घरफिचर्ससारांशपर्यावरण रक्षण व्हावे ही श्रींची इच्छा!

पर्यावरण रक्षण व्हावे ही श्रींची इच्छा!

Subscribe

गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटाने गोंधळलेल्या समाजमनाने सगळे रितीरिवाज,परंपरा, सजावट, देखावे, शोभायात्रा या सगळ्यांना तिलांजली देत कोरोनासुरक्षेच्या नियमांचे पालन करीत अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव पार पाडला. यंदा परिस्थिती बदलल्याने सर्व नियमातील शिथिलता आणि निर्बंधमुक्ततेच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.

– दिलीप कोठावदे

गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटाने गोंधळलेल्या समाजमनाने सगळे रितीरिवाज,परंपरा, सजावट, देखावे, शोभायात्रा या सगळ्यांना तिलांजली देत कोरोनासुरक्षेच्या नियमांचे पालन करीत अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव पार पाडला. यंदा परिस्थिती बदलल्याने सर्व नियमातील शिथिलता आणि निर्बंधमुक्ततेच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे कोरोनामुळे एकलकोंडेपणाच्या गर्तेत अडकलेले तुम्ही-आम्ही सारेजण मुक्तपणे गणेशोत्सव साजरा करणार आहोत. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता किंवा त्यातून मुक्तता झाली असली तरी गणेशोत्सव व त्यानंतर येणारे नवरात्री, दसरा, दिवाळी यासारखे सर्वच सण-उत्सव साजरे करतांना व्यक्तिशः, कौटुंबिक, सामाजिक, पर्यावरण हित जोपासण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे, याचा विसर पडता कामा नये. कारण पर्यावरण रक्षण व्हावे ही श्रींची इच्छा आहे.

- Advertisement -

संपूर्ण भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवरील अनेक देशांमध्ये अतिशय जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जाणारा सण म्हणजेच गणेशोत्सव. गणपती ही विद्या आणि बुद्धीची देवता म्हणून ओळखली जाते. एवढेच नाही तर कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला गणेशाचीच पूजा केली जाते. याच गणपती बाप्पाचा दहा-बारा दिवसांचा गणेशोत्सव ही तर आबालवृद्धांसाठी मोठी पर्वणीच असते. गणेशोत्सवाच्या दिवसांत विविध सांस्कृतिक, मनोरंजन, देशभक्ती, समाजहितैशी कार्यक्रम केले जातात. शेवटच्या दिवशी वाजत गाजत मिरवणुकीने गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, च्या जयघोषात बाप्पाला निरोपही दिला जातो.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटाने गोंधळलेल्या समाजमनाने सगळे रितीरिवाज,परंपरा, सजावट, देखावे, शोभायात्रा या सगळ्यांना तिलांजली देत कोरोनासुरक्षेच्या नियमांचे पालन करीत अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव पार पाडला. यंदा परिस्थिती बदलल्याने सर्व नियमातील शिथिलता आणि निर्बंधमुक्ततेच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे कोरोनामुळे एकलकोंडेपणाच्या गर्तेत अडकलेले तुम्ही-आम्ही सारेजण मुक्तपणे गणेशोत्सव साजरा करणार आहोत. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता किंवा त्यातून मुक्तता झाली असली तरी गणेशोत्सव व त्यानंतर येणारे नवरात्री, दसरा, दिवाळी यासारखे सर्वच सण-उत्सव साजरे करतांना व्यक्तिशः, कौटुंबिक, सामाजिक, पर्यावरण हित जोपासण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे याचा विसर पडता कामा नये. कारण पर्यावरण रक्षण व्हावे ही श्रींची इच्छा आहे.

- Advertisement -

खरे तर सण साजरे करणे म्हणजे आनंदाची लयलूट, त्यातून पुन्हा त्रासदायक गोष्टी उद्भवणार असतील तर, आपण कुठे तर चुकतोय हे लक्षात घ्यायला हवं. म्हणून गणेशोत्सवाचा हा सण सर्वांसाठीच आनंदाचा, मांगल्याचा आणि महत्वाचा म्हणजे आरोग्यदायी असावा असे वाटत असेल तर, पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. गणेशाच्या मूर्तीची, घराची, मंडपाची सजवट करणे, रांगोळी काढणे, हे सगळे काही आपण किती आनंदाने करतो. पण, हेच करत असताना प्रत्येक गोष्ट नक्की पर्यावरण पूरक आहे का, याचा जरा विचार करायलाच हवा. किंबहुना ती भविष्यासाठी गरज आहे.

मग अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या केल्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचू शकते, अगदी छोट्या प्रामाणात असली तरी हानी ही हानीच असते, आणि प्रत्येकाने थोडी थोडी हानी पोहोचवली तर त्याचा अंतिम परिणाम मोठा होतो याचा थोडा विचार करूया, आणि आपल्याकडून पर्यावरणाची अत्यल्पशीही हानी होणार नाही याची काळजी घेऊया. जे गणपती घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी बसवले जातात ते मातीचेच असतात असे नाही. किंबहुना गणपतींच्या मूर्ती बनवण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो. जे पाण्यात लवकर विरघळत नाही, तसेच गणपती सोबत निर्माल्य आणि इतरही काही वस्तू पाण्यात सोडून दिल्या जातात, ज्या पाण्यात विरघळणार्‍या नसतात किंवा विरघळल्याच तर त्यातील हानिकारक रसायनांच्या प्रभावाने नदी-नाले, तलावांचे पाणी प्रदूषित होऊन त्याचा फटका मनुष्याबरोबरच पशु-पक्षी, प्राणी आणि पर्यावरणालाही बसतो. त्यातून रोगराई पसरण्याची किंवा आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता असते. या सगळ्या कृतीतून पर्यावरणाला पोहोचणारी हानी अक्षम्यच आहे. त्यामुळे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती निवडण्यावर भर द्यायला हवा.

घरी असो किंवा सार्वजनिक मंडळात असो आपण जी मूर्ती बसवणार आहोत ती रासायनिक पदार्थ, प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा चीनी मातीची नसेल याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. नैसर्गिक पद्धतीने बनवलेली आणि जे सहज नष्ट होईल अशा साहित्यापासून बनवलेली मूर्तीच बसावावी, त्यामुळे विसर्जनानंतर पाणी व पर्यावरण दूषित होण्याचा धोका कमी करता येईल. गणपतीच्या मूर्ती नदी, तलावात विसर्जित करून संपूर्ण जलस्त्रोत दूषित करण्याऐवजी विसर्जनासाठी तयार केलेल्या तात्पुरत्या हौदात किंवा घरगुती गणपती बादलीत बुडवले तरी चालतात. शक्यतो धातूच्या किंवा दगडापासून बनवलेल्या मूर्ती असतील तर, त्या अशा पद्धतीने बादलीत बुडवून, स्वच्छ पुसून पुन्हा पुढच्या वर्षीसाठी वापरता येऊ शकतात.

याशिवाय प्रतिकात्मक विसर्जनही करू शकता. गणपतीऐवजी सुपारी जरी पाण्यात बुडवली तरी विसर्जनाचा विधी पूर्ण होतो. त्यासाठी नद्या आणि तलाव प्रदूषित करण्याची गरज नाही. एक गाव एक गणपती या संकल्पने प्रमाणेच आपल्या गल्ली, कॉलनी, सोसायटीमध्येही एकच गणपती बसविण्याच्या संकल्पनेला प्राधान्य दिले पाहिजे. तसेच या गणपतींचा आकारदेखील अगदी मर्यादित असावा. कारण जितका मोठा गणपती तितके जास्त प्रदूषित घटक पाण्यात मिसळणार. स्वाभाविकपणे ते विरघळण्यासाठीदेखील जास्त वेळ/दिवस लागणार. थोडक्यात सांगायचे तर जेवढा मोठा गणपती तितकीच पर्यावरणाची हानी मोठी म्हणून गणपतींची संख्या आणि आकार दोन्ही मर्यादित असावे.

हिच गोष्ट सजावटीच्या बाबतीतही लागू होते. सजावटीशिवाय गणपती ही कल्पनाही अशक्यप्राय वाटते. मात्र सहज-सुलभपणे व कमी खर्चात उपलब्ध होणार्‍या प्लास्टिकच्या फुलांच्या माळा, चायनाच्या लायटिंग माळा, प्लास्टिकची फुले, गौरीचे मुखवटे, त्यांची आरास, अशा अनेक वस्तू आपण वापरत असतो, पण या वस्तू खराब झाल्यानंतर जेव्हा आपल्याकडून टाकून दिल्या जातात तेव्हा त्यातून आपण पर्यावरणाला हानी पोहोचवत आहोत हे आपल्या लक्षातही येत नाही. म्हणून गणपतीच्या किंवा गौरीच्या सजावटीसाठी वापरले जाणारे साहित्य हे नैसर्गिक स्वरूपाचे असेल याची काळजी घ्यायला हवी. विविध रंगांची फुले, पाने, पडदे, यापासून देखील आरास करता येऊ शकते, ज्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही. मंडप उभे करताना त्यांचा आकार व संख्या यावरही मर्यादेचे बंधन असावे.

एकाच भागात मोठमोठे मंडप उभे केल्याने वाहतुकीचाही प्रश्न निर्माण होतो. शिवाय मोठी सजावट किंवा मोठा मंडप, तेवढा विजेचा वापरही जास्त होतो. मंडप किंवा घरातील सजावट करताना वापरलेले लाईट, लायटिंग फक्त पूजेच्या आणि आरतीच्या वेळी तसेच गरज असेल तेव्हाच लावले तर विजेची बचत होऊ शकते. सार्वजनिक ठिकाणी तर संपूर्ण गल्लीला किंवा रस्त्याच्या दुतर्फा लाईटिंग केली जाते. बर्‍याचवेळा ही लाईट रात्ररात्र भर सुरू राहते. अशा गोष्टी जितक्या टाळता येतील तितके चांगले!

याचबरोबर लाऊडस्पीकर, डीजे यांचा गणेशोत्सवातील वापर अविभाज्य झाला असला तरी इतरांना त्रास होईल अशा पद्धतीने मोठमोठ्या आवाजात गाणी, वाद्य वाजवणे टाळण्याचा प्रयत्न करायला हवा. लाउडस्पीकर्समुळे आजूबाजूच्या परिसरातील दवाखाने, शाळा, अभ्यासिका, वाचनालये, जेष्ठ नागरिक, रुग्ण,लहान बाळे, हृदयविकाराचे रुग्ण यांना त्रास होऊ शकतो. त्यासाठी आवाजावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यामुळे प्रदूषणाची तीव्रता नियंत्रणात ठेवणेही शक्य होऊ शकेल.

रांगोळी हा गणपती सजवटीचाच एक प्रमुख भाग झाला आहे. किंबहुना गणपतीपुढील भल्या मोठ्या रांगोळ्या आकर्षणाचे केंद्र ठरू लागल्या आहेत. यातून रांगोळी कलाकारांना मिळणारे प्रोत्साहन ही जमेची बाजू असली तरी अलीकडच्या काळात रांगोळी काढताना वापरले जाणारे रंग,रंगीत रांगोळी,हे सर्वच रासायनिक प्रक्रियेतून तयार झालेले असतात. रांगोळी पुसल्यानंतर रंग मिश्रित रांगोळी इतस्ततः फेकताना त्यामुळे होणारे परिणाम आपल्या लक्षातही येत नाहीत. म्हणूनच रांगोळीसाठीही हळद, मेहंदी, तांदळाचे पीठ, गुलाल यासारख्या नैसर्गिक रंगांचा वापर करून बघा. असे रंग पर्यावरणाला किंवा मानवी आरोग्यासाठी देखील हानिकारक नसतात.

सार्वजनिक ठिकाणच्या गणपतीच्या दर्शनाला जाताना, प्रसाद, लाडू, फुले, अगरबत्ती अशा कितीतरी गोष्टी प्लास्टिकच्या पिशवीतून नेल्या किंवा दिल्या जातात. एकदा का हे सगळं देवाचरणी अर्पण केलं की, या पिशव्या आपल्याकडून अगदी सहजपणे हव्या तिथे टाकून दिल्या जातात. आपल्या या कृतीतून आपण पर्यावरणाला हानी पोहोचवत आहोत याची सुतरामही कल्पना आपल्याला नसते, ना त्याबद्दल कसली खंत. अगदी घरातील निर्माल्यदेखील आपण प्लास्टिक पिशवीतून नदीत टाकून देतो. हे खरोखरच धोकादायक आहे. त्यासाठी प्लास्टिक वापरावर आपण स्वयंस्फूर्तीने पूर्णतः बंदी घातली पाहिजे. यासाठी स्वतःबरोबरच इतरांनाही प्रेरित करायला हवे.

गणेश विसर्जनानंतर निर्माल्य नदीत न टाकता आपल्या घराजवळ, बागेत एक खड्डा खणून त्यामध्ये पुरुन ठेवल्यास त्याचे चांगले खत बनू शकते. ज्यांना बागकामाची आवड आहे किंवा ज्यांच्याकडे झाडे व जागा आहे त्यांनी विसर्जनाला येणार्‍या लोकांकडून असे निर्माल्य घेऊन त्याचा वापर कंपोस्ट खत बनविण्यासाठी केला तर ही पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने मोठी कामगिरी ठरेल. सण आणि उत्सवाचा आनंद लुटत असताना पर्यावरण आणि निसर्गाची हानी होणार नाही याची कटाक्षाने दक्षता घेणे गरजेचे आहे, तरच या सणातील पावित्र्य आणि मांगल्य टिकून राहील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -