घरमनोरंजनशशांकचे 31 दिवस; श्रीमुळे मिळाली प्रसिद्धी

शशांकचे 31 दिवस; श्रीमुळे मिळाली प्रसिद्धी

Subscribe

‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतील श्री या नावाने घराघरात ओळखला जाणारा अभिनेता शशांक केतकर आगामी ‘31 दिवस’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्या निमित्ताने त्याच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...

मराठी अभिनेता शशांक केतकर याच्या करिअरचा आत्तापर्यंतचा ग्राफ कायमच चढता राहिला आहे. नक्की कसा घडला ‘अॅक्टर’ शशांक केतकर? त्याची ही एक्स्क्लुझिव्ह मुलाखत….

‘31 दिवस’ चित्रपटाची कथा व तुझ्या भूमिकेबद्दल सांग?

मी या चित्रपटात मकरंद नामक भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे नाव वाचल्यानंतर एक अंदाज येतो की 31 दिवसांत काहीतरी आव्हान पूर्ण करायचे असेल. नेमके काय आव्हान असेल हे चित्रपटात कळेल. पण, ध्येयाने पेटलेला माणूस असतो. तो एका मोठ्या शारीरिक संकटात सापडतो. मग, त्या संकाटातून तो कसा धैर्याने मार्ग काढतो आणि त्याची स्वप्ने कशी पूर्ण करतो, यावर आधारीत चित्रपटाची कथा आहे. फक्त तरूणाईलाच नाही तर सर्वांना रिलेट करणारी ही गोष्ट आहे. असे संकट कोणावरही येऊ शकते. त्यातून खचून न जाता पुन्हा जोमाने उभे राहता येते, असे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे.

 या चित्रपटात त्रिकोणी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे का ?

अजिबात नाही. या चित्रपटात माझ्याबरोबर मयुरी देशमुख व रिना अगरवाल प्रमुख भूमिकेत असल्या तरी त्रिकोणी प्रेमकथा पाहायला मिळणार नाही. तिसर्‍या नायिकेची चित्रपटात काय भूमिका आहे, हे सांगणे जरा अवघड आहे. मात्र ही इंटरेस्टिंग भूमिका असून माझी ती मार्गदर्शक (गाइड) दाखवलेली आहे. चित्रपटातील माझ्या वाईट काळामध्ये ती मार्गदर्शन करताना दिसणार आहे. तर माझ्या पत्नीच्या भूमिकेत मयुरी दिसणार आहे.

बाहुबली चित्रपटात पाहायला मिळालेला केरळमधील प्रसिद्ध धबधबा अथिरापल्लीवर तुम्ही एका गाण्याचे चित्रीकरण केले आहे, या गाण्याचा अनुभव कसा होता?

केरळमध्ये चित्रीकरण करत असताना तिथे आम्हाला अनेक मराठी लोक भेटले. तिकडे ते आमचे फोटो काढायला लागले. त्यावेळी काही विदेशी पर्यटकांना आम्ही बॉलिवूडचे कलाकार आहोत, असे वाटले म्हणून त्यांनी आमच्यासोबत फोटो काढले. हा खूपच वेगळा अनुभव होता. तिथे अजून एक गमतीशीर गोष्ट कळली की नैसर्गिकरित्या त्या धबधब्याचे पाणी वाहत असते. शिवाय वरती कंट्रोल वॉल्वसुद्धा आहेत. जे पैसे देऊन पाण्याचा फ्लो वाढवता येतो. आम्ही या गाण्यासाठी वॉल्व पूर्ण सोडायला सांगितले होते. त्यामुळे विहंगमय दृश्य दिसत होते. त्या गाण्याचे चित्रीकरण तर खूपच छान झाले आहे. वृषाली चव्हाणने गाणे कोरियोग्राफ केले.  ते खूपच छान गाणे झाले आहे आणि हे गाणे नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. या गाण्याव्यतिरिक्त या चित्रपटात एक प्रेमगीत, हळदीचे आणि प्रेरणादायी अशी तीन गाणी आहेत.

या चित्रपटातील तुझ्या अनुभवाबद्दल सांग ?

खूपच छान अनुभव होता. हाच नाही तर कोणत्याही चित्रपटाचा प्रवास फार सुखावणारा असतो. लोकांची काम करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शिकायला मिळतात. त्यामुळे जबाबदारीही वाढते. कारण लोक जर वेगवेगळ्या पद्धतीने काम करीत आहेत तर आपणही पात्रातून सतत वेगवेगळे काहीतरी देत राहिले पाहिजे, असे मला वाटते. तसेच माझा एक नायक असलेला हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे माझ्यावर आणखीन जबाबदारी होती.

आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल या तुझ्या नाटकाबद्दल सांग?

खूपच वेगळे नाटक असून आतापर्यंत न पाहिलेला शशांक केतकर या नाटकात पाहायला मिळतो. अत्यंत वेगळी भूमिका आहे. आजच्या ज्या समाजात वावरतो आणि राहतोय, त्या सिस्टिमवरचे हे नाटक म्हणजे बोल्ड विधान आहे. खूप चांगला प्रतिसाद या नाटकाला मिळत आहे.

 तुझ्या कारकीर्दीतील कलाटणी देणारी भूमिका कोणती ?

अर्थातच श्रीची. ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतील श्रीच्या भूमिकेतून मी प्रसिद्धीच्या झोतात आलो आणि लोक ओळखू लागले. काहीही हं श्री… या संवादामुळे मी जगभरात पोहचलो. ही मालिका संपून तीन वर्षे उलटली तरीदेखील ही मालिका व त्यातील पात्रे रसिकांच्या मनात घर करून आहेत. त्यानंतर ‘गोष्ट तशी गमतीची’ हे चांगले नाटक माझ्या नशिबी आले. मंगेश कदम व लीना भागवत या कलाकारांबरोबर या नाटकात मी काम केले. या नाटकाचेदेखील चारशेहून अधिक प्रयोग जगभर केले. खूप चांगला प्रतिसाद या नाटकाला मिळाला.

मालिका, चित्रपट व नाटक या तिन्ही माध्यमात तू काम केलेले आहेस, तर तुझे आवडते माध्यम कोणते?

तिन्ही माध्यमे मला आवडतात. या तिन्ही माध्यमात स्वतःला आजमवायची संधी असते. त्यामुळे तिन्ही ताकदीची माध्यमे आहेत आणि तिन्हीचा प्रेक्षकवर्ग वेगळा आहे.

पुण्यात तुझे ‘आईच्या गावात’ नामक हॉटेल आहे, तू वेळ काढून जात असतोस आणि सोशल मीडियावरदेखील चाहत्यांना अपडेट देत असतोस. इतक्या व्यग्र शेड्युलमधून तू कसा वेळ काढतोस?

अभिनयाव्यतिरिक्त तो एक पसारा मी वाढवलेला आहे. फुड इंडस्ट्रीतील काम खूप जबाबदारीचे आहे. त्यामुळे तिथेही जाणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. महिन्यातून चार ते पाच दिवस हॉटेलमध्ये जातो. मला खायला आवडते पण, त्यापेक्षा मला दुसर्‍यांना खायला घालायला खूप आवडते. हॉटेलचे म्हणाल तर टेबल पुसणे, भांडी घासणे, पदार्थ बनविणे अशी सगळीच कामे मी करत असतो. मी अभिनेता म्हणून कॅमेरासमोर उभा असतो. कलाकारही माणूसच आहे. कॅमेर्‍यापलिकडे मी अभिनेता नाही.

आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांग?

यावर्षात माझे तीन चित्रपट तयार आहेत. ते कधीही प्रदर्शित होतील. तसेच मालिकेची बोलणी सुरू आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -