घरमनोरंजन'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'च्या दिग्दर्शकाला अटक

‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’च्या दिग्दर्शकाला अटक

Subscribe

'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' चित्रपटाचा दिग्दर्शक विजय रत्नाकर गुट्टे याला जीएसटीच्या अधिकाऱ्यांकडून अटक करण्यात आली आहे.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असणारा चित्रपट ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाचा दिग्दर्शक विजय रत्नाकर गुट्टे याला जीएसटीच्या अधिकाऱ्यांकडून अटक करण्यात आली आहे. ३४ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप विजय गुट्टेवर लावण्यात आला आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, विजय गुट्टेच्या विरोधामध्ये केंद्री वस्तू आणि सेवा कर कायदा (सीजीएसटी) १३२ (१) (सी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गुट्टेच्या विरोधात व्हीआरजी डिजीटल कॉर्प लिमिटेड या त्याच्या कंपनीनं ३४ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे असा आरोप लावण्यात आला आहे. दरम्यान या कंपनीनं अॅनिमेशन आणि मनुष्य बळासाठी होरायझन आऊटसोर्स सॉल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून बनावट ३४ कोटी रूपयांचे जीएसटी इनव्हॉईस घेतल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यामुळं या प्रकरणात विजय रत्नाकर गुट्टेला अटक करण्यात आली असून त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

विजय गुट्टेचा पहिला चित्रपट

‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा विजय गुट्टेचा पहिलाच दिग्दर्शक म्हणून चित्रपट आहे. तर यापूर्वी त्यानं इमोशनल अत्याचार, टाईम बरा – वाईट आणि बदमाशिया या तीन चित्रपटांची निर्मिती केली होती. ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटात अनुपम खेर प्रमुख भूमिका साकारत असून सध्या हा चित्रपट खूप गाजत आहे. तर, विजय गुट्टेचे वडील रत्नाकर गुट्टे हे राजकारणात कार्यरत आहेत. त्यांच्यावरही पावसाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेचे विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गंभीर आरोप केले होते. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर्सचे अध्यक्ष असणाऱ्या रत्नाकर गुट्टे यांनी साधारण २२ बोगस कंपन्यांच्या माध्यमांमधून २६ हजार शेतकरी आणि अनेक बँकांना साधारण साडेपाच हजार कोटींना फसवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -