घरफिचर्ससारांशमहाराष्ट्र धर्म वाढवावा!

महाराष्ट्र धर्म वाढवावा!

Subscribe

मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा॥ अशी मराठी भाषक समाजाच्या संघटनाची व राष्ट्रधर्माच्या विकासाची मनीषा बाळगणारे संत रामदास हे राजकीय विचार व्यक्त करणारे महत्त्वाचे संत होत. या राजकीय परिमाणामुळेच त्यांचे वेगळेपण ठळक होते. दासबोध हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे. तसेच विविध विषयांवर त्यांनी स्फुट लेखन केले. नेहमीची भ्रमंती, पर्यटन यामुळे रामदासांना जीवनाचे समग्र दर्शन झाले. याच अनुभवाचा फायदा त्यांना साहित्य निर्मितीसाठी झाला. त्यांचे समाज निरीक्षण दांडगे होते.

–डॉ. अशोक लिंबेकर

संत रामदास व संत तुकाराम हे १७ व्या शतकातील दोन महान संत. ह्या दोन्ही संतांचा कार्यकाल हा प्रचंड अस्थिरतेचा काळ होता. हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेचा तसेच मध्ययुग आणि आधुनिक कालखंडाचा संधिकाल म्हणूनही या काळाचा उल्लेख करता येईल. समर्थ रामदासांनी आपल्या स्फुट आणि ग्रंथ लेखनातून प्रामुख्याने विवेकनिष्ठेची जोपासना केली. त्यांचे समग्र साहित्य हे तत्त्वाचे व नीतीबोधाचे प्रतिपादन करणारे आहे. गीता हा ग्रंथ त्यांच्या साहित्यानिर्मितीमागील प्रेरणास्त्रोत आहे. कथा, आख्यान यांसारख्या रंजन करणार्‍या साहित्याला फाटा देऊन समर्थांनी केवळ प्रबोधन करण्याच्या हेतूनेच साहित्य निर्माण केले. रामभक्तीचा आणि बलोपासनेचा प्रचार-प्रसार करून त्यांनी भक्तीबरोबरच शक्तीच्या उपासनेलाही गती दिली. म्हणूनच भक्ती, शक्ती आणि युक्ती यांचा त्रिवेणी संगम रामदासांच्या काव्यात आढळतो. रामदासांच्या घरी पूर्वापार रामभक्तीची परंपरा असल्याने स्वाभाविकच ते रामभक्तीकडे वळले.

- Advertisement -

बालपणापासूनच विरक्त असणारे रामदास पूर्ण आयुष्य सन्यस्तपणे जगले; परंतु आपल्या साहित्यातून मात्र त्यांनी आधी प्रपंच करावा नेटका॥ मग घ्यावे परमार्थ विवेका॥ येथे आळस करू नका। विवेकीहो॥ असे सांगून प्रपंचाला अग्रक्रम दिला, पण परमार्थ सोडून केवळ प्रपंचातच गुंतलेल्यांना ते परमार्थाची उपयुक्तताही सांगतात. प्रपंची जो सावधान। तो परमार्थ करील जाण। प्रपंची जो अप्रमाण। तो परमार्थी खोटा॥ हे सांगून या दोन्ही घटकांचा ते समन्वय साधतात. प्रपंचाचा अनुभव नसतानाही रामदास प्रपंचाची बाजू का घेतात, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे आणि अनेकांना तो पडतोही, पण येथे वरील विधानावरून याचे उत्तर मिळते. कारण प्रपंचात खोटे वागणारा, फसवणारा माणूस परमार्थात निष्ठावान कसा असू शकेल? हा साधा व्यवहार रामदास इथे सांगतात. त्याचप्रमाणे ज्या पंथात साधकावर जास्त बंधने लादली जातात तो पंथ कधीच विस्तारत नाही. हा महानुभाव पंथाबाबतचा अनुभव त्यांना होता.

म्हणूनच रामदासांनी आपल्या समर्थ सांप्रदायाबाबत अशी कठोर भूमिका ठेवली नाही, पण तरीही रामदासांचा पंथ वारकरी पंथाप्रमाणे बहुजनापर्यंत पोहोचू शकला नाही. याची अनेक कारणे आहेत. त्यामुळे समर्थ सांप्रदाय उच्चवर्णीयांपुरताच मर्यादित राहिला. असे असले तरी समर्थांचे विचार महाराष्ट्रातील घराघरात पोहचले. त्यांच्या मनाच्या श्लोकांनी महाराष्ट्राचे समाजमन सुसंस्कारित केले. समर्थांनी लोकमनाशी साधलेला संवाद म्हणजे त्यांचे मनाचे श्लोक होत. हे कोणीही नाकारू शकत नाही. मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा॥ अशी मराठी भाषक समाजाच्या संघटनाची व राष्ट्रधर्माच्या विकासाची मनीषा बाळगणारे संत रामदास हे राजकीय विचार व्यक्त करणारे महत्त्वाचे संत होत. या राजकीय परिमाणामुळेच त्यांचे वेगळेपण ठळक होते. दासबोध हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे. तसेच विविध विषयांवर त्यांनी स्फुट लेखन केले. नेहमीची भ्रमंती, पर्यटन यामुळे रामदासांना जीवनाचे समग्र दर्शन झाले. याच अनुभवाचा फायदा त्यांना साहित्य निर्मितीसाठी झाला. त्यांचे सामाज निरीक्षण दांडगे होते.

- Advertisement -

माणसांच्या स्वभावाचे विविध पैलू त्यांना अनुभवण्यास मिळाले. सामाजिक अनुभवाबरोबरच निसर्गाचेही सूक्ष्म निरीक्षण त्यांनी केले. याबाबत त्यांचे बाग प्रकरण महत्त्वाचे आहे. विविध वनस्पतींची माहिती यात आली आहे. निसर्गाबद्दलचा त्यांचा जिव्हाळा येथे दिसून येतो. वाचन, लेखन, सुलेखन, कला, राजकारण, समाजकारण, लोकशिक्षण, तत्त्वचिंतन, प्रबोधन आणि मूल्यसंस्कार अशा विविध पैलूंनी समृद्ध असे रामदासांचे साहित्य महत्त्वपूर्ण आहे. भक्तीबरोबरच संगीत, कला, वाचन, लेखन यामध्येही नैपुण्य मिळवावे हा आधुनिक दृष्टिकोन रामदासांच्या विचारातून स्पष्ट होतो. मनाचे श्लोक, आरत्या, स्तोत्रे इत्यादी रामदासी काव्याला लोकांच्या धार्मिक जीवनामध्ये महत्त्वाचे स्थान आहे.

सुखकर्ता, दू:खहर्ता ही श्रीगणेशाची सर्वांना परिचित असणारी आरती समर्थ रामदासांचीच रचना आहे. इतर संत कवींच्या तुलनेत रामदासांच्या काव्यात काव्यगुण जरी कमी असले, त्यांची भाषा जरी काही प्रमाणात रांगडी वाटली तरी त्यांच्या शब्दाशब्दातून समाज परिवर्तनाची आंतरिक तळमळ दिसून येते. त्यामुळेच सामाजिक परिवर्तनाचे व जीवनमूल्यांचे अधिष्ठान लाभलेले रामदासांचे साहित्य सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. खरेतर रामदास पद्य शैलीपेक्षा गद्य शैलीमध्ये अधिक प्रभावीपणे व्यक्त झाले असते असे त्यांच्या लेखनशैलीवरून जाणवते, परंतु तत्कालीन आविष्काराची शैलीच पद्यात्मक असल्याने त्यांनाही याच शैलीतून अभिव्यक्त व्हावे लागले, मात्र पुढील आधुनिक गद्याची चाहूल रामदासांच्या साहित्यातून जाणवते.

जीवनमूल्यांच्या प्रसारासाठी रामदासांनी मनाच्या श्लोकाप्रमाणेच मूर्खांची लक्षणे सांगून माणसाच्या अंतरंगातील विकार विकृतीला दूर करण्याचा प्रयत्न केला. उपरोध, विडंबनेच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. मूर्खांची लक्षणे सांगताना केवळ टीका करणे हा त्यांचा उद्देश नसून लोकांनी दुष्टवृत्ती सोडून सन्मार्गाला लागावे, नीतिमान व्हावे ही त्यांची त्यामागे आंतरिक तळमळ होती. म्हणूनच ते म्हणतात की, उत्तम लक्षणे घ्यावी। मूर्ख लक्षणे त्यागावी।, रामदासांनी सांगितलेली ही लक्षणे व त्यात सुधारणा करण्याची अपेक्षा निकोप समाज जीवनासाठी किती महत्त्वाची होती हे त्यांच्या पुढील अवतरणातून समजते. सांडून सर्वही गोत। स्त्री आधेन जीवित। सांगे अंतरीची मात। तो एक मूर्ख॥ वाढती व्यक्तीनिष्ठता, संकुचित दृष्टिकोन, या आधुनिक काळातील प्रवृत्तीवर रामदासांनी १७ व्या शतकातच चिंतन केले होते हे विशेष! आजच्या वाढत्या चंगळवादी वृत्तीचा व भ्रष्टाचाराचाही निषेध त्यांनी केला.

पैशालाच सर्वस्व मानणार्‍यांची त्यांनी मूर्खात गणना केली. अनीतीने द्रव्य जोडी। धर्म, नीती न्याय सोडी॥, अशा माणसालाही त्यांनी मूर्ख संबोधले. दुसर्‍याच्या दु:खात आनंद मानणार्‍या विघ्नसंतोषी लोकांबद्दल ते म्हणतात की, परपीडेचे मानी सुख। परसंतोषांचे मानी दुख॥ गेले वस्तूचा करी शोक। तो एक मूर्ख॥, अशा प्रकारे बोचर्‍या टीकेतून रामदासांनी समाज परिवर्तनाचे स्वप्न पाहिले. सदाचाराची व विवेकनिष्ठेची कास धरावी यासाठीच रामदासांचे साहित्य आविष्कृत झाले. सर्वात महत्त्वाचा विचार म्हणजे रामदासांनी वाचनाबद्दल व्यक्त केलेले विचार होत. वाचन संस्कृती विकसित व्हावी याचा विचार रामदासांनी केलेला दिसतो. मुलांना उपदेश करताना ते म्हणतात की, दिसामाजि काही तरी ते ल्याहावे। प्रसंगे अखंडित वाचीत जावे॥ सुंदर अक्षर ल्याहावे। स्पष्ट नेमस्त वाचावे. आधुनिक काळातील माध्यम क्रांतीने एकूणच मानवी जीवनातील प्राधान्यक्रम बदलले आहेत. रंजनाची खूप साधने हाताशी आहेत. अशा वेळी काय पाहावे, काय ऐकावे याचे तारतम्य व सद्सद्विवेक माणूस हरवत चालला आहे. वाचनाच्या व लेखनाच्या बाबतीत तर सार्वत्रिक उदासीचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर समर्थांचे हे विचारधन नक्कीच उपयुक्त आहे.

महाराष्ट्र धर्माच्या अस्मितेबरोबरच मराठी भाषेचा पुरस्कारही त्यांनी केला. तैसी भाषा प्राकृत। अर्थ वेदांत आणि सिद्धांत। नेणोनि त्यागी भ्रांत। मंद बुद्धीस्तव॥ एकूणातच जे जे आपणासी ठावे। ते इतरांसी सांगावे। शहाणे करून सोडावे। सकल जन॥ या समर्थ वचनाप्रमाणे रामदासांच्या साहित्याने महाराष्ट्रीय समाजाला सुसंस्कारित करण्याचे, कर्मयोग व कर्तव्यनिष्ठा रुजविण्याचे व व्यवहारवादी बनवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले, परंतु महाराष्ट्रीय संतांच्या कार्याचा व संतसाहित्याचा विचारही जातीय परिप्रेक्ष्यातून व वर्णीय अभिनिवेशातून केला गेल्याने मराठी संतांचीही विभागणी आपण आपल्या स्वार्थासाठी जातीनिहाय केली. यामुळे महाराष्ट्राचे खूप नुकसान झाले. या वृत्तीने मराठी संतांवर आपण खूप अन्याय केला याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. किमान शिवरायांचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा साक्षेप। शिवरायांचा आठवावा प्रताप भूमंडली। शिवरायांचे कैसे बोलणे। शिवरायांचे कैसे चालणे। सकळ सुखांचा केला त्याग। म्हणोनि साधिजे तो योग। राज्यसाधनाची लगबग। तैसी करावी॥, छत्रपती संभाजीराजांना लिहिलेल्या या पत्रातील आशय व विचार जरी आज आपण आपल्या आचरणात आणला तरी महाराष्ट्राचे खर्‍या अर्थाने भले होईल असे वाटते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -