घरसंपादकीयओपेडसोशल मीडिया म्हणजे खुळ्याच्या हातातील कोलीत!

सोशल मीडिया म्हणजे खुळ्याच्या हातातील कोलीत!

Subscribe

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे महत्त्व जसजसे वाढत आहे, तसतसे शत्रू अस्वस्थ होऊ लागले आहेत. भारतातील असंतुष्ट लोकांची माथी भडकावून त्यांच्या हाती शस्त्र देण्याचे काम पाकिस्तान करत असतो, पण आता त्याचीही गरज भासत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून नुसती माथी भडकवली की असे अनेक जण स्वत:हून हाती शस्त्रे घेतात. यात चीनही मागे नाही. मणिपूरमधील अशांततेमागे चीनचादेखील हात असल्याचे बोलले जाते. सोशल मीडिया हे अनेक वेळा खुळ्याच्या हातातील कोलीत ठरते. तो कुठेही आग लावत जातो. त्यातून अनेक जण नाहक होरपळले जातात.

गेल्या अडीच महिन्यांत दोन धक्कादायक घटना घडल्या. एक घटना माणुसकीचे दर्शन घडविणारी होती, तर दुसरी मानवतेला कलंक फासणारी! दोन्ही घटनांचे व्हिडीओ व्हायरल झाले अन् त्यांच्या सर्वत्र प्रतिक्रियाही उमटल्या. महिनाभरापूर्वी पुण्याच्या रस्त्यावर एक थरार घडला. एमपीएससीची परीक्षा देणार्‍या एका मुलीवर भरदिवसा एका तरुणाने कोयत्याने हल्ला केला. एकतर्फी प्रेमातून घडलेली ही घटना होती, पण नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ती मुलगी बचावली आणि हल्लेखोराला पोलिसांनी गजाआड केले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. लोकांच्या सजगतेचे, माणुसकीचे आणि समाजाप्रति असलेल्या बांधिलकीचे दर्शन यानिमित्ताने झाले, तर दुसरीकडे मणिपूरमधील मनाचा थरकाप उडवणारा एक व्हिडीओ अलीकडेच व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ ४ मे २०२३ रोजीचा असल्याचेही उघड झाले आहे. हजारोंच्या जमावाने दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्याचा हा व्हिडीओ आहे. केवळ महिलांची धिंडच काढली नाही, तर त्यांच्या देहाची विटंबनाही केली जात होती. या अमानुष प्रकाराचे तीव्र पडसाद उमटणे सहाजिकच होते. तसे ते उमटलेदेखील. समाजाच्या प्रत्येक थरातून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. माणसातील पशुत्वाचे दर्शन घडविणारी ही घटना होती. एवढ्या हजारोंच्या जमावात असे कोणीही नव्हते, जो त्या महिलांच्या बाजूने उभा राहील हेच कटू सत्य आहे. महिलेची विटंबना बंद दरवाजाआडच नव्हे तर भररस्त्यातही केली जाते हे अनेक घटनांमधून समोर आले आहे.

- Advertisement -

 धृतराष्ट्राचे दरबार आजही भरत आहेत हे वास्तव आहे. युग कोणतेही असो विटंबना ही कायम स्त्रिचीच झाली आहे. सर्वात खेदाची गोष्ट म्हणजे जिथे महिलांची ‘शक्ती’ म्हणून पूजा केली जाते, तिथेच तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला जातो. वसईची श्रद्धा वालकर, मीरा रोडची सरस्वती वैद्य, नवी दिल्लीतील साक्षी यांच्या बाबतीत जे घडले ते डोके सुन्न करणारेच होते. अशी अनेक उदाहरणे देता येतील.

मणिपूरमधील त्या घटनेचा जवळपास अडीच महिन्यांनी हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर आला आणि याबाबत आक्रोश व्यक्त होताच संबंधित आरोपींची धरपकड सुरू झाली आहे. मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार पाहता असा एकमेव प्रकार घडला नसावा अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. अडीच महिने मणिपूर पोलीस स्वस्थ का बसले? या प्रश्नापासून सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची घेतलेली गंभीर दखल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेला लज्जास्पद संबोधतानाच कोणाचीही गय केली जाणार नाही हा दिलेला इशारा, विरोधकांची आक्रमक भूमिका असे अनेक मुद्दे आहेत. ते त्या त्या जागी योग्यदेखील आहेत, पण जखमेवर नुसती मलमपट्टी करून उपयोग नाही. त्याचे मूळ, त्याचा उगम कुठे आहे हे शोधून त्यावर रामबाण उपाय करण्याची खरी गरज आहे.

- Advertisement -

सोशल मीडिया अर्थात समाजमाध्यमावर आलेल्या एका फोटोमुळे मणिपूरमधील घटना घडल्याचे सांगण्यात येते. एका मुलीचा मृतदेह एका प्लास्टिमध्ये गुंडाळल्याचा हा फोटो होता. तो फोटो होता नवी दिल्लीतला, पण तो मणिपूरचा आहे आणि ती एका विशिष्ट जाती-जमातीची मुलगी असून बलात्कार केल्यानंतर तिला मारून टाकण्यात आल्याचे ‘फेक वृत्त’ समाजमाध्यमांवर पसरले. त्यातून त्या जाती-जमातीच्या हजारो लोकांनी दुसर्‍या जाती-जमातीच्या लोकांवर हजारोंच्या संख्येने हल्ला केला. त्यातून ही दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली.

थोर विदुषी दुर्गा भागवत यांनी ‘व्यासपर्व’ या पुस्तकात महाभारतकालीन व्यक्तिरेखांचे विश्लेषण केले आहे. ‘कर्णा’च्या व्यक्तिरेखेबद्दल लिहिताना त्यांनी त्यावेळच्या समाजव्यवस्थेबाबत केलेले भाष्य मणिपूरच्या घटनेवरून आजही काही प्रमाणात लागू होते. भारतीय समाजातील जातीचे कुंपण इतके बंदिस्त आहे की ते ओलांडून जाणे अशक्य आहे. त्यातून जातीय हिंसाचार उफाळतो. नवे तंत्रज्ञान जितके आयुष्याला सुकर बनवत आहे तितकेच ते देशाच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. सायबर हल्ला हा त्याचाच एक भाग आहे. विविध वेबसाईट तसेच सोशल मीडिया हॅक करून लाखो लोकांचा डाटा चोरला जातो. बनावट टेलिफोन एक्स्चेंज चालवून कोट्यवधींचा गंडा घातला जातो.

याशिवाय समाजमाध्यमांचादेखील धोका आहेच. तोच मोठा हानिकारक आहे. निवृत्त लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे यांनी एका चर्चासत्रात सांगितले की, ‘आजकाल सर्वांच्या हातात दिसणारा स्मार्टफोन हा स्टेनगनपेक्षाही धोकादायक आहे. स्टेनगनमधून एकावेळी किती गोळ्या फायर होतात हे ठरलेले असते, पण स्मार्टफोनमधील सोशल मीडियाचे फायरिंग अमर्यादित आणि बेछूट असते.’ याचा प्रत्यय आपल्याला अनेकदा येतो.

‘संवादाची भूक ही जिवंतपणाची साक्ष आहे. माणूस आणि जनावर यात हाच फरक आहे. शब्दांचा शोध हा तेवढ्यासाठीच ‘अणू’च्या शोधापेक्षा महान आहे,’ असे प्रसिद्ध लेखक व. पु. काळे सांगतात. शहरी भागातील धकाधकीच्या जीवनात एकमेकांशी संवाद साधण्याचे तसेच व्यक्त होण्याचे प्रभावी साधन म्हणजे समाजमाध्यम आहे. म्हणूनच त्यावर विविध गोष्टींची चर्चा घडविणे सोपे झाले आहे आणि त्यावर निकोप चर्चा व्हायला हवी, पण कोणतेही, कसेही एडिट केलेले, आगापिछा नसलेले, चित्रण नेमके कुठले आणि कोणत्या काळाचे आहे याचा संदर्भ नसलेले अनेक व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केले जातात आणि ते चटकन व्हायरलदेखील होतात.

 त्याचा परिणाम काय होऊ शकतो याची जाणीव अनेकांना असते. जाणूनबुजून आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो, मजकूर समाजमाध्यमांवर शेअर केले जातात. त्याचे परिणाम निरपराध लोकांना भोगावे लागतात. सोशल मीडियाच्या आहारी बहुतांश सर्वच जण गेले आहेत. त्यामुळे देशविघातक शक्तींना लोकांचा बुद्धीभेद करणे सोपे झाले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे इसिस म्हणजेच इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरियाचे म्हणता येईल. कोणतेही आगापिछा नसलेले व्हिडीओ ‘अमुक एका ठिकाणाचे’ असल्याचा दावा करत मुस्लीम तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्याची पद्धत इसिस वापरते. समाजमाध्यमांद्वारे अशा तरुणांपर्यंत पोहचता येते. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकरणांच्या तपासात इसिसची हीच मोडस ऑपरेंडी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जागतिक मंदी असो की कोरोना महामारी जगातील बहुतांश देशांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे, पण स्थिर अर्थव्यवस्था फक्त भारताची राहिली. त्याशिवाय अंतराळ संशोधनातही भारताची अमिट छाप आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे महत्त्व जसजसे वाढत आहे, तसतसे जे शत्रू आहेत ते अस्वस्थ होऊ लागले आहेत, तर नवे निर्माणही होत आहेत. भारतातील असंतुष्ट लोकांची माथी भडकावून त्यांच्या हाती शस्त्र देण्याचे काम पाकिस्तान करत असतो, पण आता त्याचीही गरज भासत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून नुसती माथी भडकवली की असे अनेक जण स्वत:हून हाती शस्त्रे घेतात ही मेख अनेकांना उमगली आहे. त्यात तंत्रज्ञानात अग्रेसर असलेले चीनसारखे देश मागे कसे राहणार? मणिपूरमधील अशांततेमागे चीनचादेखील हात असल्याचे बोलले जाते.

सन २०२०-२१मध्ये राजधानी दिल्लीच्या वेशीवर झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या वेळीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरून नागरिकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न झाला होता. स्वीडनमधील हवामान बदल आणि पर्यावरण संरक्षण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने त्यावेळी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता. शिवाय सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी ‘टूलकिट’ प्रकार समोर आला होता. मणिपूरमधील महिलांची धिंड काढल्याच्या घटनेमागेही सोशल मीडियाच असल्याचे दिसते. म्हणूनच दुर्बल मानसिकतेमुळे देशाच्या सुरक्षिततेला किती धोका आहे ही बाबदेखील या घटनेमुळे अधोरेखित होते. देशाच्या सुरक्षिततेची जबाबदारी केवळ सीमेवरील सैन्यावर तसेच राज्यातील पोलीस दलावर आहे या भ्रमात राहणे चुकीचे आहे.

आपले देशप्रेम केवळ प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिनापुरते नको. दिवाळीला ‘एक पणती सीमेवरील जवानासाठी’ असे मेसेज पाठवायचे, पण आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा लवलेशही नसावा हे योग्य नाही. ‘देश प्रथम’ ही मनोभूमी प्रत्येकाची तयार व्हायला हवी. समाज (विशिष्ट धर्म, जात, पंथ अभिप्रेत नाही, तर सर्व देशवासी) एकसंध राहणारी मानसिकता कशी असायला पाहिजे हे व्हिएतनामने दाखवून दिले आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर व्हिएतनामचे युद्ध झाले होते. त्यामध्ये बलाढ्य अमेरिकेलाही माघार घेण्यास व्हिएतनामने भाग पाडले होते. अमेरिकेने त्यावेळी लाखावर सैन्य युद्धात उतरवले होते. अमाप पैसा खर्च केला होता, पण त्यांच्या हाती काही लागले नाही. हीच राष्ट्रीयत्वाची भावना प्रत्येक भारतीयात हवी. त्यातूनच देशात अशांतता पसरवणार्‍या मनोवृत्तीला लगाम बसेल.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -