घरफिचर्ससारांशसावित्रीबाईंच्या समग्र साहित्याचा परिचय !

सावित्रीबाईंच्या समग्र साहित्याचा परिचय !

Subscribe

सावित्रीबाई फुलेंची सामाजिक, शैक्षणिक क्रांती सर्वश्रुत असली तरी त्यांचं साहित्यिक योगदान, साहित्यिक म्हणून नावलौकिक फारसा कुणाला परिचित नव्हता. ऑगस्ट १९८८ साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या डॉ.मा.गो.माळी संपादित ‘सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय’ या पुस्तकाने त्यांच्या साहित्याची ओळख झाली. त्यानंतर तब्बल ३५ वर्षांनी प्रा.आशालता कांबळे यांनी ‘सावित्रीबाई फुले : साहित्यमीमांसा’ हा संशोधनपर ग्रंथ लिहून त्यांच्या साहित्याच्या प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकून वाचकांसमोर आणला. या ग्रंथासाठी त्यांनी सतत ३ वर्षे झोकून देत जवळजवळ ५५ संदर्भ ग्रंथ अभ्यासले.

-प्रदीप जाधव

भारतातील आद्य शिक्षिका स्त्री शिक्षणाची जननी म्हणून सावित्रीबाई फुले यांचे नाव आदराने, सन्मानाने घेतलं जातं. त्यांचं शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व आदर्श आणि प्रेरणादायी आहे. त्या केवळ शिक्षिकाच नव्हत्या, तर थोर समाज क्रांतिकारक महात्मा जोतिबा फुले यांच्या सहचारिणी. प्रचलित धर्म मार्तंडांनी नाकारलेल्या समाजासाठी, मुलींसाठी शाळा सुरू करून उपेक्षितांना शहाणं करण्याचं धाडस करून इथल्या तथाकथित व्यवस्थेला सुरुंग लावून गदागदा हलवण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं.

- Advertisement -

महात्मा फुलेंच्या कार्यामध्ये सावित्रीबाई फुलेंचा सिंहाचा वाटा होता. किंबहुना, महात्मा जोतिबा फुले यांनी समाजप्रबोधन-परिवर्तनाचे लढे लढले, सार्वजनिक सत्यधर्म, सत्यशोधक समाजाची निर्मिती असो किंवा अन्य सामाजिक कृती कार्यक्रम या सर्वांत सावित्रीबाई या महात्मा फुले यांच्या सोबत होत्या, त्यांच्या सहभागामुळेच यशस्वी करू शकले हे तितकंच खरं आहे. त्यांच्या कार्याची नोंद जगाने घेतली असून दोन्ही दाम्पत्यांना भारतरत्न किताब देऊन गौरविण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षे होत आहे.

सावित्रीबाई फुलेंची सामाजिक, शैक्षणिक क्रांती सर्वश्रुत असली तरी त्यांचं साहित्यिक योगदान, साहित्यिका म्हणून नावलौकिक फारसा कुणाला परिचित नव्हता. ऑगस्ट १९८८ साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या डॉ.मा.गो.माळी संपादित ‘सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय’ या पुस्तकाने त्यांच्या साहित्याची ओळख झाली. त्यानंतरही त्यांच्या साहित्याची फारशी चर्चा किंवा त्याचं मूल्यमापन झालं नाही. तब्बल ३५ वर्षांनी प्रा.आशालता कांबळे यांनी ‘सावित्रीबाई फुले : साहित्यमीमांसा’ हा संशोधनपर ग्रंथ लिहून त्यांच्या साहित्याच्या प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकून वाचकांसमोर आणल्याने सविस्तर मांडणी करणारा हा खरा पहिला ग्रंथ ठरतो.

- Advertisement -

या ग्रंथासाठी त्यांनी सतत ३ वर्षे झोकून देत जवळजवळ ५५ संदर्भ ग्रंथ अभ्यासून संशोधन केले. प्रा.आशालता कांबळे या प्रसिद्ध साहित्यिका. त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.‘माणूस घडविणारं साहित्य’ हा समीक्षा ग्रंथ प्रचंड लोकप्रिय ठरला. सन १९८२ मध्ये ‘साने गुरुजी कथामाले’ पासून सामाजिक क्षेत्रातली वाटचाल सुरू होऊन आज त्या फुले-आंबेडकरी चळवळीतील एक तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्या, परखड वक्त्या, लेखिका, कवयित्री, समीक्षिका म्हणून परिचित आहेत. बहिणाबाईंची कविता एक आकलन, यशोधरेची लेक, समर्थ स्त्रियांचा इतिहास, आमची आई, प्रवास आम्हा दोघांचा, लोकमाता अहिल्याबाई होळकर, धम्मसंस्कृती ते संविधानसंस्कृती, डॉ. बाबासाहेब आबेडकर आणि हिंदू कोड बिल, बारसा, स्त्रियांच्या उन्नतीसाठी ही त्यांची गाजलेली पुस्तकं.

सावित्रीबाई फुले यांचे दोन कविता संग्रह, तीन पत्रे आणि भाषणे या समग्र वाङ्मयावर एकूण १६ प्रकरणांमध्ये प्रा.आशालता कांबळे याचा संपूर्ण ग्रंथ असून अत्यंत उच्च दर्जाचा, अनेक वैशिष्ठ्याने भरलेला आहे. सावित्रीबाई फुले यांच्या परिवर्तनवादी संपूर्ण साहित्याची पहिल्यांदा चिकित्सक दृष्टीने नव्याने मांडणी केली आहे. उपेक्षित बहुजन वर्गाच्या हितासाठी, जोतिबा-सावित्री फुले यांच्या सामाजिक कार्याची धार आहे. त्यामुळे हा ग्रंथ लवकरच एखाद्या विद्यापीठात अभ्यासक्रमात येईल याची खात्री वाटते. थेरी गाथेनंतर खर्‍या अर्थाने बहुजनांतील कवयित्री या नात्याने १८५४ मध्ये सावित्रीबाईंनी कविता लिहिल्या. म्हणजेच ज्यांना मराठी साहित्यात क्रांतिकवी म्हणून मान्यता मिळाली त्या केशवसुतांच्या आधी ३० वर्षे ही कविता मराठी साहित्यात स्थानापन्न झालेली आहे. मराठी कवितेच्या क्रांतीला खरेतर इथून सुरुवात झाली, असे म्हणायला हवे. कारण ज्या वैशिष्ठ्यांसाठी क्रांतिकारी कविता म्हटले जाते, ती सारी वैशिष्ठ्ये सावित्रीबाईंच्या कवितेत दिसून येतात.

या ग्रंथातील अतिशय महत्त्वाचं प्रकरण १४ मध्ये सावित्रीबाईंच्या कवितांचे, त्यातील शब्दांचा अतिशय सूक्ष्म व समग्रपणे अर्थ सांगून वाचकांसाठी सहज सुलभ शब्दांमध्ये अगदी विस्तृतपणे त्याची मांडणी केली असल्याने सावित्रीबाईंच्या कवितांच्या प्रत्येक ओळीचा संदर्भासह रसग्रहण होते. सावित्रीबाईंच्या काव्याची वैशिष्ठ्ये सांगताना त्यांची कविता कशी समृद्ध आहे हे प्रा.आशालता कांबळे यांनी पटवून दिलं आहे. सावित्रीबाईंनी कविता लिहिली ती कवयित्री म्हणून नावलौकिक मिळवण्यासाठी नाही. त्यांनी कविता लिहिली ती समाजप्रबोधनाचे माध्यम म्हणून, लोकांना समजेल अशी भाषा त्यासाठी त्यांनी वापरली.

या काळात खरेतर मराठी साहित्यावर संस्कृतचा खूप प्रभाव होता. पंडित कवींच्या कविता संस्कृतप्रचुर बोजड शब्दांच्या असत, विद्वत्तेचा तो मापदंडही होता. सावित्रीबाईंनी मात्र या सार्‍या समाजमान्य मापदंडांना झिडकारले. भाषांतर युगाच्या या काळात स्वतंत्र विचारांची कविता लिहिली, सावित्रीबाई आधी समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी तळमळणार्‍या कार्यकर्त्या. म्हणूनच त्यांनी सर्वसामान्य माणसांना केंद्रस्थानी मानून त्यांना समजेल अशा साध्या-सोप्या शब्दांचा वापर करीत कविता लिहिली. ‘सावित्रीबाईंच्या काव्यनिर्मितीचे उद्दिष्टच मुळी समाजप्रबोधन हे असल्यामुळे कवितेच्या सामाजिक मूल्यमापनाच्या कसोटीत तंतोतंत बसतात.

महात्मा जोतिबा फुले यांनी छत्रपतींची समाधी शोधून काढली, छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली, छत्रपतींवर एक हजार ओळींचा पहिला पोवाडा लिहिला. सावित्रीबाईंनीही ‘छत्रपती शिवाजी’ नावाच्या चार ओळींच्या कवितेतून त्या शिवाजी महाराजांचे प्रात:स्मरण करावे असे म्हणतात. इथेही त्यांची डोळस भक्ती दृष्टीस पडते. त्या शिवाजी महाराजांचे प्रात:स्मरण करण्याचे कारण सांगताना शिवाजी महाराज प्रत्यक्ष इतिहासात होऊन गेलेली व्यक्ती असल्याचे नमूद करतात. पुराणातल्या इतरांपेक्षा शिवाजी महाराज हे त्यांना खरे वंदनीय वाटतात; कारण त्यांनी प्रत्यक्षात शूद्रातिशूद्रांच्या हिताचे कार्य केल्याचा इतिहासात पुरावा आहे. सावित्रीबाईंच्या काव्यातील विचार, लोकपरंपरेचा वारसा चालविणारे आहेत.

मुळात त्यांनी सर्वसामान्य लोकांना जागे करण्यासाठीच कविता लिहिली. त्या स्वत: बहुजन समाजातल्या आणि खेड्यात राहणार्‍या होत्या. त्यामुळे खेड्यातील लोकांमधील लोकसंस्कृतीतून आलेल्या परंपरांचा त्यांना चांगलाच परिचय होता. ‘इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो’, ही खेड्यापाड्यातील लोकपरंपरा म्हणूनच त्यांच्या काव्यात दिसते. सावित्रीबाईंच्या कवितेत दैववादावर कठोर प्रहार केलेले दिसतात. कर्मसिद्धांत आणि दैववाद यावर आधारलेली वर्षानुवर्षांची समाजव्यवस्था उलथून टाकणारे विचार आपल्या काव्यातून मांडणे ही त्याकाळी सोपी गोष्ट नव्हती, पण सावित्रीबाईंनी तेच मोठ्या धैर्याने केले. त्यांच्या कवितेविषयी लेखिकेने अनेक निष्कर्ष काढून सैद्धांतिक मांडणी केली आहे. त्या लिहितात, सावित्रीबाईंची कविता ही विधायक भक्तीचा स्वीकार करणारी, विनयवती, करुणेने भरलेली संवेदनशीलता जागवणारी, लोकपरंपरेचा वारसा चालवणारी, बंडखोर संतांच्या प्रभावाची कविता. दैववादावर प्रहार करणारी वैज्ञानिक दृष्टीची, गुलामगिरीची बेडी तोडू पाहणारी विद्रोही कविता.

प्रा.आशालता कांबळे यांच्या अथक परिश्रमातून हा संशोधनपर ग्रंथ निर्माण झाला असून पीएचडीच्या अभ्यासकांना अत्यंत महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ असून महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून संग्रही ठेवण्यासारखा आहे. या ग्रंथाच्या प्रकाशिका मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ.वंदना महाजन यांनी प्रस्तावना लिहिली असून प्रस्तावनेत लिहितात, ‘मराठी साहित्याचा इतिहास वस्तुनिष्ठपणे समोर आणावयाचा असेल, तर सत्यशोधक समाजाच्या साहित्य निर्मितीचा इतिहास नव्याने मांडण्याची गरज आहे’. हा ग्रंथ मराठी साहित्यात अत्यंत मोलाची भर टाकणारा आहे. अलीकडे सकस आणि संशोधन साहित्याची निर्मिती होत नाही, असा आक्षेप नोंदवला जातो, त्याला हा ग्रंथ उत्तर आहे.

-लेखिका- प्रा.आशालता कांबळे
-प्रकाशक- डॉ.वंदना महाजन
-मूल्य ५८० रुपये, पृष्ठे – ३१८

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -