घरफिचर्ससारांशराजकारणातील प्रतिभावंत युगपुरुष

राजकारणातील प्रतिभावंत युगपुरुष

Subscribe

दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यातूनच त्यांच्या व्यक्तित्व व कर्तृत्वाचा परिचय भारतीयांना झालेला आहे. भारताला मजबूत आणि विकसित करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. आजही त्यांच्याकडे एक प्रतिभावंत युगपुरुष म्हणून पाहिले जाते. हिंदुत्वाचा श्वास असलेले संयमी, शांत, अभ्यासू राजकारणी आणि तितकेच हळव्या मनाचे कवी असलेले श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांची २५ डिसेंबरला ९९वी जयंती आहे.

-प्रदीप पाटील

‘गुड गव्हर्नन्स’ अथवा ‘सुशासन’ हा प्राचीन भारतीय संस्कृतीचा एक देदीप्यमान वारसा. स्वतंत्र भारतामध्ये प्रथमच प्रशासकीय आणि राजकीय संस्कृतीमध्ये सुशासनाचा अंतर्भाव यशस्वीपणे कोणी केला असेल तर तो अटलबिहारी वाजपेयी यांनी. ज्येष्ठ संसदपटू असलेले वाजपेयी राजकारणात चार दशके सक्रिय होते. वाजपेयी ९ वेळा लोकसभेवर आणि दोन वेळेस राज्यसभेवर निवडून आले होते. हा एक प्रकारचा त्यांचे नावे विक्रमच आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे अंतर्गत व परकीय धोरणास आकार देण्यात व एक पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री, विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष व एक विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी समर्थपणे आपली भूमिका बजावली आहे. त्यांची कारकीर्द प्रशंसनीय व कौतुकास्पद अशी आहे. सामाजिक जीवनातील त्यांचा उदय हा भारतीय लोकशाही व त्यांच्या कुशाग्र बुद्धिमतेचा गौरव आहे.

- Advertisement -

उदारमतवादी जागतिक दृष्टिकोन व लोकशाही तत्त्वांशी असलेली त्यांची बांधिलकी यामुळे जनसामान्यांना त्यांच्याबद्दल आजही आदर वाटतो. भारताप्रति असलेले त्यांचे निस्वार्थ समर्पण तसेच पन्नासहून अधिक वर्षे देशासाठी दिलेल्या निस्पृह सेवेबद्दल भारत सरकारकडून त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. एक हळव्या मनाचे आणि कवी हृदयाचे व्यक्तिमत्त्व म्हणूनदेखील वाजपेयींचा लौकिक होता. ट्वेन्टी पोऐम्स, क्या खोया-क्या पाया, व्यक्तीत और कविताए, मेरी इक्यावन कविताए, श्रेष्ठ कविता या काव्यसंग्रहांद्वारे वाजपेयींचे हळवे कविमन समोर येते. यातून ते व्यक्त होत गेले. दुसरीकडे राजकीय कारकिर्दीत शुद्ध राजकारणाला प्राधान्य देत जनसामान्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या कार्यातूनच आजही त्यांची राष्ट्राप्रति असलेली निष्ठा प्रतीत होते. त्यांची सेवा सर्व देशवासीयांना प्रेरणादायी आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ साली मध्य प्रदेशात ग्वाल्हेर येथे झाला. ते उत्तम पत्रकार, प्रतिभावंत कवी होते. १९४२च्या भारत छोडो आंदोलनात श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या संपर्कात आल्यावर पर्यायाने ते भारतीय जनसंघाच्या संपर्कात आले व भारतीय जनसंघाचे नेते म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. तारुण्यातच आपल्या अमोघ वाणीने त्यांनी विरोधी पक्षात असूनही सर्व स्तरांवर वाहवा तसेच आदरही मिळविला. त्यांची भाषणे अतिशय उत्तम व दर्जेदार म्हणून गणली जात होती. हिंदी भाषेवर त्यांचे अफाट प्रभुत्व होते. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये हिंदीत भाषण देणारे ते पहिले नेते होते. खुद्द भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वाजपेयी एक दिवस नक्कीच भारताचे पंतप्रधान होतील, अशा शब्दांत त्यांचा गौरव केला होता.

- Advertisement -

भारतीय जनसंघाचे मित्र, खासकरून लालकृष्ण अडवाणी आणि भैरोसिंग शेखावत यांच्या सोबतीने १९८० साली भारतीय जनता पक्षाची स्थापना केली व वाजपेयी हे भाजपचे पहिले अध्यक्ष झाले. सुरुवातीला लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या वाट्याला केवळ दोनच जागा आल्या. तरीही देशाच्या राजकारणात भाजपाचा विस्तार होतच राहिला. १६ मे १९९६ ते ३१ मे १९९६ तेरा दिवसांचे पंतप्रधानपदही या काळात त्यांच्याकडे होते.

रसायन आणि खते, सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार, कोळसा, वाणिज्य, दळणवळण, पर्यावरण आणि वन, अन्नप्रक्रिया उद्योग, मानव संसाधन संपत्ती विकास, कामगार खाणी उद्योग, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, नियोजन आणि कार्य अंमलबजावणी, ऊर्जा, रेल्वे, ग्रामीण, रोजगार, विज्ञान, तंत्रज्ञान, पोलाद, भूपृष्ठ वाहतूक, वस्त्रोद्योग, जलसंपत्ती इलेक्ट्रॉनिक्स, जम्मू काश्मीर व्यवहार, सागरी विकास एवढ्या खात्यांचा कारभार त्यांच्याकडे होता. १९९६ साली पहिल्यांदा, १९९८-९९ साली दुसर्‍यांदा, तर १३ ऑक्टोबर १९९९ला तिसर्‍यांदा ते पंतप्रधान झाले.

१९९५च्या मार्चमध्ये गुजरातच्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांत भाजपाला विजय मिळाला व त्याच वेळी मुंबई येथे अधिवेशनात अडवाणी यांनी १९९६च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधानपदासाठी वाजपेयी यांचे नाव घोषित केले. मे १९९८ मध्ये वाजपेयी सरकारने जमिनीखाली ५ अणुचाचण्या केल्या. या चाचण्यांमुळे अमेरिकेला धक्का बसला. कारण या चाचण्या भारताने अमेरिकेच्या हेरगिरी उपग्रहाला चुकवून पार पाडल्या होत्या. अमेरिकेने भारतावर अनेक निर्बंध लादले होते, परंतु वाजपेयी यांच्या प्रबळ आर्थिक धोरणांमुळे भारताला त्याची झळ लागली नाही व या अणुचाचण्या भारताला लाभदायक ठरवण्यात वाजपेयी यशस्वी झाले.

दुसरीकडे कारगील युद्धावेळची मुत्सद्देगिरी वाजपेयींच्या कणखरतेची साक्ष देणारी ठरली. लाहोर भेटीत दोन देशांचे संबंध सुधारण्यासाठी वाजपेयी प्रयत्न करीत असताना पाकिस्तान काश्मीरमध्ये घुसखोरी करीत होता. त्यांच्यासोबत दहशतवादीही होते. भारतीय सैन्याच्या ही बाब लक्षात आली. त्यानुसार १९९९ मध्ये ऑपरेशन विजय सुरू केले. पाकिस्तानला त्यांचा पराभव दिसू लागला. भारताच्या पवित्र्यामुळे चीनने हस्तक्षेप नाकारला व नवाझ शरीफ यांनी अमेरिकेकडे मदतीची याचना केली. तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी मध्यस्थीची तयारी दाखवत वाजपेयी यांना चर्चेसाठी वाशिंग्टन येथे बोलाविले, पण वाजपेयींनी त्यास नकार दिला आणि अमेरिकेस सणसणीत असे उत्तर दिले.

काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आणि तिसर्‍या पक्षाचा हस्तक्षेप करून शिमला करार मोडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्नही वाजपेयींनी शिताफीने उधळला. १९९९ साली तालिबानी अतिरेक्यांनी भारतीय प्रवासी विमानाचे अपहरण केले. अतिरेक्यांच्या या कृतीमुळे वाजपेयी सरकारने तीन अतिरेक्यांच्या बदल्यात प्रवासी विमानाची प्रवाशांसह सुटका केली. तसेच २००१ साली दहशतवादी अफझल गुरू याने आणि त्याच्या साथीदारांनी संसदेवर हल्ला केला. त्यात ७ भारतीय सुरक्षा रक्षक मारले गेले, मात्र दहशतवाद्यांचा खात्मा सुरक्षा रक्षकांनी केला म्हणून मोठा अनर्थ टळला. कारण एकेका दहशतवाद्याच्या अंगावर मोठ्या प्रमाणात आरडीएक्स बांधलेले होते.

श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांनी भारतासाठी दिलेले योगदान आम्ही भारतीय कधीच विसरू शकणार नाहीत. आज त्यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!

-(लेखक भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीतील निमंत्रित सदस्य आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -