घरफिचर्ससारांशनात्याला समजून घ्या...

नात्याला समजून घ्या…

Subscribe

तुम्ही आवेशात बोलत असता नेहमी. तिच्या नि त्याच्याबद्दलही. त्या दोघांमधल्या पवित्र नात्याचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? नाही. नसेलच कळत. कारण तो कळला असता तर ‘असं’ बोलताना तुमच्या छातीत कळ आली असती नक्की. तिने बोलूही नये का त्याच्याशी? की लगेच तुमची संस्कृती बाटतेय त्याने. हो, अगदी प्रामाणिकपणे मान्य आहे. काहींचं वागणं तसं असेलही. किंबहुना आहेही. ते खरंच संस्कृती बिघडवताय, पण अशा काहींसाठी सर्वांकडेच का तसं बघावं?

–अमोल जगताप

व्हॅलेंटाईन डे आलाय. आता फक्त प्रेम, प्रपोज आणि पोरी फिरणार डोक्यात. खरंतर ‘तिला’ बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकलाय आमच्या वखवखलेल्या नजरेने. ती आणि तो बोलताना दिसले तरी आमच्या डोक्यातील विचार पातळी सोडतात. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात अन् तिला तिच्या भावनांसह ओरबाडतात.

- Advertisement -

बस्स! आता खूप झालं. मनसोक्त लिहिलं तुम्ही. भरपूर तोंडसुखही घेतलं, पण आता आमची सहनशीलता संपलीय. काय?? वरून काय म्हणून काय विचारताय. आम्ही तिच्याशी बोलायचंच नाही का कधी? स्टॉपवर ती भेटते. मोजून घड्याळाचे पाच-सात मिनिटं. तिला काही नोट्स हव्या असतात, पण तुमच्या या नजरांनी ती कैद होते. नुसतं विचारायला म्हणून जरी ती जवळ आली तरी लगेच तुम्हाला गावभर ओरडायला विषय मिळतो. ती ना… ती तशीच आहे. अरे, सतरा जणांबरोबर पाहिलंय मी तिला. सकाळ, दुपार, संध्याकाळ केव्हाही दिसते. कुठेही? कॉलेज! अरे, नाटकं आहेत सगळे.

तिलाही हे आता कळायला लागलंय. ती स्तब्ध उभी राहते. जवळ येऊन विचारायचीही हिंमत करीत नाही ती. तुम्ही… तुम्ही मात्र बटबटीत नजरेने न्याहाळत राहता तिला. कधी सरळ सरळ तर कधी अँगल चेंज करीत. ती मात्र तशीच स्टॉपवर. विचारांचं वादळ आवरत नि तुमच्या नजरांपासून सावरत. तितक्यात तिचा मोबाईल वाजतो. लगेच तुमचे कान वर… ती बोलते, थोडी हसते. तुमचे लगेच तर्कवितर्क सुरू होतात आणि ते मोठ्या आवाजात शेअर करूनही टाकता तिथेच. वाटलंच होतं मला. तरीच म्हणालो एवढ्या कोपर्‍यात का उभी होती. दिसते बघ कशी गरीब आणि… विचारू नको पुढे… सगळी पिढीच वाया चाललीय. तुम्ही-आम्ही काय करणार? तुम्हाला असं मागचा पुढचा विचार न करता बोलताना छातीत कुठे दुखत नाही का हो? कोण ती? कुठली? नीट ओळखतही नाही नावाने… मनाने तर लांबच…. तरीही तुम्ही हे असं एका दमात कसं बोलून टाकतात.

- Advertisement -

मीही उभा असतो तुमच्यासोबत स्टॉपवर, कधी रिक्षात, कधी कॉलेजच्या घोळक्यात, मी रस्त्याने चालत असतो तेव्हाही… बाजारात असतानाही.. पेट्रोल भरत असतो तेव्हाही आणि आता अगदी स्टाफ रूममध्ये असतानाही.. तुम्ही आवेशात बोलत असता नेहमी. तिच्या नि त्याच्याबद्दलही. त्या दोघांमधल्या पवित्र नात्याचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? नाही. नसेलच कळत. कारण तो कळला असता तर ‘असं’ बोलताना तुमच्या छातीत कळ आली असती नक्की. तिने बोलूही नये का त्याच्याशी? की लगेच तुमची संस्कृती बाटतेय त्याने. हो, अगदी प्रामाणिकपणे मान्य आहे. काहींचे वागणं तसं असेलही. किंबहुना आहेही. ते खरंच संस्कृती बिघडवताय, पण अशा काहींसाठी सर्वांकडेच का तसं बघावं? सगळेच रिक्षावाले सारखे नसतात. त्यातलीच ही गत! आणि बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंडव्यतिरिक्त इतर कुठलं नातं नसतंच का त्यांच्यात? नाही, सांगा ना तुम्हीच एकाच वर्गात शिकतोय.

एकाच बसने येतोय; तरी आम्ही बोलायचं नाही का एकमेकांशी? स्टॉपपासून कॉलेजपर्यंत सोबत चालायचंही नाही का? की मग तुम्हाला चांगलं वाटावं म्हणून तिने बसच्या पुढच्या नि आम्ही मागच्या दरवाजातून बाहेर पडायचं? कळत कसं नाही तुम्हाला.. तिलाही मन असतं. स्वतःचे वेगळे असे विचारही असतात. मत मांडायचं असतं तिलाही… मनमोकळं बोलायचंही असतं स्वतःबद्दल, घरच्यांबद्दल, देशाबद्दलही; कुणाशी तरी… जो समजून घेईल तिच्या भावना. नुसत्या मान हलवून नाही, आपल्या स्वत:च्या मानून… मनातलं वादळ मोकळं करायचं असतं त्याच्याजवळ… पण ती मर्यादा घालते स्वत:वर.. गप्प राहाते, शांत होते फक्त वरून, पण आतून जळत जाते.. अविरत.. केवळ एकाच विचाराने. मला असं बोलताना कोणी बघितलं तर? काय विचार करतील ते? इतरांना काय सांगतील ते?

पण का? का तिच्या मनात असा विचार यावा. त्यामागे आपलेच ते फडतूस विचार असतात ना… एरवी तुमचीही चोरटी नजर असते तिच्यावर. ती घराबाहेर निघते तेव्हापासून ती घरात येईपर्यंत. तुमचं मोजमाप वेगळंच असतं. तिने सरळ चालावं, शिस्तीत अन् तुम्ही? तिला मुद्दामहून क्रॉस जाताना तुम्हाला केसांमधून हात फिरवावासा वाटतो तेव्हा सर्व माफ. तिने गर्दीमुळे बस सोडली की तुम्ही लटकलेले असतानाही परत उतरतात तेव्हाही नो आर्ग्युमेंट. ती काही खरेदी करायला गेली की तुम्हालाही मग त्याच दुकानात जाऊन चॉकलेट खावंसं वाटतं तेव्हा? तेव्हा कुणीच हस्तक्षेप करायचा नाही ना!

ती रस्त्याने जात असताना तुमच्यातलेच काही असतात तिच्यामागे काही फुटांवर. आता आता तर काही इंचांवरही. ती दबकून वळून बघते, तुमचा अर्थ वेगळाच! गर्दीचा फायदाही घेता तुम्ही बसमध्ये, रिक्षातही… कुठे रांगा असल्या तर विचारूच नका. त्यात तुमची बॉडी लँग्वेजही भयंकर. मग ती नियमांची चौकट फक्त तिच्यासाठीच का? तुमच्यासाठी का नाही?

अक्च्युअली सध्याचे ओटीटी प्लॅटफॉर्म, त्यातील कंटेंट, भडक सिनेमे आणि अगदीच प्राईम टाईमच्या सीरियलनेही सगळंच वातावरण दूषित करून टाकलं आहे. बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडशिवायही एखादं निर्मळ प्रेमाचं नातं असू शकतं या जगात. तिच्यात आणि त्याच्यात. हेही साधे कसे समजत नाही कुणालाच?

अहो.. ती… ती… कोणीही असू शकते. तुमची मैत्रीण, बहीण, माई, मंजिरी, कल्याणी किंवा तुमची सात जन्माची सोबतीणही… निर्मळ प्रेमाचंही एक नातं असतं या जगात. तिच्यात नि त्याच्यात. फक्त ते नीट समजून घ्या. त्या नात्याला कलंकित करू नका. त्याच्या पावित्र्याला नासवू नका. बस्स, एवढंच!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -