घरफिचर्ससारांशनाताळ आणि लोककथा...

नाताळ आणि लोककथा…

Subscribe

ख्रिसमसमधील सानथोरांचे आकर्षण असलेला ‘ख्रिसमस बाबा’ हे आपण त्याला दिलेले मराठमोळे नाव! स्विडनमधे त्याला युलथोमथेन, इंग्लंडमधे फादर ख्रिसमस, फ्रान्समध्ये पेर नोएल अशा विविध नावांनी ओळखले जाते. टर्की देशातल्या पाटारा शहरातील सेंट निकोलस नावाचे एक भले पाद्री अडीअडचणीत असलेल्या लोकांना गुप्तपणे मदत करीत. आपल्या तीन कन्यांचा हुंडा देण्याची ऐपत नसल्याने त्यांचा वेश्या बाजारात सौदा करायला असहाय्य झालेल्या एका गरीब वडिलांना या संत निकोलसने रात्रीच्या वेळी सर्व झोपलेले असताना सोन्याच्या मोहरा पुरवल्या आणि त्या मुलींचे आयुष्य वाचवले.

-मॅक्सवेल लोपीस

ख्रिसमस किंवा नाताळ म्हटले म्हणजे ईशपुत्र म्हटलेल्या येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस, परंतु ही एक मानलेली परंपरा आहे. ख्रिस्ताचा जन्म त्या दिवशी झालाच नव्हता असा अनेक अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. शिवाय बायबलमधेदेखील तसा कुठेच उल्लेख नाही. माळरानावर मेंढरे चारणारे मेंढपाळ असे बायबलमधील ख्रिस्तजन्मावेळचे वर्णनदेखील त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती पाहता ख्रिस्त जन्म वसंत ऋतूत झाला असावा असा तर्क करावयास लावते.

- Advertisement -

ख्रिस्त जन्मापूर्वीपासून रोमन साम्राज्यात १७ डिसेंबर ते २३ डिसेंबर या काळात सटर्नेलिया नावाने शनीदेवाचा सण आणि लहान मुलांना समर्पित ज्युवेनेलिया असे उत्सव मोठ्या उत्सवात साजरे केले जात असत. शिवाय २५ डिसेंबरला मिथ्रा हा सूर्यदेवाचा सण साजरा केला जाई. दुसरीकडे युरोपात पेगन समाजातील लोक (एक मूर्तीपूजक समाज) २२ डिसेंबर या अयनदिनी (winter solstice) शेकोटीभोवती नाचत लवकरच येऊ घातलेल्या वसंताचे स्वागत करीत. पुढे चौथ्या शतकात सम्राट कान्स्टटाइनच्या काळात ख्रिस्ती धर्माचा प्रचार झाल्यानंतर रोमन आणि पेगन या दोन संस्कृतींना मध्यवर्ती ठेवत २५ डिसेंबर हा ख्रिस्त जयंतीचा दिवस म्हणून साजरा होऊ लागला.

एका अर्थाने पाहिले तर मिथ्रा हा सूर्यदेव. ख्रिस्तदेखील जुलमी व्यवस्थेविरोधात आवाज उठवताना प्रेमाचा सिद्धांत मांडणारा रोमन साम्राज्यातील एक तापहीन मार्तंडच! त्यामुळे दया, क्षमा अशा मूल्यांची पखरण करणार्‍या येशूचा जन्म रोमन व्यवस्थेत एखाद्या अरुणोदयापेक्षा काही निराळा नव्हताच. दुसरी गोष्ट म्हणजे कितीतरी काळापर्यंत हा दिवस ख्रिस्त जन्मदिवस मानण्यास काही सनातन्यांचा (Puritan) विरोध होता, परंतु ख्रिस्तासारख्या महामानवांची जन्मतिथी नक्की कुठली यापेक्षा त्यांचे विचार जास्त महत्त्वाचे मानून त्या विचारांना स्मरण्यासाठी या दिवसाला हळूहळू महत्त्व प्राप्त होत गेले. अमेरिकेतील वर्गसंघर्ष आणि साहित्य यांचे योगदान त्यात खूप मोलाचे आहे. त्यामुळेच नाताळच्या साजरीकरणात ख्रिस्त विचारांवर आधारलेल्या पाश्चिमात्य देशांतील लोकसाहित्याला जास्त महत्त्व प्राप्त होते.

- Advertisement -

ख्रिसमसमधील सानथोरांचे आकर्षण असलेला ‘ख्रिसमस बाबा’ हे आपण त्याला दिलेले मराठमोळे नाव! स्विडनमधे त्याला युलथोमथेन, इंग्लंडमधे फादर ख्रिसमस, फ्रान्समध्ये पेर नोएल अशा विविध नावांनी ओळखले जाते. टर्की देशातल्या पाटारा शहरातील सेंट निकोलस नावाचे एक भले पाद्री अडीअडचणीत असलेल्या लोकांना गुप्तपणे मदत करीत. आपल्या तीन कन्यांचा हुंडा देण्याची ऐपत नसल्याने त्यांचा वेश्या बाजारात सौदा करायला असहाय्य झालेल्या एका गरीब वडिलांना या संत निकोलसने रात्रीच्या वेळी सर्व झोपलेले असताना सोन्याच्या मोहरा पुरवल्या आणि त्या मुलींचे आयुष्य वाचवले.

याच सेंट निकोलसला नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स अशा देशांत तेथील उच्चाराप्रमाणे ‘सिंटर क्लास’ म्हटले गेले. पुढे अमेरिकेत त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याला ‘सँटा क्लाज’ ही नवीन ओळख मिळाली. सेंट निकोलसने आपला उपहार एका पायमोजात घालून त्या गरीब व्यक्तीच्या घरातील शेकोटीशेजारी ठेवलेला होता. म्हणून आजवर नाताळच्या रात्री शेकोटीशेजारी पायमोजे ठेवण्याची परंपरा पाळली जाते.

हा ख्रिसमस बाबा बाळ येशूसोबत फिरून लहान मुलांना उपहार देत असतो, असे स्वीस-जर्मनीतील लहान मुलांना सांगितले जाते. यावर आधारित फ्रान्समधे फ्रान्सिस कोप यांची ‘द वूडन शूज आफ लिटील वूल्फ’ अशी एक कथा प्रसिद्ध आहे. यामधील वूल्फ नावाचा एक लहान अनाथ मुलगा आपल्या पाषाणहृदयी नातलगांसोबत राहत होता. त्या घरात त्यालाही तीच वागणूक मिळत असे जी या जगात बहुसंख्य अनाथांना मिळते. अशाच एका नाताळच्या रात्री तो शाळेतील इतर विद्यार्थ्यांसोबत चर्चमध्ये गेलेला होता. ही सर्व मुले उच्चभ्रू घरातील असून अपुर्‍या कपड्यात असलेल्या गरीब बिचार्‍या वूल्फचा उपहास करत होती. चर्चमधील प्रार्थना संपल्यावर स्वत: पुरेशा कपड्यांअभावी वुल्फ थंडीत कुडकुडत बाहेर पडत असताना त्याचे लक्ष चर्चद्वाराशी झोपलेल्या एका लहान बाळाकडे जाते.

त्या बाळाच्या पायात बूट नव्हते. बोचरी थंडी त्याच्या नाजूक पायांना असह्य होत होती. मागचा पुढचा विचार न करता वूल्फने आपल्या पायातील बूट त्या बाळाच्या पायात चढवले आणि स्वत: त्या जीवघेण्या थंडीत अडखळत-लंगडत घरी गेला. घरी त्याला बूट हरवल्याने शिक्षा म्हणून जेवायलाही मिळत नाही, मात्र दुसर्‍या दिवशी अकल्पितपणे त्याच्यासाठी ते घर अनेक प्रकारच्या उपहारांनी भरून जाते आणि सर्वत्र बातमी पोहचते की ज्या बाळाला वूल्फने आपले बूट दिले तो तर साक्षात बाळ येशू होता. आत्यंतिक गरिबी आणि संघर्षमय जीवनातही वूल्फ आपल्या मानवतेच्या मूळ मूल्यांना धरून राहिला असा विचार या कथेतून दिला जातो.

ख्रिसमस ट्री हेदेखील या काळातील एक मोठे आकर्षण. या संबंधात उत्तर युरोपातील एक स्कडिनेवियन आख्यायिका प्रसिद्ध आहे. जर्मनीतील काही मूर्तीपूजक (पेगन) समाजात एका ओक वृक्षाखाली युद्ध देवता था (Thor) यास अयनदिनी जिवंत माणसांचे आणि पशूंचे बळी दिले जात असत. अशाच एका प्रसंगी सेंट बोनीफेस नावाच्या एका भल्या माणसाने या प्रकाराविरूद्ध बंड करीत ज्या ओक वृक्षाला थाच्या रूपात पाहिले जाई त्या वृक्षाला आपल्या कु़र्‍हाडीने भुईसपाट केले. त्या पडलेल्या वृक्षाच्या भाराखाली एक देवदार वृक्षाचे छोटे रोपटे बचावलेले होते. त्या समाजाने त्या रोपट्याचे जतन केले. पुढे शांतता आणि अमरत्व अशा प्रतीकांचा वेध घेण्यासाठी स्वर्गाच्या दिशेने सरळ वाढ घेणार्‍या त्या सदाहरित वृक्षाला ख्रिसमस ट्री म्हणून गौरविले गेले.

ख्रिसमस संबंधाने अशा शेकडो लोककथा पाश्चिमात्य साहित्य परंपरेने दिलेल्या आहेत. त्यात दया, परोपकार, भूतदया अशा मूल्यांना महत्त्व दिलेले आहेच, परंतु संस्कृती समन्वयाचादेखील महान विचार त्यात सामावलेला आहे. आता ख्रिसमस या शब्दाचेच पाहिले तर त्यासाठी वापरण्यात येणारा ‘नाताळ’ हा मराठी शब्ददेखील मुळात इटालियन भाषेतील आहे. परोपकार, अपरिग्रह याबाबत तर आपल्या भारतीय संस्कृतीनेदेखील म्हटलेच आहे- ‘तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम’

ख्रिसमस साहित्यात शंतनू-गंगा, उर्वषी-पुरूरवा या कथांशी साधर्म्य असलेल्या कथादेखील आहेत आणि हो आपल्या संस्कृतीतील साधू संतांच्या समर्पणाचा परमात्म्याच्या मीलनासाठी विरहीत झालेल्या जीवात्म्याचा विचारदेखील तेथे दिलेला आहे. यासंबंधाने रशियन संस्कृतीतील बाबुष्काची कथा खूपच उद्बोधक आहे. ही बाबुष्का नावाची एक दीनदरिद्री स्त्री एका सायंकाळी आपल्या झोपडीची झाडलोट करीत असते. अचानक तिची नजर रस्त्यावरून मोठ्या डौलाने निघालेल्या तीन राजांवर जाते. ते राजे तिला म्हणतात की, ‘येथून दूर बेथलेहेम गावी एक राजा जन्मलेला आहे. त्याला भेटण्यासाठी आम्ही जात आहोत. तुझी इच्छा असेल तर तुही आमच्यासोबत ये’.

आपल्या कामात गुंतलेली बाबुष्का त्यांच्यासोबत जाण्यास नकार देते, परंतु जसे ते राजे पुढे निघून जातात ती आपल्या नकाराने दग्ध होते. संसाराच्या किरकोळ विचाराने आपण साक्षात भगवंताचे दर्शन घेण्यास नकार दिला हा विचारच तिला असह्य होतो. ती बेथलेहेमच्या दिशेने वाट तुडवू लागते, परंतु तिथे ती कधी पोहचतच नाही. अश्वत्थाम्याप्रमाणे शापित अमरत्वाचे वरदान घेऊन म्हणे ती आजही रशियात दारोदारी फिरत असते. जेव्हा तिला एखादा पाळणा दिसतो ती त्याच्या जवळ जाऊन आत डोकावून पाहते, परंतु राजांचा राजा तिला काही तेथे दिसत नाही. ती वणवण शोक करीत फिरतच आहे त्याच्या शोधात मिळेल का कधी तिला तो!

बाबुष्काप्रमाणे पूर्ण मानवजातीने भौतिक सुखांच्या विळख्यात परमसत्याला दुर्लक्षित केलेले आहे. आत्म्याने दीन ते धन्य, नम्र ते धन्य कारण ते पृथ्वीचे वतनदार होतील या ख्रिस्तवचनांचा त्यांनी हवा तसा अर्थ घेतलेला आहे. परमेश्वराच्या वचनानुसार वागणारे सर्व माझे भाऊबंद असे म्हणणार्‍या ख्रिस्ताला त्यांनी वेगळ्या रूपात सजवले आहे आणि मग आपल्या सीमित कक्षेनुसार ग्लोबलायझेशन हेदेखील केवळ अर्थनीती आणि संसाधनांच्या बेताल वापरापुरता सीमित करून ठेवलेले आहे. अशा वेळी नाताळच्या माध्यमातून केवळ उत्सवबाजीत न रमता ख़र्‍या ख्रिस्त विचारांना ओळखण्याची गरज आज सर्वाधिक प्रमाणात निर्माण झाली आहे. लोककथा संस्कृती घडवत असतात, परंतु आज या लोककथांनाच बाजूला सारून नाताळचे सेलिब्रेशन चंगळवादाकडे जास्त झुकत चालले आहे. ज्या दिवशी यावर मात करून ख़र्‍या नाताळच्या विचारांचा मागोवा घेतला जाईल, त्या दिवशीच बाळ येशूचे या पृथ्वीवरील आगमन सार्थकी लागेल.

-(लेखक संत साहित्य आणि गांधी विचारांचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -