घरफिचर्ससारांशभावभावनांचा मुक्त परिमळ

भावभावनांचा मुक्त परिमळ

Subscribe

एका पुस्तक प्रकाशनप्रसंगी कवयित्री शुभा खांबेकर पाणसरे यांनी त्यांचा ‘कौमुदी’ हा कवितासंग्रह मला भेट देताना नम्रपणे सुचवले की यावर आपला अभिप्राय कळवावा. मीही होकार भरला. नेरळला फार्म हाऊसच्या दिशेने निघालो असताना डोंबिवली ते बदलापूर प्रवासात मी ‘कौमुदी’ वाचून संपवला. या अर्ध्या तासात माझा बाह्य जगाशी संपर्क तुटला होता. कौमुदी वाचनात मी पुरता गुंगलो होतो. तो भावभावनांचा मुक्त परिमळ होता. घरी आल्यावर प्रत्येक कवितेचा विषय, भाषा व साहित्यिक दर्जा या अंगांनी विचार करून कौमुदी परत वाचला. तेव्हा जाणवले की कवयित्रीचे भावविश्व खूपच समृद्ध आहे.

–प्रा. डॉ. राम नेमाडे

मनोगतात कवयित्री शुभा खांबेकर यांनी म्हटल्याप्रमाणे कविता म्हटली की तो असतो भावनांचा खेळ व कवीच्या मनाचे प्रतिबिंब त्याच्या कवितेत उमटते, ही दोन्ही विधाने त्यांच्या कवितांना तंतोतंत लागू पडतात. काव्यसंग्रहात विषयांत वैविध्यता आहे. धर्म, संस्कृती, निसर्ग, सामाजिक आशय, सुख-दुःखे, वैयक्तिक ऋणानुबंध इत्यादींची आळवणी केली आहे. ‘तव चरणी दे स्थान, भ्रष्टमती कर नाश’, अशी विनवणी गणेश नमन कवितेत केली आहे, तर ‘मानिनी तू माया, सकलाची छाया’, असे दुर्गाभक्ती कवितेत म्हटले आहे. ‘स्वामी’, ‘गुरूराया’ कवितांतून सद्गुरूनिष्ठा वर्णन केली आहे.
चांदणे कवितेत कवयित्रीने मनात फुललेल्या चांदण्याचे
विलोभनीय चित्र रेखाटले आहे. पुढील ओळी पाहा…
‘मनात माझ्या फुलले चांदणे
प्राजक्ताच्या दलांत मोकळ्या स्मिताचे रुसलेले गाणे’
कवितेची परिभाषा सांगताना कविता कवितेत त्या लिहितात, ‘कविता म्हणजे भावनांचा खेळ शब्दांचा मेळ,
हौसेचा आनंद, आत्म्याचा परमानंद…’ इतक्या व्यापक रूपात कवितेकडे पाहणे कौतुकास्पद आहे.
वारकरी अभंगात रचना विठ्ठलरूपाचे छान आलेखन आहे.
‘होऊनिया दंग। तुझ्या गजरात। धन्य करी जीवा। पांडुरंग॥’
स्त्रीजन्म या कवितेत स्त्रीजन्माची कहाणी व्यक्त केली आहे. मुलगी जन्माला आली की आनंद मावळून उदासीनता
पसरते. वंशाला दिवा हवा असतो. मुलीला हीन समजले जाते, ही मानसिकता पुढील ओळींत व्यक्त होते…
‘कदाचित शल्य तुझही,
वंशाला दिवा नाही
दर्शवितात भेद लिंगात
समानता रुजणे नाही’
भग्न वाडा ही रूपक कविता आहे. खंडित झालेल्या नातेसंबधांचे ते विदारक चित्र आहे…
‘दारातूनी दारे पिढ्यांतूनी पिढ्या
गुंतती कधीच्या रोखून नजरा’
रक्ताची नाती वडील आणि आई अतिशय जिव्हाळ्याची असतात. वडील आपल्या परिवारासाठी आपले सर्वस्व पणाला लावतात, पण वडिलांना क्वचितच समजून घेतले जाते. पुढील ओळीतून ते स्पष्ट होतं…
‘कुणा न कळे दुःख त्याचे
मस्करीत गुंफतो आयुष्य सुखाचे’
आईचा वियोग हृदयविदारक असतो. आई नसते तेव्हा आई म्हणायला कोणी उरत नाही. ती खंत कवयित्री पुढील काव्यपंक्तींत व्यक्त करते…
‘वात्सल्याच्या पुरात बालपण सरले
संसाराच्या पायथ्याशी आईला हरवले’
माणूस भौतिक सुखामागे धावत आहे. निसर्गाचा र्‍हास करीत आहे. पशूपक्ष्याची घरे उद्ध्वस्त करून स्वतःचे इमले रचत आहे. हव्यास या कवितेत मानवानेच प्रदूषणाचा भस्मासूर उभा केला, हे सांगून त्याचा परिणाम दिला आहे…
‘नाही उरली घरे मुक्या प्राण्यांना
तहान भागत नाही रस्त्यात फिरताना’
तरी माणूस रॅटरेसमध्ये धावतोच आहे.
हाक कवितेत मनातल्या प्रश्नांना कवयित्री हाक मारू इच्छिते. उत्तर मिळालंच तर त्याला ती साथही देणार आहे. तिला प्रश्न पडतात. ती म्हणते…
‘धरतीच्या तृणांना कोणते बरे समाधान? कोणती बरे शांती?’
श्रावण हा मनभावन महिना आहे. जवळजवळ सर्वच कवींना त्याची मोहिनी पडते. कवयित्री विविध सण सजवीत येणार्‍या श्रावणाला आळविते. श्रावणाला पाहून तिची काय अवस्था झाली ते पाहा…
‘तन शिरशिरले हृदयी हसले
परागाशी खेळले फुलपाखरासवे उडाले’
प्राक्तन वाटा ओलांडून जाताना मनात धाकधूक होते. संस्कारदिशा वाट अडवतात. मार्ग वारंवार एकाच बिंदूवर स्थिरावतो. ती मनाला हाक कवितेत बजावत आहे…
‘रात्रीची शांतता नीरव काजव्यांना मिणमिणता प्रकाश
रातकिड्यांची भरीव किरकिर, जंगलात पाऊल उचल भरभर
ती जाता तिच्या वळणावर…’
‘मनुष्य जन्म’ या कवितेत मनुष्य जन्माला येतो खरा पण आपले येणेजाणे नेमके कोणासाठी आहे हेच त्याला कळत नाही. ज्याला धर्माधर्माची सांगड कळते तो धर्मात्मा! कवयित्री म्हणते…
‘तुझा घडीचा भूतली डाव कुणी नसे कुणाचे
हेच वास्तव भूलोकीचे ठरतो धर्म जाणिवेने कर्म’
वृंदावन ही कविता शृंगार रसाचा उत्तम नमुना आहे. वृंदावन म्हटले की राधाकृष्ण आठवणार, पण यातील रूपकं कळली पाहिजेत. श्रीरंगाने पावा वाजवताच राधा थिरकणार आणि गवळणीही ठुमकणारच! त्याहून वेगळेपण हे बघ…
‘कृष्णमेघ आला गगनमंडपी चुंबला
सावळ्या छायेत सौंदर्यवान नाचला…’
सावल्या ही अंतरीचा ठाव घेणारी कविता आहे. यात विलगलेले मन व विश्वासघाताचे फुत्कारणारे फणे मनात काहूर माजवतात. मीलनोत्सुक आतुर मनाची चरफड सांगण्याआधीचे दृश्य पाहा…
‘मन मारून जगले दोघे अंगणात सुकले चाफे
झुडपात सरपट गजांत दिखावा, पाकळ्यात घेतला विसावा’
दुखरी जखम ही कविता आत डोकावत खोल खोल जाणारी, गत स्मृतींना जागवणारी, हळूच मूड बदलणारी असं बरंच काही सांगून जाणारी आहे. हे कडवे चिंतनीय आहे…
‘सरता सरते आयुष्य जखम कोपर्‍यात असते
कोपरा निवांत राहतो माणूस हळूच विसरतो’
नात्यातही मोठी गंमत असते. रक्ताची नाती तर असतातच. तशी आपुलकीची, तर कधी तात्कालिक स्वार्थाचीही नाती असतात. कवयित्रीने नात्याच्या या गुंत्याविषयी म्हटले आहे…
‘नात्यात असते आपल्या माणसाची मैत्री
नात्यात असते रक्ताच्या नात्याची ओढ
दिसली तर माया नाही तर फोल.’
आई असते तेव्हा तिचे मोल कळत नाही. ती नसते तेव्हा आठवणीतून जात नाही. आकाशात मेघांची दाटी होताना पाहून मन आईच्या आठवणीत रमते आणि भडभडूनही येते.
मग ती झोपाळ्यावर आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत राहते.
‘मनही रमले गुंजन गुजगोष्टींत तशीच झुलते तिच्या स्मृतींत
भरून आले मन माझे आईच्या आठवणींत’ (हुरहुर)
कवयित्रीची अंतर ही कविता भाषासौंदर्याने नटलेली आहे.
मीलनात दोघांचे श्वास परस्परांच्या श्वासात मिळावेत व विलगताना दवदुलई रानफुलावर पसरू दे. यातील दवदुलई हे रूपक अर्थपूर्ण आहे. शेवटी ती लिहिते…
‘भिजवुनी अंग चंदन शीतल
सरसरून येतो काटा अंगावर
मिसळता श्वास तुझा नि माझा
विरघळत मी तुझ्यात’
भेट मीलनाची ही कविताही अशीच शृंगारिक व वाचनीय आहे.
वंशाचा दिवा ही कविता करगिल युद्धात धारातीर्थी पडलेल्या वीर जवानाला उद्देशून लिहिली आहे. देशभक्तीचे बाळकडू कोळून प्यायलेला जवान देशासाठी शहीद होतो.
त्याच्या बलिदानानंतर…
‘एका गोळीचे वीर चक्र
उराशी बाळगते पत्नी अन् माता
जळत असतो एकदाच दिवा.’
मी काही मोजक्या कवितांवर प्रकाश टाकला आहे. सर्वच कविता वाचनीय व आनंद देणार्‍या आहेत. कवयित्री शुभा खांबेकर पाणसरे यांची शब्दांवर जबर पकड आहे. त्यांच्याकडे शब्दभरणाही विपुल प्रमाणात आहे. कल्पकता व प्रतिभा यांचा सुरम्य संगम त्यांच्या कवितांत पदोपदी जाणवतो. त्यांचा कौमुदी हा पहिलाच कवितासंग्रह असूनही तो दर्जेदार झाला आहे. त्यांनी यापुढेही लिहित राहावे व रसिक वाचकांसाठी असेच लेखन करीत राहावे, ही सदिच्छा व्यक्त करून या पुस्तक परीक्षणास पूर्णविराम देतो.

- Advertisement -

–(लेखक प्रसिद्ध लेखक आणि समीक्षक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -