घरसंपादकीयओपेडवाढते अपघात रोखा रे बाबांनो!

वाढते अपघात रोखा रे बाबांनो!

Subscribe

वाहनांच्या अपघातांचे वाढते प्रमाण पाहिले की ‘वाढते अपघात रोखा रे बाबांनो’ अशीच साद संबंधित यंत्रणांना अनेकजण घालत असतील. गाजावाजा करून अपघात रोखता येणार नाहीत. चालकांचे समुपदेशनही झाले पाहिजे. काही महाभाग असे आहेत की चालकाला अनुभव नसताना त्याच्या हाती वाहन सोपवतात. छोट्या वाहनांच्याबाबतीत हा प्रकार अधिक प्रमाणात पहावयास मिळतो. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहन चालविणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे.

शनिवार १५ एप्रिल रोजी पहाटेच्या काळ्याकुट्ट अंधारात मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बोरघाटात श्री शिंग्रोबा मंदिराजवळ तीनशे फूट खोल दरीत कोसळून खासगी बसच्या भीषण अपघातात १४ जणांना जीव गमवावा लागला. यात बहुतांश १५ ते २६ या वयोगटातील युवक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ते पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये गेले होते. तेथील कार्यक्रमात उपस्थितांची वाहवा मिळवून सर्वजण या बसमधून परतत होते. अवघ्या काही अंतरावर काळाने या सर्वांवर घाला घातला. अपघातातून बचावलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार बस वेगात होती. त्यापूर्वी दोन ते तीन वेळा मुलांनी चालकाला बस हळू नेण्याची विनंती केली, परंतु चालक त्याच्या मस्तीत होता आणि अखेर त्याने त्याच्यासह इतर निष्पाप युवक-युवतींना मृत्यूस कवटाळणे भाग पाडले. एकूण घटनाक्रम लक्षात घेतला तर अपघाताला पूर्णपणे चालक जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या घटनेला आठ दिवस पूर्ण होत नाही तोच पुणे-बंगळुरू मार्गावर पुण्याजवळ रविवारी, २३ एप्रिल रोजी, पहाटे दोन वाजता वेगात आलेल्या ट्रकने पुढे चाललेल्या आराम बसला धडक दिल्याने बसमधील चौघांचा मृत्यू झाला. बेदरकारपणे वाहन चालविणे ही फार मोठी समस्या ठरत आहे. अपघात झाला की चर्चा होते, मृतांचे प्रमाण अधिक असले किंवा मृतांत कुणी नामवंत असेल तर थातूर-मातूर उपाय केले जातात. थोड्या दिवसांनी अशा घटना विसरल्या जातात. बोरघाटातील बस अपघाताचे वृत्त ज्या दिवशी वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले त्याच दिवशी खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे घडलेल्या दुर्घटनेने 14 जणांचा बळी घेतला. त्यामुळे घाटातील दुर्घटनेची बातमी मागे पडून खारघर दुर्घटनेची चर्चा सुरू झाली. अपघाती घटनांबाबत हे असेच होत आले आहे. मृत किंवा जखमींचे नातेवाईक वगळले तर अशा घटना इतरांच्या विस्मृतीत जातात. रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक बाब आहे. ठराविक ठिकाणी अपघात रोखण्यासाठी उपाययोजना राबविल्या म्हणजे अन्य ठिकाणच्या अपघातांनाही ब्रेक लागणार असे नाही. वाहनचालकांतील बेदरकारपणा वाढत्या अपघातांमागील प्रमुख कारण आहे. दारू पिऊन वाहन चालविण्याचा ‘आनंद’ घेणारे मोठ्या संख्येने आहेत. भन्नाट वेग हे दोन्ही ठिकाणी समान ‘तत्व’ आहे. महाराष्ट्रासह देशात रस्ते अपघातांचे प्रमाण भयावह असून त्यात दरवर्षी वाढ होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित येणारी वाहने ही अभिमानाची बाब असली तरी दुसरीकडे त्यांचा वेग आपल्याकडील रस्त्याला मानवणारा नसल्याचे लक्षात घ्यावे लागेल. रस्त्यांचे, महामार्गांचे जाळे पसरत चालले असले तरी बर्‍याच ठिकाणी त्याचा दर्जा टुकार आहे. ज्या ठिकाणी रस्त्यावर पोलीस तपासणी, इतर अडथळे असतात त्या ठिकाणी शिस्तीत (!) धावणारी वाहने अन्य रस्त्यांवर सुसाट धावतात. तेथे चालकांना कसले भय वाटत नाही. वेडवाकडे ओव्हरटेक, प्रमाणापेक्षा वेग वाढवणे असे प्रकार तेथे घडतात आणि त्यातून अपघाताचा धोका वाढतो.

- Advertisement -

महाराष्ट्रात २०२२-२३ मध्ये अपघाताची आकडेवारी ३३०६९ आहे. त्यात जवळपास १५ हजार जणांचा मृत्यू ओढावलेला आहे. अपघातांची आकडेवारी दरवर्षी वाढत आहे. देशातील सर्वाधिक वर्दळीपैकी एक असलेल्या मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर वाढते अपघात रोखण्यासाठी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) बसविण्यात आली आहे. याचा उपयोग वाहनांच्या वेगावर मर्यादा ठेवतानाच वाहतुकीला शिस्त यावी यासाठी आहे. या यंत्रणेमुळे अपघातात घट झाल्याचा दावा केला जात आहे. त्यात तथ्य असेल तर ही बाब नक्कीच स्वागतार्ह आहे. अलीकडे बोरघाटात ढोल पथकाच्या बसला झालेल्या अपघानंतर द्रुतगतीप्रमाणे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरही अशी यंत्रणा बसविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अनेकदा असे लक्षात आलेय की द्रुतगतीतून टोलमुक्ती मिळविण्यासाठी महामार्गावरून वाहने आणली जातात. अपघात रोखण्यासाठी आयटीएमएससारखी यंत्रणा योग्य असली तरी इतर ठिकाणी वाहतुकीच्या बेदरकारपणाला वठणीवर आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार, हा प्रश्न आहे. गाजावाजा करून सुरू करण्यात आलेला समृद्धी महामार्ग अपघाती मार्ग ठरतोय की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. गेल्या १०० दिवसांत ९०० हून अधिक अपघात होऊन त्यात ३१ पेक्षा अधिकांचा बळी गेला आहे. मुंबई ते नागपूरपर्यंतचा हा मार्ग आहे. त्याचे काम नागपूर ते शिर्डी इतके झाले असून उर्वरित काम सुरू आहे. संपूर्ण मार्ग तयार होईल तेव्हा अपघाती घटना वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आतापासूनच अपघात प्रतिबंधक उपाययोजना केल्या पाहिजेत.

आपल्याकडे रस्त्यांचा दर्जा सुमार राहिलेला आहे. फारच थोडे असे रस्ते आहेत की त्यावरील प्रवास सुखावह असतो. सुमार दर्जाच्या रस्त्यावरून वाहन सुसह्य मार्गावर धावू लागले की त्याचा वेग वाढविण्यात येतो. अनेकदा वाहनांत वेगाची शर्यत सुरू असल्याचा भास होतो. ओव्हरटेकचा प्रयत्न करताना बर्‍याचदा निष्काळजीपणा दाखविण्यात येतो. अपघातांचे प्रमाण वाढत असले किंवा अपघातामागचे कारण लक्षात येत असले तरी ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ असे कधी होत नाही. घडलेली घटना विसरून आपल्याच मस्तीत वाहन चालविण्यात धन्यता मानली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आजच्या वाहनांची रचना आहे. पूर्वी अवजड किंवा मल्टी अ‍ॅक्सल वाहन चालविताना चालकाचा हात थकून जात असे. आता तशी परिस्थिती नाही. या वाहनाचा चालक वेळप्रसंगी रुबाबात एका हातात स्टेअरिंग पकडून रस्ता पार करीत असतो. पॉवर स्टेअरिंग आणि इतर सुविधांमुळे अवजड वाहने सुसाट वेगाने पळताना दिसतात. छोट्या चारचाकी वाहनांमधील झालेले बदल वेग वाढविण्यासाठी सहाय्यभूत ठरत आहेत. योग्य वेग वाढविण्यावर कुणाचा आक्षेप असणार नाही, पण वेग वाढविताना आसपासच्या परिस्थितीचे भान राखले जात नाही. वळणावर ओव्हरटेक करू नये हा साधा नियम असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. शहरातून येणार्‍या वाहनांच्या चालकांना वळणावळणाच्या रस्त्याचा अंदाज नसला तरी बिनधास्त ओव्हरटेक केले जातात असे कित्येकदा निदर्शनास आले आहे.

- Advertisement -

प्रवासी वाहन चालविताना वेगाचे भान राखले जात नाही. रात्रीच्या वेळी धावणार्‍या प्रवासी बस वार्‍याशी स्पर्धा करावी अशा वेगाने चालविल्या जातात. महामार्गावर हॉटेल किंवा धाब्यांवर या बस थांबतात तेव्हा हॉटेल किंवा धाब्याच्या मालकांकडून त्यांच्या चालकांची ‘उत्तम’ बडदास्त ठेवली जाते. काही चालक तेथे दारू ढोसून नंतर वाहन चालवत असल्याचे किती तरी वेळा आढळून आले आहे. यावर कोणतीच कठोर कारवाई होत नसल्याने साराच आनंदीआनंद आहे. अपघाताची घटना घडली की मग सारवासारव करण्यासाठी कारवाईचा दंडुका उगारल्याचे चित्र उभे केले जाते. सणासुदीत किंवा मे महिन्याच्या सुट्टीत रस्त्यावर वाहनांची संख्या इतर दिवसांच्या तुलनेत काही पटीने वाढते. या कालावधीत अपघातांचे प्रमाण वाढलेले दिसते ते केवळ आणि केवळ चालकाच्या बेफिकीरीमुळे! पैसे कमविण्याच्या हव्यासापोटी छोटी-मोठी प्रवासी वाहने या दिवसांत अधिक प्रमाणात रस्त्यावर आलेली दिसतात. चालक पुरेशी विश्रांती न घेताच वाहन चालवितात. गेल्या जानेवारी महिन्यात रायगड जिल्ह्यातील माणगाव शहराजवळ पहाटेच्या सुमारास ईको आणि ट्रकच्या अपघातात ईकोमधील 10 जण दगावले होते. रात्रीचा प्रवास सुखदायी वाटत असला तरी चालकाला विश्रांती मिळालेली नसेल तर पहाटेच्या वेळी त्याला डुलकी लागण्याची शक्यता असते हे प्रवासीही लक्षात घेत नाहीत. रात्रीचा प्रवास सुरू करण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना वारंवार केल्या गेल्या असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानण्यात येते.

वाहनांच्या अपघातांचे वाढते प्रमाण पाहिले की ‘वाढते अपघात रोखा रे बाबांनो’ अशीच साद संबंधित यंत्रणांना अनेकजण घालत असतील. गाजावाजा करून अपघात रोखता येणार नाहीत. चालकांचे समुपदेशनही झाले पाहिजे. काही महाभाग असे आहेत की चालकाला अनुभव नसताना त्याच्या हाती वाहन सोपवतात. छोट्या वाहनांच्याबाबतीत हा प्रकार अधिक प्रमाणात पहावयास मिळतो. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहन चालविणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. लेनची शिस्त पाळण्याबाबतही दुर्लक्ष केले जाते. लेन आखून दिल्या म्हणजे त्यामागे निश्चित असे काही नियम असल्याचे चालकांच्या लक्षातच येत नाही. मोठी वाहने उजवीकडच्या लेनमधून, तर छोटी वाहने डावीकडील लेनमधून धावत असल्याचे दृश्य आता सर्वसामान्य झाले आहे. पोलीस किंवा आरटीओकडून होणार्‍या कारवाईबाबत कुणाला भय राहिलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. वाहतूक पोलीस किंवा आरटीओकडून शिस्तीचा किंवा कारवाईचा बडगा ठराविक ठिकाणीच नाही तर सर्वत्र उचलला जात असल्याचे पहायला मिळाले तर वाहनचालकांना जरब बसेल. कारवाई करताना होणार्‍या अर्थपूर्ण तडजोडीही बंद झाल्या पाहिजेत. चालकांच्या बेपर्वाईमुळे वाहन अपघात होतात हे स्पष्ट झाल्याने चालकांवर यंत्रणांचा जरब असलाच पाहिजे. कारवाई करताना डावे-उजवे होत नाही असे जेव्हा चालकांच्या लक्षात येईल तेव्हा सर्वचजण सुतासारखे सरळ येतात की नाही ते पहा!

सध्या सुट्टीचा हंगाम सुरू असल्याने ठिकठिकाणच्या रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढलेली आहे. प्रवास सुखरूप आणि निर्धोक होण्यासाठी प्रवाशांनी आणि चालकांनी काळजी घेतली पाहिजे. किंचितशीही चूक अपघाताला कारणीभूत ठरते. वाढते अपघात रोखले गेले पाहिजेत. त्यासाठी यंत्रणांची मानसिकता बदलून त्यांनाही कठोर व्हावेच लागेल.

वाढते अपघात रोखा रे बाबांनो!
Uday Bhisehttps://www.mymahanagar.com/author/uday-bhise/
गेली २७ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाणाची विशेष आवड. डिजिटल मीडियाचाही अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -