घरफिचर्ससारांशविद्यार्थ्यांचे व्यापक मूल्यमापन!

विद्यार्थ्यांचे व्यापक मूल्यमापन!

Subscribe

विद्यार्थ्यास खरोखर उत्तम नागरिक घडवायचा असेल तर व्यापक पातळीवर मूल्यमापन करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्याचे शिकण्यासाठी घर आणि परिसर हेही महत्त्वाचे असते. त्या दृष्टीने पालकांचा अभिप्राय अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे यापुढे मूल्यमापनाच्या प्रक्रियेत केवळ शिक्षणाच्या अभिप्रायावर अवलंबून न राहता व्यापक स्वरूपात मूल्यमापन होणार आहे. त्यामुळे शालेय वर्तनाबरोबर बाह्य वर्तनाचे प्रतिबिंबही प्रगती पुस्तकात प्रतिबिंबीत होणार आहे.

-संदीप वाकचौरे
राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर झाल्यानंतर देशात अंमलबजावणीच्या दृष्टीने पावले पडू लागली आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन प्रक्रियेत बदल अपेक्षित आहे. नव्या बदलांना सामोरे जाताना शिक्षणाविषयी पक्क्या झालेल्या धारणांना धक्का लागणार आहे. तो धक्का पचविण्यासाठी मानसिक तयारी सर्वांनाच करावी लागणार आहे. देशातील केंद्रीय परीक्षा मंडळाने विद्यार्थ्यांच्या प्रगती पत्रकावर विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या गुणांची टक्केवारी व श्रेणी नोंदवली जाणार नाही, असा निर्णय जाहीर केला आहे. त्याचवेळी धोरणात विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करीत असताना समग्र मूल्यमापन अपेक्षित केले आहे.
ज्या स्वरूपाचे मूल्यमापन केले जाणार आहे, त्या स्वरूपाचे प्रगती पुस्तक विद्यार्थ्यांच्या हाती मिळणार आहे. धोरणानुसार दिले जाणारे प्रगती पुस्तक म्हणजे ३६० अंश दृष्टिकोनाचे  प्रतिबिंब असणार आहे. एका अर्थाने ते प्रगती पुस्तक बहुआयामी आणि विद्यार्थ्यांच्या कार्यक्षमता अधोरेखित होणारे आहे. अर्थात प्रगती पुस्तक जेव्हा समग्र असणार आहे असे म्हटले जात आहे तेव्हा मूल्यमापनदेखील समग्र असणार आहे. मूल्यमापनाचा विचारही बदलणारा आहे. यानिमित्ताने वर्गातील अध्ययन, अध्यापन प्रक्रियेतदेखील मूलभूत बदलाच्या दिशेने पावले पडणार आहेत. केवळ मूल्यमापनाची प्रक्रिया बदलून आपल्याला अपेक्षित परिणाम साधता जाणार नाही. त्यासाठी वर्गातील आंतरक्रियेतील बदल अधिक महत्त्वाचे ठरणार आहेत.
समग्र प्रगती पत्रकाचा विचार केला जात असताना त्यावर केवळ विषयांचे मिळालेल्या मार्कांची नोंद असणार नाही तर त्यात अभ्यासक्रमाची क्षेत्रे, ध्येय, क्षमता, अध्ययन निष्पत्तीच्या अनुषंगाने नोंदीचा विचार असणार आहे. २०१० नंतर देशात शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आला आणि त्यानंतर मूल्यमापन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून पूर्वीप्रमाणे गुणपत्रक मुलांच्या हाती न पडता प्रगती पुस्तक हाती पडू लागले. पूर्वीच्या गुणपत्रकावर केवळ विषयांचे मार्क नोंदवले जात होते. आता मुलांच्या हाती प्रगतीपत्रक मिळत आहे. त्यावरील मार्क गायब झाले आहेत.
त्याऐवजी प्राथमिक स्तरावर श्रेणी नोंदवल्या जाऊ लागल्या आहेत. विशेष नोंदीबरोबर शिकण्यातील अडथळे, विशेष प्रगतीदेखील नोंदवली जाऊ लागली आहे. प्रगती पुस्तकावर विद्यार्थ्यांची आवड, छंद यांचाही उल्लेख केला जात आहे. धोरणानुसार नव्याने बदलाची भूमिका घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या हाती देण्यात येणार्‍या प्रगती पुस्तकात बालकांच्या कार्यक्षमतेच्या सर्वंकष वर्णनाची नोंद असणार आहे. त्याचवेळी विशिष्ट कालावधीतील विद्यार्थ्यांचे सामर्थ्य, संधी, अडथळे, कौशल्य यांची नोंद घेतली जाणार आहे. या सर्व नोंदीचा उपयोग अपेक्षित अध्ययन निष्पत्ती साध्य करण्याच्या दृष्टीने मदत होईल.
त्याचा अधिकाधिक उपयोग विद्यार्थ्यांचा शारीरिक, भावनिक, मानसिक, सामाजिक विकासाच्या प्रक्रियेसाठी होऊ शकेल. विद्यार्थ्यांच्या बोधात्मक, भावनिक आणि कारक कौशल्यांमधील प्रगती आणि बालकांचे वेगळेपण याचाही विचार  केला जाईल. यामुळे प्रत्येक पालकाला आणि विद्यार्थ्यालादेखील तो कोठे आहे, आपले सामर्थ्य कोणते आणि कशात आहे हे जाणण्यास मदत होईल. त्याचवेळी बालकांची आवडही प्रतिबिंबीत केली जाणार आहे. त्याचप्रमाणे वेगळेपण नेमके काय आहे याचाही विचार केला जाईल. त्यामुळे या समग्र प्रगती पुस्तकाद्वारे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या शिकण्यासाठी निश्चित मदत होईल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीच्या दिशेने आपल्याला निश्चित अशी मदत होऊ शकणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेच्या आधारे त्यांची हुशारी ठरविण्यात येत असते.  कोणत्याही विद्यार्थ्याची प्रगती ही केवळ एखाद्या परीक्षेच्या आधारे न करता सातत्याने मूल्यमापनाची गरज असते. जेव्हा कधी केवळ वार्षिक परीक्षेवर आधारित प्रगती पुस्तक तयार केले जाते तेव्हा वर्षभरातील इतर मूल्यमापनाशी संबंधित प्रक्रियेकडे आपोआप दुर्लक्ष होते आणि केवळ अखेरच्या परीक्षेकडे लक्ष केंद्रित होताना दिसते. शिक्षणाच्या ध्येयानुसार आपल्याला बालकांची प्रगती साध्य करायची आहे, पण ती केवळ एखाद्या क्षेत्रात नाही तर बालकांच्या समग्र प्रगतीचा विचार करण्याची गरज आहे.
त्या दृष्टीने धोरणानुसार अपेक्षित प्रगती पत्रक हाती पडल्यावर विद्यार्थ्यांना शाळेत आणि शाळाबाहेरील काय, किती, कोणत्या स्वरूपाची मदत करण्याची गरज आहे याचा अंदाज लावता येईल आणि त्या दिशेने जाण्यासाठी निश्चित स्वरूपाची मदत करता येईल. प्रगती पुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या सर्व पैलूंचा विचार केला जाणार आहे. वर्गातील आंतरक्रिया, विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील प्रगती, गळती, अध्ययनातील अडथळे यांची नोंद घेतली जाणार असल्याने विद्यार्थ्यांच्या समग्र विकासातील अडथळे लक्षात येणार आहेत. ते समजले तर अगदी सहजतेने ते दूर करता येणे शक्य होणार आहे.
शिक्षण धोरणानुसार प्रगती पुस्तकात विद्यार्थ्यांच्या सर्वसाधारण माहितीचा भाग नोंदवलेला असणार आहे. पुढच्या भागात मी व माझा परिसर याविषयी माहिती नोंदवली जाईल. तसेच अभ्यासक्रमाचे क्षेत्र, ध्येय, क्षमता, अध्ययन निष्पत्ती, उपक्रम, मूल्यमापन रूब्रिक, शिक्षक अभिप्राय यांची नोंद घेतली जाईल. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अध्ययनांच्या विविध स्तरांचा विचार केला जाणार आहे. त्यात पायाभूत, मध्य, प्रगत स्तरांचा विचार केला जाईल. स्वःमूल्यमापन, सहाध्यायी मूल्यमापन, पालक, काळजीवाहू व्यक्ती यांचा अभिप्राय याबद्दलही नोंदी असणार आहेत. एकूणच विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकाचा विचार केला तर शाळेतील अध्ययन प्रक्रियेसंबंधी शिक्षक नोंदी आणि अभिप्राय देतील.
त्याचवेळी विद्यार्थी ज्यांच्यासोबत शिकत आहेत त्या आपल्या मित्र, मैत्रिणींनादेखील आपल्या सहाध्यायी सहकार्याच्या नोंदी कराव्या लागणार आहेत. अशा नोंदी करताना इतक्या लहान वयातील मुलांना कोठे काय कळते, असा प्रश्न अनेकदा समोर येतो. खरंतर बालक कोणतेही असू दे ते विचार करते, प्रतिसाद देते हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे आपल्या सहकार्‍याबद्दल त्याच्या शिकण्याविषयी अधिक चांगली माहिती देऊ शकेल यात शंका नाही. विद्यार्थ्यांना जेव्हा स्वातंत्र्य असते, कोणत्याही प्रकारचे दडपण, भीती नोंदवली जात नाही तेव्हा बालक अधिक निरपेक्षतेने अभिप्राय देत असते. फक्त मुलांवर विश्वास ठेवायला हवा. घरातील वातावरणात मुक्तता असेल तर बालक आई आणि बाबांचे काय चुकले याविषयीदेखील बोलत असते.
त्यांनी नोंदवलेले निरीक्षण हे नेहमीच अत्यंत सुस्पष्ट असण्याची शक्यता आहे. त्यासाठी वातावरणात अधिक स्वातंत्र्य असायला हवे हे मात्र निश्चित. विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या दृष्टीने पालकांचा अभिप्राय हा अधिक महत्त्वाचा आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचे वर्तन, मिळणारा अभिप्राय आणि घरातील वर्तन यात बदल घडत गेला तर प्रतिसाद भिन्न येतो. त्यामुळे विद्यार्थ्यास खरोखर उत्तम नागरिक घडवायचा असेल तर व्यापक पातळीवर मूल्यमापन करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्याचे शिकण्यासाठी घर आणि परिसर हेही महत्त्वाचे असते. त्या दृष्टीने पालकांचा अभिप्राय अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे यापुढे मूल्यमापनाच्या प्रक्रियेत केवळ शिक्षणाच्या अभिप्रायावर अवलंबून न राहता व्यापक स्वरूपात मूल्यमापन होणार आहे. त्यामुळे शालेय वर्तनाबरोबर बाह्य वर्तनाचे प्रतिबिंबही प्रगती पुस्तकात प्रतिबिंबीत होणार आहे.
बाह्य परीक्षण होईल, पण त्याचवेळी स्वत:लाही स्वत:चे मूल्यमापन करावे लागणार आहे. अर्थात समाजव्यवस्थेत प्रगतीची भरारी घ्यायची असेल तर स्वत:कडे पाहता यायला हवे. नेहमीच आत्मपरीक्षणाची नितांत गरज आहे. आत्मपरीक्षणाचा विचार रूजवला गेला तर आपल्याला उत्तम समाज निर्मितीसाठी निश्चित मदत होऊ शकेल. वर्तमानात समाज व्यवस्थेत आत्मपरीक्षणाचा विचार फारसा प्रतिबिंबीत होताना दिसत नाही. माणसांमध्ये सतत बाहरे डोकावण्याची वृत्ती विकसित होत आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेकदा दुसर्‍यांच्या चुका दिसतात आणि स्वत:चे गुण आणि अवगुणाचा विचार होताना दिसत नाही. खरंतर आपण कधीच स्वत:कडे पाहत नाही. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना आपल्या विविध विषयांसंदर्भातील कौशल्यांचा विचार करता येणार आहे. समग्र मूल्यमापनाच्या निमित्ताने बालकांच्या हाती दिले जाणारे समग्र प्रगती पुस्तकाच्या निमित्ताने विद्यार्थ्याला स्वयं मूल्यमापनाला सामोरे जावे लागणार आहे. अर्थात यानिमित्ताने आपण स्वत:च कोठे असणार आहोत हे समजण्यास मदत होईल. त्यातून शिकण्यासाठी प्रेरणा आणि नव्या वाटा सापडत जाणार आहेत.
केंद्र सरकारने २०१७ला अध्ययन निष्पत्ती जाहीर केल्या आहेत. त्या अध्ययन निष्पत्तीची साध्यता महत्त्वाची असणार आहे. प्रत्येक विषयातील निष्पत्ती किती प्रमाणात साध्य झाली आहे हे पडताळून पाहिले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक निष्पत्तीचा विचार शाळा, वर्ग स्तरावर करावा लागेल. विद्यार्थ्यांना त्या साध्य व्हाव्यात म्हणून शिक्षकांना अध्ययन अनुभव द्यावे लागतील. त्यासाठी शिक्षकांना पाठ्यपुस्तकाबाहेर जावे लागणार आहे. केवळ पाठ्यपुस्तक केंद्रित असलेली शिक्षणाची प्रक्रिया यानिमित्ताने पाठ्यपुस्तकाबाहेर डोकावले जाईल. हे दिसणारे मूल्यमापन आज वरवर सोपे वाटत असले तरी शिक्षकांना स्वत:लाच समृद्धतेची वाट चालावी लागेल. सूक्ष्म विचार करून शिक्षणाची अध्ययन अध्यापन प्रक्रिया गतिमान करावी लागेल. मूल्यमापन प्रक्रिया प्रभावी करायची असेल तर एकूणच शिक्षण प्रक्रियेचा विचार अधिक गंभीरपणे करीत परिवर्तनाची वाट चालावी लागेल, अन्यथा मागील पानावरून पुढे चालू असेच सुरू राहण्याचा धोका आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -