घरसंपादकीयओपेडमोदींच्या मुखवट्यासमोर महायुतीतील नेत्यांचे लोटांगण!

मोदींच्या मुखवट्यासमोर महायुतीतील नेत्यांचे लोटांगण!

Subscribe

प्रत्येक निवडणुकीत जेव्हा काही धक्कादायक निकाल लागतात, तेव्हा मतदारांची मानसिकता निर्णायक ठरते हे प्रकर्षाने जाणवते, पण येणार्‍या काही वर्षांत धक्कादायक काही घडेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाटत नसावे किंवा ज्या प्रकारे ते महायुतीत सामील झाले आहेत, त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वलय, मुखवटा आपल्याला तारेल, असा त्यांना आत्मविश्वास आहे. ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ असे अभिमानाने मिरवणार्‍या महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांची अवस्था सध्या तरी दिल्ली दरबारी ‘घालीन लोंटागण, वंदीन चरण...’ अशीच झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीला किती जागा भाजप सोडणार की किरकोळ जागांवर त्यांची बोळवण करणार, हे लवकरच दिसून येईल. काहीही झाले तरी भाजप लोकसभेत आपल्या पक्षाचे स्पष्ट बहुमत होऊ शकेल यावर भर देत आहे, हे उघड आहे.

विकासाच्या आणि स्वाभिमानाच्या बाता मारत महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन महत्त्वाच्या पक्षांतील काही नेत्यांनी आपल्या मूळ राजकीय पक्षांची वाताहत केली. आम्ही करू तेच सत्तेचे शहाणपण आहे, असे म्हणत ‘डंके की चोट पर’ सत्तेत सामील झालेल्या या दोन पक्षांतील महत्त्वाकांक्षी राजकीय नेत्यांची येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले आणि आपल्या सोबत आलेल्या नेत्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठीची सुरू असलेली ससेहोलपट पाहता विधानसभा निवडणूक या दोन पक्षांनी भाजपमध्ये विलीन होत कमळाच्या चिन्हावर लढली तरी सामान्य मतदारांना आश्चर्य वाटणार नाही. दुसरीकडे घराणेशाही नको, असा नारा देत सातत्याने घराणेशाहीवर यथेच्छ टीका करत जनमत तयार करणार्‍या भाजप आता घराणेशहीपेक्षा वेगळे काय उमेदवार देणार आहे? महाराष्ट्रात एकाही जिल्ह्यात पारंपरिक राजकीय घराणी वगळता किती नवे चेहरे उमेदवार असणार आहेत, हा संशोधनाचा आणि भाजपच्या राजकीय नीतीच्या कसरतीचा विषय असणार आहे. मी आणि माझे घर या पलीकडे राजकीय नेते तिसर्‍या-चौथ्या पिढीतही जायला तयार नाहीत. मग एकट्या गांधी घराण्यावर सातत्याने टीकेचा भडिमार करण्यात काय अर्थ आहे? एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरात सूर मिसळून एकनाथ शिंदे, अजित पवार हे भाजपच्या वळचणीला गेलेले नेते उद्धव ठाकरे-शरद पवारांवर घराणेशाहीचा आरोप करतात, तर दुसरीकडे आपला मुलगा, आपली बायको यांना लोकसभेचे तिकीट मिळाले तरी पुरे! सोबत असलेल्या इतरांचा पत्ता कट झाला तरी विचारतो कोण, अशा अविर्भावात वावरताना दिसतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर भारतीय जनता पक्षाने देशात प्रचंड विस्तार केला. आज देशातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोदी तितकेच लोकप्रिय आहेत. महत्त्वाच्या जागतिक नेत्यांमध्ये त्यांची गणना होत आहे. आजच्या घडीला देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. त्यांचा शब्द झेलायला देशातील जनता, ईडी कारवाईला घाबरलेले विरोधी राजकीय नेते एका पायावर तयार आहेत. भाजपने मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 नंतर अनेक राज्यांत आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवले. त्यामुळे त्यांच्या विषयीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. येणार्‍या लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्याच नेतृत्वाखाली भाजप हॅट्ट्रिक करेल, असा अंदाज आहे. विविध राज्यांतील प्रादेशिक पक्षांना सोबत घेत 400 चा टप्पा पार करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने कंबर कसली आहे.

- Advertisement -

मोदी म्हणजे सामर्थ्यवान, विकसित भारताचा उद्गाता, प्रखर इच्छाशक्ती, दुर्दम्य आशावाद असलेला, भव्य स्वप्ने पाहणारा, महत्त्वाकांक्षा बाळगणारा आणि जबरदस्त आत्मविश्वास असलेला नेता अशी ‘इमेज’ (‘इव्हेंट’च्या माध्यमातून) निर्माण करण्यात भाजप यशस्वी झाला आहे. खासकरून कलम 370 निष्प्रभ करणे, अतिशय कमी वेळात कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून 100 कोटी जनतेला देणे, तिहेरी तलाक संपुष्टात आणणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अयोध्येतील जन्मस्थानावरच श्रीराम मंदिराची भव्य उभारणी ही सर्वच कामे अशक्यप्राय वाटणारी होती, मात्र प्रखर इच्छाशक्तीच्या आधारावर केंद्र सरकारने ती शक्य करून दाखविली. त्याचे सर्व श्रेय मोदींना देत भाजपने त्यांना ‘विश्वनेता’ केले आहे.
केंद्रातील काँग्रेसची सत्ता उलथवून मोदी सरकार 2014 साली सत्तेवर आले तेव्हा ‘अब की बार, मोदी सरकार’ हा नारा होता. त्यानंतर 2019 साली ‘फिर एक बार, मोदी सरकार’ आणि आता ‘अब की बार 400 पार’चा नारा यशस्वी करण्यासाठी ‘मोदी गॅरंटी’ हे घोषवाक्य परवलीचे झाले आहे. मोदी प्रथम पंतप्रधान झाले त्यावेळी वाटले होते देशात चांगले बदल होतील, राजकारणाचा घसरलेला दर्जा, राजकीय नेत्यांचे बदललेले चाल-चलन, चारित्र्य यात सकारात्मक बदल होतील. सुरुवातीला ‘सबका साथ, सबका विकास’ म्हणत मोदी यांनी जनतेमध्ये आशा निर्माण केली; मात्र गेल्या दहा वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आणि भाजप आणि मोदी यांचा खरा चेहरा जनतेसमोर येत त्यांच्या ‘करनी आणि कथनी’मध्ये मोठे अंतर आहे, हे वारंवार अधोरेखित होऊ लागले. ‘सबका साथ, सबका विकास’ म्हणत असतानाच त्यांनी देशातील आजवरच्या वाटचालीत योगदान दिलेल्या काँग्रेसला, काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य करत ते कसे भ्रष्टाचारी आहेत, देशद्रोही आहेत याचा डंका पिटला. कालांतराने भाजपने ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा दिला, त्याचबरोबर ‘शतप्रतिशत भाजप’ यशस्वी करण्याचा संकल्प सोडला. कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची यासाठी वाट्टेल ते करण्याची कार्यपद्धती भाजपने अवलंबली. त्यासाठी आपणच काँग्रेस वा इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांवर आरोप करायचे, आपल्या इशार्‍यानुसार वागणार्‍या यंत्रणांना कामाला लावायचे आणि त्यांना आपल्याकडील ‘वॉशिंग मशीन’मध्ये टाकून स्वच्छ करून घ्यायचे, हे तंत्र भाजपने अवलंबवले. भाजपच्या इशार्‍यांना घाबरूनच शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या वळचणीला गेले. हे करताना वर्षानुवर्षे जपलेल्या विचारधारेला तिलांजली देऊन भाजपने चक्क मेगाभरती सुरू केली. मोदींच्या कार्यकाळात राजकारणाची गणिते बदलली. केवळ सत्ताकारण ही एकच विचारधारा भाजपसोबत जाणार्‍या नेत्यांनी स्वीकारली आहे. त्यामुळेच कुठलीही नैतिकता न बाळगता नेते इकडून तिकडे जातात, भाजपदेखील कुठलीही नैतिकता न बाळगता दबावतंत्राच्या बळावर विरोधी नेत्यांना पक्षात घेतो. आता तर कलंक, भ्रष्टाचार, गुन्हेगारीचा शिक्का असलेल्यांचीच मोठी संख्या भाजपमध्ये दिसते. भाजप हा विचारधारा, तत्त्व मानणारा पक्ष मानला जात होता, पण आता परिस्थिती खूपच बदललेली आहे. सत्तेसाठी आम्ही काहाही करू शकतो, हे त्यांनी लोकांना दाखवून दिले आहे.
‘विरोधकमुक्त’ राजकारणाच्या नादात भाजप ‘विरोधकयुक्त’ बनल्याचे चित्र आहे. त्यात इतर पक्षांतून आलेल्यांना भाजपमध्ये चांगला मान मिळतो. जसे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना ‘उप’ बनावे लागले आणि बाहेरून आलेल्या एकनाथ शिंदे यांना ‘मुख्य’मंत्रीपदाचा मान मिळाला. त्यामागून गेलेल्या अजित पवार यांनादेखील उपमुख्यमंत्रीपद मिळाले. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपचा गंडा हाती बांधला आणि लगेच दुसर्‍याच दिवशी भाजपने त्यांची राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर करून खासदारकी बहाल केली. मोदी सरकारने डोळे वटारले की, सुतासारखे सरळ होऊन हे नेते भाजपवासी झाले हे आता लपून राहिलेले नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतल्याने भाजपला महाराष्ट्रात निश्चिती नसलेल्या मतदारसंघांतील विजयाची खात्री झाली आहे, तर ईडी कारवाई टाळण्यासाठी भाजपच्या सावलीत राहून मिळणार्‍या सत्तेचा लाभ उठविण्याचा शिंदे आणि अजित पवारांचा उद्देश त्यांच्या हालचालींतून स्पष्ट होत आहे. त्यासाठी ‘मोदी की गॅरंटी’ त्यांच्या पथ्यावर पडणार, हे सांगण्यासाठी आता राजकीय भविष्यवेत्त्याची गरज राहिलेली नाही.

लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपने आपली तब्बल 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून निवडणूक सज्जतेचे दर्शन घडवले आहे. ज्या जागा मागे ठेवलेल्या आहेत, त्यादेखील मित्रपक्षांना आणि नव्याने आकारास येणार्‍या युतींमधील पक्षांना सामावून घेण्यासाठी मागे ठेवण्यात आल्या आहेत. भाजपच्या या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. महाराष्ट्रात भाजपसोबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत युती असल्याने जागावाटपाच्या मॅरेथॉन चर्चा सुरू आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीला किती जागा भाजप सोडणार की किरकोळ जागांवर त्यांची बोळवण करणार हे लवकरच दिसून येईल. काहीही झाले तरी भाजप लोकसभेत आपल्या पक्षाचे स्पष्ट बहुमत होऊ शकेल यावर भर देत आहे, हे उघड आहे.
एकंदरच महायुती, महाआघाडी, भाजप काय किंवा देशभरातील कोणताही राजकीय पक्ष मी आणि माझे घर यापलीकडे जायला तयार नाही. गत पाच वर्षात अनेकार्थाने ढवळलेले राजकारण यंदा टोकाचे गढूळ होणार आणि प्रत्येक नेता स्वत:च एका हातात दहा शस्त्रे घेऊन कायदा आणि सुव्यवस्था आम्ही असताना कोण बिघडवतो, असे विचारत घराणेशाहीच्या पुढे कोणाला जाऊ देणार नाही हेच खरे! अर्थातच यासाठी दिल्ली दरबारात जितके झुकावे लागेल, तितके झुकण्याची तयारी महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीत सामील झालेल्या नेत्यांनी केल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -