घरमनोरंजनअक्षय कुमार करणार दाक्षिणात्य चित्रपटामध्ये काम बाकी हिंदी सिनेमाचे काय?

अक्षय कुमार करणार दाक्षिणात्य चित्रपटामध्ये काम बाकी हिंदी सिनेमाचे काय?

Subscribe

– हर्षदा वेदपाठक

बॉक्स ऑफिसवर हमखास चित्रपट चालणार, अशी ख्याती असलेला एकमेव अभिनेता म्हणजे, अक्षय कुमार. अक्षय बरोबर काम करणे म्हणजे गुंतवलेले पैसे आणि नफा मिळणार अशी त्याची ख्याती वितरकांमध्ये आहे. मात्र मागील तीन वर्ष त्याच्या या चढत्या आलेखला कोणती रेषा छेदून गेली की त्याचे चित्रपट चालत नाही आहे. याचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न.

- Advertisement -

बच्चन पांडे, लक्ष्मी, रामसेतू, रक्षाबंधन, कटपुतली, पृथ्वीराज, सेल्फी हे अक्षय कुमार चे सात चित्रपट जे 2000 ते 2023 दरम्यान प्रदर्शित झाले, ते चालले नाहीत. त्या मागचे प्रमुख कारण म्हणजे, कमकुवत पटकथा. जेव्हा कंटेंट इज किंग म्हटले जाते, तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टी दाक्षिणात्य चित्रपटाचे रिमेक, तर हॉलिवूड मधून चोरलेले कथानक यात व्यस्त होती. तर दुसरीकडे, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी, हि नवीन विषय आणि हॉलिवूड चे तंत्रज्ञान यावर सखोल मेहनत करत होती. ते आपण पुष्पा आणि आरआरआर या चित्रपटाला लाभलेल्या यशाने पाहिले आहे. 2023 मध्ये आपल्याकडे बोलायला फक्त सूर्यवंशी आणि पठाण हे दोनच चित्रपट चालले. बाकीच्या चित्रपटांचे काय झालं हा मोठा प्रश्न आहे. असो, तर आपण अक्षय कुमार याचे चित्रपट या बद्दल बोलत होतो. हमखास चालणारा अभिनेता जेव्हा ओळीने सात चित्रपट फ्लॉप देतो तेव्हा साहजिकच आहे, सिनेसृष्टीचा सांगाडा हलणारच , त्याला अपवाद असलेला एकमेव चित्रपट म्हणजे, सूर्यवंशी. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाचे कथानक हे सिंघम आणि सिंबा या चित्रपटाच्या तुलनेत कमकुवत होते. बरं, तुम्हाला माहित आहे ना, सिंघम आणि सिंबा हे दोन चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटाची तंतोतंत कॉपी होते. सूर्यवंशी या चित्रपटामध्ये त्या मानाने नवीन कथानक होते, तरी देखील तो चित्रपट फारसा चालला नाही.

सूर्यवंशीचे यश हे, एकट्या अक्षय कुमारचे नव्हते, तर ते रणवीर सिंग आणि अजय देवगण यांचे देखील होते हे देखील तितकेच खरे. हिंदी चित्रपट चालत नाहीत म्हणून, अक्षय कुमार दाक्षिणात्य चित्रपटाकडे वळला असे म्हणायचे काय? ओळीने सात चित्रपट चालले नाहीत, आठवा चित्रपट काही प्रमाणात हिट झाला. म्हणून की काय, अक्षय कुमारने त्या नंतर चित्रपट स्वीकारलेच नाहीत. ओह माय गॉड हा चित्रपट, पूर्वीच स्विकारलेला असल्याने तो चित्रपट आता प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

- Advertisement -

चित्रपट किंवा कारकीर्द चालली नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी हा एकमेव आधार हिंदीत अनेक वर्ष राहिला आहे. अमिताभ बच्चन, सलमान खान, संजय दत्त, सैफ अली खान, इम्रान हाश्मी हे सगळेच आता दक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत आहेत. त्यात आता आणखीन एका नावाची भर पडली आहे आणि ते म्हणजे अक्षय कुमारची. दक्षिणेमध्ये काही हिट चित्रपट देणाऱ्या निर्माता सत्यनारायणा कोनेरू यांच्या कर्मा या चित्रपटामध्ये तो काम करणार आहे अशी खबर येत आहे.

जा अभिनेत्रींना हिंदी चित्रपटामध्ये काम करायचा आहे, परंतु त्यांना संधी मिळत नाही अशा अनेक अभिनेत्रींनी दक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करून हिंदी चित्रपटांचा उंबरठा ओलांडला आहे. आणि या सगळ्याच अभिनेत्री यशस्वी ठरलेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने रेखा, श्रीदेवी, जयाप्रदा, काजल अगरवाल, तमन्ना भाटिया, चर्मी कौर, हंसिका मोटवानी अशी अनेक नावे घेता येतील. अभिनेत्यांचे म्हणाल तर तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषेमध्ये त्यांचे पूजन केले जाते. त्यामुळे संपूर्णतः हिंदी अभिनेत्याला घेवून दक्षिणात्य चित्रपट तयार करणे, अजून तरी निर्मात्याला न जमणारी गोष्ट आहे. हिंदी अभिनेत्यांना घेवून दुय्यम खलनायकी भूमिका देणे किंवा प्रमुख अभिनेत्यासमोर तितक्याच ताकदीचा खलनायक देणे हे सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी मध्ये दिसून येते. ते तुम्ही हर्षवर्धन राणे, नील नितीन मुकेश, राहुल देव, सयाजी शिंदे अश्या अनेक कलाकारांना पाहिले असेल. या हात मिळवणीमुळे कमकुवत झालेला हिंदी चित्रपट काही प्रमाणात डब होऊन सिनेमागृहामध्ये तसेच टीव्हीवर झळकू लागला. आणि थोडेफार यश मिळवू लागला.

सत्यनारायणा कोनेरु हे दक्षिणेतील नामवंत निर्माता आहेत. त्यांनी रक्षासुदू ((२०१९), खिलाडी (२०२२) हे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. सध्या ते रक्षासुदु 2 या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. त्या नंतर ते कर्मा या चित्रपटाचं काम सुरू करणार आहेत. अक्षय कुमार यांना त्यांनी फोन करून कर्माबद्दल विचारले असल्याचे समजते. चित्रपटाच्या कथानकाबद्दल बोलायचे तर, जे पेराल ते उगवणार या कर्माच्या सिद्धांतावर हा चित्रपट आधारित असणार आहे. अभिनेता आणि निर्माता यांचे ठरले तर, मार्च 2024 मध्ये कर्माच्या चित्रीकरणास सुरूवात होईल. कर्माचे पहिले चित्रीकरण सत्र वाराणसी येथे होईल. त्यानंतरचे चित्रीकरण हे जून 2024 मध्ये लंडन येथे होईल. कर्माचे दिग्दर्शन कोण करणार ते अजून ठरायचे आहे. तसेच, प्रमुख अभिनेत्रीची निवड अजून झालेली नाही असे कळते. इतर सह कलाकारांची निवड मात्र सुरू असल्याचे समजते.

मल्याळम अभिनेत्री अमला पॉल हिचे नाव ऐका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी विचारात असल्याचं समजते. अक्षय कुमार हा अनेक दाक्षिणात्य निर्मात्यांचा लाडका अभिनेता ठरू लागला आहे. मागच्या आठवड्यामध्ये आणखीन एक दाक्षिणात्य निर्माता मुंबई मध्ये अक्षय कुमार यांना भेटायला आला होता. परंतु त्या दरम्यान अक्षय हा कुटुंबासमवेत फिरायला गेला असल्याने, त्याला भेटता आले नाही.

ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या ओह माय गॉड या चित्रपटामध्ये अक्षय, यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी यांच्या बरोबर दिसेल. अमित राय दिग्दर्शित हा चित्रपट चर्चेत आला आहे तो, शंभर करोड किंवा त्यापेक्षा जास्त फीस आकारणाऱ्या अक्षय कुमारने ओह माय गॉड या चित्रपटासाठी केवळ 35 करोड रुपये आकारल्याची चर्चा आहे. तसेच या चित्रपटातील काही दृश्य सेन्सॉरच्या कैचीत सापडलेली आहेत. त्यावर अजून निर्णय व्हायचा आहे. आपल्याकडे देवावर आधारित चित्रपटांवर प्रेक्षकांची सेन्सिटिव्हिटी अवलंबून असते. आणि ते पाहूनच चित्रपट पास केले जातात. जन भावना दुखावणारी काही दृश्य किंवा संवाद असल्यास ते चित्रपटकर्त्यांना वगळावेच लागतील यावर दुमत नाही. परंतु यात चित्रपटावर कॉन्ट्रोव्हर्सी झाली किंवा चित्रपट पुढे ढकलला गेला तर मात्र त्याचा खरा फटका बसेल तो अक्षय कुमारला. आम्हाला दिलेल्या अनेक मुलाखतीमध्ये अक्षय कुमार म्हणायचा, “मी ऐका वर्षात चार चित्रपट करणार”. आणि हा रेकॉर्ड त्याने अनेक वर्ष कायम ठेवला आहे. परंतु तीन वर्षात आपटलेले सात चित्रपट आणि एक साधारण चाललेला सूर्यवंशी, यामुळे अक्षय कुमारचा चित्रपट करण्याचा आराखडा कुठेतरी बिघडला आहे, असे दिसून येते. आणि त्यात जर ओह माय गॉड या चित्रपटाला उशीर झाला तर त्यापुढे कर्मा किंवा त्याचे इतर काही आगामी चित्रपट यावर देखील परिणाम होईल असे दिसून येते. अक्षय कुमारचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे, त्याद्वारे त्याने मराठी आणि इतर भाषिक चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे.
अभिनेता म्हणून अक्षयच्या कारकीर्दीचा फायदा या प्रोडक्शन हाऊसला तसेच इतर चित्रपटांना नक्कीच मिळतो. अक्षयचे चित्रपट जर चालले नाहीत, तर मात्र प्रोडक्शन हाऊस आणि त्याचे इतर चित्रपट यांचे काय होणार यावर विचार न केलेलाच बरा.

चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर झळकलेल्या शाहरुख खान याला पठाणाने बरापैकी हात दिला. त्या मानाने सलमान खान आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट बऱ्याच प्रमाणात ढेपाळताना दिसत आहेत. त्यानंतर उरलेली जागा अजय देवगण याने व्यापून टाकली आहे. सोबतीला कधीही न पाहिलेले विषय, बिगर सेन्सॉर दृश्य आणि नवनवीन कलाकाराचा भरणा यामुळे ओटीटीची गाडी मात्र जोरात आहे. अनेक कलाकारांनी कोरोनानंतर सरळ ओटीटीचा रस्ता धरला. त्यात प्रामुख्याने अनिल कपूर, शाहीद कपूर,अभिषेक बच्चन यांचे नाव घेता येईल. कथा आणि पटकथा चांगली नसेल तर प्रेक्षक ओटीटीकडे देखील वळणार नाहीत. हे सर्व ओटीटीचे मालक पण जाणतात. म्हणून की काय प्रेक्षकांना प्रत्येक वेळेला खिळवून ठेवायला ही मंडळी नवीन चेहरे घेवून, नवीन शक्कल लढवत जोमाने पुढे जात आहेत. असंच काहीसं करण्याची गरज हिंदी चित्रपटसृष्टीला देखील आहे. कुछ भी चलता है, हे असं वाटणाऱ्या अनेक निर्मात्यांना प्रेक्षकांनी घरचा रस्ता दाखवला आहे. त्यात यशराज आणि धर्मा प्रोडक्शन या निर्मात्यांची नावे प्रामुख्याने घ्यावी लागतात.

एक पडदा सिनेमागृह तिकिटांचा कमी रेट यामुळे कोरोनानंतरही काही प्रमाणात टिकून राहिली आहेत. त्या तुलनेत मल्टिप्लेक्सवाल्यांची अवस्था फार वाईट आहे. ओटीटीचा वाढता प्रभाव, वाईट कंटेंटमुळे चालत नसलेले चित्रपट. त्यात प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत कसे आणायचे हा एक मोठा प्रश्न अनेक वितरक आणि प्रदर्शकांना भेडसावत आहे. अशातच कंटेंट अभावी एखादा आघाडीचा अभिनेता, दक्षिणेकडे आशेने पाहत आहे! आपल्या येथे कॉपी करण्याची पद्धत आहे. एखाद्या कलाकाराने, एखादं पाऊल उचललं तर त्याची कॉपी करत अनेक कलाकार तेच करतात. मग हिंदी चित्रपट चालणार कसे ? दक्षिणेकडून हिंदीत डब होवून येणारा चित्रपट बघायचा? की तो चित्रपट ओटीटी वर येईपर्यंत थांबायचे ? हे असे अनेक प्रश्न निर्मात्यांना भेडसावत आहेत. यावर उपाय म्हणजे एकच, चांगली कथा त्यावर साजेशी पटकथा आणि उगाचचा थिल्लरपणा बाजूला ठेवून सेन्सिबल असा चित्रपट तयार करायचा. असे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिस वर चालतना आपण पाहिले आहेत. त्यात नावे घ्यायची झाली तर, बधाई हो बाधई, द काश्मीर फाईल्स, द केरला स्टोरी आणि अनेक चित्रपटांची नावे घेता येतील.

हिंदी चित्रपटांना जिथे वाईट दिवस आले आहेत, त्यामानाने मराठी आणि दक्षिणात्य सिनेमा तुफान सुरू आहेत. मराठीमध्ये नुकताच प्रदर्शित झालेला बाईपण भारी देवा हा चित्रपट पाच करोड रुपयाच्या बजेटमध्ये तयार झाला. परंतु प्रदर्शनाच्या दोन आठवड्यानंतर तोच चित्रपट 37.35 करोड रुपये कमावतो. यावरून सगळ्यांनाच बरेच काही शिकण्यासारखे आहे.


हेही वाचा- चांद्रयान 3 लाँच करताना अक्षय कुमारने शेअर केले असे ट्विट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -