घरफिचर्ससारांशस्त्रियांच्या बंडखोर जाणिवा!

स्त्रियांच्या बंडखोर जाणिवा!

Subscribe

अखिल मानवजातीचा विचार करता या २५ शतकांच्या कालपटलावर भारतात विविध ठिकाणी, विविध कार्यक्षेत्रात स्वत:च्या आणि सर्वांच्या हितासाठी संघर्ष करणार्‍या स्त्रियांना शोधून काढून त्यांना तुमच्या-आमच्यासमोर एकत्रितपणे ठेवणारं हे लेखन आहे. त्याचा हेतू उदात्त, त्यासाठी केलेला अभ्यास सखोल, त्याचा आवाका व्यापक आणि या सार्‍याला विवेक, संवेदनशीलता यांची सजग साथ यात आहे. लेखिका आणि संशोधक डॉ. अरुणा ढेरे यांचं ‘जाणिवा जाग्या होताना’ या पुस्तकातून त्यांनी विविध कालावधीत आदर्शवत ठरणार्‍या स्त्रियांच्या बंडखोर जाणिवांचा मागोवा घेतला आहे.

-प्रवीण घोडेस्वार

मराठी साहित्यातल्या ख्यातनाम लेखिका आणि संशोधक डॉ. अरुणा ढेरे यांचं ‘जाणिवा जाग्या होताना’ हे पुस्तक पुण्याच्या सुरेश एजन्सीने मे २०१५ मध्ये प्रसिद्ध केलं असून याची दुसरी आवृत्ती डिसेंबर २०१८ साली प्रकाशित झाली. जीवनाच्या विविधतेला समजून घेणार्‍या स्वतंत्र आणि निर्भय जाणिवांना लेखिकेने हे पुस्तक अर्पण केलंय. पुस्तकात गार्गी, मैत्रेयी, सुलभा, द्रौपदी, मीरा, जनाबाई, सोयराबाई, बहिणाबाई, राजमाता जिजाबाई, महाराणी ताराबाई, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, बहिणाबाई चौधरी, ताराबाई मोडक, दुर्गा भागवत, मालतीबाई बेडेकर, इरावती कर्वे, कुसुमावती देशपांडे अशा परिचित आणि गौतमी, विमला, पूर्णिका, ओव्वे, अक्कमहादेवी, सत्यवती, लल्ला, राधाबाई व गोपिकाबाई पेशवे, विठाबाई चौधरी, मथुराबाई जोशी, जाईबाई चौधरी, रुक्केया हुसेन, शेवंताबाई निकंबे, जनाक्का शिंदे, मालिनीबाई किबे, मनकर्णिका जोग, गीता साने, आनंदीबाई शिर्के, विमलाबाई बागल यांसारख्या फारशा ज्ञात नसलेल्या थोर स्त्रियांच्या विचारांचा आणि कार्यकर्तृत्वाचा मागोवा घेतलाय.

- Advertisement -

प्रसिद्ध स्त्रीवादी चिंतक, लेखिका आणि संपादक कालकथित विद्या बाळ यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना पुस्तकासाठी लिहिलीय. त्या म्हणतात की, अखिल मानवजातीचा विचार करता या २५ शतकांच्या कालपटलावर भारतात विविध ठिकाणी, विविध कार्यक्षेत्रात स्वत:च्या आणि सर्वांच्या हितासाठी संघर्ष करणार्‍या स्त्रियांना शोधून काढून त्यांना तुमच्या-आमच्यासमोर एकत्रितपणे ठेवणारं हे लेखन आहे. त्याचा हेतू उदात्त, त्यासाठी केलेला अभ्यास सखोल, त्याचा आवाका व्यापक आणि या सार्‍याला विवेक, संवेदनशीलता यांची सजग साथ. या सार्‍यासह केलेल्या मांडणीत लेखिकेची स्वत:ची सोपी पण शब्दघन अशी शैली. यामुळे हे पुस्तक विचार करण्यासाठीची फारशी अनुकूलता नसलेल्या काळातल्या आणि थोड्या सुविधा मिळालेल्या नंतरच्या काळातल्या स्त्रियांच्या विचारक्षमतेचा पटच आपल्यासमोर उलगडून ठेवते. पुस्तक वाचताना याचा प्रत्यय येतो.

पाली भाषेतल्या थेरीगाथांमधलं दुर्मीळ विचारधन म्हणून गौतमी, विमला आणि पूर्णिका यांची ओळख लेखिकेने करून दिलीय, तर तामिळनाडूमधली ओव्वे, कर्नाटकातल्या अक्कममहादेवी व सत्यवती या संत स्त्रियांच्या विचारांनी घडलेल्या परिवर्तनाच्या प्रयत्नांचा लेखिकेने घेतलेला परामर्श महत्त्वपूर्ण आहे. लल्ला ही १४व्या शतकातली काश्मीरची संत कवयित्री. कबीराप्रमाणेच ती हिंदू, सुफी व मुस्लिमांनाही प्रिय होती. तिच्या विचारांचं खरं सौदर्य तिने घेतलेल्या आत्मशोधात असल्याचं लेखिका म्हणते. राधाबाई व गोपिकाबाई पेशवे यांना सार्वजनिक व राजकीय प्रश्नांचे भान असल्याचं दिसतं. शिवाय मानवी स्वभाव आणि नेतृत्व गुणांचंही आकलन त्यांच्यापाशी होतं.

- Advertisement -

ब्रिटिश राजवटीत १८८२ मध्ये हंटर आयोगापुढे दिलेल्या साक्षीत मुलींच्या शिक्षणासंदर्भात विठाबाई सखाराम चौधरी नामक तरुणीने अत्यंत मौलिक विचार मांडले. तिने स्त्रियांनाही इंग्रजी शिक्षण देण्याची आग्रही मागणी केली, तर १९१२ मध्ये मथुरा जोशी या तरुणीने पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात ‘भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी’ या विषयावर समकालीन वास्तवाचं भान असलेलं भाषण केलं. प्रौढविवाहाचं समर्थन करून विभक्त कुटुंब पद्धती अधिक फायद्याची असल्याचं तिने व्याख्यानात सांगितलं होतं.

जाईबाई चौधरी यांची कहाणी अतिशय विलक्षण आहे. विदर्भातल्या लहानशा गावातल्या महार समाजातल्या जाईने ख्रिश्चन मिशनरीबाई ग्रेगरीच्या शाळेत हट्टाने शिक्षण घेतलं. पुढे समाजसेवक किसन फागुजी बनसोडे यांनी सुरू केलेल्या चोखामेळा मुलींच्या शाळेत त्या शिकल्या. प्रेमाने भांडून ग्रेगरीबाईच्या शाळेत शिक्षिका बनल्या, पण स्पृश्य समाजाने त्यांना शिक्षिका म्हणून स्वीकारलं नाही. ग्रेगरीबाईने त्यांना ख्रिस्ती होण्याचा आग्रह केला. नोकरी सोडली पण त्या ख्रिस्ती झाल्या नाहीत. किसन बनसोडे यांची शाळा स्पृश्य समाजाने आग लावून बंद पाडली. १९२२ मध्ये जाईबाईंनी हीच शाळा पुन्हा सुरू केली. तेव्हा त्यांचं वय अवघे ३० वर्षे होतं.

त्यांचं संपूर्ण जीवन शाळेचं संगोपन-संवर्धन-व्यवस्थापनात गेलं. १९५६ मध्ये बाबासाहेबांसमवेत त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला. सत्यशोधक, कृतिशील विचारवती म्हणजे सावित्रीबाई रोडे. त्यांनी महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक समाजाच्या सचिव म्हणून काम केल्याची नोंद सापडते. त्यांचं प्रबोधनपर लेखन ‘दीनमित्र’मध्ये प्रकाशित झालं. त्यांनी १९१५ मध्ये पुण्यात क्षत्रिय रामोशी संघाची स्थापना केली. पतीसमवेत त्यांनी रामोशी समाजासाठी तीन शाळा काढल्या. तसेच ‘रामोशी समाचार’ हे वृत्तपत्रही काढलं. सावित्रीबाई रोडे ज्योतिबा-सावित्रीबाईंचा वारसा चालवणार्‍या धैर्यशील, विचारशील व कृतीप्रवण कर्तबगार स्त्री होत्या.

युद्धापेक्षा सर्जन आणि संशोधन हेच श्रेयस्कर याची प्रचिती देणारी रूक्कया हुसेन. अवघ्या ५२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी केलेली कामगिरी स्तिमित करणारी आहे. मुस्लीम मुलींसाठी त्यांनी शाळा उघडली. त्यांनी १९०५ मध्ये लिहिलेल्या ‘सुल्तानज ड्रीम’ या कथेत स्त्रीराज्याची कल्पना मांडली आहे. भारतातल्या विवाहित स्त्रियांच्या प्रश्नांचा उच्चार शेवंताबाई निकंबे यांनी केला. १८८४ मध्ये त्या मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांनी विवाहित मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढली. मुख्याध्यापिका म्हणूनही काम केलं. पंडिता रमाबाईंच्या कर्तबगार शिक्षिका-सहकारी म्हणून त्यांनी उल्लेखनीय योगदान दिलं. त्यांनी युरोप-अमेरिकेचा दौरा केला. १८९५ मध्ये ‘रत्नाबाई : अ स्केच ऑफ अ हाय कास्ट हिंदू वाईफ’ ही कादंबरी त्यांनी लिहिली.

पुढे त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. महर्षी विठ्ठल शिंदे यांच्या भगिनी जनाक्का शिंदे यांचं कार्य अलीकडे लोकांपर्यंत पोहचायला सुरुवात झालीय. जातीभेद निवारणात पतीला मदत करणं हेच खरं पातिव्रत्य अशी भूमिका जाहीर भाषणात मांडून त्या प्रकाशझोतात आल्या. त्यांचं काम सावित्रीबाई फुले यांच्यानंतरचं श्रेष्ठ कार्य समजलं जातं. बडोदा संस्थानात जन्मलेली नर्मदा गुणे लग्नानंतर मालिनीबाई किबे झाली. ‘आया व त्यांच्या लहान मुलांचे शिक्षण’ आणि ‘स्त्रियांची परतंत्रता’ या दोन निबंधांतून तिचे विवेकी विचार प्रकट झाले. वयाच्या अठराव्या वर्षी तिचं निधन झालं, अन्यथा पुढे तिने मोठं कर्तृत्व गाजवलं असतं.

स्त्रीसन्मानाबाबत कमालीची जागरूक असलेल्या मनकर्णिका जोग या मुलीने वयाच्या पंचविशी-तिशीत अत्यंत प्रौढ नि प्रगत कविता लिहिल्या. दीर्घायुष्य लाभूनही त्यांच्या हयातीत कवितासंग्रह निघू शकला नाही. त्यांच्या नातवाने ‘खुणेचं पान’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित केला. पूर्वाश्रमीच्या अनूसूया शिंदे विवाहानंतर आनंदीबाई शिर्के झाल्या. त्यांनी ‘मराठामित्र’ मासिकात कथालेखन केलं. त्यांचं कथालेखन मराठी साहित्यात स्वतंत्र ठसा उमटवणारं आहे. त्यांनी ‘सांजवात’ हे आत्मचरित्रही लिहिलं. घटस्फोटित-परितक्त्या-विधवा स्त्रियांना कौटुंबिक संपत्तीत हिस्सा मिळण्यासाठी त्यांनी वकील पतीसोबत लढा दिला.

हिंदू कोड बिल नामंजूर झाल्याने राजीनामा दिल्यानंतर कोल्हापुरात विमलाबाई बागल यांनी डॉ. आंबेडकरांचा सत्कार घडवून आणला. त्यांनी अनेक बालवाड्या, शाळा, समित्या, संस्था स्थापन केल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्या लोकसभेच्या खासदारही झाल्या. पुस्तकाच्या अखेरीस लोकपरंपरेतल्या अनाम स्त्रियांविषयीही त्यांनी लिहिलेल्या सण-उत्सव-व्रत-खेळांची गाणी, अंगाई गीतं, दळण-कांडणाची गाणी यासाठी लेखिकेने कृतज्ञता व्यक्त केलीय. अरुणा ढेरे यांचं हे पुस्तक ज्ञात-अज्ञात कर्तबगार स्त्रियांच्या अफाट कामगिरीचा वेध घेणारा एक मौलिक दस्तऐवज आहे.

या पाक्षिक सदरातून आपण स्त्री प्रश्नाचा वेध घेणार्‍या आणि विविध क्षेत्रात अतुलनीय योगदान देणार्‍या स्त्रियांच्या कार्याची महती सांगणार्‍या पुस्तकांचा परिचय करून घेतला. यात ललित साहित्य आणि सैद्धांतिक मांडणी करणार्‍या पुस्तकांचाही समावेश होता. स्त्री प्रश्नाच्या चर्चाविश्वाचा हा अक्षरवेध वाचकांना आवडला असेल अशी आशा. ही संधी दिल्याबद्दल ‘सारांश’ पुरवणीचे संपादक हेमंत भोसले यांचे आभार. आपलं महानगरच्या सर्व वाचक व हितचिंतकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -