घरफिचर्ससारांशपुस्तकं मस्तकं घडवतात...

पुस्तकं मस्तकं घडवतात…

Subscribe

आता जे काही करायचे आहे ते तरुणाईने करावे, असे म्हटले जाते. आपला देश जगाच्या पाठीवरील सर्वात तरुण देश आहे, मात्र तरुणाईने वाचावे असे वाटत असेल तर शाळा, महाविद्यालये ही वाचनाची समृद्ध ठिकाणे व्हायला हवीत. आज तेथील चित्र फारसे समाधानकारक नाही हे वास्तव लक्षात घ्यायला हवे. मुळात शिक्षकांनी वाचन केले तर त्याचा अत्यंत सकारात्मक परिणाम साधला जातो. रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटले आहे की, एखादा शिक्षक जर स्वत:च अध्ययन करीत नसेल तर तो योग्य प्रकारे अध्यापन करीत आहे, असे म्हणता येणार नाही.

-संदीप वाकचौरे
भारत सरकारच्या राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने पुणे येथे नुकताच सर्वात मोठा पुस्तक महोत्सव संपन्न झाला. पुस्तक प्रदर्शनाला साडेचार लाख लोकांनी भेट दिली आणि तब्बल साडेआठ लाख पुस्तकांची विक्री झाली आणि ही उलाढाल सुमारे ११ कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. प्रदर्शनादरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी पुस्तक प्रदर्शनाला भेटी दिल्या. त्यात अनेक शिक्षकही सहभागी झाले ही अधिक आनंददायी गोष्ट आहे. पुस्तकांच्या सहवासात विद्यार्थी रमतात तेव्हा उद्याचे भविष्य अधिक उज्ज्वल असावे असे वाटून जाते. पुस्तकं ही मस्तकं घडविणारी व्यवस्था आहे. समाजात आज लोकसंख्येचा विचार करता पुस्तक वाचणारी लोकसंख्या फारशी नाही.
साधारण २५ टक्क्यांच्या आसपास लोक पुस्तके वाचतात असे सर्वेक्षणात समोर आले आहे. आपल्या देशातील साक्षरता ही साधारण ८५ टक्क्यांच्या आसपास आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर साक्षरता असतानाही वाचणारी माणसं त्या प्रमाणात पुस्तके वाचत नाहीत हेही लक्षात घ्यायला हवे. वाचणार्‍या वाचकांचा विचार करता तरुणांचे प्रमाण सर्वेक्षणात अधिक दिसत आहे, पण जगाच्या पाठीवर सर्वाधिक तरुणाई असलेल्या देशात लोकसंख्येच्या प्रमाणात वाचत नाही हेही समोर आले आहे. खरंतर वाचता आले म्हणजे माणसं साक्षर झाली असं मानले जाते, मात्र वाचता येत असूनही जेव्हा माणसं वाचत नाहीत त्याचा अर्थ ते साक्षर कसे? वाचता वाचता माणसं अधिक वाचती होणे हे निरंतर शिक्षण आहे. त्यामुळे तोच मार्ग आपल्या सर्वांसाठी भविष्य उज्ज्वलतेची वाट दाखविणारा आहे.
  या पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. सरकारच्या वतीने शांतता पुणेकर वाचत आहे, हा उपक्रम घेण्यात आला. मुलांना गोष्ट सांगणारे पालक यानिमित्ताने समोर आले आहेत. यानिमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे एक पुस्तक वाचायचे आहे. असे काही उपक्रम वाचन संस्कृतीला बळ देणारे ठरणार आहेत. आपल्या देशातील तरुणाई अधिक समाजमाध्यमांच्या आहारी गेली आहे, असे सातत्याने नमूद केले जात आहे. वाचणारी तरुणाई आपल्या भोवताली दिसत नाही, असेही मत नमूद केले जाते. शाळा, महाविद्यालयांच्या ग्रंथालयामध्ये असणारे वाचन कक्ष आता फारसे भरलेले दिसत नाहीत हेही वास्तव आहे.
ग्रंथालयांमध्ये वाचणारी माणसं अभावाने दिसतात. अनेक ठिकाणी ग्रंथालये आहेत, पण तेथील ग्रंथालयांना वाचकांची प्रतीक्षा आहे. शासनाने मान्यता दिलेल्या ग्रामीण भागातील ग्रंथालयांना खरोखर वाचकांची प्रतीक्षा आहे. आपल्याला खरंतर ग्रामीण भागातील चित्र बदलायचे असेल तर समृद्ध ग्रंथालयांची गरज आहे हे खरे, पण त्या पलीकडे वाचणारी मस्तकं असायला हवी आहेत हेही लक्षात घ्यायला हवे. समाजात वाचणारा वर्ग नाही, असेही मत व्यक्त होते, पण त्याच प्रमाणात शाळा, महाविद्यालयांतदेखील वाचणारा शिक्षक वर्ग कमी झालेला आहे.
   शिक्षक जसे वाचत नाहीत त्याप्रमाणे वाचणारी मुलेही आपल्या भोवतालामध्ये दिसत नाहीत. मुळात वाचायचे कशाला? असा विचारणारा एक वर्ग आहे. देशातील विविध सर्वेक्षणांनुसार वाचनासंदर्भाने जी आकडेवारी समोर आली आहे त्यानुसार देशातील साधारण २६.४ टक्के लोक पुस्तके वाचतात. वाचणारा जो समूह आहे त्यातील ४१ टक्के लोकसंख्या ही २५ ते ३४ वयोगटातील आहे. सुमारे ३० टक्के लोक १८ ते २४ वयोगटातील आहेत. या दोन्हींची बेरीज केली तर साधारण ७० टक्क्यांपर्यंत जाते. एकीकडे तरुणाई वाचत नाही, असे म्हटले जाते, पण सर्वेक्षणानुसार वाचणार्‍या लोकसंख्येपैकी ७० टक्के लोक तर तरुण आहेत.
वाचणार्‍या एकूण लोकसंख्येपैकी ३७ टक्के लोकांचा विचार करता ते वाचक उच्च आर्थिक वर्गातील आहेत. उर्वरित ६३ टक्के लोक हे अल्प आणि मध्यम वर्गातील आहेत. सर्वेक्षणानुसार २६ टक्के वाचक हे हिंदी भाषेतील पुस्तके वाचणारे आहेत. इंग्रजी भाषेची पुस्तके वाचणार्‍यांची संख्या २२ टक्के आहे. तामिळी भाषेतील वाचकांची संख्या ९ टक्के, बंगाली पुस्तकांचे वाचन करणारे ७ टक्के, मराठी भाषेतील वाचकांचे प्रमाणे ६.६ टक्के इतके आहे. देशातील पाच भाषांचा विचार करता हिंदी भाषेला अधिक वाचक आहे. अर्थात भारताचा भौगोलिक आणि भाषिक विस्ताराचा विचार करता मोठ्या प्रमाणावर हिंदी भाषिक राज्य आहे. त्याचबरोबर इतर भाषिक राज्यातही हिंदी वाचक आहेत.
त्यामुळे ही संख्या उंचावलेली आहे. त्या खालोखाल इंग्रजी भाषिक पुस्तके वाचली जातात. अर्थात ही पुस्तके वाचणारी पिढी ही एकतर उच्च आर्थिक वर्गातील आणि शैक्षणिकदृष्ठ्या अधिक शिक्षित असणारी आहेत. मराठीचा टक्का मात्र अवघा साडेसहापर्यंत पोहचत आहे. राज्यातील हजारी ६६ लोक पुस्तके वाचतात ही गोष्ट फार आशावादी चित्र दाखविणारी नाही. ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा देणारे नेतृत्व दिले, येथील विचारवंतांनी देशाला विचार देत राष्ट्र विकासाच्या प्रक्रियेत योगदान दिले, त्या महाराष्ट्रात आज वाचणार्‍या माणसांचे प्रमाण फारसे नाही हे अधिक चिंताजनक आहे. जेथे वाचणारी माणसं नाहीत तेथे लिहिणारे हात निर्माण होण्याची शक्यता नाही.
आता जे काही करायचे आहे ते तरुणाईने करावे, असे म्हटले जाते. आपला देश जगाच्या पाठीवरील सर्वात तरुण देश आहे, मात्र तरुणाईने  वाचावे असे वाटत असेल तर शाळा, महाविद्यालये ही वाचनाची समृद्ध ठिकाणे व्हायला हवीत. आज तेथील चित्र फारसे समाधानकारक नाही हे वास्तव लक्षात घ्यायला हवे. मुळात शिक्षकांनी वाचन केले तर त्याचा अत्यंत सकारात्मक परिणाम साधला जातो. रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटले आहे की,  एखादा शिक्षक जर स्वत:च अध्ययन करीत नसेल तर तो योग्य प्रकारे अध्यापन करीत आहे, असे म्हणता येणार नाही.
एखाद्या दिव्याची स्वत:ची वात जर जळत नसेल तर तो दुसरा दिवा कधीही पेटवू शकणार नाही. ज्या शिक्षकाने स्वत:च्या विषयाचा अभ्यास थांबविला आहे, आपल्या ज्ञानात जो भर घालत नाही, तर केवळ ठरावीक पाठच शिकवत राहतो असा शिक्षक त्यांच्या मनात साठवायला मदत करू शकेल, पण त्यांच्यामधील स्फुलिंग चेतवू शकणार नाही. टागोरांनी शिक्षण प्रक्रियेतील वाचन संस्कार हा किती महत्त्वाचा विचार आहे हे नमूद केले आहे. शिक्षणात हरवलेल्या गुणवत्तेच्या वाचनाचा अभाव हे एक महत्त्वाचे कारण आहे. शिक्षक वाचतील तर शिक्षणाची प्रक्रिया अधिक गतिमान आणि समृद्ध होण्यास मदत होईल. जितके वाचन जास्त तितके शिकणे परिणामकारक होण्याची शक्यता अधिक असते.
  वाचनाने सृजनशीलता उंचावते, शहाणपण येते आणि त्याचबरोबर प्रयोगशीलतादेखील उंचावण्यास मदत होते. अध्यापनाच्या प्रक्रियेचे भरण व्हावे यासाठी वाचन हे खाद्य आहे. वाचले की अध्यापन अधिक परिणामकारक होण्यास मदत होते. अर्थात आपल्याला एखादा दिवा प्रज्वलित करायचा असेल तर अगोदर एखादा दिवा पेटलेला हवा तरच दुसरा दिवा पेटवता येईल. शिक्षणाच्या प्रक्रियेत तर जिवंत मुलांची मने प्रज्वलित करायची असतात. आपल्याला ती प्रज्वलित करायची असतील, ज्यांच्यावर ती मने पेटवण्याची जबाबदारी आहे त्यांची मने तरी प्रज्वलित असायला हवीत. याचा अर्थ शिक्षकांची मने अधिक जाज्वल्य आणि प्रज्वलित असायला हवीत.
शिक्षकांची मने सतत प्रज्वलित करण्याचे माध्यम ही पुस्तकेच आहेत. पुस्तके न वाचणारा माणूस स्फुलिंग चेतवू शकणार नाही. वाचनाशिवायचे अध्यापन करण्याने शिकवणे होईल, पण त्या अध्यापनात रस असणार नाही. केवळ पदवीवर भरवसा ठेवून शिक्षण प्रक्रियेतील अध्यापनाचा प्रवास केला जाणार असेल तर शिकवणे होईल, पण अपेक्षित परिणाम साध्य होताना दिसणार नाही. शिक्षकांनी स्वतःच अध्ययन करायला हवे. त्यांच्या अध्ययनावरच विद्यार्थ्यांचे अध्ययन अवलंबून असणार आहे. त्यामुळे शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी जितका मार्गदर्शक आहे तितकाच तो समाजासाठीदेखील मार्गदर्शक असतो.
आज समाजात निर्माण झालेली विषमता, समाजातील संघर्ष, जातीभेद अशा विविध कारणांनी उभे राहणारे संघर्ष हे अधिक चिंताजनक आहे. अशा वेळी मस्तक अधिक सशक्त निर्माण करण्याची गरज आहे. ती मस्तके पुस्तकांशिवाय निर्माण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे शिक्षकांवर जर समाज व राष्ट्रनिर्मितीची जबाबदारी असेल तर शिक्षकांची मस्तके अधिक सशक्त असायला हवीत. पुन्हा ती वाट पुस्तके आणि ग्रंथालयाच्या माध्यमातून जाते. त्यामुळे शिक्षकांनी पुस्तके हाती घेऊन वाचते होण्याची गरज आहे. शिक्षकी पेशाची प्रतिष्ठा ही शिक्षकांच्या मस्तकाच्या उंचीवर अवलंबून आहे. त्यामुळे ते मस्तक अधिक समृद्ध होण्यासाठीच वाचते होण्याची नितांत गरज आहे. दुर्दैवाने शिक्षणातील वाचणारी माणसं हरवत चालली आहेत. त्याचा परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -