घरसंपादकीयअग्रलेखपावसाने केले वस्त्रहरण!

पावसाने केले वस्त्रहरण!

Subscribe

मुंबईकर पावसाच्या प्रतीक्षेत असताना शनिवारी त्याचे जोरदार आगमन झाले. पहिल्यांदाच आलेल्या या जोरदार पावसाने मुंबईत बर्‍याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले, याबद्दल पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता, ‘पाऊस आला त्याचे स्वागत करा, पाणी साचले ही तक्रार काय करता,’ अशी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया ऐकल्यावर पत्रकारही अचंबित झाले, कारण हा काही हसण्यावारी नेण्यासारखा विनोदाचा विषय नव्हता. हा अनेक मुंबईकरांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी निदान गांभीर्य बाळगून उत्तर देण्याची अपेक्षा होती, पण कुणीही सत्तेत असले तरी मुंबईत पाणी तुंबणार ही आता काळ्या दगडावरील रेघ असल्यामुळे कदाचित मुख्यमंत्र्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त करताना फार गांभीर्याने विचार केला नसावा. त्यांचे हे हलके फुलके उत्तर पुढील काळात त्यांना त्रासदायक ठरू शकते.

कारण मुंबईमध्ये पावसाच्या कालावधीमध्ये पाणी साचून लोकांचे हाल होऊ नयेत, वेळीच पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी काही हजार कोटींचे प्रकल्प उभारण्यात येतात. नालेसफाईवर कोट्यवधींचा खर्च केला जातो, पण इतके सगळे करूनही पावसाच्या दिवसांमध्ये मुंबईची तुंबई होतच राहते. त्यात पुन्हा पावसाळ्यात खड्ड्यांचे मोठे संकट असते. ते पार करताना अनेक मुंबईकारांना आपला जीव गमवावा लागतो. अनेकांची हाडे खिळखिळी होऊन हाडांचे आजार बळावतात. या वर्षी मुंबईत पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडू नयेत, म्हणून मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे जाहीर केले होते. काही भागात हे काम झालेले आहे, पण वेगाने आणि व्यापकतेने हे काम व्हायला हवे होते, तसे झालेले दिसत नाही, त्यामुळे या वर्षीही सगळ्याच मुंबईकरांना खड्डेमुक्त मुंबईचे सुख मिळेल असे वाटत नाही.

- Advertisement -

मुंबईतील नालेसफाईची कामे मुंबई महानगरपालिकेकडून केली जातात. त्याची जबाबदारी ही प्रामुख्याने त्या त्या भागातील नगरसेवकांवर आणि महापालिकेच्या आयुक्तांवर असते. पालिकेचे अधिकारी या कामांवर देखरेख करत असतात. पण प्रत्यक्षात मुख्यमंत्री पायी चालत जाऊन नालेसफाईच्या कामांची पाहणी करत नाहीत. कारण मुख्यमंत्री हे राज्यातील उच्च पद आहे. ते नालेसफाईची कामे पाहण्यासाठी जात नाहीत. पण यावेळी चित्र वेगळे दिसले. पावसाळा सुरू होण्याअगोदर मुख्यमंत्री नालेसफाई कशाप्रकारे झाली आहे, ते पाहण्यासाठी स्वत: गेले. इतकेच नव्हे तर शनिवारच्या पावसाने मुंबईत जिथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले तिथेही त्यांनी जाऊन पाहणी केली. मुख्यमंत्री नालेसफाईसाठी रस्त्यावर उतरून कशासाठी पाहणी करत आहेत, यापूर्वी असे चित्र कधी दिसले नाही, ते आता का दिसत आहे, हे न समजण्याइतके लोक काही दूधखुळे नाहीत. ये पब्लिक हैं, ये सब जानती हैं. मुख्यमंत्री याविषयी बोलताना आपल्या भाषणांमधून सांगतात की, मी जनसामान्यांचा मुख्यमंत्री आहे, मी घरात बसून काम करणारा मुख्यमंत्री नाही, त्यामुळे मी रस्त्यावर उतरून लोकांच्या समस्या जाणून घेत आहे, असे म्हणून ते त्यांचे मुख्य टार्गेट असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोले मारत आहेत, पण या टोलेबाजीने मुंबईची तुंबई होण्यावर उत्तर मिळत नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मे महिन्यात एकनाथ शिंदे यांनी स्वत: मुंबईत ठिकठिकाणी जाऊन नालेसफाईच्या कामांची पाहणी केली होती. इतकेच काय पावसात ज्या भागात पाणी तुंबेल तेथील पालिका अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल, अशी तंबी दिली होती.

त्याप्रमाणे एका अधिकार्‍याला मुख्यमंत्र्यांनी कारवाईचा इंगा दाखवला होता. इतके सगळे करून पावसाच्या पहिल्या दणक्यात मुंबईच्या बर्‍याच भागात पाणी कसे काय तुंबले, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांकडे दिसत नाही, म्हणून त्यांनी ते हलक्यात घेऊन पावसाचे स्वागत करा, असे आवाहन केले. मुख्यमंत्र्याच्या या विधानावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महापालिकेत कसा भ्रष्टाचार झालेला आहे, त्याचा पाढा वाचायला सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांनी केलेलं हे विधान निर्लज्जपणाचे, नाकर्तेपणाचे आहे. भ्रष्टाचाराचा कोणता चेहरा असेल, तर हे खोके सरकार आहे, असा शेरा आदित्य ठाकरे यांनी मारला. पण पावसाने सगळ्यांचेच वस्त्रहरण केले आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेचा कार्यकाल संपल्यामुळे तिथे निवडणूक होणे अपेक्षित होते, पण प्रभाग निर्मितीचे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे निवडणुका होणे अवघड होेऊन बसलेले आहे. खरे तर याविषयाचा निर्णय होऊन निवडणुकांची वाट मोकळी करण्यात न्यायालयाने अधिक सक्रिय असायला हवे होते. आता पावसाळ्यानंतर मुंबईसह काही महापालिकांच्या निवडणुका होतील, असा अंदाज बांधला जात आहे. त्यासाठीच मुख्यमंत्री नालेसफाईच्या बाबतील जास्त सक्रिय झालेले दिसत आहेत. कारण मुंबईत पाणी साचल्यामुळे लोकांचे खूप हाल होतात. तसेच रस्त्यावरील खड्डे हाही कळीचा मुद्दा असतो. मुंबईतील सर्वसामान्य मतदारांसाठी हे महत्वाचे मुद्दे असतात. राज्यात सत्तेवर असलेल्या शिंदे आणि फडणवीस यांना यावेळी मुंबई महापालिका काहीही करून आपल्या ताब्यात घ्यायची आहे. त्यासाठी मुख्यमंत्री नालेसफाईच्या पाहणीसाठी स्वत: रस्त्यावर उतरले होते. आता सगळा पाऊस संपेपर्यंत मुख्यमंत्री ठिकाठिकाणी जाऊन पाण्यात उतरून मदतकार्य करतानाचे चित्रही दिसू शकेल. त्याचवेळी ते कसे काम करत आहेत, याची उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे पाहणी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -