घर फिचर्स सारांश संभ्रमित भवतालातील दीपस्तंभ!

संभ्रमित भवतालातील दीपस्तंभ!

Subscribe

लेखक, अभ्यासू संशोधक, संपादक, वक्ते हरी रामचंद्र नरके यांच्या निधनानंतर समाजमाध्यमांवर त्यांच्याविषयी जेवढ्या प्रमाणात लिहिलं वाचलं, जातंय यावरून त्यांच्या कामाने समाजावर, या पिढीवर किती ठळक परिणाम केला होता हे स्पष्ट व्हावे. सामाजिक, राजकीय, साहित्य, पत्रकारिता, कला, संशोधन, इतिहास अशा सर्वच क्षेत्रातून नरके सरांच्या निधनानंतर वेदना व्यक्त करण्यात आली. या सर्वच क्षेत्रांचं मोठं नुकसान झाल्याची भावना व्यक्त झाली. त्यांनी इतक्या लवकर जायला नको होतं, अशी हळहळ व्यक्त करण्यात आली. आजच्या संभ्रमित भवतालात दिशा शोधणार्‍यांसाठी हरी नरके दीपस्तंभ होते.

–संजय सोनवणे

वैचारिक संभ्रमात दिशा भरकटलेल्या समुदायाला महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर पुन्हा आणण्यासाठी नरके सरांसारख्या मार्गदर्शकांची गरज आजच्या काळात होतीच. आजचा भवताल तुलनेनं जास्त गढूळलेला आहे. इतिहासाची मोडतोड सुरूच आहे. व्यक्तीगत अस्मितांच्या नावाखाली उन्माद पोसणार्‍या झुंडी वाढल्या आहेत. महापुरुषांची बदनामी करण्याचे प्रयत्न आणि वैचारिक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातून राजकीय हेतू साध्य करण्यासाठी आजचं राजकारण अत्यंत खालच्या स्तरावर गेलेलं पाहायला मिळत असताना प्रा. नरके सरांचं जाणं जास्तच हानीकारक आणि चटका लावणारं आहे.

- Advertisement -

बहुजन वैचारिक चळवळीला दिशादर्शक महात्मा फुलेंच्या लेखनाचा पाया मजबूत करण्याचं काम नरके सरांकडून केलं जात होतं. विचारप्रदूषणाच्या मरणासन्न विद्यमान काळाला नरके सरांकडून सत्यशोधक लेखनाचा प्राणवायू पुरवण्याचं काम केलं जात होतं. राजसत्तेचा मार्ग धर्मसत्तेच्या दारातून जात असल्यानं आजच्या गढुळलेल्या वातावरणात नरके सरांची खर्‍या अर्थाने गरज होतीच. नरके सरांच्या निधनामुळे सर्वच घटकातून सहवेदना व्यक्त केली जात असताना एक असाही घटक समाजमाध्यमांत विद्यमान होता ज्यांच्यावर नरके सरांच्या जाण्यामुळे ‘सकारात्मक’ परिणाम झाला. नरके सरांच्या जाण्यामुळे वैचारिक चळवळीचे जे नुकसान झाले आहे, या नुकसानामुळे आनंद व्यक्त करणारे घटकही यानिमित्ताने समोर आले आहेत.

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे नुकसान झाल्यामुळे कोणाला आनंद होऊ शकतो? ज्यांचा सत्यशोधनाला विरोध आहे, ज्यांना समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वावर आधारित व्यवस्थेला विरोध आहे. ज्यांचा माणसांना माणूस म्हणवून घ्यायला विरोध आहे. ज्यांना इतिहास आणि साहित्यांची वस्तुनिष्ठ मीमांसा करण्यास विरोध आहे. ज्यांना विचारांचे मूल्यमापन करण्यास विरोध आहे. ज्यांना लोकशाही आणि कल्याणकारी राज्याच्या निर्मितीला विरोध आहे. शिक्षणांवर आधारित सद्सद्विवेक जागृत असलेला समाज समुदाय निर्माण व्हायला ज्यांचा विरोध आहे. या घटकांनी प्रा. नरके सरांच्या जाण्यामुळे ‘सकारात्मक’ भावना व्यक्त केली. प्रा. नरके सरांची सत्यशोधनाला विरोध करणार्‍यांना किती भीती होती? हे यातून स्पष्ट व्हावे.

- Advertisement -

प्रा. हरी नरके सरांच्या कामाचा आवाका आणि त्यांनी केलेले संशोधन याविषयी बर्‍याच मान्यवरांनी लिहिलं. नरके सरांच्या सहवासात माणसं कशी प्रगल्भ होत गेली, इतरांच्या लेखन संशोधनाच्या कामात नरके सरांनी कशी मदत केली, सप्रमाण संदर्भ कसे उपलब्ध करून दिले, याविषयीही समाजमाध्यमांवर अनेकांनी लिहून ठेवलं आहे. प्रा. हरी नरके पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे प्राध्यापक होते. या शिवाय सर पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष होते. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू या प्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे, हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी काम पाहिले होते. मराठी भाषा संशोधन विषयात एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार्‍या कामाचा भाग असतानाही ‘मराठी’ साहित्य आणि राजकीय वर्तुळातून त्यांच्या ‘जाण्याची’ पुरेशी दखल घेतली गेलीच नाही. एरवी मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी लढणार्‍यांकडून मराठी भाषा संस्कृतीसाठी आग्रही असणार्‍या गटांकडूनही याविषयी नरके सरांविषयी पुरेशा संवेदना व्यक्त झाल्या नाहीत.

महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या लेखनाच्या मराठी अनुवादाच्या कामात मोलाचे योगदान असलेले प्रा. नरके यांच्याशी याच कारणामुळे स्वतःला केवळ मराठीजन म्हणून संबोधणार्‍यांनी ही वैचारिक अस्पृश्यता का पाळली असेल? महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर ही दोन नावे आजही इथल्या सरंजामी समाजव्यवस्थेला अडचणीची ठरतात, या दोन महनीय नावांनी सुचवलेल्या मार्गावर आपली वैचारिक वाटचाल करणारे मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या लढ्यातील प्रमुख शिलेदार असलेले प्रा. नरके त्यामुळेच ‘या’ विशिष्ट गटासाठी अदखलपात्र ठरले असावेत. त्यामुळे ‘वैश्विक मानवतेचे साहित्य मूल्य’ शिकवणार्‍या ‘मराठी भाषा’ आणि ‘मराठीजन’ या दोन्ही संकल्पनातील जातीय फोलपणाही या निमित्ताने समोर आला आहे. केवळ पुरोगामी चळवळीशी नाते सांगणारे नरके सर यांची एवढीच ओळख त्यांना मराठी भाषेच्या योगदानात ‘अदखपात्र’ ठरवू शकत नाही, मात्र तसे प्रयत्नही त्यांच्या निधनानंतर समोर आले.

नरके सरांच्या जाण्यामुळे चळवळीचे नुकसान झाले आहे. परंतु मैत्री, स्नेहबंध जोपासणार्‍या अनेकांनी त्यांचे वैयक्तिक नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली. नरके सरांचे लेखन विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले होते. ‘ओबीसी समुदायातील दुहीची बिजे’ या लेखनामुळे लोकसंख्येत मोठ्या असलेल्या या समुदायामध्येही वैचारिक घुसळण सुरू झाली होती. फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात नेहमीच नरके सर लोकशाहीच्या बाजूने उभे राहिले. ‘बहुजनांचे विभाजन, मराठा आरक्षण’, ‘महात्मा फुले यांची बदनामी ः एक सत्यशोधन’, ‘महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा’ या प्रकाशित पुस्तकांमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीला दिशा दिली. त्यामुळे सहाजिकच मराठीची धार्मिक मक्तेदारी आपल्याकडे ठेवणार्‍या गटांसोबत त्यांचा होणारा संघर्ष टाळता येणारा नव्हता. कुठलेही कर्मकांड न करता नरके सरांचे पार्थिव वीज दाहिनीत अनंतात विलीन झाले.

नरके सरांनी मराठी भाषा संवर्धनासाठी केलेल्या कामाची गोड फळे पुढील पिढीला नक्कीच मिळतील. वैचारिक मतभेद असतानाही नरके सरांशी ‘उन्मादी झुंडी वगळता’ विरोधकांचेही मनभेद नव्हते. सत्यशोधनाची तळमळ हा समांतर धागा त्यांना इतर समविचारी चळवळीशी बांधून ठेवत होता. सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंचे नाव आल्यावर हरी नरके हे नाव पुढे ओघाने येणारच, इतकी ही दोन्ही नावे पुरोगामी महाराष्ट्राच्या ओळखीची झाली आहेत. राजकीय घडामोडींपासून नरके सरांनी पुरेसे अंतर ठेवले होते. विचार आणि राजकारण यामधील सीमारेषा त्यांनी जपली. पुरोगामी चळवळीशी नाते सांगणार्‍या राजकीय पक्षांच्या भूमिका बदलांच्या राजकारणाविषयी प्रा. नरके उदासीन असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला, मात्र त्यांनी संयम सोडला नाही. राजकारण आणि चळवळीच्या मर्यादा त्यांना माहीत होत्या. महात्मा जोतिराव फुले यांच्याविषयी तसेच सावित्रीबाई फुले यांना ‘ज्ञानज्योती’ म्हणून स्वतंत्र ओळख महाराष्ट्राला करून देण्यात नरके सरांचा मोठा वाटा आहे. केवळ स्त्रीवादी चळवळीसाठीही हा अमूल्य ठेवा आहे.

नरके सरांच्या जीवनसंघर्षाचं बळ महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर हे होते हे त्यांनी अनेकदा स्पष्ट केले होते. शालेय शिक्षणाची सुरुवात, महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांशी झालेली ओळख, डॉ. आंबेडकरांचा फोटो घरात लावण्यावरून घराच्यांकडून खाल्लेला मार, नामांतर चळवळीचा नरके सरांवर झालेला परिणाम, अभ्यास आणि संशोधनाचा व्यासंग, वाचनाची भूक यातून प्रा. नरके घडत होते. ओबीसी समुदायापर्यंत फुले आंबेडकरांचा विचार पोहचवण्यात आणि या समुदायाला वैचारिक दिशा देण्यात नरके सरांचे योगदान मोठे आहे. नरके सरांचा प्रतिवाद अभ्यासाअंती आलेला असे, त्यामुळे टोकाच्या वाद चर्चांमध्येही त्यांची भूमिका ते सप्रमाण मांडून दाखवत. नवख्या लेखकांना हरी नरके सर आधार वाटत होते. नव्या लिहिणार्‍यांना साहित्य, कला आणि लेखनात संदर्भ मिळवून देणे, माहिती, योग्य दिशादर्शन करताना कधीही नरके सरांनी त्यांचीतील मोठेपणा आड येऊ दिला नाही.

समाज माध्यमांवर एखाद्या मुद्याला नरके सरांनी प्रतिवाद केला, दखल घेतली, कौतुक केले म्हणून नव्याने लिहिणार्‍यांना आनंद होत असे. ज्यांच्याशी वैचारिक प्रतिवाद असे त्यांनाही नरके सरांच्या व्यक्तीमत्वाचे आदर कौतुकच होते. डॉ. बाबा आढाव, य.दि. फडके, गं. बा. सरदार, एम.एम. जोशी, ना. ग. गोरे, शांताराम पंदेरे, बाबुराव बागूल, लक्ष्मण माने आदींच्या संपर्कातून हरी नरके यांची वैचारिक जडणघडण झाली. ऐशीच्या दशकातील वंचितांच्या आंदोलनाचा काळ नरके सरांनी जवळून पाहिला होता. त्यांच्या जाण्याने मराठी सहित्य, संस्कृती आणि पुरोगामी चळवळीतील फार मोठा संदर्भग्रंथ मिटला आहे.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर-महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेचे संशोधन सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. नव्वदच्या दशकात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने महात्मा फुले समग्र वाड्मय प्रसिद्ध केले. धनंजय किर आणि डॉ. सं.ग. मालशे पहिले संपादक होते. तर सुधारित चौथ्या आवृत्तीपासून य.दि. फडकेंकडे संपादनाची जबाबदारी होती. या ग्रंथांच्या श्रेयनामावलीत मांडणी हरी नरके असे नाव येते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीन महनीय नावांना जोडणारा वैचारिक दुवा म्हणजे हरी नरके होते. प्रा. नरके यांनी केलेली हजारो भाषणे, व्याख्याने, हजारोंच्या संख्येने लिहिलेले लेख आणि शेकडो पुस्तकांचे केलेले काम, पुस्तकांचे केलेले संपादन आणि अनुवादाचे काम हा मराठी साहित्य, लेखन विश्वातला मोलाचा ठेवा आहे, ही अभ्यास संशोधनाची शिदोरी पुढच्या कित्येक पिढ्यांना दिशादर्शक ठरणारी आहे.

- Advertisment -