घरफिचर्ससारांशभरकटलेला ‘सापळा’....

भरकटलेला ‘सापळा’….

Subscribe

मराठीमध्येही काही उत्तमोत्तम भयपट बनले आहेत, ज्यामध्ये भय, उत्कंठा आणि रहस्याची उत्तम गुंफण करण्यात आली आहे. त्यापैकी ‘सापळा’ हा चित्रपट म्हणावा लागेल. उत्तम रहस्यमय गोष्टींची मांडणी यात करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

-आशिष निनगुरकर

मराठीत गूढकथा हा प्रकार चित्रपटांतून फारसा पाहायला मिळत नाही, मात्र गूढकथेचा फॉर्म वापरत दोन कथालेखक एकत्र आल्यानंतर काय घटना घडू शकतील या कथाकल्पनेवर आधारित ‘सापळा’ हा थरारपट निखिल लांजेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत, राजवारसा प्रॉडक्शन्स आणि मुळाक्षर प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित यांनी मिळून ‘सापळा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. एकूणच भारतामध्ये सस्पेन्स-हॉरर चित्रपट अभावानेच बनतात. जे बनतात त्यातले बहुतांश चित्रपट रहस्यमय किंवा भयप्रद न वाटता कंटाळवाणे, रटाळ किंवा हास्यास्पद वाटतात.

- Advertisement -

याचं महत्त्वाचं कारण म्हणजे चित्रपटाला भयप्रद किंवा रहस्यमय बनवण्याच्या नादात चित्रपट मूळ कथेपासून भरकटत जातो. अनेकदा यामध्ये चांगल्या कथानकाचीही वाट लागते. अर्थात यालाही अपवाद काही चित्रपट आहेतच, पण यामध्येही दाक्षिणात्य चित्रपटांचा वरचष्मा आहे, परंतु मराठीमध्येही काही उत्तमोत्तम भयपट बनले आहेत, ज्यामध्ये भय, उत्कंठा आणि रहस्याची उत्तम गुंफण करण्यात आली आहे. त्यापैकी ‘सापळा’ हा चित्रपट म्हणावा लागेल. उत्तम रहस्यमय गोष्टींची मांडणी यात करण्यात आली आहे.

मराठीमध्ये भयपटांपेक्षा हास्यपट जास्त निघतात. जे भयपट अधूनमधून येतात त्यांची हाताळणी इतकी ढिली असते की तेही हास्यपटासारखेच बनलेले असतात, मात्र या गोष्टींना छेद देणारा नवा मराठी रहस्यपट आहे तो म्हणजे ‘सापळा’. या चित्रपटामध्ये भय, रहस्य या दोन्ही गोष्टींनी जसा पडदा व्यापला आहे तसेच काही चांगली दृश्येही आहेत. मराठी साहित्यामध्ये गूढकथा, रहस्यकथा लिहिल्या गेल्या. त्यावर काही चित्रपटही आले, पण अलीकडच्या काळात मराठीत भयपट, रहस्यपट बनण्याचा प्रवाह अगदीच क्षीण झाला होता. चित्रपटाची कथा एकदम हटके आहे. वरवर साधी आणि सिम्पल वाटणारी ही गोष्ट आगळ्यावेगळ्या पद्धतीने मांडली आहे.

- Advertisement -

एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून उत्तम कथेच्या शोधात असताना प्रख्यात कथालेखक श्रीनिवास भणगे यांची एक अत्यंत प्रभावी आणि जुनी नाट्यसंहिता त्यांच्या वाचनात आली. आपल्या मराठी साहित्याची भव्य कक्षा ही आश्चर्यचकित करणारी आहे. ही कथा आजच्या तंत्रज्ञानाची जोड देत मोठ्या पडद्यावर आणण्याचा मोह हा दिग्दर्शक निखिल आवरू शकले नाहीत. ‘सापळा’ चित्रपटात मराठीतील उत्तम कलाकारांचा अभिनय पाहण्याची संधी मिळणार आहे. नवीन कथालेखक आणि अनुभवी लेखक अशी दोन डोकी एकत्र आल्यावर घडलेल्या भयानक घटनेचे चित्रण करणार्‍या या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, समीर धर्माधिकारी, दीप्ती केतकर, नेहा जोशी, नक्षत्र मेढेकर, सुनील जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रद्योत प्रशांत पेंढारकर, अनिल नारायणराव वरखडे, दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

सिनेमा पाहणारा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. अनेकदा भयपट पाहताना थरकाप उडतो. लहानपणी भयपट पाहताना वाटणारी भीती अनेकांच्या मनात मोठं झाल्यानंतरही कायम असते. बरेचसे असे चित्रपट आहेत जे लहानांनाच काय तर वयस्कर लोकांनाही एकट्याने पाहताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक सिनेमाचे गणित वेगळे असते. हा सिनेमा एका बंगल्याभोवती फिरणारा आहे. मोजकी पात्रे आहे. त्यात विशेष असे काही घडत नाही. प्रत्येक सीनमध्ये अनेक गोष्टी सारख्या वाटतात. त्यामुळे तोच तोपणा येतो. नावीन्य काही दिसत नाही.

काही चित्रपट चांगले असतात, तर काही वाईट असतात, पण काही चित्रपट असे असतात जे पाहिल्यावर हा खरंच चित्रपट आहे का, असा प्रश्न पडतो. चित्रपटाची सुरुवात एकदम संथगतीने होताना दिसते. एक प्रसिद्ध लेखक त्याला योग्य गोष्ट सुचत नसल्याने टेन्शनमध्ये असतो. याच टेन्शनमध्ये तो दारू पितो. त्यात त्याच्या पत्नीला बीपीचा आजार चालू होतो. मग एका चांगल्या स्क्रिप्टची शोधाशोध करणारा हा लेखक त्याच्या लेखन शिबिरात भेटलेल्या एका नवोदित लेखकाची स्क्रिप्ट आवडल्याने त्याला घरी घेऊन येतो. तेथूनच सिनेमाच्या घटना एकेक घडत जातात. मध्यंतरापर्यंत सिनेमा एकदम संथ आहे. सर्वांनी आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.

नेहा जोशी यांचा अभिनय काबिलेतारीफ झाला आहे. एकेक घटना मध्यंतरानंतर घडल्याने सिनेमा पुन्हा पकड घेण्याचा प्रयत्न करतो, पण सिनेमाच्या एकदम शेवटी प्रचंड धावपळीत शेवट केल्याने पूर्ण सिनेमाचा रसभंग होतो. शेवटाकडे पटकथा एकदम झुकल्यासारखी वाटते. मुळात या सिनेमाची गोष्ट उत्तम आहे, पण पटकथेची मांडणी काहीशी सुटल्याने सिनेमाचा प्रभाव कमी होत जातो. एकच लोकेशन असल्याने सिनेमाच्या मांडणीत नावीन्य वाटत नाही. एकूणच ‘सापळा’ हा सिनेमा काहीसा भरकटलेला वाटतो, पण कलाकारांच्या अभिनयाने सिनेमा काहीसा उठावदार झाला आहे. त्यामुळे ‘सापळा’चा अनुभव घ्यायला हरकत नाही.

-(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -