घरफिचर्ससारांशनवसापोटी सुशिक्षितपणाचा बळी!

नवसापोटी सुशिक्षितपणाचा बळी!

Subscribe

नवसापोटी उघड्यावर पशुबळी देण्यामध्ये केवळ अशिक्षितच असतात असे नव्हे तर शिक्षित भाविकही मोठ्या प्रमाणात मनोभावे सहभागी होताना दिसतात. शिक्षण व्यवस्थेत असलेले वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य शिक्षणातून व्यक्तीच्या आचरणात येईल, विकसित होईल आणि त्यामुळे तो अंधश्रद्धेचा, अवैज्ञानिक गोष्टींचा बळी होणार नाही अशी अपेक्षा होती, मात्र येथे शिक्षणाचा पराभव झाल्याचे चिन्ह आढळते. शिकलेला माणूस आहार, व्यायाम, आरोग्य, तंत्र वैज्ञानिक कौशल्याचे ज्ञान वापरण्यासाठी माहिती, ज्ञान व शास्त्रीय विचार पद्धती यांचा वापर करतो, मात्र महत्त्वाच्या बाबींमध्ये यशस्वी होण्यासाठी किंवा सफल होण्यासाठी तो पारंपरिकतेचा मार्ग शोधतो. त्यासाठी तो जपजाप्य, होमहवन, ताईतोडगे, पूजाअर्चा, नमाज, प्रार्थना, यज्ञयाग, गंडेदोरे, उपासतापास, नवससायास असं सर्वही यथासांगपणे पार पाडतो.

-डॉ. ठकसेन गोराणे

सण-समारंभ, उत्सव हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील ताणतणाव सैल व्हावेत, सामाजिक एकोपा, स्नेह, कृतज्ञभाव वृद्धिंगत व्हावा, सर्वांना आनंद मिळावा, मनोरंजन घडावे अशा अनेक चांगल्या गोष्टींसाठी सण-समारंभ-उत्सव साजरे करणे अतिशय आवश्यक आहे, पण अलीकडच्या काळात हे मुख्य हेतू बाजूला पडून अनेक सण, उत्सव, समारंभ यांना केवळ दिखाऊपणाचे स्वरूप व प्रचंड उधान आल्याचे दिसते. त्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे शोषण, गैरप्रकार, सामाजिक-धार्मिक तेढ, पर्यावरणाच्या प्रदूषणात वाढ, वेळ, श्रम, पैसा यांचा अनाठायी अपव्यय, अनारोग्य, कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न अशा अनेक समस्या, अडचणी, संकटं निर्माण होतात. महाराष्ट्राच्या ग्रामीण-आदिवासी भागातील अनेक गावांच्या ग्रामदैवतांच्या जत्रा-यात्रांचे आयोजन हा त्यापैकीच एक आनंदोत्सव.

- Advertisement -

मनोरंजन, कलाकुसरींचे सादरीकरण, कष्टमय जीवनाला थोडासा विश्राम, विरंगुळा, गाठीभेटी अशा अनेक इष्ट उद्देशाने जत्रांचे आयोजन केले जात असे. काही गावांमधून तर वर्षभरात एकाच गावात टप्प्याटप्प्याने दोन दोन ग्रामदैवतांच्या जत्रा आजही भरतात, मात्र प्रत्यक्षात आजही अशा अनेक जत्रायात्रांमधून परंपरा पालनाचा आणि धर्माचरणाचा भाग म्हणून अनेक अनिष्ट, अघोरी, अमानुष रूढी, प्रथा जतन करून त्या जशाच्या तशा जोपासल्या जातात असे दिसते.

अनेक जत्रायात्रांमधून नवसापोटी प्राण्यांचे बळी देण्यात येतात. जत्रेच्या निमित्ताने इतर सांस्कृतिक कार्यक्रम भलेही ठिकठिकाणी वेगवेगळे होत असतील, परंतु त्या सर्वांमध्ये एक समान धागा आढळतो तो म्हणजे देव-देवतांचे नवस फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात उघड्यावर पशूपक्षी बळी देण्याची अनिष्ट व अघोरी प्रथा. अशा जत्रांमध्ये प्रत्यक्षात आपण गेलो तर आपल्या नजरेस पडते की तेथे प्रचंड प्रमाणात उघड्यावर पशूबळी देण्याचे काम चालू असते.

- Advertisement -

त्यामुळे तेथे कमालीची अस्वच्छता व दुर्गंधी पसरलेली असते. तेथेच मांस शिजवून जेवणावळी उठत असतात. काही ठिकाणी देवदेवतांची नवसपूर्ती म्हणून दंडवत, लोटांगण घालणे, लोखंडी हूक चेहर्‍यावर, पोटाला, पाठीला टोचून घेऊन गळ खेळण्याचे क्रूर व अघोरी प्रकार चालू असतात. आजूबाजूला प्रचंड कोलाहल चालू असतो. यात काही चुकीचे आहे, गैर आहे असे कुणालाही वाटत नाही. सर्व अगदी सुखेनैव चालू असते. विशेष म्हणजे हे जसे हिंदूंच्या देवदैवतांच्या नवसपूर्तीच्या बाबतीत घडते तसेच मुस्लिमांच्या अनेक दर्ग्यांवर, पिराच्या ठिकाणीही मन्नतीची पूर्ती म्हणून पशूबळी दिले जातात.

नवसापोटी उघड्यावर पशूबळी देण्यामध्ये केवळ अशिक्षितच असतात असे नव्हे तर शिक्षित भाविकही मोठ्या प्रमाणात मनोभावे सहभागी होताना दिसतात. शिक्षण व्यवस्थेत असलेले वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य शिक्षणातून व्यक्तीच्या आचरणात येईल, विकसित होईल आणि त्यामुळे तो अंधश्रद्धेचा, अवैज्ञानिक गोष्टींचा बळी होणार नाही अशी अपेक्षा होती, मात्र येथे शिक्षणाचा पराभव झाल्याचे चिन्ह आढळते. शिकलेला माणूस आहार, व्यायाम, आरोग्य, तंत्र वैज्ञानिक कौशल्याचे ज्ञान वापरण्यासाठी माहिती, ज्ञान व शास्त्रीय विचार पद्धती यांचा वापर करतो, मात्र महत्त्वाच्या बाबींमध्ये यशस्वी होण्यासाठी किंवा सफल होण्यासाठी तो पारंपरिकतेचा मार्ग शोधतो. त्यासाठी तो जपजाप्य, होमहवन, ताईतोडगे, पूजाअर्चा, नमाज, प्रार्थना, यज्ञयाग, गंडेदोरे, उपासतापास, नवससायास असं सर्वही यथासांगपणे पार पाडतो.

जत्रेच्या ठिकाणी नवसपूर्ती करणार्‍या शिक्षित भाविकांना आपण जर विचारले तर व्यवहारातील यशस्वितेसाठी ते शास्त्रीय विचार पद्धती वापरतात, पण वैज्ञानिक दृष्टिकोनाला संपूर्ण फाटा देतात असे लक्षात येते. कारण शास्त्रीय विचार पद्धती ही एक गणिती प्रक्रिया आहे. त्यामुळे व्यवहारात अशी माणसे यशस्वी होतात, पण वैज्ञानिक दृष्टिकोन ही त्याच्या पुढची पायरी असून त्यात मूल्यविचार समाविष्ट असतो. हेच शिक्षित व्यक्तींना कळलेले नसते. त्यामुळे कितीही शिकले तरी परंपरेचा मार्ग ते स्वीकारतात. अशा वेळी नवस करू नका आणि उघड्यावर पशूबळी देऊ नका, असे बोलणेही फारसे कुणाला रुचत नाही, पटत नाही. उलट तीव्र विरोधच होतो. अशा वेळी हिंदू-मुस्लीम असे सर्व हितसंबंधी एकत्र येऊन प्रबोधन करणार्‍या कार्यकर्त्यांना एकजुटीने विरोध करतात.

देवदैवतांच्या श्रद्धेपोटी आणि नवसपूर्ती करण्यासाठी लांबून लांबून लोक, भाविक आलेले असतात. त्यातील अनेक जण स्वत:चे किंवा भाड्याचे वाहन घेऊन त्यासोबत बकरं, मेंढरू, कोंबडं घेऊन आलेले असतात. त्यांनी दहा-वीस नातेवाईक मित्रमंडळी यांनाही सोबत आणलेले असते. हे सर्वजण परंपरा जपणारे, जोपासणारे, मानणारे, मिरवणारे असतात. जत्रा, यात्रेच्या ठिकाणी विस्तीर्ण माळावर किंवा गल्लीबोळात जिथे जागा दिसेल तिथे घाणीवर माती- केरकचरा ढकलून पुढचा कार्यक्रम सुरू करतात. अशा वेळी ह्या लोकसमुदायाला समजावणे, प्रबोधित करणे अवघड होऊन बसते.

तरीही महाराष्ट्र अंनिसने महाराष्ट्रातील पशूबळीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या अशा अनेक जत्रायात्रांमधील लोकांचा, भाविकांचा रोष पत्करून प्रबोधन, सत्याग्रह आणि प्रसंगी प्रचंड संघर्ष करून हे पशूहत्येचे प्रमाण घटवण्याचा प्रयत्न केला आहे. आजपर्यंत दीडशेहून अधिक जत्रायात्रांमधील पशूबळींची अनिष्ट, अघोरी प्रथा संपूर्णपणे थांबवण्यात अंनिसला यश मिळाले आहे. शिवाय सातत्यपूर्ण प्रबोधनामुळे या अनिष्ट, अघोरी प्रथेबाबत जनसामान्यांच्या मनात मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. त्यामुळे अनेक जत्रायात्रांतील नवसापोटी उघड्यावर दिल्या जाणार्‍या पशूबळींची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.

मात्र अजूनही नवस करण्याचे प्रमाण आणि त्यासाठी उघड्यावर पशूबळी देण्याचे प्रमाण संपूर्णपणे थांबलेले नाही. जवळजवळ सर्वच ठिकाणी कायदा धाब्यावर बसवून उघड्यावर पशूबळी दिले जातात. याबाबत दरवर्षी जत्रायात्रांमधून तसेच इतर वेळीही लोकसंवाद, व्याख्याने, प्रबोधनपर कार्यक्रम अंनिस आयोजित करीत असते. काही देवदेवतांची नवसपूर्ती म्हणून विशेषत: महिला, मुली भर उन्हात, अस्वच्छ अशा सार्वजनिक रस्त्यावर झुंडीने लोटांगण, दंडवत घालणे, गळ खेळणे असे प्रकार करीत असतात. महिला आणि मुलींना असे लांच्छनास्पद प्रकार करण्यासाठी जे भोंदू, भगत उद्युक्त करतात, त्यांना मात्र याचे काहीही सोयरसुतक नसते, मात्र हे सर्व अपप्रकार पाहून सुज्ञ माणसाची मान शरमेने खाली गेल्याशिवाय राहत नाही.

जेव्हा अशा सर्व अनिष्ट, अघोरी कालबाह्य झालेल्या प्रथा, परंपरांविरोधात कार्यकर्ते प्रबोधन, सत्याग्रह, संघर्षासाठी उभे राहतात तेव्हा त्यांच्यावर अनेक आरोप होतात. तुमचं कोण ऐकणार? आमची प्रथा, परंपरा आहे, आम्ही ती पाळतो, जोपासतो. तुम्ही कोण आम्हाला सांगणार? तुम्हाला आम्हीच दिसतो का? आमचाच धर्म दिसतो का? संत गाडगेबाबांना जिथे गुडघे टेकावे लागले, तिथे तुम्ही कोण लागून गेलात? देवाच्या कामाला तुम्ही असा विरोध केला तर तुम्हाला लवकरच त्याचे परिणाम भोगायला लागतील. तुम्ही जगणारच नाहीत, असं बरंच काही प्रत्यक्ष प्रबोधन कार्यक्रमांच्या वेळी ऐकायला मिळते.

अशा जत्रायात्रांमध्ये ह्या सर्व अनिष्ट, अघोरी, अमानुष प्रथा, परंपरा चालू ठेवण्यात ज्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात, ते ऐन प्रबोधनाच्या दिवशी येऊन कार्यकर्त्यांना दमबाजी करणे, शिवीगाळ करणे, धमक्या देणे, देवाची भीती दाखवणे, लोटालोटी करून कार्यक्रम हाणून पाडण्याचा, उधळून लावण्याचा प्रयत्न करणे असे चुकीचे वर्तन सर्रास करतात, मात्र कोणी कितीही सांगितले तरी देवाधर्माच्या नावाने नवस बोलून अतिशय क्रूर पद्धतीने, गलिच्छ ठिकाणी उघड्यावर केली जाणारी पशूहत्या हा कोणत्याही धर्माचरणाचा, धर्मपालनाचा, परंपरा जतन करण्याचा आणि जोपासण्याचा भाग होऊच शकत नाही. ज्याला आधुनिक, सुसंस्कृत समाज आपण म्हणू त्यात अशा अवैज्ञानिक, कालबाह्य, अनिष्ट, अघोरी, अमानुष प्रथा-परंपरा व कर्मकांडांना थारा कसा असेल?

नवसे कन्या-पुत्र होती। तरी का करणे लागे पती?

असा खडा सवाल जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी ४०० वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या समाजाला विचारलेला आहे. महाराष्ट्र अंनिस अशा संत वचनांचीच आठवण समाजाला, भाविक-भक्तांना प्रबोधनातून करून देत असते. सामान्य भाविकांना हा मुद्दा, विचार पटतोही, पण तथाकथित भगत मंडळी आणि अशा अनिष्ट, अघोरी प्रथा, परंपरा चालू ठेवण्यात आणि त्यांचे उदात्तीकरण करण्यात ज्यांचा फायदा विशेषत: आर्थिक हितसंबंध अडकलेले असतात त्यांचा प्रबोधन, सत्याग्रहाला कडाडून विरोध असतो.

त्यांना संत-विचार, संत-वचनं, लोकांचे आरोग्य, कायदा याच्याशी काही देणे-घेणे नसते. दिनांक २३ जुलै १९९८ रोजी महाराष्ट्र शासनाने मा. उच्च न्यायालयात प्रतिपादन केले आहे की देवाच्या नावाने पशू व पक्षी यांची होणारी हत्या थांबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अशा हत्या रोखण्यासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली जाईल व योग्य ती पावले उचलली जातील. या युक्तिवादावर समाधान व्यक्त करून तसा लेखी आदेश न्यायालयाने काढला, परंतु १९९८ पासून आजपर्यंत महाराष्ट्र अंनिसने महाराष्ट्रातील त्या त्या जिल्हा व पोलीस प्रशासनाला वारंवार विनंती करूनही महाराष्ट्रातील पशूबळीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या एकाही जत्रायात्रेत न्यायालयाच्या या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी झालेली नाही.

महाराष्ट्रातील उदगीर येथे एक घटना घडली. पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. ती कमी व्हावी म्हणून नवस बोलला गेला. ही कार्यसिद्धी लवकर व्हावी म्हणून पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांकडूनच बोकडबळी दिला गेला. मग चौकशीअंती एक दोघांचे निलंबन करण्यात आले. म्हणून जत्रेतील नवसापोटी उघड्यावर होणारी पशूहत्या थांबवण्यासाठी पोलिसांनी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा करणे हे विनोद करण्यासारखेच आहे.

महाराष्ट्रात दरवर्षी लहानमोठ्या अशा सरासरी चार ते पाच हजार जत्रायात्रा भरतात. असे समजूया की, त्यापैकी केवळ दोन हजार जत्रा- यात्रांमधून पशूपक्षी बळी देऊन नवस फेडले जातात. नवसपूर्ती म्हणून एका पशूबळीसाठी आजच्या महागाईनुसार किमान पंधरा हजार रुपये खर्च येतो. प्रत्येक जत्रेतून सरासरी एक हजार प्राण्यांचे बळी दिले जातात, असे गृहीत धरले तर, दोन हजार जत्रांमध्ये वीस लाख पशूबळी दिले जातात. म्हणजे महाराष्ट्रातील ग्रामीण-आदिवासी भागातून दरवर्षी किमान तीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम या अनिष्ट आणि अघोरी प्रथेपायी खर्च होते. त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आर्थिक बजेट मोठ्या प्रमाणात कोलमडते. अर्थव्यवस्था खिळखिळी होते. नवसापोटी पशुहत्या यामागील हे अर्थकारण ग्रामीण भागाला दिवाळखोरीकडे नेणारे आहे, एवढे मात्र नक्की !

खरं तर आपल्याकडे अशा प्रकारे दैवीउपचार, परंपरांचे पालन, धर्माचरण, नवसायास, जत्रा-यात्रा यांची पूर्तता करण्यासाठी आर्थिक ऐपत नसतानाही जो खर्च केला जातो, त्यामुळे बहुसंख्य लोक कायमचे कर्जबाजारी होतात. जत्रेत शोध घेतला तर एका जत्रेसाठी घेतलेले कर्ज पुढील जत्रेपर्यंत फिटू शकत नाही, अशी अनेक कुटुंबं, अशा जत्रांमधून आपणास पाहायला मिळतात. शिवाय पुन्हा वर्षभरात एखाद्या संकटातून निभावण्यासाठी, लाभापोटी पुन्हा दुसरा नवस केलेलाच असतो. त्याचीही पूर्ती करायची असते. पुन्हा त्यासाठी कर्ज काढणे भाग पडते. अशा दुष्टचक्रात अनेक कुटुंबे आजही अडकलेली आहेत.

अशा जत्रायात्रांमध्ये नवसफेडीपोटी भाविकांकडून देवाच्या भीतीपोटी किंवा बळजबरीने पशूपक्षी बळी करून घेण्यात आणि ते चालू ठेवण्यात ज्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात त्यांचाच मोठा आर्थिक फायदा होत असतो. लोकांच्या देवभोळेपणाचा आणि धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेऊन भाविक-भक्तांना अशा कालबाह्य, अनिष्ट, अघोरी, रूढी-प्रथा आचरण्यास भाग पाडून भीती दाखवून त्यांना अधिक गरिबीत ढकलण्याचे, कायम गरिबीत ठेवण्याचे हे कुटिल कारस्थान आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. अज्ञानातून, अंधश्रद्धेतून अनाठाई खर्च होणारी हीच रक्कम जर कुटुंबाच्या आरोग्यासाठी तसेच शिक्षण, शेती विकासासाठी आणि अशाच इतर आवश्यक बाबींसाठी खर्च केली, झाली तर अशा कुटुंबांची निश्चितच विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू होईल.

शिवाय समाज स्वास्थ्यही शाबूत राहील. खरंतर अशा अनेक जत्रांयात्रांमधून बळी दिल्या जाणार्‍या प्राण्यांची वैद्यकीय तपासणी केलेली नसते. त्यामुळे जत्रा झाल्यानंतर आजारपणाचेही प्रमाण वाढते. शिवाय मांसाहार आला म्हणजे त्याबरोबर मद्यपान करण्यास अनेक ठिकाणी समाज मान्यताही मिळते. त्याला तरुण पिढी बळी पडण्याची शक्यता असते. म्हणून कुटुंबात, समाजात असे सर्व बाजूंनी संकट, अडचणी, समस्या घेऊन येणार्‍या अशा जत्रायात्रांचे स्वरूप ठरवले तर बदलू शकतो. वेगळ्या आशादायी, उत्साहवर्धक व कालसुसंगत अशा प्रकारे जत्रायात्रांचे आयोजन करता येऊ शकते.

जत्रायात्रांचे आयोजन जरूर करावे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मनोरंजनाचे, संस्कृती संवर्धनाचे, विविध प्रकारच्या स्थानिक समस्या निवारणाचे असे अनेक उत्सव, कार्यक्रम, उपक्रम सादर करता येतील. त्या दिशेने अशा जत्रायात्रांची वाटचाल सुरू होणे आवश्यक आहे. समाजधुरिणांनी पुढे येऊन असा विचार समाजात रुजवायला हवा. संघटितपणे आणि कृतिशील प्रयत्न करायला हवेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -