घरफिचर्सताकद सकारात्मक दृष्टिकोनाची...

ताकद सकारात्मक दृष्टिकोनाची…

Subscribe

सकारात्मक दृष्टिकोन असणार्‍या व्यक्ती खूप उत्साही असतात आणि कुठल्याही कामात पुढाकार घेतात. संधीची वाट पाहत बसत नाहीत. ते काम करतात व संधी नसेल तर निर्माण करतात. या पिढीतील मोठ्यात मोठा शोध हा की, मनुष्यप्राणी आपल्या मनाचा कल बदलून त्याचे अवघे जीवन बदलू शकतो. तुमचा दृष्टिकोन म्हणजे तुमच्या मनाची बाहेरच्या जगाकडे बघायची वृत्ती असे माना. यशाची मुख्य अट अशी की, सर्व शक्ती, विचार आणि असलेले भांडवल पूर्णपणे आपल्या व्यवसायाकडे वळवावे तरच त्यात भरघोस यश मिळेल. आपल्याला ज्या मन:स्थितीत अडचणी आलेल्या असतात, त्याच मन:स्थितीत त्या सोडवता येत नाहीत. योग्य दृष्टिकोन विकसित करा व त्याचा फायदा उठवा. जीवनात आनंद तेव्हा मिळतो जेव्हा आपण आहोत तसे लोकांना आवडतो.

– निकिता गांगुर्डे

ही गोष्ट आहे दोन बेडकांची. त्या दोघांची दोस्ती मोठी घनदाट, पण स्वभावाने मात्र दोघे परस्पर विरुध्द. एकदा त्या दोघांनी ठरवले रोज रोजचे डबक्यातले जीव खाण्यापेक्षा जरा वेगळ्या ठिकाणी जावं. आणि मग दोघेही मजल दरमजल करत पुढे निघाले. नंतर ते एका शहरात पोहचले. त्यांना खूप भूक लागली, पण तिथलं सर्वच अपरिचित. वेगाने सर्व दिशांना धावणारी वाहने. आपल्याच नादात इकडून तिकडे जाणारी असंख्य माणसं. त्यांना शांत जागा दिसेना नि मनासारखं खायलाही मिळेना. पुढे रात्र झाली. शेवटी ते दोघे दाराच्या फटीतून एका दुकानात शिरले. ती एक डेअरी होती. दूध-दही-लोणी-तूप यांच्या चित्र विचित्र वासांचा घमघमाट येत होता. तेथेच एक काचेची उंच बरणी होती. दोघेही आत काय आहे हे बघायला वर चढले अन पाय घसरून बरणीत पडले. त्यात दही होत. दोघेही बेडूक दह्यात बुडू लागले. एक म्हणाला, ‘उगीच मरायला इकडे आलो. आता शांतपणे तळाला जाऊन मृत्यूची वाट पाहूया’, असं म्हणून तो तळाला गेलासुद्धा. दुसर्‍या बेडकाने स्वतःशी विचार केला, ‘पोहता तर येतंय ना या पदार्थात? मरायचंच आहे तर पोहत पोहत मरूया’, असं म्हणून तो त्या बरणीतल्या दह्यात गोल गरगर पोहू लागला आणि पुढे काय चमत्कार! दही घुसळलं जाऊन बनलं ताक नि त्यावर आला लोण्याचा गोळा… मग काय? त्या बेडकाने त्या लोण्याच्या गोळ्यावर बसून जिवाच्या आकांताने उडी मारली… अन तो चक्क बरणीच्या बाहेर आला. जरा अंग झटकलं नि बरणीच्या आत पाहिलं तर त्याचा दोस्त तळाला मरून पडला होता. अर्थातच तो त्याचाच निर्णय होता. क्षणभर आपल्या दोस्तासाठी प्रार्थना करून हा बेडूक आनंदाने निघून गेला.
तसे तर दोघांवर नियतीने सारखीच परिस्थिती आणली होती. परंतु एका बेडकाचा सकारात्मक दृष्टिकोन दुसर्‍या बेडकाच्या नकारात्मक दृष्टिकोनावर भारी पडला. जिंकणे म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारणे, सचोटी व सत्यप्रियता यावर विश्वास ठेवणे हेच आहे. आपल्या जीवनातील घटनांना आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे महत्वाचे असते. दृष्टिकोन किंवा वागण्याची दिशा म्हणजे दुसरे काही नसून रोजच्या जीवनात वागण्याची पद्धत होय. आपली वृत्ती ही आपल्या मनाची धारणा आहे. आपण सर्व त्याचेच तर गुलाम आहोत. म्हणूनच म्हणलं जात असतं व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. प्रत्येकाची त्या त्या घटनेकडे पहायची दृष्टी वेगवेगळी असते.
जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर सकारात्मक विचार करणे व आचरणात आणणे हे केलेच पाहिजे. म्हणूनच सकारात्मकतेला यशाच्या मार्गातील पहिली पायरी मानले गेले आहे. तुम्ही यशस्वी तेव्हाच व्हाल जेव्हा स्वत:ला यशस्वी आहात हे पटवून देऊ शकाल, म्हणजेच तसा सकारात्मक आशावाद बाळगाल. विजेता होण्याआधी तुम्ही स्वत:ला विजेता म्हणून पाहायला हवं. तशी प्रतिमा तुमच्या नजरेत निर्माण करा. त्यातूनच तुमचे भव्य दिव्य यश साकार होईल.
इतिहासातल्या अनेक महान विभूतींनी आपल्याला याची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अशीच उदारहणे दिलेली आहेत. थोर शास्रज्ञ एडिसन यांचे जिंकण्यासाठी स्वतः चे असे एक सूत्र होते. एक म्हणजे मोठेपणा मिळवायला बराच काळ हवा. दुसरे म्हणजे मोठेपणा मिळेपर्यंत शांत राहा आणि सर्वात शेवटचे सूत्र म्हणजे कामात सातत्य ठेवा.
खर्‍या ज्ञानाचा मार्ग हा नेहमी सत् चारित्र्य, अचूक निर्णय, शिस्त, कामातील तत्वाची बांधिलकी व बुद्धिमत्ता या लहान मोठ्या उंच सखल मार्गावरून जातो. ज्ञानासोबतच योग्यताही असणे गरजेचे असते. काही करण्याची योग्यता, तयारी, ते सकारात्मक विचार प्रत्यक्षात आणण्याची हातोटी आणि सामर्थ्य म्हणजे ते करण्याची क्षमता असणे, ताकद असणे म्हणजेच कसब होय.
आनंदी राहण्याचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे न घडणार्‍या गोष्टींबद्दल काळजी न करणे. एखाद्याने मिळवलेले यश मोजायचे झाले ते तो आज कुठे आहे ते पाहू नका, तर आजच्या स्थितीला पोचताना त्याने किती संकटांना मागे टाकले ते पहा. गतिमान बदलाबरोबर आपला वेग जुळवा. आपल्याबद्दल आपण जो विचार करतो तो बर्‍याच प्रमाणात आपल्या मनाच्या धारणेवर अवलंबून असतो. आपल्या श्रद्धा, विश्वास, कर्तृत्व किंवा आपली जडण घडण यावर आपल्या विचारांचा परिणाम होतो. प्रामाणिकपणे पाठपुरावा करण्याचे आपल्यात सामर्थ्य असेल तर आपली स्वप्ने सत्यात येऊ शकतात.
सकारात्मक दृष्टिकोन असणार्‍या व्यक्ती खूप उत्साही असतात आणि कुठल्याही कामात पुढाकार घेतात. संधीची वाट पाहत बसत नाहीत. ते काम करतात व संधी नसेल तर निर्माण करतात. या पिढीतील मोठ्यात मोठा शोध हा की, मनुष्यप्राणी आपल्या मनाचा कल बदलून त्याचे अवघे जीवन बदलू शकतो. तुमचा दृष्टिकोन म्हणजे तुमच्या मनाची बाहेरच्या जगाकडे बघायची वृत्ती असे माना. यशाची मुख्य अट अशी की, सर्व शक्ती, विचार आणि असलेले भांडवल पूर्णपणे आपल्या व्यवसायाकडे वळवावे तरच त्यात भरघोस यश मिळेल. आपल्याला ज्या मन:स्थितीत अडचणी आलेल्या असतात, त्याच मन:स्थितीत त्या सोडवता येत नाहीत. योग्य दृष्टिकोन विकसित करा व त्याचा फायदा उठवा. जीवनात आनंद तेव्हा मिळतो जेव्हा आपण आहोत तसे लोकांना आवडतो. कामाची जागा, सामाजिक व सांस्कृतिक वातावरण, प्रसार माध्यम, नातेसंबंध, श्रद्धाळूपणा व इतर अनुभव या सर्व गोष्टी दृष्टिकोन तयार करण्यास कारणीभूत ठरतात. दूरदृष्टी ठेवा व त्यावर लक्ष केंद्रित करा.
या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुमचा दृष्टीकोन तपासायला मदत करतील.
मला माझ्या आयुष्यात काय मिळवायचे आहे ? याबाबत नेमकेपणा आणि स्पष्टता ठेवा.
मला जे हवंय ते का हवंय? द्विधा मन:स्थिती ठेऊ नका.
माझे ध्येय पूर्ण झाल्यावर मला काय वाटेल? भीती, उत्साह की दुःख.
माझ्या कामाची पूर्तता, माझ्या तत्वाशी निगडित आहे? दृष्टीकोन स्वच्छ असू दे.
माझ्या इच्छित यशाबद्दल माझ्या आकांक्षा तीव्र आहेत का ? नैतिकता व गरज दोन्ही लक्षात घ्या.
क्रिया ही प्रतिक्रियेपेक्षा नक्कीच जास्त चांगली, म्हणून आधी क्रियावान व्हा.
तुमच्या विचारांवर नियंत्रण मिळवा. आपल्या मनात सर्व करण्याची ताकद असते. वेळेचे महत्व जाणा. विजेते लोक सर्व काही वेळेवर करतात म्हणूनच कदाचित त्यांचे काही नुकसान होत नाही. तुम्हाला जर यशस्वी व्हायचे असेल तर दुसरा कोणी संधी तुमच्या दाराशी घेऊन येईल अशी अपेक्षा करू नका. योगायोगाने काहीही घडत नसते. तुम्हालाच पुढे होऊन ते घडवून आणावे लागते. तुम्ही कोणालाही आश्चर्य वाटेल अशा गोष्टी करू शकता आणि फक्त तुमच्यातच तुमची स्वप्ने पूर्ण करण्याचे सामर्थ्य आहे.
स्वतः वर विश्वास ठेवा व चांगल्यात चांगले करण्याची धडपड करा. जबाबदारी घ्या आणि कामाला लागा. जे तुम्ही आज करू शकत असाल ते उद्यासाठी कधीही ठेवू नका. खरे विजय मिळवू शकणारे लोक वेळेचे महत्व जाणतात व त्याचा पुरेपूर वापर करतात. त्यांना माहीत असते की, वेळ ही फार मर्यादित गोष्ट आहे व ती आपल्या हातातून निसटून जात असते. माझ्यावर विश्वास ठेवा, चांगले काम नेहमी चांगले फळ देते. त्यासाठी फार काळ थांबावेही लागत नाही.
जर माणसाचे मन आनंदाने भरून गेले असेल तर शारीरिक वेदनांचा त्याला पूर्ण विसर पडतो. गरजूंना मदत करणे हे तुमच्या चिंता, काळज्या विसरण्याचे उत्कृष्ट साधन आहे. आपण दुसर्‍यांना मदत केल्याशिवाय स्वत:ला मदत करू शकत नाही. दुसर्‍यांना संपन्न केल्याशिवाय स्वत: तसे बनू शकत नाही. तसेच दुसर्‍यांची भरभराट केल्याशिवाय आपली उन्नती होऊ शकत नाही.

- Advertisement -

– निकिता गांगुर्डे
(लेखिका करिअर मार्गदर्शक आहेत )

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -