घरमनोरंजनभूमिकांमध्ये प्राण फुंकण्याची कला...! वीणा जामकर

भूमिकांमध्ये प्राण फुंकण्याची कला…! वीणा जामकर

Subscribe

-संतोष खामगांवकर

चित्रपटांमधून वीणाच्या वाट्याला चांगल्या भूमिका आल्या. ‘लालबाग परळ’ मंजू , ‘बायोस्कोप’ मधील लेसबियन ‘सुमित्रा’ , ‘लालबागची राणी’ मधील संध्या, ‘टपाल’ या चित्रपटातील भूमिका. ‘कुटुंब’मध्ये तिने साकारलेली आई. ‘तुकाराम’ चित्रपटातील रखमा, या सर्वच अविस्मरणीय भूमिका आहेत. वीणा सांगते की, “ मला नेहमीच स्वप्न पडायची की, माझ्याकडे खूप कठीण भूमिका यायला हव्यात. ज्या चॅलेंजिंग आहेत. प्रत्येक कामात नाविन्य आणि थकवा अनुभवायला आला पाहिजे. त्यातल्या या साऱ्या भूमिका होत्या. वयाच्या २४व्या वर्षी ‘लालबाग परळ’ मधल्या मंजू ने माझ्या अभिनयक्षमतेवर शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर माझं आयुष्य खूपच बदललं. मला कुठेही प्रूव्ह करावं लागलं नाही किंवा स्ट्रगल करावा लागला नाही. “

- Advertisement -

वीणा यशाचे श्रेय तिच्या आई-बाबांना देते. लहानपणापासूनच ते तिच्यासाठी प्रेरणा ठरले. तिची आई शिक्षिका होती पण गाणं आणि नाटक तिच्या रक्तात होतं. तर बाबा शासकीय सेवेत असूनही त्यांना चित्रकलेची आवड होती. दोघांमधील कलागुण वीणामध्ये अभिनयाच्या मार्गाने आपसूकच उतरले. वीणा सांगते की, “ लहानपणीच आईने मला शाळेतील नाटकांमधून भाग घ्यायला लावला. बालनाट्यात काम करण्याची प्रेरणा दिली. वडिलांनी सुधा करमरकरांच्या शिबिराला पाठवलं. केशवराव मोरेंकडे पाठवलं. शासनाचही एक शिबिर मी केलं. माझ्या नकळत्या वयात आई-वडिलांनी माझ्यावर हे संस्कार केले. मी पुढे आकाशवाणी, दूरदर्शनवरील ‘किलबिल’ अशा कार्यक्रमातूनही सहभागी झाले.”

उरणमधील शालेय शिक्षणानंतर वीणाची पावलं मुंबईकडे वळली. शिक्षणानिमित्त रूपरेलच्या नाट्य-चळवळीतूनही ती चमकली. ‘अविष्कार’सारख्या नाट्यसंस्थेशी ती जोडली गेली. अभिजात नाटक तिला जगायला-शिकायला मिळाले. वीणा सांगते की, “ नाटक म्हणजे काय? त्याची तालीम कशी केली जाते? एखाद्या भूमिकेचा गांभीर्याने विचार कसा करायचा? त्यातले सर्व बारकावे शोधायचे कसे?… याची त्यावेळी समज नव्हती. पण सभवताली अशी माणसं होती की, मी नाटकाकडे गांभीर्याने पाहू लागले. जर ‘अविष्कार’ नसतं तर माझं मोठं नुकसान झालं असतं. मला ज्या भूमिका मिळाल्या आणि मी एस्टॅब्लिश अभिनेत्री झाले. हे सगळं झालं नसतं. मला जे योग्य वयात योग्य ते रेकग्निशन मिळालं त्यामागे रूपारेल आणि पं. सत्यदेव दुबे यांच्या ट्रेनिंगचा भाग आहे. ” त्या काळात विणाला चेतन दातार, वाकडे काका, सुलभा देशपांडे, जयदेव हट्टंगडी अशा प्रभृतींचा सहवास लाभला.

- Advertisement -

‘एवढंच ना…’ या नाटकाद्वारे वीणा व्यावसायिक रंगभूमीवर आली. त्यावेळी तिला व्यावसायिक समज नव्हती. परंतु ‘चार दिवस प्रेमाचे’ या दुसऱ्या व्यावसायिक नाटकाद्वारे ती प्रशांत दामले, अरुण नलावडे, सविता प्रभुणे अशा दिग्गजांसोबत पटलावर आली. हा अनुभव खऱ्या अर्थाने समृद्ध करणारा ठरला. यातून प्रशांत दामलेंसारखे व्यावसायिक कलाकार, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची ऊर्जा वीणाला जवळून अनुभवायला मिळाली. ती प्रांजळ कबुली देते की, “या नाटकाच्या ७० व्या प्रयोगाला मला असं वाटलं की, आज मी माझी भूमिका बरोबर पार पाडली !”

तिचा पहिला चित्रपट ‘बेभान’ हा देखील ती कॉलेजला असतानाच प्रदर्शित झाला होता. नाटकात काम करणाऱ्या वीणाला कॅमेऱ्याची सवय नसल्यामुळे सिनेमा करताना मात्र कंटाळा आला होता. मात्र दुसरा सिनेमा ‘वळू’ करत असताना तिला उमेश कुलकर्णींसोबत सिनेमाचे तंत्र शिकायला मिळाले आणि ‘वळू’ नंतर वीणाला सिनेमा करण्याची इच्छा निर्माण झाली. तोपर्यंत मात्र आपण नाटक करूयात आणि वेळ मिळाला तर एखादा सिनेमा करूया, अशी तिची भूमिका होती.

चित्रपटांमधून वीणाच्या वाट्याला चांगल्या भूमिका आल्या. ‘लालबाग परळ’मधील तिने साकारलेली मंजू तसेच ‘बायोस्कोप’ या वेगळ्या धाटणीच्या सिनेमामधून तिने साकारलेले समलैंगिक स्त्रीचे ‘सुमित्रा’ हे पात्र. लालबागची राणी या चित्रपटामधील ‘संध्या’. टपाल या चित्रपटातील तिची भूमिका. कुटुंब या चित्रपटातील तिने केलेली आई. ‘तुकाराम’ चित्रपटातील रखमा, या सर्वच अविस्मरणीय भूमिका आहेत. वीणा सांगते की, “ मला नेहमीच स्वप्न पडायची की, माझ्याकडे खूप कठीण भूमिका यायला हव्यात. ज्या चॅलेंजिंग आहेत. प्रत्येक कामात नाविन्य आणि थकवा अनुभवायला आला पाहिजे. त्यातल्या या साऱ्या भूमिका होत्या. वयाच्या २४व्या वर्षी ‘लालबाग परळ’ मधल्या मंजू ने माझ्या अभिनयक्षमतेवर शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर माझं आयुष्य खूपच बदललं. मला कुठेही प्रूव्ह करावं लागलं नाही किंवा स्ट्रगल करावा लागला नाही. “

वीणा मिळालेली कोणतीही भूमिका साकारत असताना, भूमिका जिवंत करण्यासाठी नेहमीच काहीतरी वेगळे प्रयत्न करत असते. ‘तुकाराम’मधील रखमाचे पात्र करताना ती घरामध्ये पूर्ण वेळ नऊवारी साडी नेसून सतत संवाद म्हणत राहायची. ‘तप्तपदी’ मधील नायिका आंधळी झाल्यानंतरची तिची भूमिका साकारण्यासाठी वीणाला तेंडुलकरलिखित ‘काळोख’ या कॉलेजमध्ये केलेल्या एकांकिकेची खूप मदत झाली. ‘लालबाग परळ’ मधील मंजू जिवंत करण्यासाठी वीणा चक्क काळाचौकी लालबागमध्ये, तिथल्या माणसांमध्ये घर भाड्याने घेऊन एक ते दीड वर्ष राहिली. बंद पडलेल्या गिरण्यांचे पडसाद तिने तिथे अनुभवले. ‘कुटुंब’ चित्रपटातील दोन मुलांच्या आईची भूमिका साकारण्यासाठी शूटिंगदरम्यान वाचत असलेले गो. नी. दांडेकरांचे ‘मोगरा फुलला’ हे पुस्तक तिच्या कामी आले. त्या कथेमधील ओतप्रोत माया-ममत्व कळत नकळत तिला प्रेरणा देऊन गेले. सरावातून, निरीक्षणातून, वाचनातून, अंतःप्रेरणेने वाट्याला आलेल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमध्ये प्राण फुंकण्याची कला आता वीणाला चांगलीच जमलेली आहे.

‘बायोस्कोप’मधील लेसबियन सुमित्राची भूमिका साकारणे वीणासाठी खूप मोठे आव्हान होते. त्यासाठी तिने भूमिकेचा सर्व बाजूने विचार करून पाहिला. काही इंग्रजी चित्रपट बघितले. अशा व्यक्तींबद्दलची माहिती ऑनलाईन सर्च करून पाहिली. त्यांचे हावभाव, देहबोली याचाही विचार करून झाला. परंतू तिला सूर सापडत नव्हता. वीणा म्हणते की, शेवटी मी लेस्बिनिझमचा मुद्दा डोक्यातून काढून सायकॉलॉजिकली असा विचार केला की, मी जशी आहे तशी मला एक्सेप्ट होते का?… माझे आई वडील, माझं गाव, जात, धर्म या माझ्या अस्तित्वावरच कुणी प्रश्नचिन्ह उभं केलं तर मला किती त्रास होईल?… मला माझं अस्तित्व मान्य करताना संघर्ष करावा लागतो का?.. असं असेल तर मला किती राग येईल किती झगडा होईल स्वतःशी ?” अशा गहन विचारांचा मागोवा घेत वीणाने सुमित्रा साकारण्याचे धाडस केले.

अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी वीणा भूमिकांबाबत अजूनही असमाधानी, अतृप्त असल्याचे दिसते तिच्या मते, “ जे काही केलं ते छान होतं, उत्कृष्ट होतं पण एक स्त्री किंवा मुलगी म्हणून, आता मला काय म्हणायचं आहे ? माझी काहीतरी एक भाषा डेव्हलप होतेय, आयुष्याकडे बघण्याचा एक परस्पेक्टिव्ह डेव्हलप होतोय, अजून तरी अशी भूमिका माझ्या वाट्याला आलेली नाही. अर्थात त्याची स्वप्नं आताच मला पडायला लागलेली आहेत.


हेही वाचा- मुंबई बापासारखी असली तरीही सातारा… असे म्हणणारी किरण मानेंची पोस्ट चर्चेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -