरू झाली. राज्य तसेच जिल्हा पातळीवर स्वत:चे स्थान निर्माण करू शकेल असे नेतृत्व काँग्रेसला घडवता आले नाही. माणिकराव जगताप आणि मधुकर ठाकूर यांच्या पश्चात दुसरी फळी तयार होऊ शकली नाही. ज्या भागात काँग्रेसची अखेरची धुकधुक शिल्लक होती, त्या मतदारसंघातही बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. प्रत्येक स्थानिक नेता आपापल्या परीने राजकारण करत असल्याने येऊ घातलेल्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे अस्तित्व काय राहणार, हा प्रश्नच आहे. त्यामुळे वादळात भरकटलेल्या जहाजाप्रमाणे पक्षाच्या संघटनेची वाटचाल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसला ऊर्जितावस्था कशी मिळेल आणि भरकटलेले जहाज पुन्हा मार्गी कसे लागणार, हे येणार्‍या काळात दिसून येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -