घरताज्या घडामोडीतेजस ठाकरेंची राजकारणात ग्रॅण्ड एण्ट्री होणार

तेजस ठाकरेंची राजकारणात ग्रॅण्ड एण्ट्री होणार

Subscribe

खेकड्यांना वठणीवर आणणार; किशोरी पेडणेकर यांचे सूचक विधान

मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे हे लवकरच राजकारणामध्ये सक्रिय होणार असल्याचे संकेत आहेत. मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या सूचक विधानामुळे तेजस ठाकरे यांची राजकारणात एण्ट्री होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, तेजस ठाकरे हे ओजस्वी तसेच तेजस्वी आहेत. त्यामुळे तेजस हे नाव कधी राजकारणात आले तर ते ओजस्वी रितीने काम करतील. तेजस ठाकरेंची राजकारणामध्ये ग्रॅण्ड एण्ट्री होणार, असे वक्तव्य त्यांनी केले.

- Advertisement -

त्या पुढे म्हणाल्या की, तेजस यांची ओळखच वेगळी आहे. खेकड्यांना कसे वठणीवर आणायचे हे त्यांना माहीत आहे आणि वेगवेगळ्या खेकड्यांना त्यांनी तेजस खेकडा, ठाकरे खेकडा अशी नावे दिली आहेत. ते राजकारणात एण्ट्री करणार की नाही याबाबत त्यांचे वडील आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच सांगू शकतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तेजस ठाकरेंच्या राजकारणातील प्रवेशाबाबत गेल्या कित्येक दिवसांपासून मोठ्या चर्चा होत आहेत, मात्र अजून त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केलेला नाही, परंतु आता किशोरी पेडणेकरांनी याबाबत महत्त्वाचे विधान केल्याने तेजस ठाकरे प्रकाशझोतात आले आहेत. तेजस ठाकरे हे विविध देशांतील जंगलांमध्ये प्राण्यांवर तसेच जैव विविधतेवर संशोधन करीत आहेत. आता ते राजकारणात उतरतील अशी शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेला सावरण्यासाठी तेजस ठाकरे यांच्या राजकीय लाँचिंगकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी मुंबईतील गिरगाव येथील दहीहंडी कार्यक्रमाकरिता शिवसेनेतर्फे लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर तेजस ठाकरे यांचेही फोटो झळकले होते. आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेजस ठाकरे शिवसेनेत सक्रिय होऊ शकतात, असा अंदाज आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे तेजस ठाकरे यांच्याविषयी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी केलेल्या एका विधानाची नेहमीच चर्चा होते. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, उद्धवचा नंबर दोनचा मुलगा सेम माझ्यासारखाच आहे. त्याच्या आवडीनिवडी माझ्याशी जुळतात, असे बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्कच्या भाषणात जाहीरपणे बोलले होते. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी राज भवनावर पोहचले होते, त्यावेळी त्यांच्यासोबत तेजस ठाकरेही होते. संपूर्ण सत्तासंघर्ष त्यांनी जवळून पाहिला होता. त्यामुळे कदाचित त्यांचे लवकरच राजकारणात आगमन होणार असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -