घरसंपादकीयअग्रलेखसामंजस्याचा दसरा मेळावा व्हावा

सामंजस्याचा दसरा मेळावा व्हावा

Subscribe

महाराष्ट्रात सध्या अभूतपूर्व अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ता मिळवण्याच्या अटीतटीच्या स्पर्धेत मराठी माणसांमध्ये रणसंग्राम होऊन रक्तपात होणार की काय अशी भीती राज्यातील सर्वसामान्य माणसांच्या मनात निर्माण झाली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा हा दरवर्षी शिवाजी पार्कवर होत आला आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासूनची ही परंपरा आहे. या शिवाजी पार्क म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या जीवनावर ठसा उमटवणारे अनेक समारंभ झाले आहेत. राजकीय नेत्यांच्या विक्रमी सभा झाल्या आहेत. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात घेऊन आल्यावर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पहिली सभा शिवाजी पार्कवर झाली.

मराठी माणसांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत स्थापित करण्यात आला. महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाला नवी कलाटणी देणार्‍या अनेक घटनांचा शिवाजी पार्क साक्षीदार आहे. इतकेच नव्हे तर शिवाजी पार्कची स्मशानभूमीही तितकीच प्रसिद्ध आहे. म्हणजे मुंबई आणि परिसरात कुणाचा मृत्यू झाला तर त्याच्यावर अंत्यसंस्कार जवळच्या स्मशानभूमीत झाले तरी त्याचा पिंडदान विधी करण्यासाठी लोक शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीत येतात. याच शिवाजी पार्कवर येत्या विजयादशमीला काय होणार याविषयी महाराष्ट्रातील लोकांच्या मनात उत्सुकता आहे आणि त्याचबरोबर भीतीही आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ४० आमदारांनी बंड करून भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर खरी शिवसेना कुणाची यावरून वाद सुरू आहे. हा वाद सध्या न्यायालयात सुरू असून त्याचा नेमका निकाल काय लागणार याकडे ठाकरे आणि शिंदे गटाचे तसेच भाजपचे डोळे लागलेले आहेत. त्यामुळे तिन्ही घटकांवर सध्या टांगती तलवार लटकत आहे. ठाकरे आणि शिंदे गटासंबंधी विविध खटले सध्या न्यायालयात प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर खरी शिवसेना ही आपलीच आहे, असा दावा करणार्‍या शिंदे गटाला सोबत घेऊन भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली आहे, पण या दोघांनी स्थापन केलेल्या सत्तेवरील अनिश्चिततेचे सावट अजून दूर झालेले नाही. त्यासाठी शिवसेनेसोबत राहून त्यांच्याच लोकांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना निष्प्रभ करण्याची रणनीती भाजपने अवलंबलेली आहे. त्यात त्यांना सध्या बर्‍यापैकी यश येताना दिसत आहे.

- Advertisement -

शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा विषय राहिलेला आहे, पण यावर्षी मात्र परिस्थिती बदललेली आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केले. त्यानंतर स्थानिक पातळीवरील बरेच नगरसेवक आणि कार्यकर्ते शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे शिंदे गटाची ताकद वाढत आहे. ती अशीच वाढत जाणे हे भाजपच्या पथ्यावर पडणारे आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अट्टाहासामुळे भाजपला २०१९ साली विधानसभा निवडणुकीनंतर हातातोंडाशी आलेली सत्ता गमवावी लागली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे आपला प्रभाव वाढत आहे हे लक्षात आल्यावर भाजपने महाराष्ट्रातील शिवसेनेसोबत असलेली आपली युती तोडली. तेव्हापासूनच उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आले की, महाराष्ट्रात आपल्याला दुय्यम स्थान घ्यावे लागणार. काहीही करून मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच हवे, असा त्यांचा हट्ट होता. त्यामुळे त्यांनी आपल्या विचारसरणीच्या विरोधी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आघाडी करून सत्ता मिळवली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यावर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले, पण शिवसेनेच्या अनेक खासदारांची, आमदारांची, नगरसेवकांची, शिवसैनिकांची राजकीय कोंडी झाली होती हेच एकनाथ शिंदे यांना मिळणार्‍या प्रतिसादावरून दिसून येत आहे. कारण यापूर्वी शिवसेनेतील काही नेत्यांनी बंड केले, पण त्यांना पक्षातून इतका प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे खरेतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर गांभीर्याने विचार करायला हवा होता, पण त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आघाडी केल्यामुळे ते कोंडीत सापडले आहेत.

अशा वेळी आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्रभर पाठवून पक्षामध्ये नवी ताकद भरण्याचा प्रयत्न ते करत आहेत, पण त्याचवेळी ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये चकमकी उडू लागल्या आहेत. ठाण्यात शिवसेनेच्या एका शाखेवर ठाकरे आणि शिंदे यांच्या गटांनी दावा सांगून त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. बुलढाण्यात नुकतीच ठाकरे आणि शिंदे यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. पुढील काळात राज्यातील काही महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे त्यात सरशी मिळवण्यासाठी या दोन गटांमध्ये मोठी चुरस आहे. त्यातून या चकमकी उडत आहेत. आता शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा प्रतिष्ठेचा बनवण्यात आला आहे. त्यातूनच शिंदे गटाने दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेऊन उद्धव ठाकरे यांना निष्प्रभ करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. त्यातून दोन गटांनी मुंबई महानगरपालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केले आहेत, पण दरवर्षीप्रमाणे शिवसेनेला अजून परवानगी मिळालेली नाही.

- Advertisement -

आपली बाजू अधिक मजबूत व्हावी यासाठी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. कारण राज ठाकरे जर दसरा मेळाव्यात सहभागी झाले तर उद्धव ठाकरे यांना शह देणे अधिक सोपे जाईल असे शिंदे यांना वाटत असावे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे नेतेही राज ठाकरे यांना भेटले. यावरून राज ठाकरे यांना शिंदे यांच्या मेळाव्याला आणण्याचे प्रयत्न भाजपकडूनही सुरू असल्याचे दिसून येत आहे. शिंदे यांनी बंड केल्यावर त्यांचे आमदार गुवाहाटीला गेले तेव्हा तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, असे राज्यातील भाजपचे नेते सांगत होते, पण शिंदे यांच्या बंडामागे भाजप होती असे पुढे स्पष्ट झाले. तसे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच भाषणात विधानसभेत एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. शिवसैनिक दरवर्षी दसर्‍याला विचारांचे सोने लुटायला शिवाजी पार्कवर येत असतात, पण यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. कारण ठाकरे आणि शिंदे गट एकाच वेळी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास अडून बसले तर परिस्थिती अवघड होईल. उद्धव ठाकरे गट, शिंदे गट आणि राज ठाकरे यांची मनसे या तिघांचा गाभा हा शिवसेना आहे. शिवसेना ही मराठी माणसांच्या न्यायहक्कांसाठी स्थापन झाली होती. याचे भान या तिघांनी ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे सगळ्याच संबंधितांनी समजूतदारपणा घेऊन हा मेळावा सामंजस्याचा होईल असे पाहिले तर सर्वांच्याच हिताचे होईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -