घरताज्या घडामोडीआजोबा-एक अजूबा..!

आजोबा-एक अजूबा..!

Subscribe

लहानपणी त्यांनी आपल्या खांद्यावर ठेवलेला हात आजही आधार देणाराच वाटतो. जरा उंची वाढते आपली, एवढाच काय तो फरक, पण आता तो आजोबांचा हात आपण आपल्या हातात घट्ट पकडलेला असतो बस्स एवढाच काय तो फरक. नाहीतर आज मी त्या माऊली पुढे अगदी लहानच सिद्ध होतो. वडील मुलाला नाव देतात तर आजोबा संस्काररुपी वारसा देतात. वडिलांशिवाय जसं मुलांचं असणं नसल्यासारखं तसंच आजोबांशिवाय नातू म्हणजे जणू एक पोकळीच असते. एक अमूल्य नातं ज्याचं मोलच करता येत नाही असं ते प्रेमळ आजोबा म्हणजे माझा जीव की प्राण.

‘आम्ही तुमच्यापेक्षा दोन पावसाळे जास्त पाहिलेत बरं का’, असं खडसावून सांगणारे व खर्‍या अर्थाने अनुभवाचे बरेच पावसाळे पाहिलेले असे असतात ते आजोबा. नातू व आजोबा हे नातं नेहमीच खूप स्पेशल असतं. कारण तो एका थोरल्या पिढीने धाकट्या पिढीला देऊ केलेला संस्काररुपी वारसा असतो. आपला जन्म झाल्यावर कौतुकाने सर्वांना सांगणारे व थरथरणार्‍या ऊबदार स्पर्शाने आपल्याला जवळ घेणारे असे ते व्यक्तिमत्व. नातवाने बाळस धरायला लागल्यापासूनच हे आजोबा-नातवाचे नाते खास बनायला लागले असते. घरात हा आजोबारुपी आधारवड जोवर असतो तोवर सर्वच धाकात असतात. आजोबांसमवेत त्यांच्या बालपणीच्या गोष्टी ऐकणं ही एक खूपच छान आठवण असते.

- Advertisement -

अगदी कितीही वय झालेलं असलं तरी नेहमीच नवउमेदीने जगणारे आणि आपल्या वडिलांपेक्षाही आपल्याला जास्त जीव लावणारी व्यक्ती म्हणजे आपले ‘लाडके आजोबा’. ते रसायनच काहीस वेगळं असतं. आपल्या आयुष्यातला एक सॉलिड अजूबाच म्हणा ना…!!! त्यांच्या सुपीक डोक्यात असे काही रामबाण उपाय असायचे की, जे आपण आज बर्‍याच डिगर्‍या घेऊनसुद्धा आपल्या डोक्यात येणार नाहीत. साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेल्या माझ्या आजोबांचा पेहेराव तसा एकदम साधासा, शरीराचा बांधा सडपातळ परंतु तरीही मेहनत करण्याचा जोम आजही थक्क करणारा होता. ‘आता ती पहिल्यासारखी ताकत नाही राहिली’ असं म्हणतं आमच्यात एक छान पंजा लढवला जायचा आणि मग पंजा लढवताना मुद्दाम मी हरवून त्यांना जिंकवायचो. हा असा डाव मी त्यांच्याचकडून शिकलो. कधी कधी आपल्या माणसाच्या जिंकण्यात खरा विजय असतो ही त्यांची शिकवण कायम लक्षात राहील.

माझ्या लहानपणी ज्यांनी मला खांद्यावर घेऊन त्यांच्या जगाची भ्रमंती करवली अशा त्या माझ्या लाडक्या आजोबांना मी माझे संपूर्ण जग दाखवले. लहानपणी मला ज्यांनी माझं बोटं पकडून सगळीकडे हिंडायला-बागडायला शिकवलं त्यांच्या म्हातारपणी मी त्यांची आधाराची काठी बनलो होतो. ज्या हातांनी मला वरण भात भरवला त्याच माझ्या आजोबांना मी म्हातारपणी खाऊ पिऊ घातले. सुख-आनंद म्हणजे काय हे आपल्या माणसांच्या जवळ असण्यात तसेच त्यांना जीव लावण्यात असतं हे अगदी खरं आहे.

- Advertisement -

देवाची किमयाच निराळी ज्यांच्यासमोर आपण लहान ते तरुण असा प्रवास सुरू करतो, मात्र त्यांचा आपल्यासमोर तरुण ते वृद्ध असा प्रवास सुरू असतो. वडिलांचेही ज्यांच्यासमोर काहीच चालत नाही असे आपले दोस्त आपले जिगरी म्हणजे आपले आजोबा. आपली या जगात येण्याची जे सगळ्यात जास्त आतुरतेने वाट पाहतात ते आपले पहिले वहिले जिगरी भिडू म्हणजे आपले आजोबा. लपून छपून पैसे देऊन, ‘जा मस्त मज्जा कर आणि तुझ्या तीर्थरूपांना सांगू नकोस नाहीतर तुझ्यासोबत माझंही काही खरं नाही’, असं बिनधास्तपणे सांगणारा जिवाभावाचा सखा. मराठी ग्रामीण बोलीभाषेत आजोबांना ‘आजा’ म्हणलं जात बहुधा, याचा अर्थ ‘आरे तु जा, मी आहे इकडे, घेतो सगळं सांभाळून’ असा होत असावा.

नाही पाहिले सोनं नाणं
पाहिली माणसं घडलेली
मातीमध्ये उगवून सुद्धा
आभाळाला भिडलेली

त्यांचं माझ्यापाठीमागे असं खंबीरपणे उभं असणंच माझ्या मनाला उभारी देत होतं. अपेक्षा आणि जाणिवा या सर्वांच्या पलीकडंचे हे आमचे नाते होते. आपला नातू इतरांपेक्षा जरा जास्तच आगाऊ आहे असं आजोबांचं प्रामाणिक मत असायचं आणि त्यामुळेच इतर माझ्या तरुण सवंगड्यांसोबत असताना नेहमी माझ्याकडे जाणीवपूर्वक जास्त लक्ष त्यांचं असायचं. प्रेम त्यांचं सर्वाप्रतीच असायचं, पण आपला नातू जरा जास्त आगाऊ आहे त्यामुळे तिकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे ही काळजीसुद्धा असायची.

असं म्हणतात, कधीही आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीसोबत मैत्री करावी, कारण त्या मैत्रीने आपण शहाणपणाची, हुशारीची एक पाऊल नाही तर चार पावलं पुढे टाकत असतो. आजोबांच्या तालमीत शिकलेला हा नातुरूपी पठ्ठ्या जर कधी हार मानत असला तर लगेच आजोबा त्याला त्यांच्या काळातल्या चार अनुभवाचे बोल ऐकवायचे,’ काय लेका तू इतकुशा अपयशाने कोसळलास. आमच्यावर तर आभाळभर संकट यायची, पण तरीही आम्ही कधी हार मानली नाही… आणि हो कितीही संकटे आली आणि आभाळजरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेऊन उंची वाढवा व समोर उभ्या असलेल्या संकटाना सामोरे जा’, ही त्यांनी दिलेली शिकवण आम्हा सर्वांच्या मनावर ज्यांनी कायमस्वरूपी बिंबवली.

त्यांच्या काळातले प्रेम प्रकरण ऐकायलाही वेगळीच मज्जा यायची. माझ्या खाण्यावरूनसुद्धा आजोबांचं जाम लेक्चर असायचे, ‘काय राजा तू , काय तुझं खाणं, एक दिवशी हवेने उडून जाशील की बाबा. जरा खात जा पोटभर …’ किती ती माया आणि किती तो जीव… त्यांचं ते माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवण आणि ‘मी आहे तुझ्या सोबत’ ही खंबीरपणे दिलेली साथ या सर्व भावना शब्दात मांडणं खूप कठीण आहे.

जुन्या काळच्या कपड्यांचा व आजचा झपाट्याने बदलणारा स्टाईलिश कपड्यांचा ट्रेंड यात जमीन आसमानाचा जरी फरक असला तरी आजोबांनी पेरलेले हे संस्कार आयुष्यभर तसेच राहतील ते कधीच बदलणार नाहीत. लहानपणी त्यांनी आपल्या खांद्यावर ठेवलेला हात आजही आधार देणाराच वाटतो. जरा उंची वाढते आपली, एवढाच काय तो फरक, पण आता तो आजोबांचा हात आपण आपल्या हातात घट्ट पकडलेला असतो बस्स एवढाच काय तो फरक. नाहीतर आज मी त्या माऊली पुढे अगदी लहानच सिद्ध होतो. वडील मुलाला नाव देतात तर आजोबा संस्काररुपी वारसा देतात. वडिलांशिवाय जसं मुलांचं असणं नसल्यासारखं तसंच आजोबांशिवाय नातू म्हणजे जणू एक पोकळीच असते. एक अमूल्य नातं ज्याचं मोलच करता येत नाही असं ते प्रेमळ आजोबा म्हणजे माझा जीव की प्राण.

ऐसा देह लाभावा
तोचि चंदन व्हावा
देह सरला तरीही
सुगंध दरवळ राहावा

अगदी असाच त्यांचा सहवास होता. जी मुलं कुणाचं ऐकत नाहीत ती मुलं आजोबांच्या बटव्यातील गोष्टी त्यांना कधीच न संपणार्‍या वाटतात. असं म्हणतात की म्हातारपण दुसरे बालपणच असते. हो अगदी बरोबर आहे. हे कारण जी व्यक्ती आपल्या तारुण्यात व ऐन उमेदीच्या काळात खूप शिस्तबद्ध असते ही व्यक्ती प्रौढ झाल्यानंतर त्या नातवंडात आपलं बालपण जगते. जणू दुसरं बाळच ते. त्या नातवंडात रांगणे काय, त्यांच्यासोबत बोबडे बोल बोलणं काय किंवा त्यांना आठवडे बाजाराची फेरी मारणं काय, शाळेच्या गेटवर चातकासारखी वाट बघणं काय, चार चौघात आपलं तोंड भरुन कौतुक करणं काय, कुणाचे आजोबा तर कुणाचे आप्पा हे अजब रसायन असतं.

अगदी त्या ऑक्सिजनसारखं जे सदैव आपल्यासोबत असतं अगदी मरेपर्यंत. पण अलीकडची परिस्थिती पाहता, आता घरात म्हातारे म्हणजेच आजी- आजोबा दिसतच नाहीत. कारण आमची पिढी खूप प्रगत आहे. आजी एका मुलाकडे तर आजोबा दुसर्‍याकडे काय ही शोकांतिका. आयुष्यात त्यांनी कधी आपल्या मुलांचा भेदभाव केला नाही. पण आज मात्र त्यांचा आत्मा तडफडत असणारच. पूर्वी आम्हाला आजोबा महाभारतातला अर्जुन, दानशूर कर्ण कितीक पात्र रंगवून सांगायचे, पण तोच अर्जुन आता लक्ष्यापासून भरकटतोय. जो व्यक्ती या धरेवरचा सर्वश्रेष्ठ दानशूर होता. असा तो कर्ण, पण आज त्या कर्णालासुद्धा भिकेचे डोहाळे लागलेले आपल्याला दिसतात.

पूर्वी आजोबा रामाची कहाणीसुद्धा सांगायचे, रामाला वनवास होतो आणि सोबत जनकपुत्री सीता पण असते. आताची परिस्थिती काय वेगळी नाही. आमच्या सुशिक्षित मुलांनी आतासुद्धा राम सीता वनवासाला (वृद्धाश्रमात) पाठवलेत. राम सीतेचा वनवास तरी 14 वर्षांचा होता, पण इथे यांना तर आजन्म वनवास. फरक फक्त एवढाच की काळ बदलला, पण परिस्थिती आजही तशीच आहे. आजोबांना जणू त्यांचं भविष्य माहीत असते म्हणून असेल कदाचित पण ते आपल्याला अर्जुन, कर्ण, राम यांच्या कहान्या मोठ्या प्रेमाने सांगत. आज जेव्हा आजोबांची आठवण येते, तेव्हा मन अलगद सुन्न होऊन जातं. कारण ते असताना त्यांची किंमत कळत नाही आणि ते नसताना असं वाटतं की, आयुष्यात जणू काही तरी हरवलंय, आपल्या गाठचं काही तरी मागे सुटलंय. कारण, आपण कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतो तेव्हा तो अभिमानाने पाठीवरून फिरणारा अनुभवांचा खस्ता खाणारा हात आपल्यात नसतो. त्यांच्यासारखं कौतुक करणारी व्यक्ती या लाखो करोडो लोकांतसुद्धा सापडत नाहीत.

‘आजोबा’ थोडासा खेद वाटतो या गोष्टीचा की, आताच्या मुलांना तुमच्या बटव्यातील खाऊ मिळू शकत नाही. कारण, आजोबाच हरवले. आजोबा गेल्यानंतर उरतो फक्त त्यांचा फ्रेममधील भिंतीला टांगलेला फोटो. तो फोटोसुद्धा केविलवाण्या नजरेने आपल्याकडे बघत म्हणतो. विसरला असेल मला तुम्ही आता, असो कालांतराने फोटोसुद्धा अडगळीच्या खोलीत फेकला जातो आणि उरतात फक्त भिंतीला चिकटलेले गंज लागलेले खिळे. काही दिवसानंतर ती खिळे सुद्धा गळून पडतात. उरतात फक्त त्या खिळ्यांची सताळ छिद्रे. त्या छिद्रात वास्तव्याला येतात किडे आणि आपला संसार थाटतात. आणि कालांतराने त्या घरांच्या भिंतीसुद्धा पाडल्या जातात. आणि आजोबा स्मरणातून निघून जातात कायमचे. आजच्या नातवंडांना आजोबा माहीतच नाहीत. आजोबा सध्या आजीसोबत, कारण वनवासाला (वृद्धाश्रमात) आहेत. आजच्या पिढीला

काय कळणार हो आजोबा. आणि खरंच मिस यू आजोबा
रामाच्या सहवासात
हनुमान धन्य झाले
श्रीकृष्णाच्या सहवासाने
अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला
त्याचप्रमाणे आजोबांच्या आजवरच्या सहवासाने
माझे आयुष्य धन्य झाले असे मी समजतो.

– संकेत शिंदे
(लेखक मानसशास्त्र व नातेसंबंधाचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -