Eco friendly bappa Competition
घर संपादकीय ओपेड गणेशोत्सव काळात बहरू शकेल कोकणातील पर्यटन!

गणेशोत्सव काळात बहरू शकेल कोकणातील पर्यटन!

Subscribe

कोकणातील गणेशोत्सव अनुभवायला परदेशी पाहुणेही हजेरी लावतात. तेही उत्सवात भाग घेतात. कोकण हा पर्यटनबहुल प्रदेश असल्याने गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांतील, पर राज्यांतील, देश आणि देशाबाहेरील पर्यटकांना गणेशोत्सव काळात कोकणात सैर घडवून आणण्याची गरज आहे. पर्यटनामुळे उद्योग व्यवसायही बहरतील. कोकणातील पर्यटन साधारणपणे दिवाळीपासून बहरत जाते. त्यापूर्वी पर्यटन गणेशोत्सव काळात बहरू शकते. फक्त त्यासाठी कल्पकता दाखविण्याची गरज आहे.

दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा झाल्यानंतर महाराष्ट्राला विशेषतः कोकण पट्ट्याला गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. अवघ्या १० दिवसांनी सर्वांच्या लाडक्या बाप्पांचे आगमन होईल आणि पुढील १० दिवसांचा जल्लोष सुरू होईल. गणेशोत्सव आणि होळी हे असे २ सण आहेत की मुंबई किंवा अन्य शहरात नोकरी, व्यवसायानिमित्त असलेला कोकणी माणूस काही झाले तरी आपल्या मूळ गावी येत असतो. रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ३ जिल्ह्यांतून बाहेरगावाहून येणार्‍यांची संख्या काही लाखांत असते. त्यासाठी तो अनेक दिव्य पार करून गावी पोहचत असतो.

कोकणात येण्यासाठी जेव्हा रेल्वेची सुविधा नव्हती, तेव्हा सर्व भार एसटीवर असे. गणेशोत्सवाप्रमाणे होळीसाठी एसटीकडून नेहमीच्या व्यतिरिक्त २ हजार किंवा त्याहून अधिक बसेस विविध शहरांतून सोडण्यात येत असत. दुपदरी असणारा तेव्हाचा मुंबई-गोवा महामार्ग एसटी, खासगी वाहनांनी फुलून जात असे. त्यावेळी वाहतूक कोंडीचा प्रचंड फटकाही बसत असे. पळस्पे येथून गाडी पेणच्या दिशेला वळली की कर्नाळा खिंड, खारपाड्याचा अरुंद पूल, वडखळ, कोलाड, माणगाव या ठिकाणी वाहतूक कोंडीचा हमखास सामना करावा लागत होता.

- Advertisement -

सिंधुदुर्गात पोहचण्यासाठी अनेकदा चोवीस तास प्रवासाचाही अनुभव प्रवाशांना येई. प्रवास नकोसा वाटे, पण तरीही घरी जाण्याची ओढ असल्याने चाकरमानी तो त्रास सहन करीत होते. नव्वदच्या दशकात कोकण रेल्वे सुरू झाली आणि मग हळूहळू एसटीवरचा भार कमी होत गेला. प्रवास काहीसा सुकर होत असल्याने कोकणात जाणार्‍यांनी रेल्वेला प्राधान्य दिले. यासाठी रेल्वेकडून जादा गाड्या सोडण्यात येऊ लागल्या. यंदा तर जवळपास तीनशे जादा गाड्या तळकोकण, गोव्यापर्यंत धावणार आहेत, मात्र एसटी किंवा रेल्वेकडून जादा गाड्यांचे प्रयोजन केले जात असले तरी प्रवाशांना या सुविधा पुरेशा ठरत नसतात.

मग तेथे खासगी प्रवासी वाहतूकदारांची एन्ट्री होते. गेल्या काही वर्षांत खासगी बसेस, कार, जीप, टेम्पो यातून प्रवास करणार्‍यांची संख्या लक्षणीय असल्याचे लक्षात येते. तीन-चार वर्षांपासून राजकीय नेत्यांकडूनही चाकरमान्यांना गावी नेण्याची व्यवस्था केली जात आहे. अर्थात कितीही त्रास झाला किंवा जादाचे पैसे मोजावे लागले तरी कोकणी माणूस मागे हटत नाही, गावी कसेही करून पोहचायचे इतकेच ध्येय त्याच्यासमोर असते.

- Advertisement -

रस्त्यापेक्षा रेल्वेचा कोकणातील प्रवास बराचसा सुसह्य असतो. गेले १३ वर्षे रखडलेले मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण अलीकडे कठोर टीकेच्या आणि तितक्याच चेष्टेच्या भोवर्‍यात सापडलेले आहे. अनेक ठिकाणी या मार्गाची दैना उडाली असल्याने त्यावर मलमपट्टीचे काम सुरू आहे. पावसाने व्यत्यय आणला नाही, तर येत्या चार-पाच दिवसांत ही मलमपट्टी पूर्ण होईल असे वाटते. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरवला जातो. अवजड वाहतूक वेठीला धरून प्रवासी वाहनांचा मार्ग मोकळा करून दिला जातो.

बर्‍याचदा चाकरमानी रात्रीचा प्रवास करणे पसंत करीत असतात. काही वेळेला हा प्रवास धोकादायकही ठरू शकतो. खासगी चारचाकी वाहनांची संख्या वाढली असली तरी त्यावरील चालक प्रशिक्षित किंवा कोकणातील वळणावळणाच्या रस्त्यांची माहिती असणारा असतोच याची हमी नसते. त्यात अतिउत्साह, घातक ओव्हरटेक असे प्रकार घडतात. काही वेळेला रात्री वाटेत मद्यपान करून वाहन चालविले जाते.

यातून दुर्घटना घडू नये म्हणून पोलीस लक्ष ठेवून असतात, परंतु त्यांनाही शेवटी मर्यादा आहेत. रात्री प्रवासाची सुरुवात करण्याऐवजी पहाटे प्रवास सुरू करावा, असे आवाहन अनेकदा केले जाते, पण त्याला कुणी दाद देत नाहीत. वाहनांची उपलब्धता हाही भाग त्यात असतो. खासगी वाहनांचे मालक पैशांच्या हव्यासापोटी चालकाला लागोपाठ वाहनावर पाठवितात किंवा चालकही जादा पैसे मिळणार म्हणून विश्रांती घेण्याकडे दुर्लक्ष करतात. वाहनांतील प्रवाशांना याची माहिती असली तरी तेही गावाकडे पोहचण्याच्या घाईत याकडे कानाडोळा करतात.

काळाच्या ओघात गणेशोत्सवाचे स्वरुपही बदलत आहे. लोकमान्य टिळक यांनी समाज प्रबोधनासाठी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे स्वरुप बदलत असताना तो हायटेकही झाला आहे. मुंबई, पुणे आणि मोठ्या शहरांतील गणेशोत्सवाच्या खर्चाचे आकडे डोळे दिपविणारे असतात. इतकेच नव्हे तर कोट्यवधी रुपयांचा विमाही उतरविण्याची पद्धत सुरू झाली आहे. कोकणातही पारंपरिक गणेशोत्सव भव्य-दिव्य स्वरुपात होऊ लागला आहे. मुले चांगली शिकली सवरल्याने त्यांना नोकर्‍याही चांगल्या आहेत.

स्वाभाविक खर्च करताना हात आखडता घेतला जात नाही. गणेशोत्सवात ग्रामीण भाग खर्‍या अर्थाने ‘बोलू’ लागतो. एरव्हीचे तेथील रटाळ आणि कंटाळवाणे वातावरण बदललेले असते. अडखळणारी अर्थव्यवस्थाही गतिमान होताना दिसते. गणेशोत्सवातील ग्रामीण भागातील जल्लोष एकदा तरी अनुभवावा असा नक्कीच असतो. रात्रीचे जागरण, करमणुकीचे कार्यक्रम अशी तेथे फूल टु धम्माल असते. शहरातून येणार्‍या चाकरमान्यांना हे दिवस आनंददायी वाटतात आणि म्हणूनच गावाकडे पोहचण्याची त्यांना घाई झालेली असते.

कोकणातील गणेशोत्सव अनुभवायला परदेशी पाहुणेही हजेरी लावतात. तेही उत्सवात भाग घेतात. कोकण हा पर्यटनबहुल प्रदेश असल्याने गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांतील, पर राज्यांतील, देश आणि देशाबाहेरील पर्यटकांना गणेशोत्सव काळात कोकणात सैर घडवून आणण्याची गरज आहे. तसे झाले तर उत्सवात अधिक निटनेटकेपणा, वैविध्य आणण्याचा प्रयत्न होईल. पर्यटनामुळे उद्योग व्यवसायही बहरतील. कोकणातील पर्यटन साधारणपणे दिवाळीपासून बहरत जाते. त्यापूर्वीच पर्यटन गणेशोत्सव काळात बहरू शकते. फक्त त्यासाठी कल्पकता दाखविण्याची गरज आहे. कोकणातील गणेशोत्सव पाहण्यासाठी इतरत्रहून लोकं येतात, मात्र त्यांची संख्या तशी नगण्य असते. यासाठीच गणेशोत्सव पर्यटनाचा विचार झाला पाहिजे.

कोकणातील रायगड जिल्ह्याचा पेण तालुका हा गणेशमूर्तींसाठी जगप्रसिद्ध आहे. कधी काळी केवळ पेण शहरापुरता असणारा गणेशमूर्ती व्यवसाय तालुक्यातील हमरापूर, शिर्की या परिसरात कमालीचा बहरला आहे. हजारो हातांना तेथे काम मिळत आहे. तसेच या व्यवसायातून करोडो रुपयांची उलाढाल होताना दिसते. बर्‍याचशा गणेशमूर्तीकारांना घरातील गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तयारीला वेळ मिळत नसल्याने ते साखरचौथ (भाद्रपदातील श्री संकष्ट चतुर्थीला येणारा गणपती) गणेशोत्सव साजरा करतात, पण गमतीचा भाग असा की साखरचौथ गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरुपही आले आहे. परिणामी मूर्तिकारांचेही काम वाढले आहे.

पेणप्रमाणेच रायगडात इतर तालुक्यांतूनही साखरचौथ गणेशोत्सवाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेले आहे. गणेशमूर्ती कार्यशाळांतून परप्रांतीय कारागीरही काम करत आहे, पण हेच कारागीर भविष्यात आपल्या बोकांडी बसणार नाहीत याची पारंपरिक मूर्तिकारांनी खबरदारी घेतली पाहिजे. मराठी माणसाचे अनेक व्यवसाय परप्रांतीयांच्या हाती जात असताना गणेशमूर्ती तयार करण्याचा व्यवसाय अलगद त्यांच्या हाती जाण्याचा धोका लक्षात घेऊन स्थानिक तरुणाईने या व्यवसायात रस दाखविण्याची नितांत गरज आहे.

एकीकडे गणेशोत्सवाचा जल्लोष जेव्हा सुरू होतो, तेव्हा जुगाराला ऊत येत असतो. तीन पत्ता, रमी अशा खेळांतून या दिवसांत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. पोलिसांकडून जुगार न खेळण्याचे आवाहन जरी केले जात असले तरी तिकडे दुर्लक्ष करण्यात येते. इतकेच नव्हे तर काही वेळेला समोर पैसे न ठेवता प्लास्टिक कॉईनचा वापर केला जातो. अर्थातच ही धूळफेक असते. गणपतीच्या उत्सवात जुगार खेळण्याचा प्रकार अतिशय वाईट आहे. काही जुगारी मुक्काम ठोकून बसतात. जुगारात पैसे कमी पडले की घरातील सोने गहाण ठेवून किंवा ते चक्क विकून खेळण्याची हौस भागवून बरबाद होतात.

बदलत्या काळात गणेशोत्सवाचे स्वरुप निश्चित बदलेले असले तरी त्यात पावित्र्य जपलेच गेले पाहिजे. मनोरंजनात्मक कार्यक्रमांबरोबर प्रबोधनात्मक कार्यक्रमांनाही सार्वजनिक मंडळांनी प्राधान्य दिले पाहिजे. आज जाती-जातींमधून भांडणे लावण्याचे काम नतद्रष्ट मंडळी जाणीवपूर्वक करताना दिसत आहेत. याचा परिणाम असा होत चाललाय की एक समाज दुसर्‍या समाजाकडे संशयाने पाहत आहे. गुण्यागोविंदाने राहणारी माणसे जातीपातीच्या राजकारणात भरडून निघत आहेत. हे थांबण्याची गरज आहे.

यंदा गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुदर्शीला मुस्लीम धर्मीयांचा ईद-ए-मिलाद हा सण आहे. या दिवशी कुठेही कटूता येणार नाही याची पोलिसांप्रमाणेच सुजाण नागरिकांना काळजी घ्यावी लागेल. समाजासमाजात भांडणे लावणार्‍यांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागणार आहे. दोन्ही धर्माच्या लोकांनी तो दिवस कसा आपुलकीच्या भावनेत पार पडेल आणि पोलिसांची काळजी कमी होईल हे पाहिले पाहिजे. कुठलेही सण भांडणासाठी नव्हे तर वातावरण सौहार्दाचे राहण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात.

गणेशोत्सव काळात बहरू शकेल कोकणातील पर्यटन!
Uday Bhisehttps://www.mymahanagar.com/author/uday-bhise/
गेली २७ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाणाची विशेष आवड. डिजिटल मीडियाचाही अनुभव.
- Advertisment -