घरफिचर्ससारांशरंगभूमीवर अक्षय प्रेम करणारी अक्षया नाईक

रंगभूमीवर अक्षय प्रेम करणारी अक्षया नाईक

Subscribe

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतून तिनं साकारलेली लति घराघरात जाऊन पोहचली. अक्षया नाईकचं त्यादरम्यान कौतुक झालं होतं. ती अभिनयगुण संपन्न आहे यात शंकाच नाही, पण नायिका म्हटली की ती दिसण्याच्या ठरावीक तथाकथित चाकोरीत बसणारी हवी या गोष्टीलाच तिने छेद दिला. तिचं वजन हा मुद्दाच कधी तिच्या स्वप्नांच्या आड आला नाही आणि तिने अनेकांची मनं जिंकली.

-संतोष खामगांवकर

…तेव्हा मनात विचार करायचे की, माझं कॉलेज संपणार, मग मी बारीक होणार आणि पाहिलं ऑडिशन द्यायला मी या राजश्री प्रॉडक्शनच्या ऑफिसमध्ये येणार.

- Advertisement -

अक्षया सांगते की, मला हिरोईन व्हायचं आहे हे कधीच डोक्यात नव्हतं. मला स्टेजवर जायचं आहे हीच माझी इच्छा होती. मग डान्स, मिमिक्री, अँकरिंग किंवा अभिनय काहीही असो मला फक्त स्टेजवर जायचंय हेच मला माहीत होतं. शाळेत असताना तर मी त्यासाठी अतिउत्साही असायचे. हे पाहून टीचर तर मला नेहमीच सांगायच्या की, एका विद्यार्थिनीला एकावेळी फक्त एकाच क्षेत्रात भाग घेता येईल. कारण सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे. मग अक्षयाचा विरस व्हायचा कारण तिला सगळंच करायचं असायचं.

असं हे स्टेजवर जाण्याचं वेड असलेल्या अक्षयाला तिच्या आईनं तिची आवड पाहून वेगवगळ्या नाट्य शिबिरांना पाठवायला सुरुवात केली. २००८ साली अक्षयाला ‘अकल्पित’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी पहिल्यांदाच मिळाली, ज्यात तिला ऐश्वर्या व अविनाश नारकर या जोडगोळीच्या मुलीची भूमिका करायला मिळाली होती. या अनुभवातून समृद्ध झालेल्या अक्षयाने आपण भविष्यात पुढे अभिनयच करायचा यावर शिक्कामोर्तब केलं होतं.

- Advertisement -

सुरुवातीच्या दिवसांत मराठी नाट्य शिबिरं आणि रंगभूमीची पार्श्वभूमी असलेल्या अक्षयाला पहिला ब्रेक मात्र ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या हिंदी मालिकेतून मिळाला. त्याचा किस्सा असा की, कॉलेजच्या एका वर्गमित्राच्या बहिणीने तिचे फोटो सोशल मीडियावर पाहिले आणि तिने अचानक एक दिवस अक्षयाला ऑडिशनला बोलावलं. जिथे तिला ऑडिशन द्यायला जायचं होतं ते राजश्री प्रोडक्शनचं ऑफिस तिच्या घरापासून कॉलेजपर्यंतच्या रस्त्यावर मध्येच होतं. अक्षया सांगते की, मी रोज त्या रस्त्यावरून येजा करायचे.

तेव्हा मनात विचार करायचे की, माझं कॉलेज संपणार, मग मी बारीक होणार आणि पाहिलं ऑडिशन द्यायला मी या राजश्री प्रॉडक्शनच्या ऑफिसमध्ये येणार, पण साधी चौकशी करण्याचीसुद्धा मी कधी हिंमत केली नाही आणि लाईफ केम फुल सर्कल जेव्हा मला तिथूनच फोन आला होता. अक्षयाने त्यानंतर फक्त ऑडिशनच दिलं नाही, तर कालांतराने छोट्या पडद्यावर झळकण्याचं तिचं स्वप्नंही पूर्ण झालं.

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेच्या यशस्वी प्रवासानंतर अक्षयाचं आता नवं मराठी नाटक ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ रंगभूमीवर आलं आहे. मालिकेनिमित्त तीन वर्षे कॅमेर्‍याला सामोरं गेल्यानंतर रंगभूमीवर उभं राहणं तसं अक्षयासाठी आव्हानच होतं. त्यातच अनेक वर्षांपूर्वी दिलीप प्रभावळकर आणि निर्मिती सावंत अशा दिग्गज कलाकारांनी ‘चूकभूल द्यावी घ्यावी’मध्ये अफलातून भूमिका साकारली होती.

तेच पुन्हा साकारत असताना अक्षया स्वतःच सांगत होती की, या कलाकारांनी एक बार सेट केला आहे. त्यांच्याशी आमची बरोबरी होऊच शकत नाही. कारण त्यांच्यापुढे आम्ही काहीच नाही. आता मी माझ्या भूमिकेकडे एक जबाबदारी म्हणून बघतेय. एक छान कलाकृती प्रक्षकांसमोर तेवढ्याच ताकदीने आणि कुशलतेने मांडण्याचं शिवधनुष्य अक्षयाला बखुबी पेलवेल यात शंकाच नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -