घरफिचर्ससारांशदुसर्‍या श्वेतक्रांतीच्या दिशेने...

दुसर्‍या श्वेतक्रांतीच्या दिशेने…

Subscribe

भविष्यात भारत सुमारे ६० कोटी लिटरपर्यंत दूध उत्पादन करू शकतो. त्यातून ५० कोटी लिटरची आपली देशांतर्गत गरज असणार आहे. म्हणजेच तब्बल १० कोटी लिटर अतिरिक्त दूध असताना निर्यातीच्या बाबतीत मोठी संधी उपलब्ध होईल, मात्र आंतरराष्ट्रीय गुणवत्ता निकषापर्यंत पोहचण्यासाठी आपणास भरीव कामगिरी करावी लागणार आहे. कारण आज एकूण उत्पादनापैकी केवळ १ टक्के दुधाचीच निर्यात होते. भारत हा जगातील सर्वात मोठा दुधाचा उत्पादक देश आहे, परंतु भारतीय दुधाची आंतरराष्ट्रीय खाद्य गुणवत्ता तुलनेने कमी आहे. जरी भारताने काही देशांना काही दुग्धजन्य पदार्थांची निर्यात केली असली तरी द्रव (कच्च्या) दुधाला आतापर्यंत जागतिक बाजारपेठ मिळू शकलेली नाही.

–रणजीतसिंह देशमुख

भारतामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत दूध हे आहारातील मुख्य अन्न आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या गेल्या ७ दशकांमध्ये दुधाच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे. डॉ. व्हर्गिस कुरियन यांनी सुरू केलेल्या देशातील पहिल्या श्वेतक्रांतीनंतर म्हणजेच १९७० पासून ते आजपावेतो या क्षेत्रात प्रचंड वृद्धी झाली आहे. यामध्ये ‘राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ’ आणि ‘इंडियन डेअरी असोसिएशन’ यांचे योगदानही महत्त्वाचे आहे. १६ ते १८ मार्चदरम्यान गुजरातच्या गांधीनगर येथे इंडियन डेअरी असोसिएशनच्या परिषदेसाठी उपस्थित असताना देशातील दुग्ध व्यवसायाबाबत काही तथ्ये समोर आली. यावर्षीची कॉन्फरन्स ‘भारतीय दुग्ध व्यवसाय जगासाठी : संधी आणि आव्हाने’ या विषयाशी निगडित होती. डेअरी उद्योगातील अनेक मान्यवर, तज्ज्ञ, शेतकरी, दूध उत्पादक आणि देशभरातील प्रदर्शक हे तीनही दिवस विविध विषयांवरील तांत्रिक सत्रांना येथे उपस्थित होते.

- Advertisement -

ग्रामविकास आणि दूध उत्पादन यासाठी श्वेतक्रांतीचा पाया रचला गेला. १९४७ नंतर १.१७ कोटी लिटर असणारे दूध उत्पादन आज २२ कोटी लिटरच्याही पुढे पोहचले आहे. याचे मुख्य कारण म्हणजेच देशात झालेली श्वेतक्रांती! आज भारत दुग्ध उत्पादनाच्या बाबतीत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे. देशाच्या ग्रामीण भागातील ७० टक्के कुटुंबांचा उदरनिर्वाह दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. ग्रामीण भागातील तब्बल ८ कोटींहून अधिक कुटुंबे या व्यवसायाशी जोडली गेलेली आहेत. स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात म्हणजेच २०४७ पर्यंत भारत ६० कोटी लिटर्सपर्यंत दुग्ध उत्पादन करणारा देश असेल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. कारण याबाबत जागतिक वृद्धीदर जिथे २ टक्के आहे, तेथे भारतीय दुग्ध उत्पादनाचा वृद्धीदर हा ६ टक्के इतका आहे. म्हणजेच डेअरी उद्योगाचा विकास झपाट्याने होत आहे.

आज जागतिक दुग्ध उत्पादनापैकी २३ टक्के दुग्ध उत्पादन एकट्या भारतातून होत आहे. २०४७ पर्यंत विश्वातील ५० टक्के दुग्ध उत्पादन हे एकट्या भारतातून होऊ शकेल. जगाच्या वाढत्या लोकसंख्येच्या आहारात दुधाची गरज पाहता या क्षेत्रात भारतासाठी अनेक संधी व रोजगार उपलब्ध होतील. जगातील इतर देशांचा आहारातील दुधाचा दरडोई समावेश ३२२ मिली असताना भारतात मात्र हा दर ४२७ मिली इतका आहे. आर्थिक बाजूने पाहिल्यास भारतीय दुग्ध व्यवसायाची उलाढाल ही वार्षिक १० लाख कोटी असून एकंदरीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या ५ टक्के हिस्सा केवळ या व्यवसायाने पूर्ण होतो. देशातील एकूण अर्थव्यवस्थेत कृषी उत्पन्नाचा सहभाग १९ टक्के आहे. कृषी उत्पन्नाच्या ३० टक्के हिस्सा हा दुधावर अवलंबून आहे. म्हणजेच गहू, तांदूळ व इतर कडधान्य एकत्रित केले तरी त्याहून अधिक उलाढाल एकट्या दुग्ध व्यवसायाची आहे. अर्थात याचे श्रेय देशातील ग्रामीण कष्टकरी शेतकरी, पशुधन विकास व्यवस्था व सातत्यपूर्ण शासकीय प्रयत्नांना जाते.

- Advertisement -

इतर विकसित देशांप्रमाणेच लहान आणि सीमांत शेतकरी हे भारतातील डेअरी क्षेत्राची प्रेरक शक्ती आहेत. शेतीचे घटते उत्पन्न आणि रोजगाराच्या संधी कमी होण्याच्या युगात दुग्धव्यवसाय आणि पशुसंवर्धन हे भारतातील शेतीचे एक महत्त्वाचे उपक्षेत्र म्हणून उदयास आले आहे. पुढे उद्योगातील सहकारी आणि खासगी संस्थांच्या पूरकतेने संपूर्ण मूल्य साखळीत कार्यक्षमता आणण्यास मदत केली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी, ग्राहकांची उच्च क्रयशक्ती, पोषणावर वाढलेला फोकस आणि ब्रँड नसलेल्या आणि लूज उत्पादनांसाठी वाढती अनास्था यामुळे भारतातील दुधाचे उत्पादन येत्या २५ वर्षांमध्ये अंदाजे ६० कोटी लिटरचा आकडा गाठणार आहे. आपल्या दुग्धोत्पादन क्षेत्राकडे पाहिले आणि आज हे क्षेत्र इतके मजबूत कसे झाले याचा विचार केला तर लक्षात येईल की या क्षेत्रामध्ये प्रक्रिया क्षेत्राचा खूप चांगला विस्तार झाला आहे. आपण सर्वजण जाणून आहेत की अन्न प्रक्रिया क्रांतीसाठी देशातल्या शेतकर्‍यांना बरोबर घेऊन देशातल्या सार्वजनिक-खासगी-सहकारी क्षेत्रालाही पूर्ण ताकदीने उभे राहून पुढे जाण्याच्या दिशेने काम केले पाहिजे.

निर्यात संधी आणि आव्हाने

देशातील दुग्ध व्यवसायाचे एकंदरीत चित्र जरी चांगले असले तरीही आज दुधाचे गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि निर्यातक्षम दुग्धजन्य उत्पादने याबाबत अनेक आव्हाने समोर आहेत. दुसरीकडे सरासरी उत्पादकतेच्या बाबतीतही आपण इतर देशांच्या तुलनेत मागे आहोत. आपल्याकडे दुधाळ गायींची संख्या सुमारे ३० कोटी असतानाही अमेरिका, न्यूझीलँड, इस्त्रायल व युरोपियन देशांमध्ये सरासरी उत्पादकता १५-२० लिटरपेक्षा अधिक असते. भारतात मात्र हे प्रमाण आजही ४ लिटरपर्यंतच आहे. भारतात उत्पादकतेच्या दृष्टीने अनुक्रमे उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र, गुजरात, पंजाब व महाराष्ट्र अशी क्रमवारी लागते, परंतु त्या त्या राज्यांमध्ये गुणवत्तेच्या बाबतीत लक्षणीय विविधता आहे.

तज्ज्ञांकडील आकडेवारीनुसार भविष्यात भारत सुमारे ६० कोटी लिटरपर्यंत दूध उत्पादन करू शकतो. त्यातून ५० कोटी लिटरची आपली देशांतर्गत गरज असणार आहे. म्हणजेच तब्बल १० कोटी लिटर अतिरिक्त दूध असताना निर्यातीच्या बाबतीत मोठी संधी उपलब्ध होईल, मात्र आंतरराष्ट्रीय गुणवत्ता निकषापर्यंत पोहचण्यासाठी आपणास भरीव कामगिरी करावी लागणार आहे. कारण आज एकूण उत्पादनापैकी केवळ १ टक्का दुधाचीच निर्यात होते. भारत हा जगातील सर्वात मोठा दुधाचा उत्पादक देश आहे, परंतु भारतीय दुधाची आंतरराष्ट्रीय खाद्य गुणवत्ता तुलनेने कमी आहे. जरी भारताने काही देशांना काही दुग्धजन्य पदार्थांची निर्यात केली असली तरी द्रव (कच्च्या) दुधाला आतापर्यंत जागतिक बाजारपेठ मिळू शकलेली नाही.

जागतिक स्तरावर प्रशंसनीय श्वेतक्रांतीमुळे भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला. भारतातील डेअरी क्षेत्रावर लहान दूध उत्पादकांचे वर्चस्व आहे, जे देशभरातील १.९० लाख डेअरी सहकारी संस्थांना दूध पुरवठा करतात, लाखो कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी आधार देतात, तथापि भारतातील डेअरी आणि दूध प्रक्रिया बाजारपेठेपैकी ८१ टक्के हा असंघटित क्षेत्राचा भाग आहे. बहुतेक राज्यांमध्ये दूध जतन, प्रक्रिया आणि वाहतुकीसाठी योग्य पायाभूत सुविधांचा अभाव आंतरराष्ट्रीय मानकांनुसार निर्यात करण्यायोग्य अतिरिक्त उत्पादन करण्याची क्षमता मर्यादित करते. एकंदरीत भारताच्या दूध व्यवसायाचे भवितव्य चांगले आहे. दुपटीच्या वृद्धीदराने हा व्यवसाय वाढत आहे. त्यामुळे भविष्यात या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत, मात्र गायींची उत्पादकता वाढवून व गुणवत्तापूर्ण दुधाची निर्मिती करणे हे आपले मुख्य लक्ष्य असायला हवे, जेणेकरून भारतीय बाजारपेठेसह परदेशातही निर्यातीद्वारे या व्यवसायाला मोठी प्रगती करता येईल.

–(लेखक संगमनेर तालुका सहकारी दूध संघाचे चेअरमन आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -